भाजपचे लक्ष्य काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच असून शिवसेना नाही, असे स्पष्ट करून शिवसेनेसोबतची युती तुटण्यास कारणीभूत व्हिलन कोण, हे जनताच ठरवेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस रविवारी पत्रकार परिषदेत म्हणाले. बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या सुलेखा कुंभारे यांनी भाजपला सक्रिय पाठिंबा व्यक्त केला. त्यांचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्वागत केले.
आमचे लक्ष्य काँग्रेस व राष्ट्रवादीच असून शिवसेना नाही. भाषा, प्रांत, धर्म हे निवडणुकीचे मुद्देच नाहीत. सुशासन व विकास हेच मुद्दे आहेत. भ्रष्ट काँग्रेस व राष्ट्रवादीचा पराभव करण्याचे आव्हान असल्याने शिवसेनेच्या टीकेला उत्तर देण्यास वेळ नाही. शिवसेनेसोबतची युती तुटण्यास व्हिलन कोण, हे जनताच ठरवेल. भाजपने बाहेरून घेतलेल्यांचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमीच असून लंका दहनासाठी विभिषणांची गरज असल्यानेच केवळ इतर पक्षांच्या नेत्यांना भाजपमध्ये घेतले आहे, असे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
एकाच पक्षाच्या हाती सत्ता देण्याची जनभावना असून ते सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. रामदास आठवले यांच्या पक्षाला सत्तेत दहा टक्के वाटा देणार असून केवळ तेच नाहीत, तर रिपब्लिकन पक्षालाही सत्तेत सहभागी करून घेतले जाणार आहे. तेलंगणा निर्मिती झाली तशी नाही, तर कुठलीही अडचण न येऊ देता छोटे राज्य झाले पाहिजे, अशी पक्षाची भावना आहे. त्यामुळे ‘आगे आगे देखो होता है क्या’, असे सूचक उद्गार फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भाबाबत विचारलेल्या प्रश्नावर काढले. अनिल गोटे यांच्यावर झालेल्या आरोपांचा स्वत: अभ्यास केला असून हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्यांच्यावर केलेले आरोप राजकीयदृष्टय़ा केले गेले असल्याचे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
सुधाकर कोहळे, चंद्रशेखर बावनकुळे, समीर मेघे, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, सोनबा मुसळे, आशिष देशमुख, सुधाकर देशमुख, सुधीर पारवे, द्वाराम मल्लिकार्जुन रामा रेड्डी हे नागपूर जिल्ह्य़ातील उमेदवार, तसेच ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, गिरीश गांधी, डॉ. राजीव पोद्दार बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या सुलेखा कुंभारे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
भाजपला विनाअट पाठिंबा -सुलेखा कुंभारे
बहुजन रिपब्लिकन एकता मंचने विनाअट भाजपस सक्रिय पाठिंबा दिला असल्याचे सुलेखा कुंभारे यांनी स्पष्ट केले. गेल्या वेळेस कामठीत त्यांचा केवळ काही मतांनी पराभव झाला होता. त्यापूर्वी, दक्षिण नागपुरात चांगले मतदान झाले होते. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. आता विधानसभा निवडणुकीत कामठी, उमरेडसह पाच जागा देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. अखेरच्या क्षणी मात्र काँग्रेसने उमेदवार उभे करून विश्वासघात केल्याचा आरोप सुलेखा कुंभारे यांनी आज केला. केवळ नितीन गडकरी यांच्या मैत्रीखातर भाजपला विनाअट पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून त्यात कुठलाही संकोच वाटत नाही. गडकरी व फडणवीस हे ‘व्हिजन’ असलेले नेते आहेत. विकासाच्या मुद्दय़ावर कुठलेही मतभेद नाहीत. मात्र, स्वतंत्र विदर्भाचे स्वप्न भाजप पूर्ण करेल, अशी अपेक्षा कुंभारे यांनी व्यक्त केली.
युती तोडणारे खलनायक कोण, ते जनता ठरवेल
भाजपचे लक्ष्य काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच असून शिवसेना नाही, असे स्पष्ट करून शिवसेनेसोबतची युती तुटण्यास कारणीभूत व्हिलन कोण, हे जनताच ठरवेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस रविवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.
![युती तोडणारे खलनायक कोण, ते जनता ठरवेल](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/09/devendra-fadnavis1.jpg?w=1024)
First published on: 29-09-2014 at 03:26 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voters will decide who is villain in breaking alliance devendra fadnavis