साहेबांकडून ‘हिरवा’ कंदील मिळताच संजयभाऊंनी नोकराला खूण केली. एक मोठ्ठे पिंप घेऊन नोकर दरवाजाशी आला. ते जिवाच्या आकांतानं उचललं आणि तो खाली आला. समोर गाडी उभीच होती. खांद्यावरचं पिंपाचं ओझं खाली ठेवून नोकरानं कपाळावरचा घाम पुसला. ड्रायव्हरनं डिक्की उघडली आणि दोघांनी मिळून ते पिंप डिक्कीत ठेवलं.
पाच-दहा मिनिटांत संजयभाऊ खाली उतरले, आणि गाडीत बसले. ड्रायव्हरनं ‘स्टार्टर’ मारला आणि मागे वळून बघितलं.
‘दादर’.. चष्मा पुसून डोळ्यावर चढवत आणि हातातली फाइल चाळत ड्रायव्हरकडे न बघताच संजयभाऊ म्हणाले. गाडी सुरू झाली.
दादर जवळ आल्यावर ड्रायव्हरने पुन्हा मागे वळून बघितलं.
‘वसंत स्मृती’.. फायली चाळतच संजयभाऊंनी पुन्हा ड्रायव्हरला सांगितलं.
पाच-दहा मिनिटांत गाडी थांबली. संजयभाऊ घाईघाईनं खाली उतरले.
तेवढय़ात अनिलभाऊ, सुभाषबाबूही दाखल झाले. विनोदराव, सुधीरभाऊ, नाथाभाऊ खाली आले. गेटातच नमस्काराचा उपचार पार पडला आणि सारे हसतमुखाने बैठकीच्या खोलीत शिरले.
..बाहेर च्यानेलांची लगबग सुरू झाली होती.
‘गेले आठवडाभर लांबलेलं चर्चेचं गुऱ्हाळ आता संपुष्टात येणार असून वाटपाचं भिजत घोंगडं आता काही वेळातच वाळत घातलं जाणार आहे’.. एका च्यानेलवर अँकरनं कार्यक्रमाला सुरुवातही केली होती.
बैठकीच्या खोलीतील अनौपचारिक चर्चा संपली. सर्वानी एकमेकांचे हात हातात घेतले. परस्परांच्या अभिनंदनाचा कार्यक्रम झाला आणि संजयभाऊ व विनोदरावांनी बाहेर येऊन अखेर ती वार्ता माध्यमांना सांगून टाकली.
काही वेळ प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला आणि पुन्हा च्यानेलवाल्यांची कॉमेंट्री सुरू झाली.
‘युती अभंगच, महायुती मात्र टांगणीवर’.. कुणीतरी नवे विश्लेषण सुरू केले होते. दुसऱ्या चॅनेलवर ‘आयजीच्या जिवावर’ अशा मथळ्याखाली चर्चासत्र सुरू झाले होते, तर कुणी ‘महायुतीचे हेल्थ बुलेटिन’ तयार करून वाचायला सुरुवात केली होती.
‘आयसीयूचा पेशंट सकाळपासून उपचाराला प्रतिसाद देऊ लागला असल्याने जीविताचा धोका टळला नसला तरी प्रकृतीत थोडी सुधारणा असल्याने पेशंट वाचण्याची शक्यता जी आहे, ती वाढली आहे.. पुढील हेल्थ बुलेटिन थेट रिकव्हरी रूममधूनच जाहीर करण्यात येईल!’..
.. च्यानेलांची अशी धांदल सुरू असतानाच, गाडीतलं ते पिंप गुपचूप बैठकीच्या खोलीत गेलं होतं.
विनोदराव आणि संजयभाऊंनी त्याचं झाकण उघडलं, आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
पाण्यानं निथळणारं एक घोंगडं बाहेर काढून विनोदराव आणि संजयभाऊंनी त्याच्या दोन बाजू हाती धरल्या आणि एकमेकांसमोर उभे राहून त्यांनी ते घोंगडं पिळून काढलं.
बैठकीच्या खोलीबाहेर गॅलरीत ते वाळत घातलं आणि दोघांनीही हात झटकले.
‘चला, नंतर एकदा वाराणसीला जाऊन येऊ’.. विनोदरावांनी विनोद केला, आणि साऱ्यांच्या भुवया उंचावल्या.
‘घोडं गंगेत न्हालं पाहिजे ना’.. विनोदराव म्हणाले, आणि सगळा तणाव दूर झाल्यासारखे सारेजण हास्याच्या खळखळाटात न्हाऊन गेले..   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: When sanjay raut go for alliance talk with bjp