सरकार बदलले की नवे सत्ताधीश आपल्याला सोयीचे ठरतील असे सनदी वा पोलीस अधिकारी महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करतात. काही जुने अधिकारीही मग वशिला लावून सत्तापदांवरील लोकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात.  ही परंपरा गेली अनेक वर्षे राज्यात आणि केंद्रातही पाळली जाते. अधिकाऱ्यांचे ठीक, पण काही  चाणाक्ष मंडळी अशी असतात की त्यांचे सूत जुळतेच सत्ताधाऱ्यांशी.. कोणत्याच झेंडय़ाचा रंग त्यांना वर्ज्य नसतो.. ‘कला’च म्हणायची ही!  राज्यातील अशाच काही ‘लांब हातां’च्या माणसांविषयी..

सत्ता हे एक अजब रसायन असते. त्याचा संसर्ग ज्याला झाला, त्याचे हात लांब होतात. ‘वर’पर्यंत पोहोचतात. वजन वाढते, आणि तो जिथे लाथ मारतो, तिथे पाणी काढण्याची धमक त्याच्या अंगात येते. त्याच्या शब्दाला धार चढते, नजरेला चमक येते. त्याच्या प्रत्येक पावलाखाली जागोजागी लाल गालिचे उलगडले जातात. काही माणसे तर एवढी नशीबवान असतात, की सत्ता त्यांच्या जणू वळचणीलाच आश्रय घेऊन वसलेली असते. सरकार कोणाचेही असो, राज्यकर्ता पक्ष कोणताही असो, किंवा नेते कोणीही असोत. या माणसांना कोणत्याही सरकारदरबारी, कोणत्याही पक्षात किंवा कोणत्याही नेत्यापर्यंत सदैव मुक्त प्रवेश असतो. त्यांचा मानसन्मान राखला जातो. हे नशीब सहसा सहजपणे कुणाला लाभत नाही. साहजिकच, अशा नशीबवान माणसांच्या अंगात, आपली गरज अधोरेखित करण्याची दुर्मीळ शक्ती वास करत असते. कोणतेही सरकार असले, तरी ही शक्ती ज्या पारडय़ात पडते, ते पारडेच कायम जड असते. महाराष्ट्रातील पक्षीय राजकारणाचे, नेत्यांचे आणि निष्ठावंतांचे रंग अनेकवार बदलत गेले. अनेकजण इकडूनतिकडे उडय़ा मारण्याच्या कौशल्यावरच राजकारणात तग धरून राहिले. तर अनेकांची या कौशल्याच्या अभावी वाढच खुंटली. अनेक नेत्यांना वरिष्ठांच्या मर्जीसाठी धडपड करावी लागली, तर किती तरी नेते श्रेष्ठींच्या आशीर्वादासाठी ताटकळत वर्षांनुवर्षे आहेत त्याच स्थितीत राहिले. अनेकांची अवस्था त्रिशंकू झाली, तर अनेकांना आपला स्वाभिमान गुंडाळून वरिष्ठांच्या कृपादृष्टीसाठी प्रतीक्षा करावी लागली. राजकारणात मोठमोठी पदे भूषविलेले अनेक जण अशा स्थितीमुळे हतबल होऊन आपले अस्तित्व टिकविण्याची धडपड करत असताना, कोणत्याही सरकारात लाल गालिचावर वावरणारी ही माणसे मात्र, पडद्याआडचे नायक ठरली. अशा माणसांच्या नावांची यादी खूप लांबलचक होऊ  शकते. हे वर्णन वाचता वाचतादेखील अनेक नावे डोळ्यासमोर तरळू लागतात. अशा काही नशीबवान, लांब हातांच्या, वजनदार माणसांच्या कर्तृत्वाचा लहानसा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न. मराठी माणूस मोठा होत नाही या समजुतीला त्यांनी आपल्या भल्याबुऱ्या कर्तृत्वाच्या जोरावर जोरदार धक्का दिला, तरीही त्यांचे अपार यश हे एक गूढ मानले जाते. ही माणसे कुणाच्या जोरावर एवढी मोठी झाली, त्यांना कुणाचे पाठबळ लाभले, कोण आहे त्यांचा त्राता, कोण आहे त्यांचा कर्ता-करविता, कुठून मिळाले त्यांना मोठे होण्याचे टॉनिक, असे अनेक प्रश्न मराठी मनाला पडणे साहजिकच असते. राजकारणाची संजीवनी साथीला नसेल तर सहजासहजी मोठे होणे सोपे नसते, हे त्या कुतूहलामागचे कारण या माणसांच्या मोठेपणालाही चिकटलेले दिसते. या लांब हातांच्या वजनदार माणसांची जडणघडण कशी झाली, ती कुठे होती आणि कुठे पोहोचली, याचा हा एक प्रातिनिधिक मागोवा..

Health insurance for all ages
आता कोणत्याही वयात आरोग्य विमा सुरक्षा खरेदी करता येणार, नेमका बदल काय?
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश

खासदार संजय काकडे

बारामतीच्या पाण्यातच काही तरी जादू आहे, हे उभा महाराष्ट्र जाणतो. या पाण्याची चव चाखलेला कुणी राजकारणात उतरला, तर सहसा तो अपयशी होत नाही असे म्हणतात. भाजपचे खासदार संजय काकडे हे त्याचे वर्तमानातील उदाहरण. ‘रावणां’चा पराभव करण्यासाठी ‘बिभीषणांना’ सैन्यात दाखल करून घेण्याचा ‘हिरवा कंदील’ पक्षश्रेष्ठींकडून मिळताच, विविध गुन्ह्यांचे आरोप असलेला तिघांच्या गळ्यात नेत्यांच्या हस्ते भाजपचा ‘गमछा’ चढविणारे नेते म्हणून संजय काकडे हे नाव नुसते चर्चेतच नव्हे, तर पक्षाच्या मंचावर पहिल्या रांगेत जाऊन बसले. कधीकाळी मंडईत भाजी विकणाऱ्या या तरुणास बारामतीकरांच्या स्नेहाचा लाभ झाला आणि तो राजकारणाचे धडेही गिरवू लागला. राजकारणात जम बसविण्यासाठी ज्या भांडवलाची गरज असते, ते मिळविण्याचे अंगभूत कौशल्य असल्याने, अल्पावधीतच संजय काकडे हे नाव पुण्याच्या आणि पुढे महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी वर्तुळात परिचयाचे होऊ  लागले, आणि साहजिकच, त्यासोबत त्यांचा बांधकाम व्यवसायही फोफावू लागला. केवळ पक्षकार्यातून नेतेपद मिळत नसते, तर त्यासाठी सत्तेचे पद गरजेचे असते. संजय काकडे यांच्या ‘बिभीषण स्वागता’च्या या प्रयोगामुळे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची पंचाईत झाली. कधीकाळी राष्ट्रवादीचे पाईक असलेले, अजितदादा पवार यांचे निष्ठावंत असलेले संजय काकडे यांनी बांधकाम व्यवसायात कमालीचे यश मिळविले. आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात संजय काकडेंच्या बांधकाम व्यवसायाचे साम्राज्य आहे. २०१४ मध्ये राज्यातून राज्यसभेच्या सातव्या जागेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करून संजय काकडे यांनी जी जादू करून दाखविली, त्याने मुरलेले राजकारणीदेखील थक्क झाले. राष्ट्रवादीच्या आधाराने राजकारणात पाय ठेवलेले संजय काकडे सत्ताबदल होताच अलगद भाजपच्या सत्ताधारी तंबूत दाखल झाले, आणि राष्ट्रवादीची ताकद मोडून काढणारा मोलाचा मोहरा भाजपच्या हाती लागला. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सर करण्यासाठी भाजपला काकडेंची रसद महत्त्वाची ठरली आहे. भाजपच्या वाल्मीकीकरण मोहिमेतून हाती लागलेल्या काही मोहऱ्यांतील हा एक बिनीचा चेहरा. भाजपयुक्त पुणे मोहिमेसाठी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट सध्या काकडे यांच्यामुळे कमालीचे खूश आहेत, असे म्हणतात. खरेखोटे बापटांनाच माहीत!

अविनाश भोसले

पुण्याच्या बाणेर परिसरात कित्येक एकर परिसरातील एक आलिशान महाल, त्याच्या परिसरात उभ्या असलेल्या दिमाखदार महागडय़ा मोटारी, अधूनमधून हवेत झेपावणारे हेलिकॉप्टर, बडय़ा नेत्यांची वर्दळ असा अनोखा माहोल म्हणजे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या साम्राज्याचे वर्णन. कधीकाळी नगर जिल्ह्यातील संगमनेरसारख्या अर्धशहरात शाळकरी जीवन जगलेला हा तरुण नशीब अजमावण्यासाठी पुण्यात दाखल झाला, जेमतेम दहा हजारांच्या भांडवलावर रिक्षा व्यवसाय करू लागला आणि बघता बघता बांधकाम विश्वाचा सम्राट होऊन गेला. १९९६ मध्ये तत्कालीन युती सरकारने कृष्णा खोरे विकास प्राधिकरणांतर्गत कृष्णा नदीच्या खोऱ्यातील पाटबंधाऱ्यांची कामे काढली, आणि गोपीनाथ मुंडे यांच्या डोळ्यात हा बांधकाम व्यावसायिक भरला. भोसले यांना या प्रकल्पातील कामे मिळत गेली, आणि मग त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. पुण्याचा एक रिक्षावाला बघता बघता एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक झाला, आणि जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत सर्वत्र त्याच्यासाठी लाल गालिचे अंथरले जाऊ  लागले. एबीआयएल नावाच्या कंपनीचा बांधकाम क्षेत्रात दबदबा वाढू लागला, आणि अविनाश भोसले यांना सर्वपक्षीय वर्तुळात मानाचे स्थान मिळू लागले. आज त्यांच्या व्यवसायाने हजारो कोटींची उलाढाल गाठली आहे. एकाहून एक दिमाखदार मोटारींचा ताफा, प्रसंगी कोणाही नेत्याच्या दिमतीला दाखल होतील अशी उत्तम देखभालीखालील हेलिकॉप्टर्स असा दिमाख असलेला हा बांधकाम व्यावसायिक पुण्याच्या अतिश्रीमंतांच्या यादीत वरचा क्रमांक राखून आहे. काँग्रेसचे नेते पतंगराव कदम हे त्यांचे व्याही. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सर्वच राजकीय वर्तुळाशी तेवढेच जिव्हाळ्याचे संबंध असलेले अविनाश भोसले यांचा हात कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या सहकार्यासाठी सदैव पुढेच असतो असे म्हणतात. मध्यंतरी त्यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाच्या धाडी पडल्याची बातमी खूप गाजली. कधी कधी ते राजकीय वादाच्या भोवऱ्यातही सापडतात. अशी वादळे झाली की अनेकांच्या कारकीर्दीची पडझड होते. पण अशी अनेक वादळे झेलूनही, भोसले यांच्या साम्राज्याच्या विटा मात्र कायमच मजबूत कशा, याचे कुतूहल मराठी माणसाला कायमच वाटत राहिले.

उज्ज्वल निकम

हे नाव एव्हाना देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून सर्वदूर पसरले आहे. जळगावच्या कोर्टात वकिली करणारा एक वकील मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील विशेष सरकारी वकील म्हणून मुंबईत येतो, आणि नव्या कारकीर्दीच्या पहिल्याच अंकातील पहिल्याच प्रवेशात राजकारणाच्या एका अनपेक्षित अंगाची ओळख होते, आणि उज्ज्वल निकम हे नाव कायदेविश्वात कानोकानी होऊन जाते. संजय दत्तला खटल्यातून सोडविण्याच्या संदर्भात मातोश्रीवर घडलेल्या एका नाटय़मय प्रसंगातून पुन्हा जळगावला परतायच्या तयारीत असतानाच, तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या आदेशावरून पाऊल पुन्हा मुंबईत मागे वळले आणि मग उज्ज्वल निकम यांनी मागे वळून पाहिलेच नाही. शरद पवारांचा माणूस असल्याच्या पूर्वग्रहातून उज्ज्वल निकम यांच्याविषयीचे बाळासाहेब ठाकरे यांचे मत गोपीनाथ मुंडे यांनी मोठय़ा कौशल्याने पुसून टाकले आणि सरकारी वकील ही ओळख निकम यांना अढळपदासारखी प्राप्त झाली. निकम यांच्यासाठी टोकाची भूमिका घेत गोपीनाथ मुंडे यांनी त्या वेळी बाळासाहेबांनाही काहीसे नाराज केले होते, असे म्हणतात. पुढे निकम यांच्यावर बाळासाहेबांचाही लोभ जडला. मुंबई बॉम्बस्फोट, गुलशनकुमार हत्या प्रकरण, कसाबची फाशी, प्रमोद महाजन हत्या, मुंबईतील निर्भया प्रकरण, कोपर्डी बलात्कार प्रकरण अशा अनेक प्रकरणांत विशेष सरकारी वकील म्हणून निकम यांना महत्त्वाची भूमिका बजावता आली, त्यामागे गोपीनाथ मुंडे यांनी त्या वेळी केलेली पाठराखण हेच कारण होते. त्यानंतर सत्तांतर झाले, तरी विशेष सरकारी वकीलपदावरचा पहिला हक्क मात्र निकम यांच्याकडेच राहिला.

अरुण बोंगीरवार

सन १९९९. बहुधा मे महिन्याचा अखेरचा आठवडा होता. राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव पी. सुब्रमण्यम यांची महाराष्ट्र सरकारने अचानक उचलबांगडी केली, आणि महसूल खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या अरुण बोंगीरवार यांना त्या जागी स्थानापन्न करण्यात आले. तब्बल आठ सनदी अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता बाजूला सारून थेट बोंगीरवार यांनाच मुख्य सचिवपदावर बसविण्यात आल्याने, साहजिकच प्रशासकीय आणि राजकारणातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण सरकारचा नाइलाज होता. तत्कालीन सरकारचे रिमोट कंट्रोल म्हणून ओळखले जाणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा डावलणे सरकारला शक्यच नव्हते. दुसऱ्या दिवशी अनेक माध्यमांनीही या नियुक्तीबद्दल आश्चर्य व्यक्त केले. पण तोवर बोंगीरवार यांनी पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्याआधी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली. आधीचे मुख्य सचिव दीर्घ रजेवर गेले होते. राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेत बोंगीरवार पर्व सुरू झाले. त्याआधी सुधाकरराव नाईक आणि मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत त्यांचे सचिव म्हणून काम पाहताना, संकटमोचक अशी बोंगीरवार यांची प्रतिमा तयार झाली होती. सरकारच्या कारकीर्दीतील काही अडचणींवर मात करण्यासाठी सरळमार्गी आणि नियमांवर बोट ठेवून वागणारे सुब्रमण्यम कामाचे नाहीत, असा सरकारच्या श्रेष्ठींचा ठाम समज झाला, आणि बोंगीरवार हेच अशा कामासाठी योग्य प्रशासक आहेत, यावर तेव्हा पहिले शिक्कामोर्तब झाले. तेव्हापासून पुढे त्यांच्या निवृत्तीपर्यंत सरकारला कसोटीच्या अनेक प्रसंगांतून बाहेर काढण्यासाठी बोंगीरवार हा परवलीचा शब्द ठरला. सत्तांतर झाल्यानंतरही त्यांचे हे वजन कायम राहिले. पुढे जानेवारी २००१ मध्ये मुख्य सचिवपदावरून निवृत्त झाल्यानंतरही विविध सरकारी पदांवर काम करण्याची संधी सरकारने त्यांना दिली. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष, महाराष्ट्र एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीचे विशेष कार्य अधिकारी आदी काही पदांवरही त्यांची नियुक्ती झाली. अगदी अलीकडे, फडणवीस सरकारच्या प्रस्तावित समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या परिसरात जमीन खरेदी केल्याप्रकरणी त्यांच्या पुत्राविरुद्ध तक्रारी करणारे अर्ज मुख्यमंत्र्यांकडे गेले होते. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी हे बोंगीरवार यांचे जावई होत.