डॉ. सविता पानट या स्त्रीरोगतज्ज्ञ. त्यामुळे ज्या जोडप्याला मूल होत नाही, त्यांच्या जिवाची घालमेल त्यांना जाणवायची. त्यातूनच साकारचा जन्म झाला. अनाथ मुलांना त्यांचं हक्काचं घर मिळावं यासाठी दत्तक प्रथेला प्रोत्साहन देणे हे संस्थेचे मुख्य काम. हे काम गेल्या २२ वर्षांपासून साकारचे कार्यकर्ते करीत आहेत. आजही हे काम अव्याहतपणे सुरूच आहे. मात्र, या कामाला आता मदतीच्या हातांची नितांत गरज आहे..

ए क मूल कचराकुंडीत टाकलेले. गळ्याचा भाग काळानिळा पडलेला. कोणी तरी त्याला मारण्याचा प्रयत्न केला असावा. तातडीनं त्याला दवाखान्यात नेणे आवश्यक होतं. जगेल की मरेल हे सांगता येत नव्हतं. दवाखान्यात गेल्या गेल्या विचारलं, ‘व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल, चालेल का?’ प्रश्न पैशाच्या अंगाने जाणारा होता. पण डॉक्टरांना निक्षून सांगण्यात आले, ‘त्याला वाचविण्यासाठी जे काही करायचे असेल ते करा.’ प्रयत्नांना यश आले. तो वाचला. पुढं कमालीचा खोडकर झाला. त्याला सांभाळणे मोठे अवघड काम होते. ‘हायपर अ‍ॅक्टिव्ह’ हा शब्द जणू या मुलासाठी बनविला गेला होता. त्याचा खोडकरपणा पाहून त्याला कोणी दत्तक घ्यायलाही पुढे येईना. सहा वर्षांपर्यंत ‘साकार’मध्ये राहिला. पुढे कायद्याने अन्य संस्थेकडे त्याला वर्ग करावे लागले. तिथे त्याच्या खाण्यापिण्याची आबाळ झाली. तो वयाच्या १०व्या वर्षी वारला. त्याचे जाणे जिवाला चटका लावून जाणारे. पण न थकता, आत्मविश्वास न ढळू देता अनाथ मुलांसाठी घर शोधून देणे, हे काम गेल्या २२ वर्षांपासून ‘साकार’चे कार्यकर्ते करीत आहेत.

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
High Court rejects plea for abortion in 31st week
एकतिसाव्या आठवड्यात गर्भापाताची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
Minor boy beaten up in shop two suspects arrested
दुकानात अल्पवयीन मुलास मारहाण, दोन संशयित ताब्यात
Manisha Khatri as Commissioner of Nashik Municipal Corporation
नाशिक महानगरपालिका आयुक्तांचे बदलीनाट्य, आता मनिषा खत्री यांची नियुक्ती
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!

घाटी रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये ती राहायची. एके दिवशी वारली. कशामुळे काय माहीत. तिचं गोजिरवाणं बाळ तिथंच होतं, एका गाडीमागे, श्वास कोंडून! बेवारस म्हणून त्या महिलेचे अंत्यसंस्कार पोलिसांनी केले. पण या बाळाचं काय करायचं? पोलिसांना उत्तर सापडेना. कोणी तरी सांगितले, ‘साकार’ अशा मुलांसाठी काम करते. ते मूल संस्थेत आणण्यात आले. पुढे त्याला सांभाळताना बरीच कसरत करावी लागली, कारण त्याला लहानपणापासून लपून बसण्याची सवयच जडली होती. कधी पडद्यामागे तर कधी दारामागे, हा श्वास रोखून बसायचा. म्हणून त्याच्या दिमतीला दोन आया असायच्या. अशी अनेक मुलं. एक मूल कुमारी मातेचं. ८०० ग्राम वजनाचं. ते जेव्हा संस्थेत आलं तेव्हा पुन्हा तोच प्रश्न. हा जगेल का? तो वाचला सगळ्यांच्या प्रयत्नांनी. तो एवढा गुटगुटीत दिसू लागला की, सगळे जण त्याला ‘गोटय़ा’ म्हणू लागले. ‘साकार’मध्ये दाखल प्रत्येक मूल वाढवितानाचे अनेक किस्से.

एका वेळी संस्थेत २० मुलं असतात. त्यातील १२-१३ ही अगदी तान्हुली. पाळण्यात वाढवायची. कोणी तरी टाकलेली, नकोशी. बहुतेकवेळा कुमारी मातेची. ज्या मुलांना वैद्यकीय काळजीची अधिक गरज आहे अशा मुलांनाही टाकून देणारे महाभाग आहेत. हृदयाला छिद्र, काचबिंदू, एखादा जंतूसंसर्ग असणारी किंवा मतिमंद तान्हुली मुलं सोडून जाणारे अनेक जण आहेत. या मुलांना वाढविण्यासाठी साकार ही संस्था काम करते. या संस्थेच्या कामात सहभाग देणारेही तसे अनेक जण आहेत. कणव वाटून मदत करणाऱ्यांना वाटते, ‘चला एक महिन्याचा किराणा देऊ या, पण प्रत्यक्षात गरज असते ती दुधाची. या बाळांना दर महिन्याला शंभर दुधाचे डबे लागतात. दुधाच्या एका डब्याची किंमत ३०० रुपये. दुसरी गरज असते ती स्वच्छतेसाठी लागणाऱ्या वस्तूंची. डेटॉल किंवा फिनाईल या वस्तू देणे हे आपल्या सामाजिक जबाबदारीच्या निकषात केव्हा बसेल, काय माहीत?’ मात्र या दोन वस्तूंशिवाय ‘साकार’चे काम उभेच राहू शकत नाही. येथे दाखल होणारे बहुतेक प्रत्येक मूल ‘शी- शू’ श्रेणीतील. त्यामुळे त्यांचे लंगोट, त्यांची स्वच्छता ही संस्थेमधली दररोजची महत्त्वाची कामे. एका बाळाला सर्दी झाली की त्याची लागण सगळ्यांना होण्याची शक्यता. त्यामुळे अशा बाळांसाठी स्वतंत्र आया. मूल जसे मोठे होते तसे त्याला लागणाऱ्या सर्व वस्तू ही संस्थेची गरज. ० ते ६ वयोगटांतील प्रत्येक मुलाची गरज वेगळी. ओळख वेगळी. स्वभाव आणि व्यक्त होण्याची पद्धतही निराळी. या बाळांना त्यांचं हक्काचं घर मिळावं यासाठी दत्तक प्रथेला प्रोत्साहन देणे हे संस्थेचे मुख्य काम. संस्थेच्या प्रमुख कार्यकर्त्यां डॉ. सविता पानट या स्त्रीरोगतज्ज्ञ. त्यामुळे ज्या जोडप्याला मूल होत नाही, त्यांच्या जिवाची घालमेल त्यांना जाणवायची. त्यातूनच ‘साकार’चा जन्म झाला. अनेक जोडप्यांना मूल दत्तक घेणे हे कमीपणाचे वाटते. पण मूल म्हणजे आनंद. खरे तर आता दत्तक प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे. केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (कारा) या केंद्र सरकारच्या एजन्सीमुळे काही तरतुदी अधिक पारदर्शक झाल्या आहेत. मात्र या प्रक्रियेमुळे संस्थेतील कार्यकर्ते आणि दत्तक घेऊ इच्छिणारे पालक यांच्यादरम्यान होणारा संवाद मात्र काहीसा हरवल्यासारखे वातावरण झाले आहे. आता ‘कारा’च्या संकेतस्थळावर संस्थेत मूल दाखल झाल्यावर त्याचे छायाचित्र टाकले जाते. तीन महिन्याने मूल दत्तक देण्यासाठी पात्र ठरते. ही मुले संस्थेत आणण्यापासून ते दत्तक जाईपर्यंत कायद्याच्या अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून संस्थेच्या कार्यकर्त्यांना जावे लागते. कधी कधी न्यायालयीन प्रक्रियेतील कमालीचा कंटाळवाणा प्रवास दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला डोकेदुखी ठरू शकतो. मात्र या प्रक्रियेत हस्तक्षेप करीत किमान ९ महिन्यांत त्याच्या पदरी मूल जाईल, अशी रचना लावणाऱ्यांमध्ये साकारच्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले आहे. आता ही प्रक्रिया तशी सुलभ झाली आहे. संस्थेत येणाऱ्या, दत्तक घेऊ  इच्छिणाऱ्यांच्या मानसिकताही मोठय़ा गमतीच्या. एखादा म्हणतो, ‘आम्हाला चांगलं मूल द्या हं. तसलं नको. आमच्याच धर्माचं असेल तर बरं. या प्रत्येकाला मूल हे मूल असतं. त्याला जात-धर्म आपण नंतर चिकटवतो हे समजावून सांगणे हा अत्यंत कठीण प्रसंग साकारचे कार्यकर्ते मन लावून करतात. डॉ. सविता पानट, नीलिमा सुभेदार, मंगला साधू, सुचित्रा देशपांडे, सुहास वैद्य, राधिका मुळे, हेमा आहिरवाडकर, डॉ. नीलिमा पांडे, आशा नानिवाडेकर, अ‍ॅड. अर्चना गोंधळेकर यांच्यासह तीन डॉक्टर, दोन नर्स, दोन सामाजिक कार्यकर्त्यां, १५ आया, एक स्वयंपाकी असा साकारचा मोठा परिवार आहे. सध्या संस्थेचा कारभार भाडय़ाच्या जागेत सुरू आहे. परिणामी जाणवणारी आर्थिक चणचण नव्या समस्या घेऊन येते. विशेषत: मूल जेव्हा संस्थेत दाखल होतं तेव्हा त्याला तातडीच्या वैद्यकीय उपचाराची गरज असते. त्यासाठी अत्याधुनिक रुग्णालयात त्यावर उपचार करावे लागतात. कधी कधी एकेका मुलावर लाखभर रुपये खर्च होतो. दररोजचा खर्च, कार्यकर्त्यांचे मानधन यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करणे ही आता सवय बनत चालली आहे. जर स्वत:ची जागा झाली तर भाडय़ाचे दरमहा भरावे लागणारे ३० हजार रुपये वाचतील. त्यातून आणखी नवे काही करता येईल, असा संस्थेच्या विश्वस्तांचा मानस आहे. प्रगल्भ सामाजिक जाणिवेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा समूह केवळ किशोरवयीन मुलींना प्रशिक्षण देतो. विवाहपूर्व जोडप्यांसाठी ‘थोडंसं बोलू या’ हा समुपदेशानाचा एक प्रकल्पही संस्थेकडून हाती घेतला जातो. मूलत: मुलं असणाऱ्यांनी आणि नसणाऱ्यांनी एक निरागस जीवन नव्याने साकार करावं यासाठी बालकांना दत्तक घ्यावं, यासाठी प्रयत्न करणाऱ्या या संस्थेला इमारत उभी करण्यासाठी मदतीची गरज आहे.

चिमुकल्यांना घर मिळवून देणारे ‘साकार’

समाज एवढा प्रगल्भ व्हावा की, अशा कामांची गरजच भासू नये. अनैतिक चौकटींचं एवढं ओझं समाजावर झालं आहे की, त्यातून मार्ग काढण्यासाठी जन्मलेल्या मुलाला टाकणं ही वाईट वेळ कोणत्याही आईवर येऊ नये. किमान मूल टाकताना त्याला कचऱ्याच्या कुंडीत किंवा बेवारशी टाकू नका. ‘साकार’च्या समोर एवढय़ासाठी एक रिकामा पाळणा ठेवला आहे. किमान त्या मुलाला किडय़ा-मुंगींनी खाऊ नये. एखाद्या जनावरानं तोंड लावू नये, एवढी तरी माणुसकी आपल्यात बाणवू शकतो. तेवढं झालं तरी बरंच काही साकार होईल. त्यामुळे या कामाला कोणाच्या ‘शुभेच्छा’ नकोतच, अशी वैचारिक मांडणी करत साकारचे कार्यकर्ते काम करत आहेत.

संस्थेपर्यंत कसे जाल?

शहरातील दूध डेअरी चौकातून काल्डा कॉर्नर चौकात गेल्यानंतर पद्मावती रुग्णालयाशेजारी ‘साकार’चे कार्यालय आहे.

धनादेश या नावाने पाठवा..

साकार (Sakar) (कलम ८०जी (५) नुसार देणग्या करसवलतीस पात्र आहेत)

 

धनादेश येथे पाठवा.. : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे लोकसत्तात प्रसिद्ध केली जातील.

  • मुंबई कार्यालय : लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०५३६
  • महापे कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
  • ठाणे कार्यालय : संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३८५१३२
  • पुणे कार्यालय : संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४११२५
  • नाशिक कार्यालय : संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४
  • नागपूर कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, ०७१२ झ्र् २७०६९२३
  • औरंगाबाद कार्यालय : संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३
  • नगर कार्यालय : संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७
  • दिल्ली कार्यालय : संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३० उत्तर प्रदेश. ०११- २०६६५१५००

 

अभागी जुळ्या मुलांच्या कहाणीचा साकारलेला सुखद शेवट..

‘साकार’मध्ये आलेल्या जुळ्यांचा ही कहाणी कुठल्याही कहाणीपेक्षा वेगळी. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा दिवस. ‘साकार’मध्ये फोन खणखणला. बोलणारी व्यक्ती अगदी घाबरी-घुबरी झालेली. एका रेल्वेच्या डब्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत त्याला जुळी बाळं दिसली. त्या व्यक्तीला ‘साकार’ माहीत होते म्हणून त्यांनी पोलिसांऐवजी कळवले. ‘साकार’चे कार्यकर्ते ताबडतोब स्टेशनवर पोहोचले. जेमतेम काही तासांची, क्षीण हालचाल करीत असलेली ही बालके. लहान मुलांच्या दवाखान्यात उपचार सुरू झाले. एकाचे वजन होते अवघे एक किलो व दुसऱ्या बाळाचे १२०० ग्रॅम. दोन्हीही मुलगे. ही दोन्ही जुळी मुले दवाखान्यात २५ दिवस होती आणि त्यांचे बिल आले होते लाखाच्या आसपास. आता प्रश्न उपस्थित झाला, त्यांना दत्तक देण्याचा. कायदा असे सांगतो की, जुळ्यांना एकाच घरात दिले पाहिजे. दोघांना कोण दत्तक घेणार? पण असे पालक मिळाले. त्यांनी ही दोन्ही मुले दत्तक घेतली. विनय/विजय (संस्थेने ठेवलेली नावे) तीन वर्षांची आहेत. बेसिनच्या खाली, कॅरीबॅगमध्ये आयुष्याची सुरुवात झालेली ही मुले आज एका भक्कम घरात, प्रेमळ वातावरणात, अतूट नात्याच्या मायेत अगदी सुखात आहेत.

साकार औरंगाबाद

‘साकार’ ही संस्था औरंगाबाद शहरात कार्यरत आहे. अनाथ मुलांना त्यांचं हक्काचं घर मिळावं यासाठी दत्तक प्रथेला प्रोत्साहन देणे हे संस्थेचे मुख्य काम. सध्या संस्थेचा कारभार भाडय़ाच्या जागेत सुरू आहे. या संस्थेला इमारत उभी करण्यासाठी मदतीची गरज आहे.

 

– सुहास सरदेशमुख

Story img Loader