अब्दुल कादर मुकादम

औरंगाबादचे नाव बदलून ते संभाजीनगर व्हावे, ही मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत आहे. राज्यातील सद्य: राजकीय वातावरणात तिचे पडसादही उमटत आहेत. ही मागणी भावनिक असली, तरी तिला सुप्त धर्मवादी झालरसुद्धा आहे. ती टाळून, या प्रश्नी निराळा पर्याय सुचवू पाहणारे हे टिपण..

Atul Save, chandrakant khaire
ठाकरेंच्या बंडखोराची माघार, काँग्रेसऐवजी भाजपा सुखावली, अतुल सावेंनी थेंट खैरेंचे पाय धरले; औरंगाबादमध्ये काय घडतंय?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
nagpur pollution increased on diwali due to use of firecrackers
प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना हवेत ,कोट्यवधींच्या फटाक्यांचा आवाज व धूर
pune video
वाढीव पुणेकर! एवढे उत्साही लोक फक्त पुण्यातच भेटतात, पठ्ठ्याने कारला केली लायटिंग, Video Viral
sobhita dhulipala celebrated diwali with naga chaitnya and family
लग्नाआधी सोभिता धुलीपालानं नागा चैतन्याच्या कुटुंबासह साजरी केली दिवाळी; अभिनेत्रीच्या साडीतल्या लूकमुळे वेधलं लक्ष, पाहा फोटो
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
Health Special Diwali for mental health
Health Special : मानसिक स्वास्थ्यासाठी दिवाळी
awareness campaign by fire brigade during diwali
दिवाळीत अग्निशमन दलाकडून जनजागृती मोहिम; सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

औरंगाबाद शहराचे नाव बदलून ते ‘संभाजीनगर’ असे ठेवावे ही मागणी गेल्या काही वर्षांपासून सतत केली जात आहे, अलीकडे मात्र या मागणीने विशेष जोर धरला आहे असे दिसते. परंतु या मागणीमागे तर्कशुद्ध सत्यशोधनापेक्षा भावनिकतेचा भाग अधिक आहे. उलट या विषयाला असलेली धर्मवादी झालरसुद्धा या भावनिकतेचाच आविष्कार आहे. म्हणूनच औरंगाबादला ‘संभाजीनगर’ हे नाव देण्याचा हिंदू आग्रह धरतात, तर त्याची प्रतिक्रिया म्हणून ‘औरंगाबाद’ हे नाव बदलू नये असा आग्रह मुस्लीम धरतात. अर्थात, हे नाव सम्राट औरंगझेबाने दिलेले आहे. तो मुसलमान असल्यामुळे ते नाव बदलू नये, अशी मुस्लिमांची भूमिका आहे. पण ती एवढय़ापुरतीच मर्यादित नाही. त्यापलीकडे त्याला आणखी एक व्यापक व सर्वसमावेशक अर्थ आहे. तो अर्थ समजून घेतला तर या विषयाचा तिढा हळुवार हाताने आपण सोडवू शकू.

एकूण लोकसंख्येच्या १३-१४ टक्के मुसलमान आहेत. त्यांच्याबरोबर आणखीही काही लहान-मोठे धार्मिक-सांस्कृतिक- भाषिक- प्रादेशिक गट आहेत आणि त्यांचीही काही सांस्कृतिक वैशिष्टय़े आहेत. व्यापक भारतीय संस्कृतीच्या कक्षेत त्यांचीही जपणूक व्हावी असे त्यांना वाटत असते, यात भारतीय मुस्लीमही आले. त्यांनी आपल्या संस्कृतीची जपणूक करावी किंवा तिचा अभिमान बाळगावा यात गैर काही नाही. मात्र, यासंदर्भात त्यांनी दोन पथ्ये पाळणे आवश्यक आहे. एक म्हणजे, मुस्लीम संस्कृती व्यापक भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे याचे सतत भान ठेवले पाहिजे. पण त्याचबरोबर मुस्लीम किंवा इस्लामिक संस्कृतीचे प्रतीक म्हणून ज्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा स्वीकार करणार असू त्या व्यक्तीची वैचारिक किंवा सैद्धान्तिक बैठक आणि मूल्यांची बांधिलकी वरील विवेचनाशी सुसंगत असली पाहिजे. अन्यथा विविधतेतून एकात्मता साधण्याचे आपले सर्व प्रयत्न फोल ठरतील.

धार्मिकता आणि धर्मवेड ही औरंगझेबाच्या व्यक्तिमत्त्वाची दोन मुख्य वैशिष्टय़े होती. तो स्वत:ला धार्मिक म्हणवत असे. धर्माची सर्व कर्मकांडे व इतर सर्व धार्मिक व्यवहार तो काटेकोरपणे पाळत असे. पण तेवढय़ामुळे तो आपल्या धार्मिकतेशी किंवा धर्माचरणाशी प्रामाणिक आहे, असे समजणे कठीण आहे. सत्ता मिळवणे आणि तिचा मनसोक्त वापर करणे हेच त्याचे एकमेव उद्दिष्ट होते. हे साध्य करण्याच्या आड जे जे आले- मग ती मानवी व्यक्ती असो किंवा धर्माचे आदेश असोत, त्यांना लीलया आपल्या मार्गातून दूर करण्यात त्याला कसलीही दिक्कत वाटत नसे. सम्राट शहाजहान आजारी पडल्याची बातमी कळली तेव्हा तो दक्षिणेच्या मोहिमेवर होता. ही मोहीम तशीच अर्धवट सोडून त्याने दिल्ली गाठली. यदाकदाचित शहाजहानचे निधन झाले तर तिथे होणाऱ्या सत्तास्पर्धेत आपण अग्रभागी असले पाहिजे, हा त्यामागील हेतू होता.

औरंगझेबाच्या अंदाजाप्रमाणे सम्राट शहाजहानचे निधन झाले नाही. पण सूत्रे आपल्या हातात असावी म्हणून त्याने आपल्या या वडिलांनाच कैदेत टाकले. पाठोपाठ दारा शुकोह, शाहसुजा, मुरादबक्ष, दाराचा ज्येष्ठ पुत्र सुलेमान शिकोह या सर्वाचा काटा काढला. कपटीपणाचा कळस म्हणजे दाराचा काटा काढण्यासाठी एका वेगळ्या मार्गाचा अवलंब केला. दारा शुकोहवर सुफी संतांच्या आध्यात्मिक परंपरेचा प्रभाव होता. शिवाय त्याला हिंदू धर्मपरंपरांविषयीसुद्धा आदर व ओढ होती. म्हणून वाराणसीला जाऊन तेथील पंडितांकडून तो संस्कृत भाषा शिकला, अनेक संस्कृत ग्रंथांचे पर्शियनमध्ये अनुवाद केले. हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही समाजांत त्याच्याविषयी प्रेम व आदर होता. अशा या लोकप्रिय राजपुत्राला इतर वारसांसारखे एक घाव दोन तुकडे या न्यायाने त्याचा वध केला तर प्रजेत बंडाळी माजण्याची शक्यता होती. म्हणून औरंगझेबाने त्याला धर्मद्रोही ठरवून त्याच्या धर्मद्रोहाची चौकशी करण्यासाठी एका न्याय समितीचे गठन केले. ही समिती इस्लामी कायदे व न्यायपद्धतीनुसार दारा शुकोहचा न्यायनिवाडा करणार होती. अर्थात, हा निकाल प्रत्यक्षात औरंगझेबाला हवा तसा होणार होता हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या समितीने दारा शुकोह धर्मद्रोही असल्याचाच निकाल दिला. औरंगझेबाने तो ग्राह्य़ मानून दाराचा शिरच्छेद केला. पण ही कत्तलबाजी इथेच संपत नाही. भविष्यात आपल्याविरोधात कुणी विरोधक उठू नये म्हणून त्याने स्वत:चा ज्येष्ठ पुत्र सुल्तान मुहम्मद याचाही शिरच्छेद केला.

औरंगझेबाने सत्तेसाठी केलेला हा पाशवी हिंसाचार आहे. यात शंका नाही. पण इस्लामी न्यायशास्त्रातसुद्धा त्यास कसलाही आधार नाही.  इस्लामी परंपरेत राजा, सम्राट किंवा साम्राज्याची कसलीही संकल्पना अस्तित्वात नसताना औरंगझेबाने स्वत:ला आलमगीर म्हणवून घेणे हासुद्धा धर्मद्रोहच आहे.

कुराणाच्या दुसऱ्या अध्यायातील १९३ वा श्लोक यासंदर्भात अतिशय नि:संदिग्ध आणि स्पष्ट आदेश आहे. त्यात म्हटले आहे की, ‘आणि जोपर्यंत (धार्मिक) छळ थांबत नाही तोपर्यंत त्यांच्याशी लढा, आणि जर त्यांनी तो छळ थांबविला तर ही गोष्ट लक्षात ठेवावी की, आक्रमकांव्यतिरिक्त इतरांच्या बाबतीत शत्रुत्व ठेवण्याची परवानगी नाही.’ या श्लोकाच्या अनुषंगाने औरंगझेबाच्या कृतीचे पृथक्करण करू या. इथे औरंगझेब आक्रमक आहे. त्याच्या आदेशांप्रमाणे त्याचा सेनापती मुकर्रब खान याने संगमेश्वराच्या वाडय़ात संभाजी राजे आणि कवी कलश या दोघांना जिवंत पकडले आणि बेडय़ा व शृंखलाबद्ध करून औरंगझेबाच्या दरबारात हजर केले. इथेही औरंगझेबाच्या दांभिक धार्मिकतेचा आणखी एक वेगळा पैलू दिसतो. संभाजी राजांना त्याच्या दरबारात साखळदंड-बेडय़ा घातलेल्या आणि नि:शस्त्र अवस्थेत उभे करण्यात आले होते. म्हणजे त्या क्षणी ते एक प्रकारे शरणागत होते, म्हणून त्यांच्याविषयी शत्रुत्वाची भावना ठेवण्याची कुराणानुसार परवानगी नाही. मात्र, औरंगझेबाने कुराणाचा हाही आदेश पायदळी तुडवला. कुराणात अल्लाहचे वर्णन करुणामय, आपला करुणेचा प्रत्यय आणून देणारा, दयाशील, क्षमाशील असे आहे. पण औरंगझेबाचा अल्लाह यापेक्षा पूर्ण वेगळा आहे. याला दांभिकता नाही म्हणायचे तर काय म्हणायचे?

औरंगझेबाच्या व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण आणखी एका दृष्टिकोनातून आपण करू शकतो. हा सम्राट साम्राज्यवादी आणि सरंजामशाही राजकीय व्यवस्थेचा प्रतिनिधी होता. अशा राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेत समाजकल्याण किंवा प्रजेच्या विकासाचा विचार दुय्यम ठरत असतो. साम्राज्य वाढविणे हेच अशा व्यवस्थेचे व्यवच्छेदक लक्षण असते. औरंगझेबाच्या व्यक्तिमत्त्वात ही सारी लक्षणे होती. पण त्याचबरोबर त्यात धार्मिकता आणि धर्माधताही मोठय़ा प्रमाणात होती. त्याचे धर्मवेड आक्रमक व हिंसक होते आणि धार्मिकता दांभिक होती. हे पाहता, एखाद्या शहराला दिलेले त्याचे नाव बदलले तरी काहीच बिघडणार नाही. कारण त्याचे स्मरण चिरंतन करावे असे त्याच्या व्यक्तिमत्त्वात काहीच नव्हते.

मात्र, दक्षिणेतील मध्ययुगीन इतिहासात आणि संस्कृतीत आपल्या कर्तृत्वाने व उमद्या स्वभावामुळे उच्च पदास पोहोचलेल्या काही थोडक्या महानायकांमध्ये मलिक अंबरचे नाव आदरपूर्वक घेतले जात होते. तत्कालीन राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्याचे कर्तृत्व इतके वादातीत होते, की मोगलांसारख्या त्याच्या शत्रूलादेखील त्याच्याविषयी आदर वाटत असे. १६ व्या शतकाचा उत्तरार्ध आणि १७ व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ हा उत्तरेतील मुघल साम्राज्याचा उत्कर्षांचा कालखंड होता. लष्करी सामर्थ्य हे या सम्राटांचे वैशिष्टय़ होते. अशा सामर्थ्यवान सत्तेला मलिक अंबरने शेवटपर्यंत दख्खनचा शत्रू मानले व त्यांच्याशी लढला.

ही प्रादेशिक व भौगोलिक अस्मिता आणि सर्वसमावेशक व कल्याणकारी समाजव्यवस्था हे मलिक अंबरच्या राजकारणाचे मध्यवर्ती सूत्र होते. गरीब आई-वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या आणि वयाच्या १६ व्या वर्षांपासूनच गुलामगिरीच्या जाळ्यात अडकून पडलेल्या या तरुणाने सगळ्या विपरीत परिस्थितीवर मात करून यशाचे परमोच्च शिखर गाठले.

मलिक अंबरचा जन्म इ.स. १५४८ मध्ये इथिओपियातील एका लहानशा गावात झाला. घरात अठराविशे दारिद्रय़. मुळात गरिबी हे साऱ्या देशाचेच व्यवच्छेदक लक्षण होते. म्हणूनच त्या काळी हा देश गुलामांच्या घाऊक निर्यातीसाठी प्रसिद्ध होता. त्यामुळे मलिक अंबरचे प्राक्तन यापेक्षा वेगळे नव्हते. तो कदाचित युद्धात कैदी म्हणून पकडला गेला असावा किंवा दारिद्रय़ामुळे त्याच्या आईवडिलांनीच त्याला गुलाम म्हणून विकले असावे. काहीही असेल, पण अशा गुलामांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात तोसुद्धा त्या समाजाचा अविभाज्य घटक झाला. त्याचे मूळचे नाव ‘चापू’ होते. पण गुलामीचे जीवन जगत असतानासुद्धा तो प्रगतिपथावर वेगाने पुढे जात होता. इथिओपियातून त्याला बगदाद येथे नेण्यात आले. तिथे एका प्रसिद्ध व्यापाऱ्याने त्याला विकत घेतले आणि त्याचे नाव ‘मलिक अंबर’ (आकाशाचा राजा) ठेवले व त्याच्या शिक्षणाचीही व्यवस्था केली. बगदादहून त्याची रवानगी दक्षिण भारतात झाली, जिथे अहमदनगरच्या निजामशाहीचा पेशवा (पंतप्रधान) चंगीझखानने त्याला विकत घेतले. त्या दिवसापासून निजामशाहीने त्याला आणि त्याने निजामशाहीला सोडले नाही.

१५७४-७५ मध्ये मलिक अंबरच्या जीवनाला कलाटणी देणारी एक घटना घडली. त्याचे मालक चंगीझखान पेशवा याचे दु:खद निधन झाले आणि त्याच्या विधवा पत्नीने मलिक अंबरला गुलामीतून मुक्त केले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. शेवटी तो निजामशाहीचा पेशवा झाला. पेशवेपदाच्या कारकीर्दीत निजामशाहीच्या तख्तावर बसण्याची अनेकदा संधी आली, पण प्रत्येक वेळी शाही घराण्यातील वारसालाच निजामशाहीच्या तख्तावर बसविले व पेशवा म्हणून कारभार केला. राजघराण्याची प्रतिष्ठा आणि प्रजेचे कल्याण याचे सतत भान ठेवून कारभार केला. समन्याय व सर्वसमावेशकता हे त्याच्या राज्यकारभाराचे सूत्र होते. अनेक मराठा सरदारांना त्याने निजामशाहीत संधी दिली. त्यात मालोजी भोसले आणि शहाजी भोसले यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. कारण ते मलिक अंबरचे विश्वासू आणि निकटचे सहकारी होते.

औरंगाबाद शहराचे हे नाव खुद्द औरंगझेबाने ठेवले. पण त्या शहराच्या जडणघडणीत किंवा विकासात त्याचे काहीही योगदान नाही. पण त्याचबरोबर स्वत:ला धार्मिक म्हणवून घेणारा, धार्मिक कर्म नियमितपणे करणारा हा सम्राट प्रत्यक्षात दांभिक होता. तेव्हा ते नाव कुणी बदलायचे ठरवले तर त्याबाबत आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण त्यापेक्षा ‘संभाजीनगर’ असे नामांतर करताना, संभाजी राजेंविषयी अधिक विचार करणे आवश्यक आहे असे वाटते. सम्राट औरंगझेबाने अतिशय अमानुषपणे त्यांची हत्या केलीच; पण त्यांच्या स्वजनांनीसुद्धा त्यांच्यावर आयुष्यभर अन्याय केला. तेव्हा त्यांना न्याय मिळावा अशा तऱ्हेने त्यांच्या स्मारकाचा विचार व्हायला हवा. त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले त्या जागी संभाजी राजांचे स्मारक व्हावे, आणि तेसुद्धा ज्ञानसाधनेची समृद्ध अशी संस्था निर्माण करून व्हावे.

आता प्रश्न उरलाय तो ‘औरंगाबाद’ या नावाचा! ते नाव तसेच ठेवायचे का? त्याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. पण त्याऐवजी दखनी प्रदेशाला भौगोलिक अस्मिता देणारा, गनिमी काव्याचा आणि विविधतेतून एकात्मता साधण्याच्या सिद्धान्ताचा जनक असलेला मलिक अंबरचे नाव देणे सर्वस्वी योग्य होईल असे वाटते. ऐन तारुण्यात गुलाम म्हणून विकला गेल्यामुळे आपल्या जन्मभूमीशी कायमचे नाते तुटलेल्या मलिक अंबरने दक्षिण भारतात आल्यानंतर या भूमीला आपले मानले, या भूमीशी कधीच प्रतारणा केली नाही. शिवाय दौलताबादजवळच्या खडकी या लहानशा गावाचा सर्वागीण विकास केला.अशा प्रतिभाशाली आणि ऋषितुल्य राजकारणी नेत्याचे नाव या शहराला दिल्यास ते सर्वार्थाने योग्य होईल.

(लेखक राजकीय-सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

arumukadam@gmail.com