बहुमताचे उटणे लावून भाजप पहिली दिवाळी पहाट साजरी करेल की शिवसेनेचा भगवा कंदील विधानभवनावर झळकेल की मंत्रालयाच्या दारात युतीची रांगोळी काढली जाईल.. काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिवाळे कितपत निघेल.. मनसेचा आपटीबार फुसका ठरेल की महाराष्ट्र हादरवेल..छोटय़ा छोटय़ा पक्षांचा तडतडाट किती प्रभावी ठरेल, अशा सगळय़ा प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्रातील जनतेला आज, रविवारी मिळतील. दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली असली तरी लोकशाहीचा खरा दिवाळसण रविवारीच साजरा होणार आहे.
 राज्यात तीन दशकांनंतर प्रथमच विधानसभा निवडणूक पंचरंगी होती. तेव्हापासून सुरू झालेल्या विविध मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरेल अशी भाकिते केली आहेत. शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरून सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे संकेतही या चाचण्यांनी दिले आहेत. मात्र, गेल्या चार दिवसांत विविध प्रसारमाध्यमे, वृत्तसंस्था, गोपनीय अहवाल, पक्षांचे अंदाज यांतून इतके आकडे फिरत आहेत की, नेमके काय होणार याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अर्थात, राज्यातील सत्तेच्या स्पर्धेत काँग्रेस-राष्ट्रवादी नसतील, याबाबत अनेकांचे एकमत आहे.
मतदानोत्तर चाचण्यांनी भाजप सर्वाधिक जागा जिंकेल, असा अंदाज वर्तवला असला तरी विधानसभा त्रिशंकू असेल, असेही भाकीत मांडले आहे. या अंदाजाप्रमाणे निकाल लागल्यास निवडणुकीपुरते संपलेले युती-आघाडीचे पर्व पुन्हा येण्याची शक्यता आहे. दरम्यान, निकाल ‘एन्जॉय’ करण्याचे बेत शिजू लागले आहेत. पुढील पाच वर्षे कोणाची सत्ता राज्यावर चालेल याचे उत्तर देऊन रविवारचा सूर्य मावळतीला जाईल. त्यानंतर सुरू होईल सत्तास्थापनेची गणिते, मतदारराजाही दिवाळी साजरी करायला मोकळा असेल..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा