देशातील तरुणाईचा सध्याचा सर्वात लाडका लेखक चेतन भगत आणि महाराष्ट्रातील भाजपचे तरुण नेते देवेंद्र फडणवीस शनिवारी एकाच व्यासपीठावर आले. निमित्त होते देशाचे भवितव्य आणि तरुणांच्या सहभागाबाबतच्या चर्चासत्राचे. फडणवीस यांनी देशाचे चित्र पालटण्यासाठी तरुणांचा राजकारणातील सहभाग गरजेचा असल्याचे सांगत तरुणाईला राजकारणात येण्याची साद घातली, तर आगामी विधानसभा निवडणुकीत सजगपणे मतदान करा, असे सांगत चेतन भगत यांनी तरुणांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले.
‘विवेकानंद एज्युकेशन सोसायटी’मध्ये ‘भारताचे भवितव्य तरुणांच्या हाती’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तरुणांना मतदानाबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पार पडलेल्या या चर्चासत्रात देवेंद्र फडणवीस, चेतन भगत यांच्याबरोबर शायना एन. सी. यांचा सहभाग होता. या चर्चासत्रात महाराष्ट्रातील तरुणांना भेडसावणाऱ्या शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा, भ्रष्टाचार अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
भ्रष्टाचार आणि नेत्यांचा भ्रष्ट कारभार ही महाराष्ट्रापुढील गंभीर समस्या असल्याचे मान्य करताना, त्याच्या विळख्यातून महाराष्ट्राला मुक्त करायचे असल्यास तरुणांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सामाजिक आणि आर्थिक बदल आणायचे असल्यास राजकीय क्षेत्र हे एक उत्तम माध्यम आहे. आपल्याकडे अनेक भ्रष्ट नेते आहेत, हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. राजकारणी म्हणजे खलनायकी प्रवृत्तीची माणसे असे एक चित्र तरुणांपुढे तयार केले गेले आहे. पण हे चित्र बदलायचे असेल, तर मात्र तरुणांनी स्वत: राजकारणात येणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा