एक सुशिक्षित युवा मतदार आपल्या मतदारसंघातील स्थानिक समस्या घेऊन स्थानिक उमेदवाराकडे जातो. गळ्यात भगवे उपरणे घालून खुर्चीत बसलेल्या उमेदवारावर प्रश्नांची सरबत्ती करतो. त्यावर तो उमेदवार-आमदार त्याचे बौद्धिकच सुरू करतो – गुजरातला दुसऱ्या धर्माचा मुख्यमंत्री मिळाला, आपल्या पक्षाची सत्ता गेली तर काय होईल?. आपल्या पक्षाला सत्ता मिळाली नाही, तर पाकिस्तान हल्ला करील.. विरोधक तर काश्मीर पाकिस्तानला विकायला बसलेले आहेत. आपलाच पक्ष राम मंदिर उभारील.. केवळ आमच्याच राजवटीत नागरिक सुरक्षित राहतील. तो युवक गोंधळूनच जातो त्यामुळे. पण त्याने जे मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत त्याला हे राष्ट्रवादी उत्तर होते. महागडे शिक्षण तसेच आरोग्याच्या मूलभूत सुविधांचा अभाव, स्थानिकांना भेडसावणाऱ्या समस्या, उदा. उद्यान उभारण्याचे आश्वासन, १५ वर्षांपूर्वी देण्यात आले होते. अजून ते कागदावरच आहे. हे सारे या उमेदवाराच्या लेखी दुय्यम होते.

ही तीन मिनिटे १२ सेकंदांची उपहासगर्भ चित्रफीत सध्या समाजमाध्यमांत फिरतेय. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा अनेक चित्रफिती फिरत आहेत. हे त्यातील एक उदाहरण. भाजपचे कडवे समर्थक संतापाने ही जी मांडणी करत आहेत ते पाहून आश्चर्य वाटते. दुसरी बाब म्हणजे सामान्य जनतेला केवळ भाजपच सुरक्षा देऊ शकतो असे पंतप्रधानांनी एका सभेत सांगितले, त्यानंतर दोनच दिवसांनी ही चित्रफीत समाजमाध्यमांवर फिरू लागली.

२००७ च्या विधानसभा निवडणुकीपासून विकास व गुजराती अस्मिता हे मुद्दे भाजप प्रामुख्याने प्रचारात मांडत आहेत. त्याबरोबरच काँग्रेसमधील घराणेशाही, सोनिया गांधी व राहुल यांचा परकी वंश हे कडवट अपेक्षित मुद्दे होतेच. २००२च्या निवडणुकीनंतर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले, त्या वेळच्या प्रचारात ‘मियाँ मुशर्रफ’वर भर असायचा. त्यातही ‘मियाँ’वर जरा अधिक जोर असायचा. त्याची जागा आता या मुद्दय़ांनी घेतली होती.

२००७ च्या निवडणूक प्रचारात काही सभांमध्ये सोहराबुद्दीनच्या चकमकीचे समर्थन वगळता, मोदींनी गुजरातला विकास कसा केला यावरच प्रामुख्याने भर दिला होता. आता आपल्या नेतृत्वात देशाने कशी प्रगती केली याचा लेखाजोखा ते मांडत फिरत आहेत. मात्र २७ नोव्हेंबरला राजकोटजवळ काँग्रेसचा प्रभाव असलेल्या जसदन येथील प्रचारात मोदींनी जातीय दंगलींचा – अर्थात गुजरातेत भाजप सत्तेवर येण्यापूर्वी, काँग्रेसच्या राज्यात झालेल्या दंगलींचा – मुद्दा उकरून काढला.

ते म्हणाले होते, ‘‘२००२च्या आधीचा गुजरात आठवतोय? पतंग उडवण्यासारखे किंवा एखाद्या अपघातासारखे क्षुल्लक कारण तेव्हा दंगे भडकायला पुरेसे ठरत असे. अहमदाबादला येण्याआधी लोक दूरध्वनीवरून परिस्थिती शांत आहे ना, हे विचारून मग येत असत. रात्री सुरक्षित पोहोचण्याचीही त्यांना खात्री नसायची.’’ हे सांगून झाल्यानंतर, भाजपनेच सामान्यांना सुरक्षितता दिली, हे मोदींनी ठासून सांगितले. या जसदनमध्ये गेल्या दोन दशकांत भाजपला केवळ दोनदा विजय मिळवता आला, तोही पोटनिवडणुकीत.

पाठोपाठ दोन दिवसांनी भावनगर जिल्ह्य़ातील पलिटना या जैनधर्मीयांचे सर्वात मोठे श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी पंतप्रधानांची सभा होती. तेथेही त्यांनी काँग्रेस राजवटीतील दहा वर्षांत सात वेळा रथयात्रेदरम्यान जातीय दंगे झाल्याची आठवण करून दिली. काँग्रेसच्या काळात एकही महिना दंगामुक्त गेला नाही अशी टीका करून त्यांनी विचारणा केली, की ‘तुम्हाला शांततेत राहायचे की त्या जुन्या दिवसांमध्ये पुन्हा जायचे आहे?’ भाजप सत्तेत असेल तर कोणीही निरपराध व्यक्ती मारली जाणार नाही असे आश्वासन दिले. पलिटनामध्ये मुस्लिमांची मते मोठय़ा संख्येने आहेत. किंबहुना जैनांपेक्षा ती जास्त आहेत. तीन वर्षांपूर्वी भाजपची सत्ता असलेल्या या नगरपालिकेने शहरात मांसाहार बंदीचा ठराव संमत केला होता. जैन समुदायाच्या दबावाखाली हा निर्णय होता हे उघड आहे. आता हा मुद्दा उच्च न्यायालयात आहे.

पलिटनापासून ५० किमी अंतरावर असलेल्या भावनगर शहरात हिंदुबहुल भागात मुस्लिमांनी घर खरेदी करू नये म्हणून विश्व हिंदू परिषद अनेक वर्षे आंदोलन करत होती. ज्या व्यक्ती मुस्लिमांना घरे विकतील त्यांचा निषेध करण्यासाठी घराबाहेर ‘रामधून’ वाजविली जायची. मोदींबरोबरच भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री विजय रुपानी प्रचारसभांमधून काँग्रेसच्या काळातील जातीय दंगे व संचारबंदीचा मुद्दा उपस्थित करत आहेत. काँग्रेस मात्र रणनीतीचा भाग म्हणून गोध्रानंतरच्या या प्रचाराला प्रत्युत्तर देण्याचे टाळत आहे. कारण असा प्रचार उलटू शकतो याची त्यांना जाणीव आहे. भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर चौफेर टीका करत, त्यांच्या सोमनाथ मंदिर प्रवेशाच्या नोंदीवरूनच्या वादात धार्मिक श्रद्धांचा मुद्दा उपस्थित केला आहे. राहुल यांच्या एका सहकाऱ्याने मंदिराच्या नोंदवहीत त्यांचा उल्लेख अहिंदू असा केला. मंदिरात प्रवेश करताना कोणत्याही बिगर हिंदू व्यक्तीला नोंद करणे बंधनकारक आहे.

पाटीदार अनामत आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेल सरकारविरोधी राळ उडवून काँग्रेसचे काम आपसूक करत आहे. काँग्रेसही हार्दिकपासून अंतर ठेवून या घडामोडी सूचकपणे पाहात आहे. यातील गमतीचा भाग म्हणजे गोध्रा दंगलीनंतर हाच पाटीदार भाजपचा भक्कम पाठीराखा राहिलेला आहे. हार्दिकने तर मोदींवर जातीय प्रचाराबद्दल टीकास्त्र सोडले. भाजप सरकारच्या काळात दंगली झाल्या नाहीत किंवा संचारबंदी नाही, कारण हीच मंडळी आता सत्तेत आहेत असा टोला हार्दिकने राजकोटच्या प्रचंड सभेत लगावला. निवडणुका जिंकण्याठी मोदी कोणत्याही थराला जातील असा इशारा हार्दिकने यापूर्वीच समाजाला दिला आहे. त्यांच्या भावनिक सापळ्यात अडकू नका असे आवाहन हार्दिकने केले आहे. अर्थात या निवडणुकीत जातीय व धार्मिक मुद्दय़ांपेक्षा स्थानिक प्रश्नांना अधिक महत्त्व असल्याचे राजकीय विश्लेषक अच्युत याज्ञिक यांनी स्पष्ट केले. पाटीदार आंदोलन, शेतकऱ्यांच्या समस्या हे प्रमुख मुद्दे या वेळी असल्याचे याज्ञिक यांनी स्पष्ट केले.

जातीय दंग्यांबरोबर मोदींनी काँग्रेसवर जाती-जातींमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप केला आहे. पाटीदार भाजपवर नाराज आहेत, तर इतर मागासवर्गीय व दलितांमधील काही घटकांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मोदींची चिंता रास्त आहे. त्यातील अनेक घटक गुजरातच्या विकासाच्या प्रारूपाबाबत पूर्णपणे सहमत नसले, तरी पुन्हा राज्याची सामाजिक वीण उसवणाऱ्या सरकार पुरस्कृत जातीय अनुयायाच्या वातावरणात जाण्याची त्यांची इच्छा नाही. तीन जातींच्या नेत्यांचा पाठिंबा घेणाऱ्या काँग्रेसवर पुन्हा जुन्या जातीय समीकरणांचा प्रयोग करत असल्याचा भाजपचा आरोप आहे. माजी केंद्रीय मंत्री माधवसिंह सोळंकी यांनी १९८५ मध्ये ‘खाम’चा प्रयोग करून गुजरातमध्ये विक्रमी १४४ जागांवर विजय मिळवला होता. क्षत्रिय, हरिजन, आदिवासी व मुस्लीम हे ते ‘खाम’ समीकरण काँग्रेस पुन्हा आणू पाहतेय असा भाजपचा आरोप आहे. मोदींनी पलिटना येथील सभेत तीन दशकांपूर्वीच्या मंगध खेडय़ानजीकच्या रक्तरंजित जातीय हत्याकांडाचा उल्लेख केला होता. त्यामुळे पाटीदार व क्षत्रिय नाराज आहेत. समाजातील तिघांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी १९८४ मध्ये क्षत्रियांनी ११ पाटीदारांची हत्या केली होती. सभेत मोदींनी कोणत्याही समुदायाचा उल्लेख केला नाही. मात्र क्षत्रियांची संघटना असलेल्या गोहिवाड रजपूत समाजाने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. इतक्या वर्षांनी हे प्रकरण उकरून काढणे चुकीचे आहे. क्षत्रिय व पाटीदार आता रक्तरंजित भूतकाळ विसरून गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. अगदी पीडित कुटुंबीयदेखील ही घटना विसरले आहेत, असे या संघटनेचे अध्यक्ष वासुदेव गोहिल यांनी स्पष्ट केले.

हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर फूट पाडण्याचे राजकारण भाजप करत असल्याचा आरोप विरोधक करतात. मात्र या वेळी प्रथमच हिंदू समाजातून क्षत्रियांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. आता हार्दिक पटेलचा रविवारी भव्य रोड शो व सभा आहे त्याकडे भाजपचे बारकाईने लक्ष आहे.

जैमिनी राव

jaiminirao2002@gmail.com