– गिरीश कुबेर

‘‘लोक मूर्ख नसतात. आपल्यासाठी काय चांगलं काय वाईट हे त्यांना सांगितलं की ते बरोबर ऐकतात. त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. त्यासाठी रस्त्यावर पोलीस/जवान वगैरे तैनात करायची काही गरज नाही. हे अनावश्यक आहे..’’, स्वीडनचे प्रख्यात वैद्यकतज्ज्ञ जोहान गिसेक (Johan Giesecke) हे परखड आहेत बोलायला. इंग्रजी भाषेच्या मांडणीत आंतरराष्ट्रीय पातळीवर बोलताना अनेकांकडून उगाच एक राजनैतिक मुत्सद्दीपणा दाखवला जातो. म्हणजे कोणाला दुखवायचे नाही वगैरे. पण स्वीडिश असल्यामुळे असेल पण गिसेक तसे नाहीत. फाडकन बोलतात.

सध्या जगात करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वीडनच्या यशाची चांगलीच चर्चा आहे. गेल्या आठवडय़ात याच स्तंभात (१२ मे) त्या देशाच्या यशाची दखल घेतली होती. त्यावर अनेकांच्या ‘‘स्वीडन केव्हढासा.. आपण केवढे. त्या देशाची आपली कशी काय तुलना होऊ शकते,’’ अशा छापाच्या अपेक्षित प्रतिक्रिया आल्या. आपण अतुलनीय असे मानायची सवय लागली की असे होऊ शकते. पण जे असे मानत नाहीत त्यांनी गिसेक यांची ऑस्ट्रेलियाच्या स्काय न्यूजला दिलेली मुलाखत जरूर पाहायला हवी.

कारण या मुलाखतीत गिसेक यांनी करोनाविषयी सध्याचे प्रचलित समज-गैरसमज पार उद्ध्वस्त केलेत. हा आजार म्हणजे नेहमीच्याच फ्लूचे गंभीर स्वरूप येथपासून ते ‘‘तुम्ही काय देशाच्या सीमा कायमच्या बंद ठेवणार आहात काय,’’ असं विचारण्यापर्यंत अनेक मुद्दय़ांवर गिसेक सणसणीत उत्तरं देतात. मुलाखतकार ऑस्ट्रेलियाच्या स्थितीविषयी विचारत या देशाचे सगळेच चुकले का, असं विचारतो. मुद्दा टाळेबंदीचा. त्यावर गिसेक थंडपणे म्हणतात : ‘‘तुम्ही तुमच्या हाताने स्वत:ला यात अडकवून घेतले आहे. आता तुम्ही आणि अन्य शंभरभर देश यातून बाहेर कसे पडता, त्याकडे माझे लक्ष आहे. मला खात्री आहे, एकाही देशाने टाळेबंदी जाहीर करण्याआधी आपण त्यातून बाहेर कसे पडू याचा क्षणभर तरी विचार केला नसेल! तुम्ही शाळा बंद केल्यात. आता त्या कोणत्या निकषांवर सुरू करणार? विचारच केला गेलेला नाही याचा.’’

दुसऱ्या एका प्रश्नावर तर गिसेक सरळ सांगतात.. कोणतेही, कसलेही उपाय केलेत तरी या विषाणूचा प्रसार थांबवता येणे केवळ अशक्य आहे. याच्या साथीची त्सुनामी आली आहे. जगभरातल्या जवळपास बहुतेकांना याचा हलका संसर्ग होईल आणि या बहुतेकांना ते कळणारही नाही. स्वीडनची आकडेवारी दाखवते की तब्बल ९८ ते ९९ टक्के नागरिकांना करोनाने स्पर्श केला. त्यांना तो जाणवलाही नाही. या अशांचीच संख्या जास्त असेल. हे करोनावाहक असतील आणि त्यांच्यामुळे होणारी बाधादेखील अशीच हलकी असेल. फार म्हणजे फारच कमी जण या आजाराने अत्यवस्थ होतील आणि त्याहूनही कमी जणांचे प्राण जातील. पण खरी साथ म्हणाल तर ती असेल ती हलक्या करोनाचीच.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने या रोगावर ‘मात’ केल्याचे वृत्त आहे. त्याबाबत तर गिसेक यांची प्रतिक्रिया आवर्जून लक्षात घ्यावी अशी. अत्यंत कुत्सितपणे ते म्हणतात : तुम्ही काय किंवा न्यूझीलंड काय.. करोना विषाणूला हद्दपार करण्यात तुम्हाला यश आलेही असेल. पण तुमच्या यशाकडे पाहून मला प्रश्न पडतो की, आता पुढची ३० वर्षे तुम्ही काय करणार? सीमा बंद ठेवणार देशांच्या? कायमच्या?? तुमच्या देशात येणाऱ्या प्रत्येकाचे विलगीकरण करणार का?

स्वत:च्या निष्कर्षांवर, मतावर ठाम असलेला एखादा शास्त्रज्ञ कोणाची भीडमुर्वत न ठेवता जसा बोलतो तसे गिसेक बोलतात. त्यामुळे त्यांचे करोना प्रतिबंधासाठी देशोदेशांनी केलेल्या प्रयत्नांबाबतचे मत ऐकले की चर्र होते मनातल्या मनात. कारण ही टाळेबंदी वगैरे उपाय निर्थक आहेत असा त्यांच्या प्रतिपादनाचा अर्थ असतो. ‘‘या विषाणूची खरी साथ अदृश्यच आहे. तुम्ही काहीही उपाय करा, ती पसरणारच. हे असे उपाय केलेल्या आणि न केलेल्या देशांतील परिणाम त्यामुळे एकसारखेच असतील.’’ त्यांच्या प्रतिपादनातला खरा बॉम्ब पुढे आहे. ‘‘टाळेबंदी यशस्वी करून दाखवली म्हणून अभिमान बाळगणारे जेव्हा केव्हा टाळेबंदी उठवतील तेव्हा या साथीचे थैमान वाढेल आणि त्यामुळे मृत्यूंची संख्याही वाढेल.’’

इतके जर आहे तर हे सारे टाळताच येणार नाही? गिसेक यांच्या मते अंतरसोवळे, बाहेर पडताना चेहेऱ्यावर मुखपट्टी आणि दीडशे वर्षांपासून महत्त्वाची मानली गेलेली हात धुवायची सवय हे इतकेच करोना प्रतिबंधासाठी पुरे.

यानंतर गिसेक यशस्वी अशा स्वीडिश प्रारूपाविषयी सांगतात : ‘‘वयोवृद्ध, अशक्त अशांची आम्ही विशेष काळजी घेतली. आणि इतरांसाठी जगण्याचे नियम निश्चित करताना एकच निकष पाळला. पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेत अशाच उपायांचा अवलंब करायचा.’’

गिसेक यांचे बरोबर की चूक? हे आपल्या देशातले पुढचे काही आठवडे पुराव्यानिशी सिद्ध करतील.

@girishkuber

Story img Loader