‘‘आ णि या ब्लॉकबस्टरने शंभर ट्रिलियन गॅलक्टिक डॉलर्सची कमाई केलीच पाहिजे!’’ मिस्मी हातातलं बाड टेबलवर आपटत म्हणाली, ‘‘काय स्पेशल इफेक्ट्स, साऊण्ड इफेक्ट्स, फोर-डी, सिक्स-डी.. जे लागेल ते घाला. काय?’’
‘‘बरं..’’ प्रलीनने सावध पवित्रा घेतला.
‘‘तू आतापर्यंत चार ब्लॉकबस्टर्स दिलेस, होय ना?’’ तिने आपलं संपर्कयंत्र उघडत विचारलं.
‘‘हो.’’
‘‘आता आमच्या स्टुडिओकडे हा नवा चित्रपट डायरेक्ट करणार आहेस. तेव्हा त्या चारांच्या वरचढ कमाई व्हायला हवी. काय?’’ तिने आपलं ठेवणीतलं स्मित त्याच्याकडे फेकलं आणि दोन-चार मेसेजेसना भराभर उत्तरं दिली.
‘‘बरं, विषय कोणता?’’ बोलता बोलता तो पाय हलवायला लागला. जरासं टेन्शन आलं की असे पाय हलवायला बरं वाटायचं त्याला.
‘‘विषय? राइट! ते करूच. पण कास्टिंग परफेक्ट व्हायला हवं. हीरो कोण घ्यायचा?’’
‘‘शंभर ट्रिलियन म्हणतेस तर सगळ्यात मोठं मार्केटच टार्गेट करायला लागेल.’’
‘‘उघडच आहे. आणि ते मार्केट पृथ्वीचं आहे.. करेक्ट?’’ मिस्मी अजूनही आपले निळेशार डोळे संपर्कयंत्रावर रोखून होती.
‘‘हो. पण मी तिथल्या प्रेक्षकांसाठी अजून तरी एकही चित्रपट केलेला नाही.’’
‘‘मग हा करतोयस की!’’ खुर्चीत मागे रेलत ती त्याच्याकडे बघत म्हणाली, ‘‘आणि हीरो म्हणून मग तिथला सध्याचा सुपरस्टार घेऊ.’’
‘‘मिस्मी, पृथ्वी म्हणजे एक अजब ग्रह आहे. इतर ग्रहांसारखी एकच भाषा नि एकच प्रांत नाही तिथे. बरं, त्यांची संस्कृती पण पार वेगवेगळी असते. तू आता अमेरिकन सुपरस्टार घेणार की चिनी, की भारतीय?’’
‘‘या तीन तिथल्या मोठय़ा टेरिटरीज का?’’
‘‘हो. मोठय़ा आणि खात्रीच्या.’’
‘‘ठीक आहे. तर मग तीन हीरो घेऊ. काय?’’ तिने खुशीत मान हलवली.
‘‘पण मग बाकीच्या ग्रहांचं काय?’’ प्रलीन प्रयत्नपूर्वक म्हणाला.
‘‘हं. मग असं करू- तीन प्रांत म्हणालास ना? मग पृथ्वीवरच्या एका प्रांतातला नायक, एका प्रांतातली नायिका आणि तिसऱ्या प्रांतातला खलनायक. ओके?
‘‘नॉट ओके. बाकीच्या ग्रहांवरच्या सुपरस्टार्सचं काय करायचं?’’
‘‘गेस्ट रोल्स द्यायचे!’’ तिने आपले हात हवेत उडवून प्रश्न सोडवून टाकला.
‘‘तेवढय़ाने भागेल?’’
‘‘त्या- त्या ग्रहावर रिलीज करताना त्यांचे कोण मोठे स्टार्स असतील त्यांना डब करायला सांगू की!’’ मिस्मीचं उत्तर तयार होतं.
‘‘हूं. ते ठीक होईल. पण त्या भारतीयांना गाणी आणि डान्स लागतात- म्हणजे त्यांची नायिका घ्यायला लागेल. आणि तिच्या ड्रेसेसचं बजेट ठेवायला लागेल प्रचंड.’’
‘‘चालेल. पैशांचा प्रश्न नाही.’’
‘‘आणि वेगवेगळ्या ग्रहांवर गाण्यांचं लोकेशन शूटिंग.’’
‘‘डन. आपल्याकडे इतके विविध लोकेशन्स आहेत इतक्या वेगवेगळ्या ग्रहांवर. जांभळे पर्वत, लाल झरे, गर्द निळे बीचेस, काळ्या वाळूच्या टेकडय़ा.. आपल्याला काय कमी? मग नायक अमेरिकन घ्यायचा का?’’
‘‘तसा कॉम्बो झालाय आधी. त्यापेक्षा नायक चिनी घेऊ. पण नको- थांब, त्यांचे मार्शल आर्ट्स आणि भारतीय नायिकेची नाचगाणी- दीड तास पुरायचा नाही.’’
‘‘मार्शल आर्ट्स?’’
‘‘हो. म्हणजे मारामारीच असते एक प्रकारची; पण आर्टिस्टिक अशी.’’
‘‘चालेल की. नवीन होईल प्रकार.’’
‘‘नवीन आपल्याला. तिथे तो बराच जुना झालाय. पण अजूनही तिथल्या लोकांना लागतो. शिवाय तिकडे अमेरिकन्सना विनोद हवा असतो.’’
‘‘विनोद? यू मीन जोक्स?’’
‘‘लाइट ह्य़ुमर. विशेषत: खलनायक असेल तर त्याला ते लागेलच. या स्क्रिप्टमध्ये कसं घालायचं ते बघू नंतर.’’
‘‘स्क्रिप्ट?’’ मिस्मी गोंधळली.
‘‘ते आता टेबलवर टाकलंस ते स्क्रिप्टच आहे ना?’’
‘‘छे! छे! स्क्रिप्ट एवढय़ात कुठे! आधी कास्टिंग! आणि हे म्हणशील तर गेल्या महिन्यातल्या ब्लॉकबस्टर सिनेमांच्या कमाईचे रिपोर्ट्स आहेत ते!’’
प्रलीन थक्क झाला.
‘‘मला वाटलं, चर्चेला बोलावलंस ते स्क्रिप्ट तयार असेल म्हणून.’’
मिस्मीने पोटभर हसून घेतलं. ‘‘मजाच करतोस की. ब्लॉकबस्टर सिनेमांना कधी स्क्रिप्ट आधी लिहितात का? बाकीचे सगळे एलिमेंट्स फिट झाले की मग स्क्रिप्ट. ते पण त्या- त्या अभिनेत्यांच्या गरजेनुसार.’’
‘‘माझ्या सगळ्या चित्रपटांना मी कथा, पटकथा, संवाद आधी करतो. बाऊंड स्क्रिप्ट सगळ्यांना देतो. तेही पूर्ण तयारी करून येतात. आयत्या वेळेला थोडे बदल होतात, नाही असं नाही. पण..’’
‘‘चल, यावेळी माझ्या पद्धतीनुसार करूया. काय?’’
प्रलीन गडबडला. त्याचे आधीचे चित्रपट केवळ प्रेक्षकांनी नाही, तर समीक्षकांनीदेखील उचलून धरले होते. आता मिस्मीची ही तऱ्हा असेल तर त्याच्या नव्या चित्रपटाला त्याच समीक्षकांनी धुळीला मिळवलं असतं!
‘‘कसं आहे मिस्मी, हा ग्रह अलीकडेच आपण शोधून काढला आहे. त्याच्या खाचाखोचा अजून तितक्याशा माहीत नाहीत आपल्याला. मीही प्राथमिक अभ्यास फक्त केला आहे. फक्त त्यांच्या लोकसंख्येमुळे ते एक मोठं मार्केट ठरतं म्हणून. आपल्याला त्यांच्या आवडीनिवडींबद्दल खूप बारकाईने माहीत नाही.’’
‘‘बरं मग?’’
‘‘तर मग पृथ्वीवरचा एखादा लेखक घेऊयात का? तो सुचवेल आपल्याला काही कल्पना.. म्हणजे पृथ्वीवासीयांना अपील होतील अशा.’’
‘‘लेखक?’’ मिस्मीच्या कपाळसदृश भागाला आठय़ा पडल्या. ‘‘ब्लॉकबस्टरना स्पेशल लेखक नाही लागत. आमची एक फौज आहे ती लिहील. फार फार तर एक कन्सल्टंट घेऊ पृथ्वीवरचा. असं करू- तिथला अलीकडचा सुपरहिट् चित्रपट बघू आणि त्या चित्रपटाचा कोणीतरी एकजण घेऊ सल्ले द्यायला. काय?’’
प्रलीनचा नाइलाज झाला.
‘‘शिवाय असून असून काय वेगळं असणार? प्रेम असेल, सूड असेल. एखादा भाऊ नाहीतर बहीण असेल, मुख्य म्हणजे आई असेल-’’
‘‘असं नाही. अनाथ कॅरक्टर पण असू शकतं.’’ प्रलीन उत्स्फूर्तपणे म्हणाला.
‘‘ग्रेट! अनाथ एलिमेंट मस्त होईल!’’
‘‘मग नायक अनाथ दाखवूयात?’’
‘‘पण मग प्रेमात खडा कोण घालणार? सासू-टाईप कॅरॅक्टर हवंच! नायिका अनाथ आणि तिला लहानपणापासून सांभाळणारी एक गरीब बाई.’’
‘‘चालेल. मग शेवटी नायिका मूळची श्रीमंत घरातली दाखवली की त्यांच्या कष्टाचं आणि त्यागाचं फलितबिलित पण होईल.’’ आपल्याच कल्पनेवर खूश होऊन प्रलीन पुन्हा पाय हलवायला लागला.
‘‘आता कसं बोललास!’’ मिस्मीने त्याच्याकडे कौतुकभरले कटाक्ष टाकले. ‘‘बरं, त्या तिन्ही प्रांतांतले सण.. त्यांची काय माहिती आहे?’’
‘‘सण? ते कशाला?’’ प्रलीन बावचळला.
‘‘अरे, चित्रपटात सण आले ना, की कसं उत्सवी वातावरण दाखवता येतं. शिवाय सणाचे गेस्ट्स म्हणून ते गेस्ट रोलवाले आणता येतात. अगदी नटूनथटून. तेही खूश, आपणही खूश. थट्टामस्करी पण करून घेता येते. आणि हो- प्रॉडक्ट प्लेसमेंटला पण चान्स मिळतो. आमचे मार्केटिंगवाले पृथ्वीवरच्या आणि त्या- त्या प्रांतातल्या कंपन्यांशी बोलून फिक्स करतील.’’
प्रलीनच्या विस्फारलेल्या पिवळ्या डोळ्यांकडे पाहत तिने समारोप केला. ‘‘लेट्स डू माय वे. चल, तुझ्या सहकाऱ्यांशी बोल आणि कास्टिंग, लोकेशन्स, स्पेशल इफेक्ट्स, म्युझिकबघायला घे.’’
‘‘पण स्क्रिप्ट? आणि लेखक कोण?’’
चर्चा संपली दाखवत दरवाजाबाहेर पडत मिस्मीने अनुमती दिली- ‘‘स्क्रिप्ट पण घे जोडीने बनवायला. लेखकाची गरज नाही.’’

 अभयकुमार पाटील
patilabhaykumar9@gmail.com

Story img Loader