चिकन मसाला- प्रोटिन धागे १०० ग्रॅम, फॅट ५ ग्रॅम, टेस्टमेकर ५ ग्रॅम, थिकनिंग एजेंट १० ग्रॅम, वेळ : तीन मिनिटे.

प्रकाशने सेटिंग्ज अ‍ॅडजस्ट केली. समोरच्या सूचना पटकन वाचून घेतल्या. आतमध्ये त्या त्या गोष्टी टाकल्या आहेत याची खात्री करून घेतली आणि बटण दाबलं.

फूंटर गप्पच होता.

पॉवरचा लाल डोळा सुरू आहे ना?  केबल नीट जोडली गेलीय ना? प्रकाशने पुन्हा एकदा हे बघून घेतलं. पण फूंटर शांत होता.

‘‘ए वेडय़ा- कर की प्रिंट, जाम भूक लागलीय गडय़ा.’’ दोन-चार थपडा मारत प्रकाशने आपला राग काढला.

फूंटर अजिबात दाद देत नव्हता.

मग प्रकाशने सगळी सेटिंग्ज तपासली. फूंटर ऑफ करून परत सुरू केला.

पण तो छापायचं नाव काढत नव्हता.

‘‘रुसला वाटतं. चला घेऊन जाऊ  दुरुस्तीला. पण थांब हं जरा सख्या, थोडं खाऊन घेतो.’’

घरात खूप शोधून शोधून प्रकाशला एक संत्रं आणि थोडं दूध मिळालं. दोघांचीही चव त्याला आवडली नाही, पण नाईलाज होता.

फूंटर सव्‍‌र्हिस सेंटरवर लांबलचक रांगा होत्या.

‘‘तुमचा कधी बिघडला?’’ रांगेतल्या एकाने प्रकाशकडे चौकशी केली.

‘‘आताच. लगेच आलो इकडे. फूंटर थ्री-डी प्रिंट करून फूड देत नाही, तर खायचं काय?’’

‘‘तर काय! मी पण बाकीची सगळी कामं टाकून अश्शी इकडे धावत आले.’’ एका बाईने आपली कैफियत मांडली.

‘‘इथे वेळ लागेल वाटतं, दुसरं सव्‍‌र्हिस सेंटर कुठे आहे माहीत आहे का कोणाला?’’ एका तरुणाने विचारणा केली.

प्रकाश त्याला घेऊन जायला तयार झाला. पण त्या सेंटरवरही माणसांची गर्दी होती.

‘‘एखादं स्टोअर बघून काही खायला घेतो आणि मग घरी जातो. उद्या-परवा बघतो.’’ प्रकाशने आपला निर्णय जाहीर केला.

पण जवळच्या चारही दुकानातला सगळा माल संपला होता. २०० किलोमीटर परिसरात फिरूनही प्रकाशला एकाही दुकानात साधी बिस्किटं की दूध मिळालं नाही.

मग नाईलाजाने तो एका महागडय़ा रेस्तराँमध्ये गेला. शहरात अशी दोन-तीन रेस्तराँ फक्त होती. कधीमधी चैन करायला, पाटर्य़ा करायला म्हणून. फटाफट थ्री-डी फूड प्रिंट करणारा फूंटर घरोघरी पोहोचल्यापासून पिझ्झा डिलिव्हरी, डोसा स्टॉल, वडापाव गाडी- सगळं बंद

झालं होतं.

आठवडा झाला तरी कोणाचेच फूंटर दुरुस्त होऊ शकले नाहीत.

दरम्यान फुडी नावाचा एक छोटा स्टॉल कोणीतरी सुरू केला. तो तुफान चालला. एक छोटा फुडी कॅफे हळूच उघडला. तिथला बिझनेस बघता बघता

दुप्पट झाला.

बघता बघता छोटीमोठी रेस्तराँ सुरू झाली. लोकं तिथे जमून गप्पा मारत मारत नवनव्या पदार्थावर ताव मारायला लागली.

‘‘किती बरं वाटतं नै, असं निवांत बोलत बोलत खायला’’ प्रकाशची मैत्रीण नंदा कॅफेत बसून बोलत होती. ‘‘नाहीतर आधी आपण फूंटरमधून काहीतरी काढून एकटय़ाने खाणं उरकून घ्यायचो अगदी.’’

प्रकाशने मान डोलावली.

‘‘हो की नै रे- त्याची चव काही खास नाही लागायची. हे खाणं मस्त स्वादिष्ट आहे नै?’’ तिचं गुणगान चालूच होतं.

‘‘हो. हो.’’

‘‘मला तर बाई असं खूप खूप आवडायला लागलंय.’’

‘‘अगं एवढा वेळ कोणाला? मला फूंटर केवढा सोयीचा पडायचा.’’

‘‘सोय होती खरी. पण लज्जत कुठे? आणि एरव्ही आपण असे बोलत बसलो असतो का?’’

काही दिवसांनी सगळे फूंटरला विसरले. फूड प्रॉडक्ट्स आणि फूड स्टॉल्सचे दिवस चांगले आले. बेकऱ्या सुरू झाल्या. मिठाईवाले आले. कसल्या-कसल्या खाण्याच्या गाडय़ा दिसायला लागल्या. इकडे फूड प्रोसेसिंग कंपन्यांचे शेअर्स वधारले.

मग काही जणांना घरी स्वयंपाक करण्याची कल्पना सुचली. अर्थात २०५० मधल्या त्या चिमुकल्या घरांमध्ये किचन अशी काही गोष्टच नव्हती. तरी पण काही जणांनी हौसेने इलेक्ट्रिक शेगडय़ा आणून एका कोपऱ्यात ठेवून काहीबाही शिजवायला सुरुवात केली.

कोणी बटाटे शिजवून बघितले. कोणाला स्वत: बनवलेला भात आवडला.

मग त्यांनी हळूहळू हे सोशल नेटवर्कवर शेअर करायला सुरुवात केली. बाकीच्यांना त्यांच्या

फोटोंचं अप्रूप वाटायला लागलं. काहींनी आपल्या अध्र्यामुध्र्या पाककृती अपलोड केल्या. इतरांनी त्यात आपली भर घालायला सुरुवात केली. या सगळ्याचा एक मोठ्ठा ट्रेंड सुरू झाला.

काही जणांनी तर कहर केला. मित्रमंडळींना बोलावून स्वत:च्या हाताने केलेले पदार्थ खिलवायला सुरुवात केली. त्याला फार धाडस लागत होतं अर्थात. कारण बाजारातून वेगवेगळ्या वस्तू आणायच्या, त्या कापून-बिपून शिजवायच्या- केवढी मेहनत होती.

प्रकाशला मात्र आपल्या फूंटरची फार आठवण यायची. त्याने तो दुरुस्त करण्याचे खूप प्रयत्न केले होते. पण थ्री-डी फूड प्रिंट करणारं ते यंत्र महाक्लिष्ट होतं. त्यातून जगात केवळ एकाच कंपनीकडे त्याचे मालकी हक्क होते. किंबहुना त्याच कंपनीने मुद्दाम सॉफ्टवेअर बदलून सगळे फूंटर्स निकामी केले अशी वदंता

होती. कारण तीच आता फूड प्रोसेसिंगमधली अग्रेसर कंपनी होती.

काही का असेना, त्या निमित्ताने लोकांची जीवनशैली बदलली होती. काजू फळाच्या बाहेर असतो आणि मटार शेंगांच्या आत असतो अशा नवनव्या ज्ञानाने सगळे रोमांचित व्हायला लागले होते. गाजरं जमिनीखाली असतात तर भोपळे गलेलठ्ठ असून चक्क नाजुकशा वेलीला लागतात, अशासारख्या माहितीने सगळे साफ नादावून गेले.

काही जणांनी तर शहरांपासून लांब लांब जाऊन भाज्यांचे मळे पाहण्याच्या सहली आखल्या. धान्य ठरावीक मोसमात पिकतं म्हटल्यावर काहींनी त्या त्या मोसमात शेतांना भेट देण्याच्या योजना बनवल्या. सगळे कसे खाद्यमय होऊन गेले होते.

प्रकाशला एकीकडे हे नवं फॅड ठीक वाटत होतं. पूर्वीही तयार जेवण मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खाणे, फास्ट फूड, मग स्लो फूड, इंटरनॅशनल फूड, मग देसी फूड अशी फॅडं होऊन गेलेली त्याला माहीत होती. हेही स्वत: ताजं बनवायचं फॅड वाईट नव्हतं. पण दुसरीकडे फूंटरची कल्पना काही स्वस्थ बसू देत नव्हती. ज्या कंपनीने फूंटर पहिल्यांदा बनवला, त्यावेळी कोणीतरी जबरदस्त डोकं चालवलं असणार. मग आपणही प्रयत्न करून बघू या, म्हणत त्याने आपलं संशोधन गुपचूप सुरू ठेवलं होतं. पुढे त्याच्या मुलानेसुद्धा हे काम सोडलं नव्हतं.

मग दोन पिढय़ांनंतर प्रकाशच्या नातीने- रश्मीने परत फूंटर बाजारात आणला. नवीन सुधारित आवृत्तीचा. वेगळी टेक्नॉलॉजी वापरणारा. बाहेर खाऊन नाहीतर स्वत: करून कंटाळलेल्या माणसांना हा पर्याय बरा वाटला. घरच्या घरी ठरावीक साहित्य टाकून थ्री-डी प्रिंट करून जेवून घ्यायचं त्यांना हवंसं वाटलं. त्यांनी भराभर फूंटरवर उडय़ा टाकल्या.

किंमत भारी असल्याने फूंटर मिरवायची गोष्ट झाली. आता सोशल नेटवर्कवर त्याचे फोटो यायला लागले. फूंटरमुळे कितीतरी मोकळा वेळ मिळतोय अशी प्रशंसा ऐकायला मिळायला लागली.

पुन्हा एकदा तेच चक्र सुरू झालं.

दरम्यान रश्मीने फूड प्रोसेसिंग कंपन्यांचे घसरायला लागलेले शेअर्स घेऊन ठेवायला सुरुवात केली.
-prad1nya2@gmail.com