*भारतरत्न हा देशाचा सर्वात मोठा नागरी सन्मान असून जीवनच्या कुठल्याही क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी तो दिला जातो. १९५४ मध्ये हा सन्मान सुरू झाला.
*वंश, व्यवसाय, लिंगभाव यावर आधारित भेदभावाशिवाय तो पात्र व्यक्तीस दिला जातो.
*पंतप्रधान भाररत्नसाठी व्यक्तींच्या नावाची शिफारस करतात. इतर औपचारिक शिफारशींची गरज नसते.
*एका वर्षांत तीन जणांना भारतरत्न देता येते.
*भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीला सनद (प्रमाणपत्र) व पदक दिले जाते.
*राज्यघटनेच्या कलम १८ (१) अनुसार पुरस्कार हा नावापुढे किंवा मागे लावता येत नाही. बायोडाटामध्ये मात्र भारतरत्न उल्लेख केला जाऊ शकतो. लेटरहेड किंवा व्हिजिटिंग कार्डमध्ये त्याचा उल्लेख करता येतो.
*भारतरत्न सन्मान राष्ट्रपती प्रदान करतात.
आओ फिरसे दिया जलाए..
भारतरत्ने
सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४). सी. राजगोपालाचारी (१९५४), सी.व्ही.रमण (१९५४), भगवान दास (१९५५), मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या (१९५५), जवाहरलाल नेहरू (१९५५). गोविंदवल्लभ पंत (१९५७), धोंडो केशव कर्वे (१९५८), बिधानचंद्र रॉय (१९६१), पुरुषोत्तम दास टंडन ( १९६१), डॉ. राजेंद्र प्रसाद (१९६२), डॉ. झाकीर हुसेन (१९६३), पांडुरंग वामन काणे (१९६३), लालबहादूर शास्त्री (१९६६), इंदिरा गांधी ( १९७१), व्ही.व्ही. गिरी (१९७५), के.कामराज (१९७६), मदर तेरेसा (१९८०), आचार्य विनोबा भावे (१९८३), खान अब्दुल गफार खान (१९८७), एम.जी.रामचंद्रन (१९८८), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९९०), नेल्सन मंडेला (१९९०), राजीव गांधी (१९९१), सरदार वल्लभभाई पटेल ( १९९१), मोराररजी देसाई (१९९१), अबुल कलाम आझाद (१९९२), जे.आर. डी.टाटा (१९९२), सत्यजित रे (१९९२), एपीजे अब्दुल कलाम (१९९७), गुलझारीलाल नंदा (१९९७), अरुणा असफ अली (१९९७), एम.एस. सुब्बुलक्ष्मी (१९९८), चिदंबरम सुब्रह्मण्यम (१९९८), जयप्रकाश नारायण (१९९८), अमर्त्य सेन (१९९९), , गोपीनाथ बोरडोलोई (१९९९), लता मंगेशकर (२००१), बिस्मिल्ला खान (२००१), भीमसेन जोशी (२००८), सी.एन.आर.राव (२०१३), सचिन तेंडुलकर (२०१३), अटलबिहारी वाजपेयी (२०१४), मदनमोहन मालवीय (२०१४)
अटलबिहारी वाजपेयी
प्रभावी, मुत्सद्दी नेता
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या तरुण खासदाराचे संसदेतील भाषण ऐकून तू एक दिवस देशाचा पंतप्रधान होशील, अशी थाप त्याच्या पाठीवर दिली होती, त्या वेळी सत्ताधारी व विरोधक यांचे विळय़ाभोपळय़ाचे नाते नव्हते. त्याच तरुणाला आता नव्वदाव्या वर्षी ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे.
जन्म- अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. कृष्णबिहारी वाजपेयी व कृष्णादेवी वाजपेयी यांचे ते पुत्र आहेत. जातीने ब्राह्मण असून त्यांनी संसदेतील पन्नास वर्षांच्या काळात मोठा प्रभाव पाडला.
अजातशत्रू
विरोधकांचे असलेले सरकार सर्वाधिक काळ चालवण्याची सर्कस अनेक पक्षांची मोट एकत्र बांधून केली. त्यासाठी त्यांनी मवाळ चेहराही धारण केला. देशाच्या राजकारणाची दिशा बदलून गांधी घराण्याच्या प्रभावातून बाहेर आणणाऱ्या नेत्यांमध्ये ते एक होते. त्यांचे सर्व पक्षांत मित्र होते, त्यामुळे भाजपसाठी ते मित्रपक्ष जोडू शकले. बाबरी मशिदीच्या पतनानंतर त्यांना हे सहेतुक करावे लागले.
वक्ता दशसहस्रेषु
अटलबिहारी वाजपेयी हे वक्ता दशसहस्रेषु आहेत. हातवारे, बोलण्यातील विराम, नर्मविनोदी शैली यांच्या मदतीने त्यांनी अनेकांच्या फिरक्या घेतल्या. त्यांचा दीर्घ विराम ते पुढे काय बोलणार यासाठी क्षणभर श्रोत्यांना वाव देत असत. त्यांची ती लकब सर्वाना भावली.
भारत-पाकिस्तान मैत्री
आग्रा शिखर बैठकीच्या वेळी २००१ मध्ये मुशर्रफ चर्चेला आले होते त्या वेळी काश्मीर प्रश्न वाजपेयींनी जवळपास सोडवला होता, पण काही नतद्रष्टांनी त्यात ऐनवेळी अडथळे आणून तो प्रयत्न हाणून पाडला. आग्नेय आशियात शांतता नांदावी. शेजारी देशात शांतता नांदावी यासाठी ते प्रयत्नशील होते. १९९९ मध्ये त्यांनी लाहोर बससेवा सुरू केली. कारगिल आक्रमणाच्या वेळी ते पंतप्रधान होते व त्यांनी खंबीरपणे ते आक्रमण निपटून काढले. पाकिस्तानशी संबंध सुधारणे हे त्यांचे स्वप्न होते.
संघाचा मुखवटा
अटलबिहारी वाजपेयी हे मवाळ नेते होते तरीही संघाचा छुपा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जात असे व त्यांच्या गूढ हास्यातच त्यांचे हिंदू गटांशी असलेले संबंध विरोधकांना जाणवत असत असे म्हणतात. ६ डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडली गेली त्या वेळी ते विरोधी पक्षनेते होते. त्या वेळी ते धर्मनिरपेक्ष राहिले. त्यांनी बाबरी हल्ल्याचा निषेध केला. गुजरात दंगलीच्या वेळी त्या वेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्म निभावण्यास सांगणारे वाजपेयीच होते हे सर्व जण विसरून जातात.
१३ दिवसांचा पंतप्रधान
जोखीम घेण्यात ते मागे नव्हते. १९९८ मध्ये ते केवळ तेरा दिवस पंतप्रधान होते. अद्रमुकच्या जयललिता यांनी पाठिंबा काढल्याने त्यांचे सरकार पडले. ते १९९९ मध्ये पुन्हा निवडून आले. मग मात्र त्यांनी आघाडी सरकारचे रिंगमास्टर म्हणून नावलौकिक मिळवला. आघाडी सरकार स्थिरपणे चालवले. आघाडी सरकारची काही बंधने असतात त्यामुळे त्यांनी राममंदिर, काश्मीर हे प्रश्न मागे ठेवले.
पोखरण अणुचाचण्या
इंदिराजींनी पहिल्या अणुचाचण्या केल्या. त्यानंतर मे १९९८ मध्ये वाजपेयी यांनी पोखरण येथे अणुचाचण्या करून जगात भारताचा धाक निर्माण केला. अण्वस्त्रांनी इतर देशांना भीती वाटू शकते हे त्यांना माहीत होते.
कवी
वाजपेयी पंतप्रधान, वक्ते, राजकारणी, मुत्सद्दी तर आहेत, पण ते हळुवार मनाचे कवी आहेत. एकदा त्यांनी केरळात कुमारकोमला जाऊन आत्मचिंतनात्मक लेखन केले. मेरी ‘इक्यावन्न कविताएँ’ हा कवितासंग्रहही त्यांनी लिहिला. ते रसिकही होते. त्यांना साहित्य, काव्य यात रस होता.
रा. स्व. संघाशी संबंध
किशोरवयीन काळापासून स्वातंत्र्यलढय़ात ते तुरुंगात गेले व काही काळ त्यांनी कम्युनिझमशी मैत्री केली, पण नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले व जनसंघात त्यांनी काम केले. संघाच्या मासिकासाठी त्यांनी १९५० मध्ये शाळा सोडली व नंतर त्यांची राजकीय मुळे संघात पक्की झाली.
राजकारणाचा श्रीगणेशा
१९४२-१९४५ या काळात ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी श्रीगणेशा केला. प्रथम ते कम्युनिस्ट होते व नंतर हिंदू राष्ट्रवादाकडे वळले. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे ते अनुयायी होते. मुखर्जी हे भारतीय जनसंघाचे संस्थापक होते. मुखर्जी यांनी १९५३ मध्ये काश्मीरमध्ये जाण्यासाठी परवान्याची अट ठेवण्याच्या विरोधात उपोषण केले, त्याला वाजपेयी यांनी पाठिंबा दिला. मुखर्जी यांच्याकडून त्यांनी धुरा खांद्यावर घेतली. १९५७ मध्ये ते जनसंघाचे खासदार झाले. त्यांनी हा पक्ष वाढवला व विरोधी पक्षातील एक दखल घेण्याजोगा नेता म्हणून नाव कमावले.
पंडित मदनमोहन मालवीय
पवित्र भूमीतला शिक्षणतज्ज्ञ
पंडित मदनमोहन मालवीय यांचा जन्म प्रयाग येथे २५ डिसेंबर १८६१ रोजी झाला. त्यांना प्रेमाने महामना मालवीय म्हणत असत. त्यांना सहा भाऊ व दोन बहिणी होत्या. त्यांचे आजोबा पंडित प्रेमधार व वडील पंडित बैजनाथ हे संस्कृत पंडित होते. पंडित बैजनाथ हे भागवत कथा सांगत असत. पंडित मदनमोहन मालवीय यांचे शिक्षण सरस्वती स्कूल येथे झाले. नंतर ते बीए झाले व मिर्झापूरच्या कुमारी देवी यांच्याशी १८७८ मध्ये त्यांचा विवाह झाला.
स्वप्न
मालवीय यांना वडिलांप्रमाणे कथावाचक व्हायचे होते पण त्यांचे स्वप्न गरिबीमुळे आईच्या अश्रूत वाहून गेले. परिस्थितीमुळे ते १८८४ मध्ये चाळीस रुपये महिन्यावर सरकारी शाळेत शिक्षक बनले.
वकिली
१८८४ मध्ये पदवीधर झाल्यानंतर ते १८९१ मध्ये एलएलबी झाले. १८९१ मध्ये त्यांनी जिल्हा न्यायालयात व नंतर १८९३ मध्ये उच्च न्यायालयात वकिली केली. सर मिर्झा इस्माईल यांनी सांगितले की, मालवीय हे कायदा व्यवसायाचा दागिना शोभतील इतके हुशार आहेत. गोपाळकृ ष्ण गोखले यांनी म्हटले होते की, मालवियांनी मोठा त्याग केला आहे. गरीब कुटुंबात जन्मल्याने त्यांना नोकरी करावी लागली, पण नंतर पुन्हा स्वातंत्र्यलढय़ाच्या हाकेला प्रतिसाद देत पुन्हा गरिबीत ढकलले गेले.
पत्रकारिता
राजा रामपाल सिंग हे त्यांच्या कोलकाता येथील काँग्रेस अधिवेशनातील भाषणाने भारावले. त्यांनी त्यांच्यावर जुलै १८८७ मध्ये हिंदोस्तान या हिंदी दैनिकाची जबाबदारी टाकली. त्यांनी मकरंद नावाने हरिश्चंद्र चंद्रिका मासिकात कविता केल्या. इंडियन युनियन या इंग्रजी साप्ताहिकासाठी काम केले. इंडियन ओपिनियन, अभ्युदय या प्रकाशनांसाठी कामे केली. सरकारच्या प्रेस अॅक्टला विरोध केला. त्यांनी मोतीलाल नेहरू यांच्या मदतीने लीडर हे इंग्रजी वृत्तपत्र काढले. मर्यादा हे हिंदी वृत्तपत्र त्यांनी काढले. हिंदुस्तान टाइम्स, सनातन धर्म यातही त्यांनी काम केले.
हिंदू धर्मावर प्रेम
मालवीय यांनी प्रयाग हिंदू समाज या संस्थेचे काम केले. मध्य भारत हिंदू समाज परिषद अलाहाबाद येथे झाली. त्याची तयारी त्यांनीच केली होती. सनातन धर्म महासभा त्यांनी सुरू केली. दहा वर्षे ते ऋषीकुल ब्रह्मचर्याश्रमाचे अध्यक्ष होते
राजकारण
कोलकाता काँग्रेस अधिवेशनात त्यांनी जे भाषण केले त्यामुळे ते राजकारणात प्रथम चमकले. पन्नास वर्षे ते काँग्रेसमध्ये होते. चार वेळा ते काँग्रेसचे अध्यक्ष होते. अलाहाबाद महापालिकेवर ते १९१६ मध्ये निवडून आले. प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये १९२४-१९३० या काळात ते सदस्य होते. १९३१ मध्ये गोलमेज परिषदेला उपस्थित होते. गोखले, टिळक यांच्या मार्गाने ते गेले.
शिक्षणकार्य
मालवीय यांनी शिक्षणात मोठे काम केले. त्यांनी इंग्रजी शिकण्यास महत्त्व दिले होते. १९०३ मध्ये त्यांनी मॅकडोनल्ड हिंदू बोर्डिग हाऊस या शाळेची स्थापन केली तेथे २३० विद्यार्थी होते.
त्यासाठी त्यांनी १.३ लाख रुपये देणगी गोळा केली. बनारस हिंदू विद्यापीठामागे त्यांची दूरदृष्टी होती. संघवृत्तीने काम करण्याची त्यांची तयारी होती.
सामाजिक कार्य
मालवीय यांनी त्यांचा मुलगा रमाकांत याला यात्री सेवादल सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. नंतर त्यांनी दीनरक्षक समिती स्थापन केली. कुंभमेळा व भूकंप तसेच इतर नैसर्गिक आपत्तींच्या वेळी त्यांच्या संस्थांतर्फे गरिबांना मदत केली जाईल. महात्मा गांधी यांच्या आवाहनानुसार १ ऑगस्ट १९३४ मध्ये त्यांनी हरिजनांसाठी शुद्धी मोहीम गंगेकिनारी राबवली.
व्यक्तिमत्त्व
महात्मा गांधी यांनी त्यांना धार्मिक वृत्तीचे म्हटले होते. गांधीजी टिळकांना हिमालय म्हणत. गोखलेंना खोल सागर म्हणत तर मालवियांना स्फटिकासारखी स्वच्छ नदी म्हणत. मानवतेवर त्यांचे प्रेम होते. त्यांच्या शर्टवर ते पांढरे फूल लावित. ते त्यांचे निष्कलंक जीवनाचे प्रतीक होते, असे ब्रिटिश अधिकारी म्हणत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात गोडवा होता, मुलांइतका साधेपणा होता, जेव्हा मृदू व्हायचे तेव्हा ते मृदू होत असत, पण वेळप्रसंगी कठोरही होत असे पत्रकार एडगर स्नो यांनी त्यांच्याविषयी म्हटले आहे. डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांना कर्मयोगी म्हटले होते. ते हिंदुत्वाचे प्रतिनिधी नसून आत्मा आहेत व आदर्शवाद व शहाणपण यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. काशी, बनारस हिंदू विद्यापीठ व पंडित मदनमोहन मालवीय ही त्रयी सारखीच पवित्रता जपणारी आहे असे जरा पुढे जाऊन म्हणता येईल.
देशातील सर्व पंतप्रधानांच्या कार्यकाळाचा विचार करता उत्तम आणि निष्कलंक कारकीर्द असलेले वाजपेयी हेच एकमेव पंतप्रधान आहेत. देशाच्या या असामान्य नेत्याला भारतरत्न पुरस्काराने गौरविण्याचा सरकारचा निर्णय स्तुत्यच आहे.
– लालकृष्ण अडवाणी, माजी केंद्रीय गृहमंत्री
देशाच्या विकासातील अटलजींचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांना भारतरत्न मिळावे ही जदयूचीही मागणी होतीच, किंबहुना संयुक्त पुरोगामी सरकारने यापूर्वीच त्यांना हा पुरस्कार द्यावयास हवा होता.
– नितीश कुमार, जनता दल युनायटेड नेते
तृणमूल काँग्रेस पक्ष आणि व्यक्तिश: ममता बॅनर्जी यांचे वाजपेयींशी विशेष ऋणानुबंध आहेत. ममता यांनी त्यांच्याबरोबर कामही केले आहे. वाजपेयीजी वेळात वेळ काढून ममता दीदी आणि त्यांच्या मातोश्री यांची भेट घेण्यासाठी कालिघाट येथील त्यांच्या निवासस्थानीही आले होते. त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यामुळे आम्हाला खूपच आनंद झाला आहे.
– डेरेक ओब्रायन, तृणमूल नेते व राज्यसभा खासदार
खरं तर मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाणार होतेच, पण आता या शुभेच्छाही द्विगुणित झाल्या आहेत.
– सुषमा स्वराज, परराष्ट्र व्यवहारमंत्री
वाजपेयी हे खऱ्या अर्थाने राष्ट्रपुरुष आहेत. भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी ते निश्चितच पात्र आहेत. एक पंतप्रधान म्हणून त्यांनी राबविलेल्या प्रत्येक धोरणाशी जरी मी सहमत नसलो तरी माणूस म्हणून त्यांची उंची अतुलनीयच आहे याबद्दल दुमत नाही.
– अमर्त्य सेन, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, (भारतरत्न पुरस्काराने सन्मानित)
पं. मदन मोहन मालवीय यांचे योगदान अमूल्य आहे आणि अटलजींना वैविध्यपूर्ण संस्कृती मान्य होती. अशा दोन्ही नेत्यांना भारतरत्न जाहीर झाल्यामुळे मला अतीव आनंद झाला आहे.
– शरद यादव, जदयू अध्यक्ष
मालवीयजी आणि वाजपेयीजी यांना सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाल्याचे वृत्त समाधान देणारे आहे. मालवीयजी हे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि शिक्षणतज्ज्ञ होते हे तर सर्वश्रुतच आहे. तर पंतप्रधान असताना वाजपेयी यांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून आणि मी काँग्रेसमध्ये असूनही मला सर्वतोपरी मदत केली होती. मी व्यक्तिश: त्यांचा ऋणी आहे.
– तरुण गोगोई, मुख्यमंत्री, आसाम
केंद्र सरकारने घेतलेला हा सर्वोत्तम निर्णय आहे. वाजपेयीजी आणि मालवीयजी यांच्या कार्याचा उचित सन्मान झाला असून हा निर्णय अभिनंदनीय आहे.
– प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरणमंत्री
पं. मदन मोहन मालवीय आणि अटलबिहारी वाजपेयी ही दोन्ही जागतिक रत्ने आहेत. त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात येणार असल्याचे ऐकून मला झालेला आनंद शब्दातीत आहे. मालवीयजी यांच्याविषयी माझे बाबा अनेक गोष्टी मला सांगत असत, तर वाजपेयी यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधीच मला मिळाली होती. ‘अंतर्नाद’ या ‘गीत नया गाता हूँ’ हे मी गायलेले आणि वाजपेयी यांनी लिहिलेले काव्यच यानिमित्ताने मी त्यांना समर्पित करते.
– लता मंगेशकर, ज्येष्ठ गायिका (भारतरत्न पुरस्काराने सन्मानित)