सोशल मीडिया आणि युद्ध – ऑड कॉम्बिनेशन वाटतंय ना. भारतीय नेटिझन्सनी एकत्र येत अगदी युद्ध नाही, पण थेट शाब्दिक आक्रमण फ्रंट सुरू केला आणि तोही शत्रूराष्ट्राविरोधात. व्हायरल झालेल्या लेखंदाजीविषयी..
गेल्याच महिन्यात यूटय़ूबवर एक व्हीडिओ अपलोड करण्यात आला. २२ वर्षीय उमदा तरुण त्या व्हीडिओत शांतपणे आपली भूमिका मांडत होता. तो म्हणतो, काश्मीरमध्ये भारतीय कायदा आणि सुव्यवस्था राबवण्यासाठी प्रयत्नशील व्यक्तींवर अॅक्शन घेण्यात येईल. काश्मीरातील लोकांनी भारतीय यंत्रणेला साथ देण्याऐवजी त्यांनी भारतीय लष्कर आणि पोलीस यांच्यावर लक्ष ठेवावे. त्यांच्या हालचालींची माहिती आम्हाला द्या. भूमिपुत्र असलेल्या पोलिसांवर हल्ला करणे आम्हाला पटत नाही, पण ते भारतीय लष्कराला मदत करतात. काश्मीरातील तरुण कार्यकर्त्यांवर कारवाई करतात. त्यामुळे त्यांच्यावर नाईलाजाने हल्ले करावे लागतात. भारतीय लष्कर आपले दुश्मन आहे. आपल्याला एकत्र येऊन त्यांना धडा शिकवायला हवा’. सहा मिनिटांचा हा व्हीडिओ. लिहिलेले वाचल्यावर तुमचं रक्त खवळलं असणार. हा उपटसुंभ कोण? त्याला ठेचून काढा असे विचार तुमच्या डोक्यात आले असतील. पण यूटय़ूब ओपन मीडियम आहे. ‘हाऊ टू मेक पुरणपोळी’पासून दुर्मीळ एकशिंगी गेंडय़ाच्या आयुष्याबाबत काहीही अपलोड होऊ शकतं. हा व्हीडिओ अपलोड केलाय बुरहान वानीने. उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक वडील आणि विज्ञान शाखेत पदव्युत्तर आईचा हा मुलगा. नुसता हुशार नाही तर वर्गात पहिला वगैरे येणारा. १५व्या वर्षीच घरातून पळाला आणि दहशतवादी गट हिज्बुल मुजाहिद्दीनच्या कंपूत दाखल झाला. आपल्या हुशारीचा स्मार्टपणे उपयोग करून घेत मुजाहिद्दीन संघटनेचा तो पोस्टर बॉय झाला. शांतपणे भूमिका मांडण्याची पद्धत, लोकांना आपलंसं वाटेल अशी बोलण्याची क्लृप्ती आणि सर्वप्रकारच्या सोशल मीडिया सॅव्ही अशा बुरहानने एकटय़ाच्या बळावर काश्मीरातल्या शंभराहून अधिक तरुण मुलांना मुजाहिद्दीनमध्ये आणलं.
भारतीय लष्कराने त्याला पकडण्यासाठीची मोहीम गतीमान केली. त्याला पकडून देणाऱ्यासाठी १० लाखांचं बक्षीस जाहीर केलं. दुसरीकडे बुऱ्हानच्या चळवळीने वेग घेतला. भारतीय सरकार, लष्कर आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणणारं आहे. त्यांच्याविरोधात एक व्हा या सूत्राअंतर्गत असंख्य काश्मिरी तरुण बुऱ्हानच्या वाटेने जाऊ लागले. एप्रिल महिन्यात बुरहानचा भाऊ खालीद वानीला भारतीय लष्कराने मारलं. त्याचा बदला घेण्याचंही डोक्यात होतं त्याच्या. अशा या बुरहानला भारतीय लष्कराने ८ जुलैला मारलं. देशात राहून देशाविरुद्ध कट रचणारी दिशाहीन युवा ऊर्जा मातीमोल झाली. काश्मिरी जनतेच्या उन्नतीचा एक मसिहा हरपला असं वातावरण तयार झालं. ५०,००० माणसं त्याच्या अंत्यविधीला जमली. यात बुरहानच्या टोळीचे कडवे दहशतवादीही होते. हिंसाचारात २२ माणसं मारली गेली. अमरनाथ यात्रा स्थगित करावी लागली. अनेक र्वष चिघळत राहिलेल्या काश्मीर प्रश्नाचे आपण तज्ज्ञ नाही. पण एवढं नक्की की बुरहान भारतात जन्मला आणि भारतभूमीतच गेला. मात्र त्याचं काम धार्जिणं असल्याने दांभिक, दुतोंडी पाकिस्तानला त्याचा पुळका आला. एरव्ही शांतीची कबुतरं, अमन की आशा सेतू, बेगडी हस्तांदोलनं, मिठय़ा मारणाऱ्या पाकिस्तानने बुरहानला शहिदाचा दर्जा दिला. शहीद बुरहानच्या आदराप्रती १९ जुलैचा दिवस त्यांनी ‘ब्लॅक डे’ म्हणून साजरा केला. आपल्याला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या नाठाळ कृतीचा सरकारी पातळीवर निषेध झाला. पण पोकळ निषेध काय कामाचा हे नेटिझन्सनी ओळखलं आणि बुरहानला टिपणाऱ्या भारतीय लष्कराप्रती आदर म्हणून # सॅल्यूट टू इंडियन आर्मी# अशी मोहीम उघडली. हे असं करायचं कोणी ठरवलं नाही, उत्स्फूर्तपणे झालं. टेक्नॉलॉजीला भौगोलिक मर्यादा नसतात. त्यामुळे पाकिस्तानच्या ‘ब्लॅक डे’ चा प्रचार आपल्यापर्यंत पोहचला. अविचाराला प्रत्युत्तर म्हणून देशवासीय सुरक्षित राहावेत यासाठी प्रतिकूल वातावरणात कार्यरत भारतीय लष्कराच्या धैर्यशील कहाण्या वेगाने समोर येऊ लागल्या. आंतरराष्ट्रीय राजकीय, आर्थिक, डावपेचात्मक समीकरणांमुळे पाकिस्तानला प्रत्यक्ष युद्धभूमीवर आपण कधी चीतपट करू ठाऊक नाही. पण व्हच्र्युल युद्धभूमीवर भारतीय नेटिझन्सनी सरशी साधली. ओठांचा चंबू केलेल्या सेल्फीऐवजी डीपी म्हणून भारतीय लष्कराचे बोधचिन्ह उमटले. खंडप्राय देशाच्या सीमा डोळ्यात तेल घालून जपणारे, कुटुंबकबिल्यापासून दूर एकला चलो रे आयुष्य जगणारे, इनटॉलरन्सच्या गप्पांऐवजी जीवाची बाजी लावणारे वीर व्हायरल झाले. आपात्कालीन परिस्थितीत देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणणाऱ्या शांतीदूतांच्या कहाण्या फॉरवर्ड होऊ लागल्या. सोशल मीडियाचा अस्त्र म्हणून उपयोग होऊ शकतो हे सिद्ध झालं. यानिमित्ताने भारतीय नेटिझन्स एकत्र आले ही सकारात्मक गोष्ट. मात्र याच सोशल मीडियाचा वापर करत भारताविरुद्ध, इथल्या नागरिकांविरुद्ध कट रचले जात आहेत. ‘तंत्रज्ञान शाप की वरदान’ हा निबंधाचा विषय जाऊन ती रिअॅलिटी झाली आहे. हा आठवडा गुरुपौर्णिमेचा. आपल्याला शिकवणाऱ्या, धडे देणाऱ्या, जागरूक करणाऱ्या, कठीण काळात आधार देणाऱ्या गुरूला वंदन तुम्ही केले असेलच. टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया आपले मॉडर्न गुरू. त्याद्वारे ‘सलाम’ कोणाला करायचा हे तुम्ही ठरवा!
– पराग फाटक