एकीकडे राज्यातील आघाडी शासनावरील भ्रष्टाचाराचे आरोप, निष्क्रिय कारभार, आघाडी व पक्षांतर्गत झालेली फाटाफूट आणि त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिलेल्या समर्थ पर्यायामुळे खुद्द पश्चिम महाराष्ट्राच्या बालेकिल्ल्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजप व शिवसेनेचे वाढलेले प्राबल्य पाहावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामती, पिंपरी, सांगली येथे घेतलेल्या सभा, त्यामुळे निर्माण झालेला सुप्त लाट, त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादीमधील उचललेले मातब्बर उमेदवार यामुळे भाजपला या पट्टय़ात आपले बळ वाढवणे शक्य झाले. पुणे शहरात भाजपने मिळवलेल्या आठपैकी आठ जागा, काँग्रेसचा कोल्हापुरात सर्व जागांवरील पराभव हे याचेच परिणाम पाहायला मिळाले. राष्ट्रवादीने सोलापूर व सातारा जिल्हयात इतर पक्षांना मागे टाकत आपले अस्तित्व टिकविले. मात्र, पुढच्या काळात या पट्टय़ात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आता भाजप, शिवसेनेच्या वर्चस्वाला तोंड द्यावे लागणार आहे.
प. महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने आपला राजकीय दबदबा कैक वष्रे कायम ठेवला होता. लोकसभेच्या पाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सहकार पट्टय़ातील नेतृत्वाची खुमखुमी थंडावली आहे. या पक्षांनी इतकी वर्षे मतदारांना गृहीत धरले होते. त्याचबरोबर भ्रष्टाचाराचे आरोप आणि निष्क्रि य कारभाराचा परिणाम यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधात  आधीच नाराजी होती. प्रस्थापितांविरुद्ध शिवसेनेच्या झेंडय़ाखाली काही ठिकाणी यश मिळाले. मात्र, नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक आणि आताच्या निवडणुकीने मोदींच्या रूपात एक समर्थ पर्याय उपलब्ध झाला. त्यामुळेच आता मतदारांनी भाजपवर विश्वास टाकला. शिवसेनेनेही या नाराजीचा फायदा उठविला. पवार कुटुंबीयांच्या पुणे जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसला २१ पैकी केवळ तीन जागा मिळाल्या. शिवसेनेने तितक्याच जागा पटकावल्या, तर भाजप आघाडीने १२ जागा खिशात टाकल्या. यावरून ही मुसंडी किती मोठय़ा प्रमाणात आहे याचा अंदाज येतो.
काँग्रेस पक्षाला तर या पट्टय़ात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कोल्हापुरात खातेही न उघडलेल्या काँग्रेसला सांगलीत डॉ. पतंगराव कदम यांच्या रूपाने आपली इज्जत कशीबशी राखता आली आहे. साताऱ्यात दोन, तर सोलापूरात तीन जागांवर काँग्रेसने विजय मिळवला असला तरी अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करणे भाग पडणार आहे. विशेषत: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील मागील दाराने येणारा लोकप्रतिनिधी, ही टीका थांबणार असली तरी त्यांनाच एकहाती पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला बळकटी आणण्यासाठी कार्यरत राहावे लागणार आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसह प्रमुख संस्थांवर विलासकाका उंडाळकर यांच्या वर्चस्वाला शह देण्यामुळे बाबा-काका यांच्यातील संघर्ष उफाळणार आहे.
सोलापूर व सांगली जिल्हयात भाजपाला यश मिळाल्यामुळे या जिल्हयात मंत्रिपद कोणाकडे राहणार हा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. सांगली जिल्हयात भाजप हा सर्वात प्रबळ पक्ष बनला आहे. स्थानिक पातळीवरील काँगेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाला धक्का देण्याचे काम भाजपापुढील काळात करीत राहील असे दिसते. सातारा व सोलापूर जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेसने गड राखण्याचा प्रयत्न केला आहे. एक जागा गमावली असली तरी पाच जागांवर विजय मिळवला असलेने पवार काका-पुतण्यांचे बारीक लक्ष असेल.
 सोलापुरात सर्वाधिक राहील. जागा राष्ट्रवादीने पटकावल्या आहेत. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या छुप्या पाठिंब्याने शिवसेना, काँग्रेस व शेकापचा एक उमेदवार विजयी झाल्याची चर्चा रंगली आहे. हे यश मोहिते पाटलांची शक्ती वाढण्यास कारणीभूत ठरेल.

Story img Loader