आठवडाभरात नोटा प्रकरणामुळे तुमची धावपळ उडाली असेल. आमचीही उडाली. पद्य हा आमचा प्रांत नाही.
पण गद्य वाचण्याएवढा वेळ होईलच याची शाश्वती नाही. म्हणूनच खास कॉर्पोरेटी पॉइंटर शैलीतले हे मुद्दे.
(डिस्क्लेमअर- उजवे, डावे, मधले, ऊध्र्व, अधर अशा विचारधारांशी आमचा दूरान्वयेही संबंध नाही. प्रो, अँटी, न्यूट्रल अशा कोणत्याच पायरीवर आम्ही कायम नसतो. भूमिका घेणं म्हणजे सहमती असा आमचा गैरसमज नाही.)
- सध्या आम्ही डॉक्युमेंटेशनचं एक मोठंच काम हाती घेतलं आहे. ८ नोव्हेंबर २०१६. वेळ रात्री साधारण साडेआठपासून पैसा आणि नोटा निगडित साहित्याचा महापूर लोटला आहे. फेसबुकी आणि ट्विटरी स्टेटस, पोस्टा, व्हॉट्सअॅप फॉरवर्डेड मेसेज, व्हिडीओज, ऑडिओज, एमएमएस अशा सर्व साहित्याचं जतनीकरणाचं काम आम्ही घेतलं आहे. या साहित्याच्या उद्वेगी आणि स्वागतीय अशा दोन शाखा पडल्या आहेत. हे सगळंच साहित्य जनहितार्थच असल्याने आम्ही हक्काने ढापून त्याचं संवर्धन एका अतिविशाल टेक्नोतिजोरी अर्थात हार्डडिस्कमध्ये केलं आहे. मराठी साहित्याचा ‘नोटीव’ इतिहास या नावाने त्याचे खंड प्रकाशित होतील. डोंबोली नगरीतील साहित्य संमेलनात आम्ही प्रकाशकांमागे ही भुणभुण करणार आहोत.
- आमचे मित्र गुगलजी यांचा आतेभाऊ गुगल मॅप्समुळे आता पत्ता शोधणं अजिबातच कठीण नाही. पण कसं आहे, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. नव्या नोटांच्या शोधार्थ आम्ही यच्ययावत् बँका आणि एटीएम यांची ‘रेकी’ केली. तुमचे गैरसमज फार चटकन होतात बुवा. मुंबई हल्ल्याच्या वेळेस डेव्हिड हेडलीने केली तशी ‘रेकी’ नाही. जपानी उपचार पद्धती असते ती ‘रेकी’ नव्हे. वणवण करून गोष्टी हुडकून काढण्याला सोप्या मराठीत ‘रेकी’ म्हणतात. बँका आणि एटीएमची कधीही गरज लागू शकते. वेळ सांगून येत नाही. पण आता आम्हाला अजिबात तणाव नाही. खुर्द, बुद्रूक, पंचक्रोशी अशा टोटल परिघात पैसा कुठे मिळू शकतो याचा एक रीतसर डी.पी. आमच्या डोक्यात फिट्ट झाला. डिस्प्ले पिक नाही हो, मनात आणि मेंदूत डेव्हलप होत जाणारा प्लॅन तो डी.पी. स्मार्टफोन हँग झाला तरी इश्यू नाही. पुण्याप्रमाणे पत्ता सांगण्यास कोणी खळखळ केली तरी वांदा नाही. बँकांची कामाची पद्धती, सोपे ते किचकट असे फॉर्म कसे भरावेत, फोटोकॉपी कशी जोडावी, बँकेत वावरताना काय काळजी घ्यावी, एटीएममध्ये कार्ड कसं वापरावं, स्वत:ची आणि एटीएम मशीनच्या सुरक्षेची काळजी कशी घ्यावी यावर पॉकेटसाइज गाइड पुस्तिका किंवा हाऊ टू स्वरूपाचा यूटय़ूब व्हिडीओ तयार करण्याचं योजिलं आहे.
- लोकशाहीचा चौथा स्तंभ अर्थात मीडियाविषयी आम्हाला अपार कुतूहल. सगळंच कसं यांना आधीच ठाऊक होतं! आज अमुकने ही स्टोरी ब्रेक केली. तमुकची एक्स्क्लुझिव्ह वाचली का असं कानी पडण्याचं हे माध्यमयुग आहे. उरी हल्ल्याच्या तपशिलापासून करीनाच्या बेबी बम्प डिझायनर वस्त्रापर्यंत सगळ्याची कुणकुण कशी लागते राव. मीडियाला भाँ करणारं कोणी आहे की नाही असं आम्हाला वाटायचं. मीडियाला जराही भनक लागू न देता सुमडीत नेशनवाइड प्लॅन शिजू शकतो! एवढा मोठा निर्णय म्हणजे कोअर टीमची बैठक झाली असणार, गाठीभेटी झाल्या असणार, काही तरी आदेश निघाले असणार, कोणी तरी भराभर कामाला लागलं असणार. बरं, नोटा छापण्याची प्रेस नाशकात आहे म्हणे. आम्हाला कौतुक राहिलं त्या गोदावरी आणि कुंभमेळ्याचं. अर्थकुंभात एवढय़ा नोटांच्या प्रसववेदनांचा जराही आवाज नाही! कसाबला फाशी दिली- टाटा समूहातून सायरसदादांना डच्चू दिला आणि आता हे नोटाप्रकरण. हे म्हणजे मीडिया शॉक्स, सरकार रॉक्स झालं की!
- मंदिरं, टोलनाके, तिकीटघरं, अॅडमिशन्स, स्वच्छतागृहं, पासपोर्ट केंद्र, आधार केंद्र या सगळ्यांमुळे रांगा आणि वेटिंग फेनॉमेना आम्हाला अजिबातच नवीन नाही. त्यामुळे नोटांसाठी रांगा मॅटरने आम्ही पस्त होणाऱ्यातले नाही. पण या रांगेत आम्हाला चुकूनही एखादा नगरसेवक किंवा रेती-वाळू-डम्पर गटाचे प्रतिनिधी दिसले नाहीत. सगळे आमच्यासारखे किडूकमिडूक गटाचे प्रतिनिधी होते. दिवाण, पलंग, सोफे, देव्हारे, फार्महाऊसचा भूगर्भ, पेंटहाऊसचे माळे यांमध्ये धनसंचय करणाऱ्यांसाठी कुठे रांगा आहेत हे जाणून घ्यायचंय आणि त्यांनाही आयडी कार्डाची प्रत जोडणं अनिवार्य आहे का हेही बघायचंय. जसा आमचा सगळा डेटा सरकारदरबारी जमा आहे तसा यांचाही होणार का? आणि वाममार्गाने मालामाल झाल्याचं लक्षात आलं तर त्यांना जेलच्या रांगेत धाडणार का, हा सवाल मनी पडला. की किंगफिशरी प्राशन करून विजयराव मल्यांसारखे हेही तुरी देऊन पळ काढणार परदेशात?
- बालपणी ‘नवा व्यापार’ नामक खेळ खेळायचो आम्ही. ४०० रुपयांत पेडर रोड विकत घेतल्याचं स्मरतंय आम्हाला. (४००च्या पुढे निखर्व हे परिमाण टाकण्यास गेमकर्ते विसरले). कर्तेपणाची झूल अंगी पडल्यावर व्यापारउदीमापेक्षा चाकरमानी होण्यात आम्ही धन्यता मानली. यामुळे पेडर रोडच्या फ्लायओव्हरच्या बातम्या वाचणं आमचं कर्तव्य झालं. पोकेमॅन, अँग्री बर्ड आणि तत्सम लहान मुलांच्या खेळात हल्ली व्यापार नसतोच. थेट शस्त्रांसह आक्रमण करून यमसदनी धाडण्याचं टास्क असतं. त्यामुळे ‘नया व्यापार’ मनाच्या सांदीकोपऱ्यात आक्रसून गेला. पण तुम्हाला सांगतो, परवा २००० ची गुलाबी नोट हाती पडल्यावर आम्ही हर्षभरित झालो. लहानशी, पातळ कागदाची गुलाबी रंगाची नोट पाहून अगदी पेडर रोड नाही पण करी रोडचं तिकीट तरी काढू असा विश्वास दाटला. एवढय़ा मोठय़ा रकमेचे सुट्टे मिळणं शक्य नाही, त्यामुळे ‘नया व्यापार’चा फील देणारा तो कागदाचा तुकडा पाकिटात नीट घडी करून ठेवला आणि बँकेबाहेर पडलो.
- अगदी आतापर्यंत म्हणजे ८ तारखेच्या साडेसात वाजण्याअगोदर सगळ्या स्तरातली मंडळी आमच्याकडे पैसेच नाही, कसं भागवतोय आमचं आम्हाला माहीत असं रडगाणं गायचे. २५ ते ३० तारखांदरम्यान हा ‘सा’ तीव्र व्हायचा. पण जशा ५०० आणि १०००च्या नोटा रद्द झाल्या आणि अचानक स्टँड बदलला. घरातला एवढा पैसा रद्दी झाला की काय, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली. ई-पेमेंट वगैरे ठीक आहे, पण डे टू डे रुटीनला पैसे हवेतच की असा सूर आळवला अनेकांनी. त्यामुळे खरे गरीब कोण तुम्हाला उमगलं असेलच एव्हाना!
- शाळेत भूगोलाचा उपभाग असलेल्या अर्थशास्त्रात २५ पैकी २४ मार्क कमवायचो आम्ही. पण अर्थकारण चालतं कसं आम्हाला कोणी शिकवलं नाही. नोटांच्या निमित्ताने एटीएम मशीनची कार्यपद्धती, नोटांचे रंग, डायमेन्शन्स, त्यावरच्या चिन्हांचं अर्थ, नोटा कशा छापल्या जातात, त्यांचं वितरण कसं होतं, जुन्या नोटांचं काय होतं अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळाली. नोटांविषयक सामान्यज्ञान एवढं मिळालं की लोकल न्यूज चॅनेलवरच्या ‘चॅच’ अर्थात चॅनेलीय चर्चात सहभागी होऊ शकू असा भरवसा वाटू लागला.
तात्पर्य : ट्रम्पदादांना झाकोळून टाकून व्हायरल झालेल्या नोटांनी आम्हाला खूप काही शिकवलं. रांगा, माणुसकी, बंधुभाव, देशभक्ती, सहकार, शिस्त या संस्कारांची उजळणी झाली. पण याहीपेक्षा एक जुनं वचन मेंदूत ठसलं- सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं नाही..