१९३८ साली जन्मलेल्या भालचंद्र नेमाडे यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण त्यांच्या जन्मगावी खान्देशातच झाले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातून बीए आणि डेक्कन महाविद्यालयातून एमए (भाषाशास्त्र) केले. त्याचबरोबर १९६४ साली मुंबई विद्यापीठातून इंग्रजी साहित्यातही एमए केले. त्यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून डी.लिट देऊन सन्मानित करण्यात आले आहे. इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अहमदनगर, धुळे, औरंगाबाद, लंडनचे ‘स्कूल ऑप ओरिएंटल अॅण्ड आफ्रिकन स्टडीज’, मराठवाडा विद्यापीठ येथे काम केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या ‘गुरुदेव टागोर तुलनात्मक साहित्य अभ्यास’ अध्यासन भूषविल्यानंतर ते निवृत्त झाले.
सन्मानाची समृद्ध अडगळ
श्रेष्ठ कादंबरीकाराचा यथोचित सन्मान
राजकारणाला न जुमानता नेमाडेंना ज्ञानपीठ
‘आता कविता लेखन करणार’!
ज्ञानपीठ म्हणजे काय रे भाऊ?
विशेष संपादकीय – तुकारामांच्या मराठीचा गौरव!
नेमाडे यांनी आपली पहिली ‘कोसला’ ही कादंबरी वयाच्या २५व्या वर्षी लिहिली. ‘कोसला’ ही पांडुरंग सांगवीकर या खेडय़ातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या या तरुणाची आत्मकथा आहे. ही कांदबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयीन प्रवाहाबाहेरील कलाकृती मानली जाते. ‘कोसला’च्या यशानंतर नेमाडे यांनी बिढार, जरीला व झूल या ‘चांगदेव पाटील’ या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबऱ्या लिहिल्या. त्यानंतर नेमाडे यांनी तब्बल ३५ वर्षे अभ्यास करून लिहिलेल्या ‘हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीने तर वाचकांच्या मनावर गारूड केले. ‘हिंदू’ तीन भागांमध्ये लिहिली जाणार असल्याने आता वाचकांना त्याच्या पुढील भागाबद्दल उत्कंठा आहे. नेमाडेंना यापूर्वी साहित्य अकादमी, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान, पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
१९७५-८०च्या काळात जागतिकीकरणाच्या जाणिवेतून नेमाडे यांनी ‘देशीवादा’ची विचारसरणी जन्माला घातली. त्याला सुरुवातीला अनेक विचारवंतांनी विरोध केला, परंतु जागतिकीकरण जितके वाढत जाईल तितका देशीवाद रुजेल, असे सांगत नेमाडे आपल्या विचारांचे समर्थन करीत आले आहेत. आज अनेक विद्यापीठांमधून ‘देशीवाद’ हा अभ्यासाचा विषय झाला आहे. आपण आपल्या गोष्टी गमावतोय, या जाणिवेतून देशीवाद तयार झाला होता. देशीवादाच्या मांडणीवर अनेकदा ती हिंदुत्ववादी किंवा गांधीवादी विचारसरणीच्या जवळ जाणारी आहे, असा आक्षेप घेतला जातो. याला उत्तर देताना आपल्या आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या देशीवादामध्ये गल्लत करू नये, असे नेमाडे वेळोवेळी स्पष्ट करीत आले आहेत.आपल्या सडेतोड भूमिकेसाठी नेमाडे प्रसिद्ध आहेत. साहित्य संमेलन भरवणं ही नस्ती उठाठेव असून संमेलनावर चर्चा करणे हा वेळेचा अपव्यय आहे, असे मत व्यक्त करून नेमाडे यांनी मराठी साहित्यविश्वात खळबळ उडविली होती. त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाच्या शाळा हद्दपार करण्याच्या त्यांच्या विधानामुळेही असाच वाद उफाळला होता.
प्रकाशित साहित्य
कादंबऱ्या : कोसला (१९६३), बिढार (१९७५), हूल (१९७५), जरीला (१९७७), झूल (१९७९), हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ (२०११).
कविता : मेलडी (१९७०), देखणी (१९९१).
समीक्षा व संशोधन : साहित्याची भाषा (१९८७), द इन्फ्लुअन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी : असोशिओलि-ग्विस्टिक अॅण्ड स्टायलिस्टिक स्टडी (१९९०), टीकास्वयंवर (१९९०), इंडो-अँग्लिअन रायटिंग्ज : टू लेक्चर्स (१९९१), मराठी रीडिंग कोर्स (इअन रेसाइडसह) (१९९१), तुकाराम (१९९४), मराठी फॉर बिगिनर्स (१९९४), साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण (२००३), निवडक मुलाखती (२००८), सोळा भाषणे (२००९), नेटिव्हिजम : देशीवाद (२००९).
यंदा साहित्य संमेलन महाराष्ट्राहाबाहेर आणि खऱ्या अर्थाने आंतरभारती होत आहे. अशा वेळी भारतीय पातळीवरचा सर्वोच्च सन्मान मराठीला आणि तोही मी संमेलनाचा अध्यक्ष असताना मिळावा याचा आनंद आहे. नेमाडे यांची संमेलनाबद्दलची मते सर्वानाच ठाऊक आहेत. पण, नेमाडे हा बापमाणूस आहे.
-डॉ. सदानंद मोरे
नेमाडे यांच्या पन्नास वर्षांच्या साहित्य लेखनातून त्यांनी सातत्याने हाच जीवनभाष्याचा विचार मांडलेला आहे. नेमाडे हे आपल्या भूमिकेशी नेहमी ठाम असतात. ते त्यांच्या लेखनातूनही दिसून येते. त्यांची भूमिका ही प्रचलित विषयापासून वेगळी असली तरी त्यातून त्यांची ठाम मते पाहायला मिळतात.
-रामदास भटकळ
सुरुवातीपासूनच प्रयोगशील लेखन करणाऱ्या आणि ती परंपरा आजतागायत जपलेल्या लेखकाचा हा सन्मान आहे. कादंबरी लेखनाबरोबरच काव्य लेखनातही याचे प्रतिबिंब उमटले आहे. नेमाडे यांच्यावर तुकाराम, विशेषत: महानुभावांचा परिणाम दिसून येतो.
-डॉ. विजया राजाध्यक्ष
नेमाडेचं खरं तर भाषेबद्दल जे म्हणणं आहे त्या अंगानं काहीतरी व्हायला पाहिजे होतं. लोकांना मराठी येत नाही. एरवीच्या शाळांतून वा विद्यापीठांतूनही मराठी नीट शिकवलंच जात नाही, इकडनं रिटायर झालो की औरंगाबादला निव्वळ मराठी (हा एकच विषय) शिकवणारी शाळा काढायची, असं त्याला वाटत होतं. चंद्रकांत पाटील वगैरे मित्रांनी साथ दिली असती, तर आज ही ‘शाळा’ म्हणजे शाळाच असं नव्हे, कदाचित महाविद्यालयीन किंवा पदव्युत्तर पातळीवरचं अभ्यासकेंद्रसुद्धा- उभं राहिलं असतं!
-अशोक शहाणे
‘ज्ञानपीठ’ मिळाला म्हणजे मतभेद संपले असं नाही. नेमाडेंशी असलेले मतभेद कायम राहणार. तरीही पुरस्काराचा आनंद आहे. नेमाडेंचा देशीवाद समाजाला मध्ययुगात घेऊन जातो. आधुनिकतेचे सगळे फायदे घ्यायचे आणि देशीवादाचा पुरस्कार करायचा, ही तर्कविसंगत भूमिका आहे.
-डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्ती हा निदान मराठी माणसाच्या बाबतीत तरी नक्कीच ९ अनन्यसाधारण असं माहात्म्य सांगणारा प्रसंग आहे. हा अत्यंत दुर्मिळ सन्मान आपल्या नेमाडेसरांना मिळाला याचा मनापासून आनंद होतो आणि अभिमानही वाटतो.
-प्रा. रा. ग. जाधव
नेमाडे यांचा देशीवाद ही त्यांनी मराठी समीक्षेला दिलेली मोठी देणगी आहे.
-डॉ. माधवी वैद्य
नेमाडेंनी मराठी साहित्याचे वैभव वाढवले आहे. दहा वर्षांंपूर्वीच हा पुरस्कार त्यांना मिळावयास हवा होता.
-महेश एलकुंचवार
नेमाडेंना पुरस्कार मिळाल्याचे ऐकून आनंद झाला. ‘कोसला’मधून त्यांनी मराठी साहित्याला एक नवी वाट दाखविली आणि ‘हिंदू’ने त्यांच्या कर्तृत्वात शिरपेच रोवला आहे.
– आशा बगे
नेमाडे ४० वर्षांपासूनचा मित्र आहे. त्यामुळे आम्ही समाज जीवनातूनच बरोबर वाढलो, खेळलो, बागडलो. जवळच्या मित्राला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याचा आनंद गगनात मावत नाही.
ना. धो. महानोर
मराठीत साठोत्तरी साहित्याने नवनवे प्रवाह निर्माण करत वाङ्मयात क्रांतिकारी परिवर्तन घडविण्याच्या परंपरेत नेमाडे यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर होणे हे खऱ्या अर्थाने मराठी साहित्याचा सन्मान आहे.
-देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र आणि मराठी भाषेला चौथा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देऊन नेमाडे यांनी मराठी भाषेला, साहित्याला आणि महाराष्ट्रालाही एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. राज्य शासनातर्फे लवकरच नेमाडे यांचा जाहीर सत्कार केला जाईल.
-विनोद तावडे