प्रो. परांजपे गेले कित्येक महिने एका फोन कॉलची वाट पाहत होते. त्यांचा मुलगा ब्रह्म याच्या फोन कॉलची. तो एक कॉल त्यांच्या आयुष्याचं सार्थक करणार होता. आयुष्यभर उराशी जपलेलं स्वप्न साकारणार होता. कैक रात्री त्यांनी या कॉलची वाट बघत जागून काढल्या होत्या. मध्यरात्री त्यांचा फोन खणाणला. थरथरत्या हातांनी त्यांनी तो उचलला. जिनिव्हाचा नंबर बघून त्यांना खात्रीच पटली.. हाच तो कॉल.. त्यांचं आयुष्य सार्थकी लावणारा. फोन CERN डिरेक्टरचा होता. (CERN ही जिनिव्हातील नामांकित प्रयोगशाळा आहे. विश्वनिर्मितीचं गूढ उकलणारे प्रयोग या प्रयोगशाळेत केले जातात.) त्यांच्याशी बोलल्यावर परांजपे मटकन् खुर्चीतच कोसळले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकतेय की काय असं त्यांना वाटू लागलं. सुन्न होऊन ते पलंगावर पडून राहिले.

गेल्या २८ वर्षांतला काळ भराभर त्यांच्या नजरेसमोरून सरकू लागला. ब्रह्म हा त्यांचा एकुलता एक मुलगा. जन्मला त्या दिवशी त्यांना कोण आनंद झाला होता! ब्रह्मच्या रूपाने त्यांचं अपुरं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारं एक साधनच त्यांना मिळालं होतं. परांजपे स्वत: विज्ञानाचे प्राध्यापक होते. देशातल्या अग्रगण्य विज्ञान संशोधन संस्थेत ते कार्यरत होते. पदार्थविज्ञानाचे ते नावाजलेले प्रोफेसर होते. त्यांच्या नावावर अनेक पुस्तकं, वैज्ञानिक लेख प्रसिद्ध झाले होते. न्यूटन, आइनस्टाईन यांच्याप्रमाणे आपणही काहीतरी भव्यदिव्य शोध लावावा, जगप्रसिद्ध व्हावं असं त्यांना नेहमी वाटे. त्यासाठी चिकाटीने त्यांचं संशोधनही चालू होतं. परंतु त्यांना अपेक्षित असलेलं यश त्यांच्या दृष्टिपथातही आलं नव्हतं. म्हणूनच आपलं हे अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ब्रह्मचा जन्म झाला आहे असं त्यांना वाटू लागलं. त्याकरता त्यांनी मुलाचं नावही ‘ब्रह्म’ ठेवलं. ब्रह्म.. सृष्टी निर्माण करणारा!

ब्रह्मला त्यांनी वाढवलंही तसंच. त्याच्या आजूबाजूला सतत विज्ञानच असेल याची त्यांनी काळजी घेतली. इतर मुलांसारखा तो वाढलाच नाही. मित्र नाहीत. खेळ नाहीत. खेळणी म्हणजे फक्त scientific toys. वडिलांबरोबर क्रिकेट, फुटबॉल खेळताना त्याला न्यूटनचे गतिविषयक नियम पाठ करावे लागत, तर पाण्यात खेळताना आर्किमिडीजचे. सुरुवातीला ब्रह्मने त्याबद्दल आकांडतांडव करून पाहिलं. त्यालाही वाटे, बरोबरीच्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळावं, पतंग उडवावे. परंतु हळूहळू त्याच्या लक्षात येऊ लागलं, की यातलं आपल्याला काहीही करता येणार नाही. मग स्वत:ला तो त्याच्या अभ्यासिकेत कोंडून घेऊ लागला. तिथेच त्याने छोटीशी प्रयोगशाळाही सुरू केली. विज्ञानावरची अनेक पुस्तकं गोळा केली. ब्रह्म तीव्र बुद्धिमत्तेचा होताच. विज्ञानात पीएच. डी. संपादन करून पुढील शिक्षणासाठी तो परदेशी गेला.

जिनिव्हा येथील उएफठ सारख्या नामांकित संस्थेत त्याची नेमणूक झाली. ‘god’s particle’ शोधण्याच्या मोहिमेत त्याने मोलाची कामगिरी पार पाडली. अखंड मेहनत आणि तीव्र बुद्धिमत्ता याच्या जोरावर लवकरच तो मानाच्या शास्त्रज्ञांच्या पंगतीत जाऊन बसला. उएफठ इथे विश्वनिर्मितीची उकल करणारे अनेक प्रयोग सुरू होते. विश्वाच्या निर्मितीच्या वेळी निर्माण झालेली द्रव्याची अवस्था प्रयोगशाळेत निर्माण करण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ तिथे अहोरात्र कार्यरत होते. ब्रह्मदेखील या टीमबरोबर काम करीत होता. त्याच्या कामगिरीवर परांजपे खूश होतेच; परंतु ब्रह्मचा जन्मच मुळी काहीतरी भव्यदिव्य करण्यासाठी झालाय, हे ते विसरत नव्हते. सहा महिन्यांपूर्वी ब्रह्मने त्यांना फोन करून कळवलं होतं- ‘बाबा, तुमच्या इच्छापूर्तीचा क्षण जवळ येऊन ठेपलाय. लवकरच तुम्हाला अपेक्षित असलेलं संशोधन मी प्रकाशात आणणार आहे.’ हे ऐकून परांजपेंना आभाळ ठेंगणं झालं होतं. ब्रह्मच्या फोनची म्हणूनच ते वाट पाहत होते. आणि आता फोन आला होता CERN director चा.. ‘ब्रह्मला अटक केल्याचं’ कळवणारा!

ब्रह्मने प्रयोगशाळेत बऱ्याच प्रमाणात antimatter (प्रतिद्रव्य) बनवून त्यापासून बॉम्ब बनवला होता. अणुबॉम्बपेक्षाही कितीतरी पटीने संहार करण्याची क्षमता त्यात होती. ब्रह्म सृष्टी निर्माण करणारा न ठरता सृष्टीचा विनाश करणारा ठरला होता. Antimatter बऱ्याच प्रमाणात तयार करणं आणि साठवून ठेवणं हे खरं तर ब्रह्मने साधलेलं खूप मोठं यश होतं. भल्या भल्या शास्त्रज्ञांना ते जमलं नव्हतं. परंतु त्याचा वापर ब्रह्मने विनाशासाठी करायचा असं ठरवलं होतं. त्याच्या सहकाऱ्याला त्याच्या या प्रयोगाची कुणकुण लागल्याने त्याने ही बातमी वरिष्ठांच्या कानावर घातली होती आणि म्हणूनच ब्रह्मला अटक झाली होती. त्याने केलेला गुन्हाच इतका भयंकर होता, की यातून त्याच्या सुटकेची अपेक्षा करणंही व्यर्थ होतं. आपल्या अविवेकी, अतिरेकी महत्त्वाकांक्षेचं ओझं ब्रह्मने आयुष्यभर बाळगलं होतं, म्हणूनच तो आज असा वागला होता. त्याच्या ऱ्हासाला आपणच कारणीभूत असल्याची जाणीव परांजपेंना झाली. पण त्याला आता फार उशीर झाला होता.. फार उशीर..

(टीप : antimatter- एखाद्या कणाइतकेच वस्तुमान; परंतु विरुद्ध प्रभार असलेला कण म्हणजे antiparticle. अशा कणांचा समूह म्हणजे antimatter. (उदा. electron चा antiparticle positron आहे.)
भाग्यश्री चाळके – bachalke@gmail.com

Story img Loader