समाजातील उपेक्षितांच्या, वंचितांच्या आणि दुर्बलांच्या सेवेसाठी स्वार्थनिरपेक्षपणे उभे आयुष्य झोकून देणाऱ्या सामाजिक संस्था आणि अनामिक सेवाव्रतींना दरवर्षी ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाद्वारे आर्थिक साहाय्यकेले जाते. २०१२मध्ये ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या हस्ते या सामाजिक संस्थांना मदतीच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी सदाशिव अमरापूरकर यांनी व्यक्त केलेले मनोगत
महाराष्ट्राला सामाजिक कार्याची आणि सेवाभावाची फार मोठी परंपरा आहे. गेली अनेक वष्रे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पडद्याआड राहून कामे करणाऱ्या या दहा संस्थांची ओळख ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’ या उपक्रमामुळे समाजाला झाली. आपण सुरू केलेले हे कार्य किती महान आहे, याचा प्रत्यय या उपक्रमातून मिळालेल्या प्रतिसादामुळे संस्थांना आला असेल. माझ्या दृष्टीने हा तर अनामिक कार्याचा सत्कार आहे.
आज आपण एका वेगळ्या कामाच्या समाधानाने भारावलो आहोत. मानवाची सेवा ही सर्वात महान सेवा आहे, या महात्मा गांधीच्या वचनाचा प्रत्यय या सेवाकार्यातून जागोजागी येताना दिसतोच, पण वर्तमानपत्रांवर आज जनतेचा सर्वाधिक विश्वास आहे याचाही प्रत्यय अशा उपक्रमांतून येतो. लोक किती मदत करतात आणि संस्था कशा वटवृक्षासारख्या उभ्या राहतात, याचे जिवंत उदाहरण आज ‘लोकसत्ता’च्या कार्यक्रमातून आपण अनुभवले. वेदनांच्या या महासागरापुढे रामायण, महाभारत आणि गीताही तोकडय़ा पडाव्यात. माझ्या आयुष्यातील उत्तरकाळ अशाच प्रकारे लोकांची दु:खे दूर करण्यात जावा, अशी भावोत्कट इच्छा आहे. आनंदाच्या गोष्टी सांगणारे हजारो असतात, पण आपल्या व्यथा सांगणारे कोणी नसते. या लोकांनी अशा व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांचे अश्रू पुसले, हे खऱ्या अर्थाने परमेश्वराचे काम आहे.