देवळाली आणि नाशिक पूर्व या दोन मतदारसंघातील मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी रात्री आयोजित प्रचार सभा निर्धारित वेळेनंतरही सुरू राहिल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सिडको, गंगापूररोड आणि जेलरोड या तीन ठिकाणी राज ठाकरे यांच्या प्रचार सभा झाल्या. सिडको येथील पहिली सभाच निर्धारित वेळेपेक्षा उशीरा सुरू झाल्याने पुढील दोन्ही सभांना उशीर होत गेला. जेलरोड येथील सभास्थानी राज हे दहा वाजेला दोन मिनिटे बाकी असताना पोहोचले. लगेचच त्यांनी भाषणास सुरूवात केली. सुमारे २५ मिनिटे त्यांचे भाषण सुरू होते. आदर्श आचारसंहितेनुसार रात्री दहा वाजेपर्यंत भाषण संपविणे आवश्यक होते. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश जाधव यांनी ठाकरे यांच्याविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाची तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा