– गिरीश कुबेर
आरके लक्ष्मण यांचं एक व्यंगचित्र आठवतंय. पत्नी घाबरून अग्निशमन दलाला बोलवतीये. ते जवान आलेत. दरवाजातून विस्फारलेल्या डोळ्यांनी घरात पाहत त्या महिलेला ते म्हणतात.. ‘‘आम्ही तुमच्या नवऱ्यास सोडवू, पण आधी ते या अवस्थेत अडकले कसे ते सांगा’’. आणि या सगळ्याची पार्श्वभूमी म्हणजे मागे सतरंजीवर योगासनं करताना काहीतरी तिरपागडं घडल्यानं स्वत:च्याच शरीराच्या वेढय़ात अडकलेला, घामाघूम झालेला तो इसम.
टाळेबंदीतली आपली अवस्था पाहिली की हे व्यंगचित्र आठवतं. येत्या रविवारी, ३ मेला टाळेबंदीस ४१ दिवस होतील. यापेक्षा जास्त काळ बंदिवास फक्त वुहाननेच अनुभवलेला असावा. आता अर्थव्यवस्थेचे प्राण कंठाशी आलेले असल्यानं या टाळेबंदीत शिथिलता देण्याची चर्चा सुरू झालीये. ती द्यावीच लागेल, असं जमिनीवरचं वास्तव. पण एकदम सैल सोडलं तर मग इतके दिवस डांबलंतच का, असा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता. तेव्हा या धर्मसंकटातून बाहेर पडण्यासाठी योग्य ती वातावरणनिर्मिती सुरू झाल्याचं दिसतंय सरकारी पातळीवर. म्हणजे गेल्या दोनतीन दिवसात विविध सकारात्मक विधानं केली जाऊ लागलीयेत. उदाहरणार्थ : ‘‘करोनाग्रस्तांची संख्या दुप्पट होण्याची मुदत आता ११ दिवसांवर गेलीये’’, ‘‘जगात सगळीकडे करोना नियंत्रणासाठी भारताचं कौतुक होतंय’’ किंवा ‘‘टाळेबंदी केली नसती तर आपली रुग्णसंख्या अमुकतमुक लाख झाली असती’’, वगैरे वगैरे.
या पार्श्वभूमीवर ब्लुमबर्ग या वृत्तवाहिनीनं आकडेवारीच्या आधारे शुक्रवारी प्रसृत केलेला अहवाल धक्कादायक ठरतो. ‘‘टाळेबंदीमुळे भारतात करोनाप्रसाराचा आलेख अजिबात सपाट झालेला नाही,’’ हे या वृत्तलेखाचं शीर्षक. यासाठी ब्लुमबर्गनं आपल्या देशातील करोना प्रसाराची तुलना इटली, स्पेन अशा देशांशी केली आहे. ब्लुमबर्गसारखी वृत्तसेवा जेव्हा एखाद्या विषयावर लिहिते तेव्हा ते लिखाण शुद्ध संख्याधारित असतं. याचा अर्थ ते लिहिणाऱ्यांना काय वाटतं, त्यांचं मत काय याचा परिणाम अशा वृत्तसेवांच्या लिखाणावर होत नाही.
आता हा दाखला बघा. टाळेबंदीच्या ३४व्या दिवशी आपल्या देशात १८२३ नव्या रुग्णांची भर पडली आणि ३५व्या दिवशी ही वाढ १९०९ इतकी झाली. पण इटली, स्पेन, फ्रान्स आदी देशांत टाळेबंदीच्या १३व्या दिवशी सर्वाधिक नवे रुग्ण नोंदले गेले. त्यानंतर ही स्थिती काही दिवस कायम राहिली. आणि मग मात्र हा आलेख उतरणीला लागला. भारतात अजूनही असं होताना दिसत नाही, असं हा वृत्तलेख सांगतो.
भारतात २५ मार्चला टाळेबंदी सुरू झाली. त्यावेळी देशभरातील करोनाबाधितांची संख्या होती ६००. आज, म्हणजे १ मे या दिवशी दुपारी, देशातील अशा बाधितांची संख्या झाली आहे ३५,०४३ आणि एकूण बळी आहेत ११४७ इतके. याचा अर्थ टाळेबंदी उठवली वा सैल केली जाण्यास अवघे दोन दिवस उरलेले असताना आपल्याकडे करोना रुग्णांत वाढ व्हायचं काही थांबलेलं नाही.
ब्लुमबर्गच्या मते भारतात ही रुग्णवाढ होतच राहणार. कारण १३० कोटींच्या या देशात अजूनही पुरेशा चाचण्याच केल्या जात नाहीयेत. सध्या दिवसाला ५० हजार इतक्या चाचण्या आपल्याकडे देशपातळीवर होतात. इटलीत केल्या जाणाऱ्या चाचण्यांची संख्याही अशीच आहे. पण फरक असा की आपल्या लोकसंख्येचा आकार लक्षात घेता आपल्याकडे चाचण्यांचं हे प्रमाण दर हजारी ०.५ इतकं नगण्य आहे, तर साधारण संख्येने इतक्याच चाचण्या करून इटलीत हे प्रमाण दर हजारांत ३० चाचण्या इतकं मोठं आहे. या वृत्तसंस्थेनं सदर लेखनासाठी काही तज्ज्ञांच्या प्रतिक्रियाही घेतल्या. त्या सगळ्या तज्ज्ञांचं एकच म्हणणं.. चाचण्या वाढवा. त्यांचं बरोबरच आहे प्राप्त परिस्थितीत. पण उलट त्यामुळे गुंता वाढण्याची शक्यता. जास्त चाचण्या झाल्या की जास्त करोनाग्रस्त त्यातून समोर येतील. आणि तसं झालं की पुढचा प्रश्न : रुग्णांची संख्या तर वाढतीये.. तेव्हा टाळेबंदी शिथिल कशी करणार?
इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था म्हणतात ती हीच. आपल्याकडे कोणी विचारणार नाही किंवा बोलणार नाही, पण मनातल्या मनात तरी उपस्थित होतील असे दोन मुद्दे यावर दिसतात. ‘‘आपण टाळेबंदीवर जास्त विसंबलो का,’’ हा एक. आणि दुसरा म्हणजे ‘‘देशभर सरसकट टाळेबंदीचा वरवंटा न फिरवता ज्या परिसरात करोनाबाधित आहेत त्याच परिसरांत करकचून टाळेबंदी लागू केली असती तर ते जास्त उपयोगी ठरलं असतं का?’’
या दोन्ही प्रश्नांची उत्तरं कोणीही देणार नाही, कारण ते विचारलेच जाणार नाहीत. पण ब्लुमबर्गच्या ‘‘टाळेबंदी भारतात करोना आलेख सपाट करण्यात अपयशी ठरली’’ या बातमीनं या प्रश्नांना चालना मिळेल, हे मात्र खरं.
आता लक्षात येईल ‘आत गेल्यावर बाहेरचा रस्ता शोधायचा नसतो’ या तत्त्वाचा अर्थ. आणि सध्या सुरू झालेल्या सकारात्मक बातम्यांमागचा उद्देश.
@girishkuber