आम्ही मुलांसाठी भविष्य नाही, तर भविष्यासाठी मुले घडवितो.. या मार्केटिंग तंत्राच्या साहाय्याने नाशिकमध्ये सध्या इंग्रजी शाळा शिक्षण ‘विकत’ आहेत. वर्षांगणिक वाढणाऱ्या या शाळांमुळे मराठी शाळांची अवस्था बिकट होत चालली आहे. मराठी शाळांमध्ये शिकून पुढे भविष्य नसल्याचा पद्धतशीरपणे होत जाणारा प्रचार आणि इंग्रजी शाळांच्या मार्केटिंग तंत्राची मध्यम व उच्च-मध्यम वर्गाला पडलेली भुरळ यामुळे शहरात मराठी शाळांकडे कोणी ढुंकूनही पाहण्यास तयार नाही.
दहा वर्षांपूर्वी शहर व परिसरात अगदीच मोजक्या असणाऱ्या इंग्रजी शाळांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाली आहे. बहुतांश सधन मराठी कुटुंबेच स्वभाषेतील शाळांकडे तुच्छतेने पाहत असल्याचे दिसते. शहरी भागात एकूण ५०६ शाळा असून त्यात मराठी माध्यमाच्या ३१२, तर इंग्रजी माध्यमांतील १४९ शाळा आहेत. यातील ‘सीबीएसई’ आणि ‘आयसीएसई’ मंडळाच्या शाळांची संख्या जवळपास निम्मी आहे. इंग्रजीशिवाय पर्याय नसल्याच्या भावनेने गरीब कुटुंबेही आपल्या पाल्यास इंग्रजी शाळेत टाकत असल्याचे दिसते.  या परिस्थितीतही काही मोजक्या मराठी शाळा नावलौकिक टिकवून आहेत. एखाद्या पालकास दर्जेदार मराठी शाळेत पाल्यास टाकावयाचे असेल, तर तो वास्तव्यास असलेल्या परिसरात तशी शाळाच सापडत नसल्याची सार्वत्रिक तक्रार आहे. महापालिकेच्या अखत्यारीतील एकेक शाळा वर्षांगणिक बंद पडत असून पटसंख्येअभावी आणखी काही शाळा बंद पडण्याचा धोका आहे. ग्रामीण भागातही हळूहळू इंग्रजी माध्यमातील शाळा याच पद्धतीने आपले पाय रोवत आहेत.