मुंबईत एका बाजूला संकल्पना उद्यानाचे स्वप्न फुलविले जात आहे, तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या नगरसेवकांनी आपापल्या मतदारसंघातील उद्याने विकसित करण्यासाठी निधीसाठी विनवण्या करूनही त्यांना पुरेसा निधी देण्यात येत नाही. परिणामी अनेक उद्यानांची पुरती वाट लागलेली दिसते. तुटलेली खेळणी, मोडलेली आसने, गायब झालेली हिरवळ, सुकलेले वृक्ष, माजलेले रान, बंद पडलेली कारंजी, कचऱ्याचे साम्राज्य, जुगाराचे अड्डे, समाजकंटकांचा वावर, बेपत्ता सुरक्षारक्षक, जागेवर नसलेले माळी असेच चित्र मुंबईमधील अनेक भागातील छोटय़ा-मोठय़ा उद्यानांमध्ये पाहावयास मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांना क्षणभराच्या विरंगुळ्यासाठी व मोकळा श्वास घेण्यासाठी मुंबईत एकही जागा नाही, या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कबुलीतूनच, शिवसेनेने ‘काय करून दाखवले’ ते स्पष्ट होते. मुंबईतील उद्यानांची वाट लावून दाखविणाऱ्या शिवसेनेकडून रेसकोर्सवरील थीम पार्कचा विकास होऊ शकत नाही, असेही मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे. भायखळा येथील जिजामाता उद्यानाचा विकास आजपर्यंत करू शकले नाहीत, सिंगापूरच्या धर्तीवर बर्ड पार्कची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संकल्पना जे आजपर्यंत अमलात आणू शकले नाहीत ते रेसकोर्सवर मोकळा श्वास कसा निर्माण करणार, असा सवाल पालिकेतील विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी केला. मुंबईमध्ये महापालिकेची तब्बल २६४ उद्याने आहेत. यापैकी २१८ उद्यानांची देखभाल महापालिका स्वत:च करते. उर्वरित ४६ उद्याने देखभालीसाठी खासगी संस्थांना देण्यात आली असून पालिका देखभाल करीत असलेल्या उद्यानांच्या तुलनेत खासगी संस्थांच्या ताब्यातील उद्यानांची अवस्था चांगली आहे. महापालिका देखभाल करीत असलेल्या १५८ उद्यानांमध्ये खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. परंतु बहुतांश उद्यानांमध्ये कंत्राटदाराचे सुरक्षारक्षक जागेवरच नसतात. त्यामुळे अनेक उद्याने जुगाराचे अड्डे बनले आहेत. विद्युतपुरवठा नसल्यामुळे अनेक उद्याने रात्री अंधारात हरवतात. त्यावेळी तेथे समाजकंटकांचा वावर असतो. काही ठिकाणी मद्यपींनी अड्डेच थाटले असून मद्याचे प्याले रिचवत ते धांगडधिंगाणा घालत असतात. संख्येने कमी असलेले सुरक्षा रक्षक त्याकडे कानाडोळा  करीत आहेत. तर काही उद्यानांतील सुरक्षारक्षकच समाजकंटकांबरोबर मद्याच्या पाटर्य़ा झोडताना आढळतात. मुंबईच्या विकास योजना आराखडय़ामध्ये उद्यानांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांपैकी अनेक भूखंड पालिकेच्या ताब्यात आलेले नाही. त्याची आकडेवारी दस्तुरखुद्द पालिकेकडेही उपलब्ध नाही. आरक्षण असलेले भूखंडासाठी जमीन मालकामार्फत पालिकेवर खरेदी सूचना बजावण्यात येते. खरेदी सूचना बजावल्यानंतर एक वर्षांच्या कालावधीत त्या प्रस्तावास पालिका सभागृहाची मंजुरी मिळाली नाही तर तो भूखंड जमीन मालकास मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.

मरोळ, चर्च रोड, सैफी पार्क, अंधेरी (पूर्व) येथील महापालिकेचे उद्यान. या उद्यानाची दुरवस्था झाली असून उद्यानाबाहेरील कचऱ्याने ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंडय़ा पाहून आत जाण्याची इच्छाच कुणाला होत नाही. आसपासच्या परिसरातील कचरा नियमितपणे येथे टाकण्यात येतो. परंतु कचराकुंडय़ांमधील कचरा उचलण्यासाठी अधूनमधून गाडी येते. त्यामुळे उद्यान आणि आसपासच्या परिसरात दरुगधीचे साम्राज्य पसरलेले असते. उद्यानाचे प्रवेशद्वारही तुटले असून त्याकडे लक्ष द्यायला पालिका अधिकाऱ्यांना वेळ नाही. सुरक्षा रक्षक तर येथे शोधूनही सापडत नाही.

अंधेरी येथील लिंक रोड
अंधेरी येथील लिंक रोडवरील सिटी मॉलच्या पाठीमागे उद्यानासाठी आरक्षित असलेल्या ५९८०.५५ चौरस मीटर आकाराच्या आपल्या भूखंडाचा १० महिन्यांपूर्वीच पालिकेला शोध लागला. जलबोगद्याचे काम सुरू असताना हा भूखंड उद्यानासाठी आरक्षित असल्याचे जलविभागाच्या लक्षात आले. त्या नंतर हा भूखंड पालिकेच्या के-पश्चिम विभाग कार्यालयातील उद्यान विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. या दुर्लक्षित भूखंडावर कचरा, डेब्रिजचे साम्राज्य होते. गेल्या काही महिन्यात साफसफाई करुन या भूखंडाभोवती तारेचे कुंपण घालण्यात आले. आता या भूखंडाला प्रतीक्षा आहे ती वृक्षवल्लीची. येथे सुंदर उद्यान फुलविण्यासाठी काँग्रेसच्या ज्योत्स्ना दिघे पाठपुरावा करीत आहे. परंतु प्रशासनाकडून योग्य ती साथ मिळत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कुंभारवाडा
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरगावमधील कुंभारवाडा परिसरातील हे दुर्गादेवी उद्यान. शिवसेनेचे दिवंगत आमदार चंद्रकांत पडवळ यांच्या मतदारसंघातील हे उद्यान. या परिसरातूून २००७ मध्ये पालिकेवर निवडून गेलेले शिवसेनेचे नगरसेवक विजय वाशिर्डे यांना खंडणीप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर या विभागाकडे शिवसेनेनेही दुर्लक्षच केल्याचे या उद्यानाच्या दुरवस्थेवरून स्पष्ट होते. या परिसरातील अपुऱ्या पाणीपुरवठय़ाचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेने दुर्गादेवी उद्यानात भूमिगत तलाव खोदला. याच तलावातून या विभागाला पाणी मिळते. परंतु वायुविजनासाठी तलावावर उभारलेले पाइप काही समाजकंटकांनी तोडले आणि खेळावयास येणारी काही टारगट मुले लघुशंका करीत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेने तात्काळ तुटलेले पाइप दुरुस्त केले. आताही या परिसरातून शिवसेनेच्या युगंधरा साळेकर निवडून आल्या आहेत. या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी त्यांनी प्रशासनाला पत्रही पाठविले आहे, परंतु त्यावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही.

गोराई, बोरिवली पश्चिम
बोरिवली पश्चिमेच्या गोराई डेपोजवळ उद्यानासाठी म्हाडाने राखीव ठेवलेला हा भूखंड गेली अनेक वर्षे उजाडच होता. तोपर्यंत केवळ दारूचे अड्डे जमवणाऱ्यांचा राबता असायचा. वर्षभरापूर्वी या ठिकाणी सुरक्षा भिंत बांधण्यात आली. त्यानंतर काही माहिन्याभरात येते लहान मुलांसाठी सी-सॉ, झोपाळा असे चार खेळ आले. मेरी गो राऊंड महिनाभरातच तुटून गेले. घसरगुंडीचा वापर आजुबाजूच्या रहिवाशांनी कपडे वाळत घालण्यासाठी करून तोडून टाकली.काही महिन्यांपूर्वी बांधलेल्या जॉगर्स ट्रॅकमुळे आतापर्यंत उजाड असलेल्या या उद्यानात महिला, ज्येष्ठ नागरिकांचा राबता थोडा वाढला आहे. उद्यानाची स्थिती सुधारतेय म्हणून इथल्या हौशी रहिवाशांनी येथे स्वखर्चाने बॅडमिंटन कोर्ट बांधला, पण हा विकास इतक्यावरच थांबला. आता येथील जॉगर्स ट्रॅकवर कामाच्या निमित्ताने कधीही खडी किंवा वाळू आणून टाकली जाते. कित्येक दिवस ती तेथे तशीच पडून असते.

गोराई, बोरिवली पश्चिम
बोरिवली पश्चिमेच्या गोराईमधील प्रगती शाळेमागील स्मशानभूमीजवळ असलेल्या या उद्यानाला ‘अरण्यकळा’ आली आहे. संपूर्ण उद्यान परिसरात गवत आणि जंगली वेली फोफावल्या आहेत. पावसाळ्यात येथील गवत कंबरभर उंचीचे होते. तेव्हा येथे कुणीच फिरकत नाही. मुलांसाठी घसरगुंडी, रॉकेट घसरगुंडी असे खेळ लावलेले आहेत. पण, वर्षांनुवर्षे त्यांची देखभाल न केल्याने आता ते वापरण्याच्या परिस्थितीत नाहीत.

चेंबूर कॅम्प
चेंबूर कॅम्प परिसरातील उद्ध्वस्त भोजवानी उद्यान. या उद्यानात कायम जुगाराचा अड्डा सुरू असतो. पालिकेचा सुरक्षा रक्षक येथे कधीही दृष्टीस पडत नाही. हे उद्यान जुगारी, गर्दुल्ले, समाजकंटकांचा अड्डाच बनला आहे. उद्यानातील हिरवळीची जागा डेब्रिजने घेतली आहे. आसने आणि खेळणी भग्न अवस्थेत आहेत.

मालाड, मार्वे रोड
मालाडच्या मार्वे रोडवरील अग्निशमन दलाच्या केंद्रासमोरील हे उद्यान. या उद्यानाला बकाल अवस्था आली आहे.