-गिरीश कुबेर
करोनामुळे काय होईल काय नाही, यावर अनेक पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. हे बदलेल, ते बदलेल अशा अनेक बाबी सुचवल्या जात आहेत. त्यातील बऱ्याचशा सामान्य ज्ञानावर आधारित अशाच. इंग्रजीत ‘नी जर्क’.. म्हणजे धक्का बसल्यानंतरच्या प्रतिक्षिप्त क्रियेसारख्या.. म्हणता येईल तशा. तथापि या अंदाजपंचे खेळात वेगळे वाटेल असे मत ‘द इकॉनॉमिस्ट’ साप्ताहिकात निमंत्रित लेखक एडवर्ड लटवाक यांनी सोदाहरण मांडले आहे. प्रा. लटवाक हे अमेरिकेतल्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्राशी संबंधित आदरणीय असे नाव. आणि हॉपकिन्स विद्यापीठाचे महत्त्व कोविडोस्कोपच्या वाचकांना नव्याने सांगण्याची गरज नाही. या विद्यापीठावर या स्तंभात याआधी लिहिले गेले आहेच. अशा या विद्यापीठातल्या अशा या गुरुजनाचे लिखाण निश्चितच दखल घ्यावे असे..
तर ‘इकॉनॉमिस्ट’मध्ये प्रा. लटवाक लिहितात : ‘‘करोनोत्तर काळात राजकारणच बदलेल’’. त्यांच्या मते हा करोनाकारी विषाणू हा पूर्ण सत्याग्रही आहे. ‘‘तो जेथे-जेथे पसरला तेथे-तेथे त्याने पृष्ठभागाखाली दडलेली अनेक सत्ये पृष्ठभागावर आणली. हे सत्य स्थानिक सत्ताधाऱ्यांबाबत आहे, स्थानिक समाजाबाबत आहे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांबाबतदेखील आहे. हे सर्व पाहता हा विषाणू सर्वाधिक परिणाम राजकारणावरच करेल’’. प्रा लटवाक यांचे शब्द तापत्या तेलाप्रमाणे अंगावर येतात.
‘‘चीनच्या राजवटीविषयी आपणास सर्वच माहीत होते. तेथे सत्य दडपले जाते हे आपण जाणतोच. आणि तरीही करोनाचा इशारा देणाऱ्या ली वेनलिंग याच्यापेक्षा करोनाचे गांभीर्य ओळखण्यात सपशेल कमी पडलेल्या अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा उदोउदो व्हावा असा प्रयत्न आहे. नागरिकांनी अध्यक्षांचीच आरती गात बसावे असा प्रयत्न आहे.’’
‘‘पण तैवान, हाँगकाँग आणि दक्षिण कोरिया या देशांच्या कामगिरीने चीनबाबत रास्त भ्रमनिरास व्हावा. नागरिकांवर कोणतीही जोरजबरदस्ती न करता, त्यांना न घाबरवता आणि त्यांना घरात डांबून न ठेवता या विषाणूवर मात करता येते हे या तीन देशांनी दाखवून दिले. या तीन देशांचे यश साऱ्या जगालाही आता पटेल. समाजमाध्यमांवर सरकारचे भाट यशाचे पोवाडे भले गात असतील. पण त्या देशातील सुशिक्षितांनाही आपल्या राज्यकर्त्यांच्या करोना अपयशाची पूर्ण जाणीव झालेली आहे.’’
‘‘चीनपाठोपाठ हा विषाणू जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडॉस घेब्रेसस यांना उघडे पाडतो. ते चीनच्या ‘पारदर्शी’पणाचे कौतुक करतात आणि तैवानकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. चीनने मध्यंतरी ट्वीटदेखील केले की या विषाणूचे मानवी प्रसारण अद्याप सुरू झालेले नाही. ते शब्दश: खरे होते. कारण या असा प्रसारणाचा तपास करण्याची मागणी करणाऱ्या वैद्यकांचीच मुस्कटदाबी चीनने केली..’’
‘‘हा विषाणू जेव्हा इराणमध्ये आला तेव्हा त्या देशातील धर्मवाद्यांना आणि धर्मवेडय़ांना त्याने उघडे पाडले. त्या देशाचे राज्यकर्ते बस भरभरून धर्मस्थळी जाणाऱ्या यात्रेकरूंना थांबवू शकले नाहीत. विषाणूच्या प्रसारासाठी धर्मक्षेत्रांइतके पवित्र स्थळ नाही. या धर्मस्थळी मानवाच्या वेदनांना मुक्ती मिळेल असे काही मानत होते. पण तसे काही झाले नाही. पण याची जाणीव राज्यकर्त्यांना होईपर्यंत उशीर झाला होता.’’
‘‘इटलीत या विषाणूने अधिक हाहाकार उडवला. याचे कारण इटलीचे विरोधाभासी जगणे. त्यांचे खाजगी आयुष्य कमालीचे स्वच्छ आणि सार्वजनिक आरोग्य मात्र बरोबर त्याच्या उलट. त्यांच्या सरकारी वैद्यकीय सेवेतील उणिवांना या विषाणूने बळच दिले. मंत्रीसंत्री, नोकरशहा, न्यायाधीश यांच्या तुलनेत इटलीत डॉक्टरांचे वेतन अगदीच कमी आहे. आणि सत्ताधीशांच्या उधळपट्टीतून जे काही वाचते ते व्हेंटिलेटर्स खरेदीसाठी पुरेसे नसते..’’
‘‘आणि अमेरिकेचे म्हणाल तर या विषाणूने दोन सत्ये उजेडात आणली. पहिले म्हणजे अमेरिका भासते तितकी एकसंध नाही. सार्वजनिक आरोग्याची बरीचशी जबाबदारी राज्ये उचलतात. त्यामुळे त्याबाबतची धोरणे राज्यागणिक बदलतात. आणि दुसरे सत्य म्हणजे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विरोधक अध्यक्षांबाबतच्या नकारात्मक मुद्दय़ांबरोबरीने त्यांच्यातील सकारात्मक बाजूसही टीकेचे लक्ष्य करतात. चीनबरोबरीच्या व्यापाराबाबत ट्रम्प यांचे म्हणणे बरोबर होते. पण त्यांच्यावर त्यासाठीही टीका झाली. ट्रम्प यांचा अमर्याद आशावादही कौतुकास्पद असा म्हणता येईल.’’
‘‘यापुढे युरोपीय महासंघ पूर्वी होता तितका सक्षम राहणार नाही आणि चीनचेदेखील आर्थिक महत्त्व होते तितके उरणार नाही. या विषाणूने प्रत्येक देशाच्या सरकारांचा प्रशासकीय दर्जा उघडा पाडला आहे. या विषाणूने बदल केला नाही असा देशच असणार नाही. जे झाले त्याचे समर्थन करणारे राज्यकर्ते टिकणार नाहीत.. तेव्हा मागे वळून पाहताना या विषाणूने सत्यदर्शनाचे बरेच काम केले असाच अनेकांचा निष्कर्ष असेल..’’
कोणत्याही विषयाची अशी सर्वागी चिकित्सा करण्याची क्षमता असलेले विद्वान आणि तशी ती चिकित्सा करू देणारा समाज यांचे दर्शन प्रा. लटवाक यांच्यासारख्यांच्या मांडणीतून होते. ते त्या व्यवस्थेविषयी निश्चितच आदर निर्माण करणारे. करोनाच्या वा अन्य साथीच्या निमित्ताने शारीरिक आरोग्यास धोके उत्पन्न यापुढेही होतील. पण समाज असा मनाने निरोगी असेल तर तो त्यावर सहज मात करू शकेल, हा यामागचा अर्थ.
@girishkuber