गेल्या २५ वर्षांपासून अस्तित्वात असलेली युती तुटल्यानंतर शिवसेनेच्या केंद्रातील भूमिकेकडे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कटुता टाळून युती तोडण्याची घोषणा केली असली तरी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते पदाचा राजीनामा देऊन केंद्रातील भाजप-सेना संबंध संपुष्टात आणणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीत सुरू आहे. प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असल्याने गिते राजीनामा कुणाकडे सोपवतील, असा प्रश्न खुद्द शिवसेना नेते विचारत आहेत.
मोदी सरकारच्या शंभर दिवसांच्या पाश्र्वभूमीवर आपल्या विभागाची माहिती देण्यासाठी अनंत गिते यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित केली होती. भाजप-सेना युती तुटली असली तरीही आपण मंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युती विधानसभेत तुटली, परंतु लोकसभेत नाही, असे सूचक विधान करून गिते यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना बगल दिली.
दरम्यान, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्यासंदर्भात कोणताही आदेश दिला नसल्याचे गीते यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. मात्र नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असल्याने तांत्रिकदृष्टय़ा गिते राजीनामा देऊ शकणार नाहीत. राजीनामा द्यावयाचा असल्यात तो पंतप्रधानांकडेच द्यावा लागेल. पंतप्रधान त्यावर अंतिम निर्णय घेतील. परंतु पंतप्रधान अमेरिका दौऱ्यावर असल्याने गितेंची कोंडी झाली आहे. शिवाय कार्यालयात जाणे बंद केल्यास दिल्लीकर प्रसारमाध्यमे कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील. त्यामुळे गिते गुरुवारी तडक मुंबईला रवाना झाले.
दर बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक असते. पुढील आठवडय़ातील बैठकीत गिते यांच्या अखत्यारीत असलेल्या खात्याशी संबंधित महत्त्वाचा निर्णय होणार आहे. या बैठकीस गिते उपस्थित राहणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सद्य:स्थितीत गिते यांनी राजीनामा दिलेला नाही, परंतु कामकाज थांबवले आहे. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत गिते यांना ही तुमची शेवटची पत्रकार परिषद आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गिते यांनी मी पदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेच्या वाटय़ाला आलेल्या ‘अवजड’ खात्याचे ओझे वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्या वाटय़ाला आलेल्या खात्यामुळे आम्ही नाराज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
क्रमांक दोनचा पक्ष
लोकसभेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शिवसेना हा क्रमांक दोनचा पक्ष आहे. या आघाडीत भाजपचे २८३, शिवसेनेचे १८ तर तेलुगू देसमचे १६ खासदार आहेत.