नमिता धुरी
स्मार्टफोन, संगणक यांचा लहान मुलांकडून होणारा वाढता वापर समाजात चिंतेचा विषय बनलेला असताना आता टाळेबंदीच्या निमित्ताने शाळा आणि खासगी शिकवणी वर्ग विद्यार्थ्यांवर ऑनलाइन शिक्षणाचा भडिमार करत आहेत. याच्या मार्गाच्या कौतुकापेक्षा निराळा सूर लावणारा हा वृत्तान्त..
दरवर्षी दहावी-बारावीचे वर्ग उन्हाळी सुट्टीत सुरू होतात. मात्र, टाळेबंदीत शाळांनी पूर्वप्राथमिकपासूनच्या विद्यार्थ्यांनाही तंत्रज्ञानाच्या दावणीला बांधले आहे. केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष एप्रिल महिन्यात सुरू होते व मे महिन्यात सुट्टी देऊन जूनमध्ये पुन्हा सुरू होते. त्यामुळे संपूर्ण एप्रिल महिना या शाळांनी मुलांना अक्षरश: पिळून काढले. काही शाळांनी एप्रिल संपत आला तरी सुट्टी कधी पडणार याच्या सूचना दिल्या नव्हत्या. गावी गेलेल्या विद्यार्थ्यांना नेटवर्क मिळवण्यात अडचणी येत आहेत. २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश घेतलेले गरीब घटकांतले किती विद्यार्थी ऑनलाइन वर्गामध्ये सहभागी होऊ शकत असतील, याविषयी शंकाच आहे. दुसरे म्हणजे शाळा सुरू झाल्यानंतर उजळणी के ली जाईल, असे शाळा सांगतात. उजळणी करायचीच असेल तर आतापासून ऑनलाइन शिक्षणाचा मारा कशासाठी? उजळणीबाबत खात्री नसलेले पालक आपले मूल मागे राहील या भीतीने काहीही करून मुलांना ऑनलाइन वर्गामध्ये सहभागी व्हायला लावतात. शाळा आणि खासगी शिकवणी दोन्हींच्या ऑनलाइन तासिकांना हजेरी लावणाऱ्या विद्यार्थ्यांवर तंत्रज्ञानाचा अधिक ताण आहे.
मुलांना तंत्रज्ञानाचे कितीही आकर्षण असले तरीही वयाने अगदीच लहान असलेली मुले खूप वेळ संगणकासमोर बसून कं टाळतात, चंचल होतात. मात्र, पालक आणि शिक्षकांना तंत्रज्ञानाचे अप्रूप असल्याने मुलांच्या समस्यांकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. याउलट, लहान वयात मुले तंत्रज्ञान वापरायला शिकत असल्याबद्दल पालक आनंद व्यक्त करतात. टाळेबंदीमुळे पालक-मुलांमधला संवाद वाढणे अपेक्षित असताना ऑनलाइन शिक्षणाच्या निमित्ताने दिवसातले काही तास हा संवाद थांबला आहे. एरवीही मुले संगणकोच्या सहवासात असतात- मग ऑनलाइन अभ्यास केला तर कुठे बिघडले, असे पालक आणि शिक्षकांचे म्हणणे आहे. पालकही ऑफिसचे काम घरूनच करत आहेत. त्यामुळे मुलांनी किती वेळ लॅपटॉप वापरावा आणि पालकांनी किती वेळ वापरावा, हा गहन प्रश्न अनेक कुटुंबांना पडलेला आहे!
पुढील शैक्षणिक वर्षांत अभ्यासक्रम आणि दिवाळी, गणेशोत्सव, ख्रिसमसच्या सुटय़ा कमी करण्याचा विचार राज्य शिक्षण मंडळाने सुरू के ला आहे. मात्र, इतर शिक्षण मंडळे या पर्यायाचा विचारही न करता ऑनलाइन शिक्षण अपरिहार्य असल्याचे भासवत आहेत. ‘‘अॅक्टिव्हिटी हायस्कू ल या आयसीएसई शाळेतर्फे आठवडय़ातून पाच दिवस रोज प्रत्येकी ४० मिनिटांच्या पाच ते सहा तासिका होतात. तासिका सुरू असताना विद्यार्थी मस्ती करत असतील किं वा झोपत असतील तर पालकांकडे ईमेलद्वारे तक्रार के ली जाते,’’ अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका पेरीन बगली यांनी दिली. ‘‘नारायणा सीबीएसई शाळेतर्फे पूर्वप्राथमिक वर्गासाठी रोज अर्धा तास, प्राथमिकसाठी प्रत्येकी ४० मिनिटांच्या दोन, तर माध्यमिकसाठी चार तासिका घेतल्या जातात,’’ असे मुख्याध्यापिका लता मनिम यांनी सांगितले. पुण्याच्या अनिषा ग्लोबल स्कूल या आयजीसीएसई शाळेचे ऑनलाइन वर्ग पहिली ते बारावीसाठी रोज सकाळी ७.४५ ते दुपारी २.५० या वेळेत, तर पूर्वप्राथमिकसाठी आठवडय़ातून दोन-तीन दिवस भरतात. मे महिन्याच्या सुट्टीत ऑनलाइन गृहपाठ दिला जाणार आहे. ‘‘प्रत्येक तासिके नंतर काही मिनिटांची विश्रांती असल्याने विद्यार्थ्यांवर ताण येत नाही. टाळेबंदीत विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणे आवश्यक आहे. अभ्यास म्हणून अमेरिके तील प्राणिसंग्रहालय वगैरे दाखवले जाते. त्यामुळे विद्यार्थी कं टाळत नाहीत,’’ असे शाळेचे व्यवस्थापन भागीदार मनोज सिंग यांचे म्हणणे आहे. हे झाले एप्रिल महिन्यातील प्रातिनिधिक चित्र.
आता एवढे सगळे या शाळा करतात, याचे कारण लक्षात घेतले पाहिजे. परदेशातील अभ्यासक्रम घेऊन विविध शिक्षण मंडळे भारतात आली आणि उच्चभ्रू पालकांच्या पाठिंब्याने मोठी झाली. एखादी नवीन गोष्ट आली म्हणजे जुनी गोष्ट मागास, असे सरळसोट समीकरण पालकांनी तयार केले. वयाच्या अडीचव्या वर्षी हातात आयपॅड देणाऱ्या शाळा पालकांना अधिक भावतात. शाळांमधले संपूर्ण शिक्षण प्रोजेक्टरवर देण्याची खरेच गरज असते का? अभ्यासक्रमाशी संबंधित माहितीपट आठवडय़ातून एकदा विद्यार्थ्यांना दाखवायला हरकत नाही; पण बारीकसारीक गोष्टी प्रोजेक्टरवर दाखवण्याची काय गरज? नाही तरी या तथाकथित ‘अॅडव्हान्स’ शाळांमध्ये लिहून-लिहून फळा भरून टाकण्याची पद्धत नाहीच. त्यामुळे प्रोजेक्टर नाही वापरला तर लिखाणात वेळ जाईल वगैरे अशा काहीही अडचणी नाहीत. काही शाळा तर चित्रकलेच्या तासिके ला फळ्यावर चित्र काढण्याचीही तसदी घेत नाहीत. संगणकामध्ये जतन केलेले चित्र प्रोजेक्टरवर दाखवले जाते. फळ्यावर लिहिण्याचा इतका कसला आळस? आणि अशा शाळांत शिकणाऱ्या मुलांनी घरी येऊन पालकांकडे आयफोन मागितला तर त्यांचे काय चुकले?
परंतु- ‘‘सतत स्क्रीनकडे पाहिल्याने मुलांच्या डोळ्यांमध्ये कोरडेपणा येऊ शकतो. त्यामुळे डोळे लाल होणे, खाज येणे अशा समस्या उद्भवतात. अगदी लहान मुलांसाठी ऑनलाइन शिक्षण गरजेचे नाही. १४-१५ वर्षांच्या मुलांसाठी ते योग्य ठरेल,’’ असे बालरोग चिकित्सक डॉ. संजय खंडेलवाल सांगतात. अशा प्रकारचे मत अनेक बालरोग चिकित्सक समाजमाध्यमे, वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांच्या माध्यमांतून मांडत असतात; पण त्याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसते. या सगळ्याचे फलित म्हणजे टाळेबंदीत सुरू असलेले ऑनलाइन वर्ग.
ऑनलाइन वर्ग सुरू असताना संगणकापासून लांब बसावे, दोन तासिकांच्या मधल्या काळात डोळ्यांचा व्यायाम करावा, शारीरिक व्यायाम करावा अशा गोष्टी जन्मापासूनच नियोजनबद्ध आयुष्य जगणाऱ्यांच्या मुलांना जमू शकतील; पण सगळ्याच कुटुंबांमध्ये हे वातावरण नाही. बहुतेकांच्या घरात ऑनलाइनबाबत फक्त आकर्षण आहे, ज्ञान नाही. खासगी कंपन्या, न्यायालय इत्यादी ठिकाणी सध्या लोकप्रिय ठरलेले ‘झूम’ अॅप एकदा तरी वापरण्याचा मोह ऑनलाइन शिक्षणाच्या सध्याच्या लोकप्रियतेमागील खरे कारण आहे. ‘झूम’मधून माहिती चोरीला जात असल्याच्या बातम्या येऊ लागल्यावर काही शाळांनी आपला मोर्चा ‘गूगल मीट’कडे वळवला. मात्र, काही शाळा अजूनही ‘झूम’चा वापर करतात. ज्या शाळा आधीपासूनच तंत्रज्ञानाला भरपूर महत्त्व देतात, त्यांनी स्वत:ची संगणकीय प्रणाली विकसित के ली आहे. लाइव्ह तासिका न घेतल्यास यूटय़ूबच्या लिंक आणि स्वत: तयार के लेल्या चित्रफिती पाठवून विद्यार्थ्यांना पाहण्यास सांगितले जाते. शाळेने विकसित केलेली संगणकीय प्रणाली किंवा अॅप काही वेळा खरेदी करावे लागतात. त्यामुळे पालकांवर आर्थिक भार पडतो आणि शाळांना कमाईचे नवे साधन उपलब्ध होते. काही शाळा ऑनलाइन वर्ग मोफत घेत असल्याचे भासवत असल्या, तरीही त्याचा खर्च आधीच शालेय शुल्कामधून पालकांकडून वसूल केलेला असतो.
नवी विषमता
पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी अनुदानित-विनाअनुदानित शाळा असे काही गट विद्यार्थ्यांमध्ये होते. नंतर भारतीय भाषांमध्ये शिकणारे आणि इंग्रजी माध्यमातून शिकणारे असे गट तयार झाले. त्यानंतर राज्य शिक्षण मंडळ, केंद्रीय शिक्षण मंडळे आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळे असे तीन नवे गट विद्यार्थी वर्गात उदयास आले. तंत्रज्ञानाच्या वाढत्या आकर्षणामुळे आता ऑनलाइन शिकणारे आणि ऑफलाइन शिकणारे अशी नवी विषमता सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये, खासगी मराठी शाळांमध्ये शिकणारे किं वा इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश घेतलेले बरेच विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या जगापासून दूर असतात. त्यांचा अभ्यास शाळेसोबत सुरू होतो आणि शाळेसोबत संपतो. ग्रामीण भागात पालकांकडे स्मार्टफोन, संगणक असले तरी इंटरनेट जोडणी असेलच आणि त्याला नेटवर्क मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेने चोखाळलेला नवा ऑनलाइन मार्ग खूप मोठय़ा विद्यार्थिसंख्येला शिक्षणापासून वंचित ठेवणारा आहे. आतापर्यंत ऑनलाइन शिक्षण उच्चभ्रू इंग्रजी शाळांपुरतेच मर्यादित होते, तिथेही त्याला मर्यादा होत्याच; पण टाळेबंदीमध्ये ऑनलाइन शिक्षणाचे जे काही लोण पसरले आहे ते टाळेबंदीनंतरही थांबेल असे वाटत नाही.
गरज असेल त्यांच्यासाठी आम्ही शाळा सुरू झाल्यावर उजळणी घेऊ, असे शाळा सांगतात; पण उजळणीचा अर्थ विद्यार्थी जे आधीच शिकले आहेत त्याची त्यांना आठवण करून देणे आणि संकल्पना समजल्या आहेत का हे तपासणे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात सहभागी होता आलेले नाही त्यांना उजळणीचा काहीच उपयोग नाही. ते विद्यार्थी मागे पडत जातील आणि त्यांच्या पालकांवर तांत्रिक उपकरणे खरेदी करण्याचा दबाव वाढेल.
त्यामुळे मराठी शाळा आणि सरकार यांनी तरी तंत्रज्ञानाचा वापर आत्यंतिक गरज असल्याशिवाय शिक्षणात करू नये.
खासगी शिकवणी वर्गही ऑनलाइन
शाळा-महाविद्यालये या प्रचलित शिक्षणव्यवस्थेला समांतरपणे उभे राहिलेले खासगी शिकवणी वर्ग तरी ऑनलाइन तासिकांबाबत कसे मागे राहतील? आयसीएसईच्या शाळांना मे महिन्यात सुट्टी असते. मात्र, ऑनलाइन शिकवताना मर्यादा येत असल्याने आठवी ते दहावीसाठी सुट्टीतही जास्तीचे वर्ग भरवणार असल्याचे कांदिवली येथील डी. एम. टय़ुटोरियल्सचे मुके श चव्हाण सांगतात. रोज दीड-दीड तासांच्या दोन तासिका होतात. ज्यांच्याकडे नेटवर्क नाही त्यांना चित्रफिती तयार करून पाठवल्या जातात. नेटवर्क मिळेल तेव्हा त्यांनी त्या डाऊनलोड करून पाहायच्या. पालकांनी आधीच पूर्ण शुल्क भरलेले असल्याने ऑनलाइन वर्गाना उपस्थित राहण्याशिवाय विद्यार्थ्यांना गत्यंतर नाही. शिवाय शाळेच्या ऑनलाइन तासिकांचा भार वेगळाच.
मराठी शाळांकडून अंधानुकरण
काही मराठी शाळांनी विद्यार्थ्यांना स्क्रीनविरहित अभ्यास दिला आहे. टाळेबंदीत एकटय़ा पडलेल्या रिकाम्या रस्त्याचे मनोगत लिहा, पालकांना घरकामात मदत करा, पुस्तके वाचून त्याचा अभिप्राय लिहा.. असा कृतिअभ्यास या शाळा देत आहेत. ‘इंग्रजी शाळा’ हा मापदंड मानणाऱ्या काही मराठी शाळा मात्र रस्ता चुकल्या आहेत. शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या इंग्रजी शाळांचे समाजात कौतुक होत असल्याने त्यांचे अंधानुकरण क रण्याकडे मराठी शाळांचा कल आहे. डी. एस. हायस्कू लच्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षांचा अभ्यासक्रम शिकवला जातो. रोज प्रत्येकी ४० मिनिटांच्या तीन ते चार तासिका होतात. शिवाय विविध स्पर्धा परीक्षांसाठीही अध्यापन केले जाते. ‘‘यामुळे विद्यार्थी आवडीने शिकतात. वर्गात न बोलणारी मुलेही बोलू लागतात,’’ असे शाळेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांचे म्हणणे आहे. स्वामी शामानंद एज्युके शन सोसायटीचे पाचवी ते नववीचे विद्यार्थी आदल्या वर्षीच्या अभ्यासक्रमाची रोज तासभर ऑनलाइन उजळणी करतात. पालकांची मानसिकता तयार करण्यासाठी व्यक्तिश: संपर्क साधून ऑनलाइन तासिकांचे महत्त्व पटवून दिल्याचे शिक्षिका मनीषा शिंदे सांगतात. मुलुंड विद्यामंदिरने पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडय़ातून तीन दिवस आणि दहावीसाठी चार दिवस ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. रोज पाऊण तासाची तासिका आणि नंतर ऑनलाइन परीक्षा होते. मोठे प्रश्न सोडवायला विद्यार्थी कं टाळत असल्याने छोटय़ा प्रश्नांची परीक्षा घेतली जात असल्याचे शिक्षक भाऊसाहेब घाडगे यांनी सांगितले. या शाळा सुट्टीतही तासिका सुरू ठेवणार आहेत.
‘शिक्षणात गुंतवून ठेवण्या’साठी सरकारचा ‘तंत्रस्नेही’ खटाटोप!
ऑनलाइन शिक्षणावर नियंत्रणाऐवजी सरकारची सध्या यास प्रोत्साहनाचीच भूमिका दिसते आहे. राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २८ एप्रिलला परिपत्रक काढून विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी उपलब्ध असलेले विविध अॅप्स, संके तस्थळे, पीडीएफ पुस्तकांच्या लिंक्स, यूटय़ूब वाहिन्या आदींची माहिती जाहीर केली आहे. यात शालेय अभ्यासक्रमावर आधारित आणि अवांतर वाचनासाठीचे ई-साहित्य उपलब्ध आहे. जूनमध्ये परिस्थिती अधिकच बिकट असेल आणि शाळा सुरूच होऊ शकत नाहीत याची खात्री पटली असेल, अशा वेळी असे परिपत्रक निघाले असते तर समजून घेण्यासारखे होते; पण २८ एप्रिल म्हणजे ऐन उन्हाळी सुट्टीच्या तोंडावर हे परिपत्रक काढण्यामागचे कारण काय असावे?
‘‘टाळेबंदीत विद्यार्थ्यांना एखाद्या गोष्टीत गुंतवून ठेवणे गरजेचे आहे. म्हणून ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय देण्यात आला. मात्र, विद्यार्थ्यांच्या वयानुसार ऑनलाइन शिक्षणाचा दिवसभरातील कालावधी ठरवण्याबाबत विचार केला जाईल,’’ असे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिले.
मुलांना गुंतवून ठेवायचे असेल तर वाचन (घरात पुस्तके नसतील, तर रद्दीतील वृत्तपत्रे), बैठे खेळ, व्यायाम, घरातील कामे, कथाकथन, कथालेखन, गायन, नृत्य अशा व्यक्तिमत्त्व विकास घडवणाऱ्या गोष्टी सरकारने पालकांना सुचवायला हरकत नव्हती. ‘‘तासन्तास स्क्रीनसमोर बसण्याची मुलांची क्षमता नसते. त्यामुळे लाइव्ह तासिका घेण्याच्या सूचना दिलेल्या नाहीत. शाळांनी ३० एप्रिलपर्यंत व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवून अभ्यास द्यावा, अशा सूचना दिल्या होत्या. हा अभ्यास विद्यार्थ्यांनी ऑफलाइन करणे अपेक्षित होते,’’ असे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
namitadhuri96@gmail.com