प्रा. चंद्रकांत गायकवाड

महाराष्ट्राची मुहूर्तमेढ गोदाकाठावर मराठवाडय़ातच रोवली गेली. रोमन व्यापाराची माहिती देणारा पहिल्या शतकातील, ‘पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी’ या ग्रंथात त्या काळातील नऊ महानगरे दिलेली आहेत. पैकी पतान (पठण), तगरपूर (तेर) आणि भोगवर्धन (भोकरदन) या तीन सातवाहन काळातील शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्याचे प्राचीन वैभव जाणून घ्यायचे असेल तर हा ग्रंथ उपयुक्त होय! ही भूमी अतिप्राचीन काळी दक्षिणपथ यातील ‘दंडकारण्य’ या नावाने ओळखली जात असे. कविश्रेष्ठ गोिवदाग्रजांनी आपल्या काव्यात या भूमीचे स्तोत्र गायले असून महाराष्ट्राच्या सर्व वैशिष्टय़ांसह वर्णन केलेले आहे.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
first time in history of Maharashtra 52 separate hostels for OBCs and vagabonds 5 thousand 200 students admitted
५२ वसतिगृहात तब्बल ५,२०० ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा…विद्यार्थी म्हणाले, फडणवीसांनी…
central government decision on classical languages in october 2024
संविधानभान : अभिजात भाषा म्हणजे काय?
maharshtra electoral history
महाराष्ट्राची निर्मिती, काँग्रेसचे वर्चस्व, हिंदुत्वाचा उदय; महाराष्ट्र निवडणुकीचा इतिहास काय सांगतो?
Nana Patole first reaction about leaving Congress and joining BJP before some years
“त्या नेत्यामुळे काँग्रेस सोडून भाजपात गेलो…” नाना पटोलेंनी पहिल्यांदाच…

अलीकडे महाराष्ट्रातील काही नद्यांच्या काठावर उत्खनने झाली आहेत. यावरून या प्रदेशात अतिप्राचीन काळातील म्हणजेच लाख-सवा लाख वर्षांपूर्वी आदिअश्मयुगीन मानव वावरत असला पाहिजे, असे अनुमान काढता येते. द्वितीय अश्मयुगातील मानवाची अवजारे मुंगी-पठण (पालथी नगरी – प्रतिष्ठान) येथे सापडल्याचे उल्लेख आहेत. या ठिकाणी प्राचीन काळी मूलक आणि अश्मक अशी दोन महाजन पदे होती. मूलकची राजधानी गोदावरीकाठी पठण (प्रतिष्ठान) येथे होती. कालांतराने अश्मकांनी येथेच राजधानी बनवली. त्यानंतर नंद घराण्याची सत्ता या भूमीवर प्रस्थापित झाली. नंदांनंतर गोदावरीच्या प्रदेशात पेतनिक या स्वायत्त राज्याची निर्मिती झाली. (पेतनिक म्हणजे पठणकर). पेतनिक सत्ता नष्ट करून चंद्रगुप्त मौर्याने या भूमीवर प्राबल्य मिळविले. साम्राज्यविस्तारादरम्यान सम्राट अशोकाच्या राज्याचा एक भाग महाराष्ट्र भूमी हा होता. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा प्रारंभ खऱ्या अर्थाने सातवाहन घरण्यापासून सुरू होतो. सातवाहन राज्यकत्रे मूळचे याच भूमीचे भूमिपुत्र. त्यांनी इ.स.पूर्व २३० ते इ.स.२३० असे सुमारे ४६० वर्षे राज्य केले. मध्यंतरी शकांनी या भूमीचा काही भाग जिंकून घेतला व ५० वर्षे आपल्या ताब्यात ठेवला; पुढे गौतमीपुत्र सातकर्णी या प्रतापी राजाने शक, कुशान, यवनांच्या आक्रमणाचा प्रतिकार करून भारतीय संस्कृतीचे रक्षण केले.

शकगणना सुरू केल्याने शालिवाहन हे सातवाहनांचे दुसरे नामाभिधान होते. त्यांनीच या भूमीचे संवर्धन करून महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन घडविले.

सातवाहनांचे साम्राज्य मावळल्यानंतर इ.स. २५० च्या सुमारास विध्यंशक्ती नावाच्या सेनापतीने विदर्भातील चंद्रपूरजवळ भंडक या ठिकाणी स्वतंत्र राजधानी स्थापित केली. या घराण्याचे राज्य इ.स. ५५० पर्यंत होते. या घराण्याला वाकाटक राजवंश म्हणतात. त्यांचा शेवटचा राजा हरिषेण हा होता. या काळात कला आणि संस्कृतीची भरभराट झाली. तद्नंतर बदामीचा जयसिंह या चालुक्य वंशातील पुरुषाने या भूमीवर आपली सत्ता स्थापित केली. चालुक्यांनी या भूमीवर इ.स. ७५३ पर्यंत राज्य केले. दंतिदुर्ग हा चालुक्यांचा एक सेनापती राष्ट्रकुट वंशाचा होता. त्याने इ.स. ७५४ च्या सुमारास या भूमीवर आपली सत्ता प्रस्थापित केली. मौर्य घराणे/ गुप्त घराणे या राजवंशाप्रमाणेच राष्ट्रकुट घराण्याला भारताच्या इतिहासात श्रेष्ठत्व प्राप्त झालेले आहे. यांची राजवट संपुष्टात आल्यावर इ.स. ९७३ च्या दरम्यान पुन्हा चालुक्यांची सत्ता या भूमीवर आली. या वेळी कल्याणी ही त्यांची राजधानी होती. इ.स. ९८९ पर्यंत चालुक्यांची सत्ता अस्तित्वात होती.

चालुक्यांच्या पश्चात् त्यांच्याकडे सामंत म्हणून असलेले यादव पुढे फार शूर व पराक्रमी निघाले. यादव वंशातील सुबाहू या सामंताने बदामीचा कारभार सांभाळत असताना देवगिरी (औरंगाबाद)चाही कारभार पाहत असे. याच समयी कराड-कोल्हापूर, दक्षिण कोकण आणि उत्तर कोकण या तीन ठिकाणी शिलाहार घराण्याच्या तीन शाखांचे तीन वेगवेगळे राज्य होते. या तीनही शाखा यादवांच्या कारभारात विलीन होऊन गेल्या. यादव वंशातील दृढप्रहार, सेऊनचंद्र, भिल्लम इ. पराक्रमी पुरुषांनी आपले सार्वभौमत्व सिद्ध करून देवगिरीवर आपले राज्य उभारले. हेच ते यादवांचे साम्राज्य.

पुढे देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीने स्वाऱ्या करायला सुरुवात केली. त्याने यादवांचा राजा रामदेवराय याचा पराभव करून मांडलिक बनवले. सुलतानांचा सेनापती मलिक काफूर याने रामदेवरायचा मुलगा शंकरदेव यास यादवांच्या गादीवर असताना ठार केले आणि यादवांचे साम्राज्य खालसा करण्यात आले. येथून पुढे या भूमीवर सुलतानांचे राज्य सुरू झाले. संपूर्ण देशावर सुलतानांचा वावर सुरू झाला. याच भूमीत पुढे या परकीय सुलतानांच्या अंतर्गत बंडाळीने बहामनी राज्याच्या वेगवेगळ्या पाच गाद्या (शाह्य़ा) तयार झाल्या. इमादशाही/ बरीदशाही/ कुतुबशाही/ आदिलशाही/ निजामशाही इ. परकीयांच्या कचाटय़ात ही भूमी सापडली. त्यांनी मंदिरे पाडली, लेण्या उद्ध्वस्त केल्या आणि रयतेला नागवून हाल केले. हिन्दुस्थान दोन वर्गात विभागल्या गेला- बादशहा आणि लाचार प्रजा. (पान ७ वर) (पान ६ वरून) सत्ताधीश आणि गुलाम, सधन आणि निर्धन. एतद्देशीय माणूस वर्तमान हरवून बसला आणि त्याने आत्मविश्वास गमावला. अशा सामाजिक स्थितीत सतराव्या शतकात या भूमीतील पुत्रांनी (मावळ्यांनी) बंड केले. छत्रपती शिवरायांनी रयतेचे ‘स्वराज्य’ निर्माण केले. तीच ही महाराष्ट्र भूमी होय! शिवरायांनी रयतेची मरगळलेली मने चेतवली, लाचारी घालवून सामान्यांमध्ये स्वधर्माचा आणि स्वराज्याचा आत्मविश्वास व अभिमान निर्माण केला. अन्याय व अत्याचार यांचं परिमार्जन करण्यासाठी स्वत:  आयुष्यभर निखाऱ्यात चालत स्वराज्याचा भगवा फडकवला. स्वराज्याचे साम्राज्य करण्यासाठी घामाचा पाऊस अन् रक्ताचा सडा देशभर िशपडला.  स्वराज्याचा राज्यकारभार पेशवाई धरून १८० वर्षे चालला. मराठी साम्राज्य सत्तेच्या आणि वैभवाच्या शिखरावर असतानाच पेशवाईत गृहकलह/ दुही/ घरभेदी/ व्यापक दृष्टीचा अभाव/ लोकधार्जणिेपणा/ बारभाई खोती इ. कारणांनी दुर्बलता निर्माण झाली. याच काळात इंग्रजांनी इ.स. १८१८ ला मराठी सत्ता ताब्यात घेतली. संपूर्ण देश पुन्हा एकदा गुलामगिरीत अडकून पडला. इंग्रजांनी आपल्या सोयीनुसार पुनश्च एकदा या भूमीची/ प्रांताची रचना केली. या भूमीवर इंग्रजांनी सव्वाशे वर्षे राज्य केले. असंख्य स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने स्वातंत्र्याचा लढा उभारून इ.स. १९४७ ला भारत देश स्वतंत्र झाला.

स्वातंत्र्यानंतर प्रांतीय रचना/ प्रादेशिक राज्ये भाषावार रचून अस्तित्वात आणण्यासाठी भगीरथ प्रयत्न करावा लागला. संयुक्त महाराष्ट्राच्या चंडप्रतापी लढय़ाची (१०५ हुतात्मे) जनमनातली त्या वेळची भावनोन्मादकता व सुखदता, सर्व पक्षीय, सर्व कार्यकत्रे या सर्वाची एकता मागील अर्धशतकात पाहावयास मिळाली नाही. हा सर्व इतिहास अत्यंत स्फूर्तिदायक आणि उद्बोधक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढे अद्भुत पर्व दुसरे कोणतेही नाही.

आज मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलगंणा, कर्नाटक, दादरा हवेली, गुजरात आणि पश्चिमेला अरबी समुद्र या प्रदेशांच्या सीमारेषांत ‘महाराष्ट्र’ ही संतभूमी/ वीरभूमी/ योद्धय़ांची भूमी वसलेली आहे. त्याचे क्षेत्रफळ ३,०७,७६२ चौरस किलोमीटर आहे. मराठवाडा, विदर्भ आणि प. महाराष्ट्र अशा विभागांत ही भूमी विभागली गेली आहे. मुंबई, कोकण हा प्रदेशही पश्चिम महाराष्ट्र या विभागातच येतो. कोकणपट्टीव्यतिरिक्तचा भूभाग देश म्हणून ओळखला जातो. कोकण आणि देश हा १३ जिल्ह्य़ांचा प्रदेशच स्वातंत्र्यापूर्वी महाराष्ट्र या नावाने ओळखला जात असे. हीच भूमी म्हणजे स्वराज्य भूमी होय! आजचा कर्नाटक, गुजरात राज्यांतील काही प्रदेश मुंबई इलाख्यात मोडत असे. त्याचप्रमाणे मराठवाडा हा मराठी भाषिकांचा प्रदेश तेलंगणा राज्यात येत असे, तर विदर्भातील मराठी मुलूख हा मध्य प्रदेशात दाखल केलेला होता. कोकण आणि देश ही महाराष्ट्राची मुख्य भूमी; परंतु भाषावार प्रांतरचनेत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या महाजन आंदोलनानंतर मराठी भाषा जेथवर बोलली जाते, तो सर्व मराठी माणसांचा प्रदेश.

छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आधुनिक काळात फुले-शाहू-आंबेडकर-विठ्ठल रामजी िशदे यांचा महाराष्ट्र म्हणूनही ओळखला जातो. या महापुरुषांची सामाजिक सुधारणेची परंपरा हे या महाराष्ट्रांचे वेगळेपण होय! महाराष्ट्राइतके मूलगामी विचारांचे समाजसुधारक इतर कोणत्याही प्रांतात जन्माला आलेले नाहीत. तरीही आजचे सामाजिक सौहार्द चिंताजनक बनले आहे. विकासाच्या अजेंडय़ाबाबत संयुक्त महाराष्ट्राचा एके काळचा पक्षनिरपेक्ष एकोपा उन्मळून पडला आहे. विकासाची चार-दोन कामे कमी  झाली तरी चालतील; पण सामाजिक स्वास्थ्याची वीण उसवता कामा नये. साठीचा उंबरठा ओलांडत असताना संयुक्त महाराष्ट्राने आता तो सामाजिक सलोखा जपणे गरजेचे आहे. समाजाच्या बौद्धिक, मानसिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नयनात फक्त आणि फक्त भौतिक विकास उपयुक्त ठरणार नाही. महाराष्ट्रासाठी ज्वलंत लढा उभा करणारे सारे नेते आणि कार्यकत्रे केवळ सुसंस्कृत आणि प्रगल्भ मराठी समाजाचे स्वप्न पाहत होते. त्या स्वप्नाशी नव्याने कोरोना युगाची नाळ जोडण्याचा आजचा दिवस होय!

chandrakant7662@rediffmail.com