नाटक व सिनेमात नाव कमावल्यानंतरही ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर अस्सल नगरकर होते. हे नाते त्यांनी जाणीवपूर्वक जोपासले होते. वृद्धापकाळ ते नगरलाच व्यतीत करणार होते. नगरमध्ये नवे घरही त्यांनी घेतले होते, मात्र ते आणि नगरकर असे दोघांचे हे स्वप्न अपूर्णच राहिले. त्यांच्या निधनाचे वृत्त नगरमध्ये धडकताच त्यांचे मित्र, नाटय़कलावंतांनी त्यांच्या नगर येथील निवासस्थानी धाव घेतली. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
आज अंत्यसंस्कार
प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी १ वाजता अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मुंबईहून सकाळी ९.३० वाजता त्यांचे पार्थिव अहमदनगरला आणण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता अमरापूरकर यांचे पार्थिव नगरला आणण्यात येणार आहे. माणिक चौकातील त्यांच्या निवासस्थानी दोन तास ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी ११.३० वाजता येथूनच त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.
रुपेरी पडद्यावर खलनायकी भूमिका साकार करणारे सदाशिव अमरापूरकर वैयक्तिक जीवनात मात्र अत्यंत संवेदनशिल आणि सत्वशील होते. चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेत राहुनही त्यांनी आपल्यातील साधेपण आणि माणूसपण जपले होते. त्यांच्या निधनाने सच्चा रंगकर्मी, समर्पित समाजसेवक गमावला आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
चित्रपटासारख्या झगमटाच्या दुनियेत राहूनही सामाजिक भान जपणारा आणि समाजकार्यात स्वत:ला प्रत्यक्ष झोकून देणारा उत्कृष्ट कलाकार हरपला आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक चळवळीचे भरून न येणारे नुकसान झाले आहे.
विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री
सदाशिव यांच्याशी माझी दोस्ती होती. चित्रपटाच्या प्रांताबरोबरच सामाजिक कामामध्ये आम्ही एकत्र होतो. चित्रपटात आम्ही एकत्र नांदलो नाही हे खरे असले तरी आमची चळवळीमध्ये आमची मैत्री अतूट राहिली. अमरापूरकर यांच्या निधनाने मी जवळचा मित्र गमावला आहे.
डॉ. श्रीराम लागू, ज्येष्ठ अभिनेते
सदाशिव अमरापूरकर यांच्या निधनाने अभिनयाच्या प्रांताचे तर नुकसान झाले आहे. पण, सामाजिक विषयांचे भान असणारे आणि त्याच्या निधी संकलनासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेला सामाजिक कृतज्ञता निधीचा आधारस्तंभ हरपला. सामाजिक चळवळीपुढील पैशांचा प्रश्न मिटावा यासाठी निधी संकलनाकरिता अमरापूरकर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांनी नटाचा तोरा कधी मिरवला नाही.
बाबा आढाव, सामाजिक कार्यकर्ते
‘ट्विटर’वरून मान्यवरांची श्रद्धांजली
बॉलिवूडमधील काही कलाकारांचा अपवाद वगळता अनेक मान्यवर अमरापूरकर यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अनुपस्थित राहिले. मात्र या मंडळींनी ‘ट्विटर’ या सोशल नेटवर्किंग साईटवरुन अमरापूरकर यांना श्रद्धांजली वाहिली. यात अमिताभ बच्चन यांच्यासह अर्जून कपूर, फराहन अख्तर, अनुपम खेर, महेश भट्ट, इशा गुप्ता, पूजा भट्ट, कुणाल कोहली, अजय देवणग आदींची समावेश आहे. अमिताभ बच्चन यांनी, जेव्हा एखादा सहकलाकार अचानक निघून जातो तेव्हा मोठी पोकळी निर्माण होते,अशा शब्दात आपले ट्विट केले आहे. महेश भट्ट यांनी ‘सडक’ हा चित्रपट ‘महाराणी’शिवाय पूर्ण होऊच शकत नाही, असे म्हटले आहे. तर अजय देवगण याने, एक उत्तम कलाकार आणि चांगला माणूस, अशा शब्दात अमरापूरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हिंदूीची प्रचंड भीती हे माझे वैगुण्य होते. त्याची सदाशिवला कधी भीती वाटली नाही. किंबहुना सुरुवातीच्या काळात त्याने मराठी बाज ठेवून खुबीने हिंदीचा वापर केला. त्याची हीच बेधडक वृत्ती कमालीची यशस्वी ठरली.
मधुकर तोरडमल, अभिनेते
अमरापूरकर सामाजिक भान असलेले कलावंत होते. त्या वेळच्या नगरसारख्या छोटय़ा गावातून एसटीच्या लाल डब्यात बसून मुंबईसारख्या शहरात त्यांनी नाव कमावले. नव्या कलावंतांना त्याचे नेहमीच प्रोत्साहन होते. दिसण्यास सामान्य वाटणारे कलावंतही, देखणेपण किंवा हीरोसारखे रूप नसताना उत्तुंग यश मिळवू शकतात हे त्यांनी दाखवून दिले.
मिलिंद शिंदे, अभिनेते
गेल्या ३२ वर्षांची आमची ‘असोसिएशन’ त्याच्या एक्झिटमुळे संपली. सदाशिव माझ्यापेक्षा लहान होता, मात्र अभ्यासूपणा, समृद्ध अनुभव, सामाजिक जाणीव यामुळे तो माझा मार्गदर्शकच होता. ‘ती फुलराणी’, ‘निष्पाप’ ही नाटके व ‘अनुभूती’ हा हिंदी चित्रपट आम्ही एकत्र केला.
अनिल क्षीरसागर,ज्येष्ठ नाटय़कलांवत
अमरापूरकर यांची जरी जगाला ओळख दिग्गज कलावंत अशी असली तरी ते माझ्यासाठी ‘आमचे तात्या’, स्नेही, मार्गदर्शक, गुरू होते.त्यांच्या शिकवणीमुळेच मी नाटय़क्षेत्रात काम करू शकलो.
पी. डी. कुलकर्णी, ज्येष्ठ रंगकर्मी