पुणे जिल्ह्य़ातील माळीण गावात ३० जुलैला संपूर्ण गावच दरड कोसळण्याच्या घटनेने नकाशावरून पुसले गेले. तेथे जे काही थोडे लोक वाचले आहेत त्यांचे पुनर्वसन ग्रामसभेत चर्चा करून लोकशाही मार्गाने व्हायला हवे. उघडय़ावर आलेले संसार पुन्हा एकदा उभारावे लागतील, मोडून पडलेली मने पुन्हा एकदा जीवनाच्या आशेने भरून टाकावी लागतील. अशा प्रत्येक घटनेत शासन तर मदतीला असायला पाहिजेच, पण समाजाचीही जबाबदारी खूप मोठी असते तरच निसर्गाने विस्कटलेला डाव पुन्हा मांडता येतो. दुसऱ्या लेखात माळीण गावातील मुलांचे भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या गावातील मुलांच्या वह्य़ा बघितल्यानंतर त्यांच्या पाठय़क्रमात असलेल्या एका कवितेतील वर्णन काळरात्र होऊन त्यांना सामोरे यावे हा योगायोग, पण तरीही या मुलांनी या प्रसंगाला मोठय़ा धीरोदात्तपणे सामोरे जाताना लहान वयातच मोठी समज आल्याचे दाखवून दिले. त्या मुलांची शाळा, तेथील पूर्वीची स्थिती व आताची स्थिती, कायमचे अंतरलेले मित्र, आईवडील, ज्याच्या सान्निध्यात ही वस्ती व त्यांची संस्कृती जोपासली गेली तोच निसर्ग शत्रू ठरला, हे सगळे वाचल्यानंतर डोळ्यात अश्रू तरळल्याशिवाय राहत नाहीत.
३० जुलै २०१४ रोजी भीमाशंकरच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या माळीण गावावर मुसळधार पावसात प्रचंड मोठी दरड कोसळली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. या दुर्दैवी आपत्ती निवारणाचा पहिला टप्पा राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी अहोरात्र मेहनत करून यशस्वीरीत्या पार पाडला. आता माळीण गावाच्या पुनर्वसनाविषयी धोरण आखणी प्रक्रिया सुरू होत आहे. लवकरच त्याची अंतिम घोषणा व अंमलबजावणी होण्याची शक्यता दिसते.
जी.एस.आय.मधील भूशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गावक ऱ्यांच्या साहाय्याने पश्चिम घाटातील डोंगरउतारावरील परिस्थितीचा अभ्यास करण्यात यावा. वृक्षतोड व बेकायदेशीर डोंगर खोदकामे ताबडतोब थांबवण्यात यावीत. धोकादायक गावे अथवा वाडय़ा-वस्त्यांना व शासकीय यंत्रणेला संभाव्य धोका आपत्तीपूर्वीच निदर्शनास आणून द्यावा. भूस्तरीय पाहणी करून वस्तीच्या जागेची निवड करण्यात यावी. तेथील पाणलोट क्षेत्र विकासासाठी मृद् व जलसंधारणाचे कार्यक्रम एकात्मिकपणे राबविण्यात यावेत. निसर्गात सर्वाच्या गरजा भागवण्याची क्षमता आहे. पण कोणाचीच हाव भागवण्याची क्षमता नाही, हे लक्षात ठेवलेच पाहिजे. त्या दृष्टीने नैसर्गिक विकसन प्रक्रियेतील चक्रीयता, परस्परावलंबन, समानता, विविधता आणि विकेंद्रीकरण इ. महत्त्वाच्या अंगांविषयी संशोधन करून, मर्यादा पाळणारा- ‘धारणाक्षम विकास’ या भारतीय संकल्पनेचा विचार पुन्हा एकवार नव्याने मांडला पाहिजे.
राज्य सरकारने माळीण गावातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. तसेच ग्रामस्थांना घरकुले व संपूर्ण संसार देऊन पुनर्वसन करून देण्याचे आश्वासन दिले आहे. माणुसकीचा गहिवर म्हणून ही भावना योग्यच आहे. पण ती प्रत्यक्षात उतरवताना, कोणतेही राजकीय वा स्वार्थी हेतू न बाळगता अतिशय विवेकी व रास्त निर्णय घेतले पाहिजेत. प्रकल्पाचे लहान आकारमान, गावपातळीवरील हाताळायला व्यवस्थापनाच्या दृष्टीने व्यवहार्य एकक; वस्तू, पैसा व मनुष्यबळ या स्वरूपात संसाधनांची उपलब्धता, करुणेपायी असणारा मदतीचा ओघ, सक्षम राजकीय नेतृत्व आणि शाश्वत, महाराष्ट्र आरोग्य मंडळ, चैतन्य इ. स्थानिक सेवाभावी संस्थांची कामाची तयारी या माळीण पुनर्वसन योजनेच्या जमेच्या बाजू आहेत. त्याचबरोबर मोठय़ा जीवितहानीमुळे उद्ध्वस्त झालेले ग्रामस्थ, जमिनीच्या मालकीवरून उद्भवणारे वादंग, जमीन वापराचे तपशील गाडले जाणे, इ. समस्या आहेत. आपत्तीनंतरचे नियोजन व कृतीच्या पातळीवरील विकसित करावयाचे तपशील हे अत्यंत कठीण व आव्हानात्मक काम आहे.
ग्रामविकसन ही बहुआयामी प्रक्रिया आहे. गावक ऱ्यांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, मानसिक व आध्यात्मिक विकासाद्वारे त्यांच्या जीवनाची गुणवत्ता वृद्धी करणे शक्य होते. अशा विकासासाठी एकात्म व पर्यावरणीय विचारप्रणाली विकसित करावी लागेल. जमीन, मनुष्यबळ, पशुधन, नैसर्गिक साधनसंपत्ती, संसाधने, अर्थ व उद्योग इ. घटकांचा एकत्रित विचार करावा लागेल, तसेच पुनर्वसन कार्यक्रम राबवणाऱ्या शासकीय, अशासकीय व सेवाभावी संस्था आणि गावकरी यामध्येही समन्वयाची, सामंजस्याची, परस्पर आदराची व सहकार्याची भावना असणे आवश्यक आहे.
माळीण गावाच्या पुनर्वसनात फक्त घरांचा विचार न करता वस्ती विकसनाचा व्यापक विचार करावा लागेल. ग्राम आराखडय़ात जुन्या गावातील रचनेचे दोष टाळून, पारंपरिक गावपण जपण्याची ताकद हवी. गावाची रचना करताना शहरी रचना, परिमाणे गृहीत धरता कामा नयेत. ग्रामजीवनाला अनुसरून बाजार, ग्रामपंचायत चावडी, समाजमंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुदवाखाना, अंगणवाडी इ. सुविधांसाठी नियोजनपूर्ण जागा ठेवली पाहिजे. गावात अग्निशामक दलाचा आगीबंब आणि रुग्णवाहिका फिरू शकतील असे दुतर्फा झाडी असलेले रस्ते, दळणवळणाची आधुनिक साधने उभारणे आवश्यक आहे. ‘घर’ ही प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची गोष्ट असते. उद्ध्वस्त ढिगाऱ्यातून पुनर्निर्मितीची झेप घेण्याची क्षमता माळीण गावच्या लोकांमध्ये आहे. सहकार्य व सामूहिक प्रयत्नांमधून ते साधेच, पण पुनर्निर्माण प्रक्रियेत घरांची जागा, रचना ठरवण्यापासून ते त्यांच्या उभारणीच्या प्रत्येक थराथरातून गुंतलेल्या जुन्या-नव्या आठवणींची सोबत करणारे, जगण्याची नवी उमेद देणारे, आशा-आकांक्षायुक्त, घराला घरपण देणारे ‘घर’ एकदिलाने श्रमदानाने उभारू शकतात. त्यासाठी गावक ऱ्यांना बांधकाम साहित्य, वाहतूक खर्च आणि घरबांधणीविषयक मार्गदर्शन करून नवी दृष्टी देण्याची नक्कीच गरज आहे.
निकोप समाजवृद्धीसाठी माळीण गावक ऱ्यांना भौतिक पुनर्वसनाबरोबरच सामाजिक, आर्थिक आणि मानसिक पुनर्वसनाचीही अत्यंत गरज आहे. पुनर्विवाह, बालसंगोपनासाठी दत्तक योजना, मुली, महिला, अपंग, वंचित यांना हक्काचे घर आणि कुटुंब मिळवून देणे आवश्यक आहे. भात-नाचणी शेतीसाठी आवश्यक अवजारे देऊन यंदाचा हंगाम साधायला हवा. उगवणारे धान्य साठवण्यासाठी व त्याच्या विक्रीसाठी अधिक सहानुभूतीपूर्वक व्यवस्था उभारणे अत्यंत गरजेचे आहे. रोजगार हमी योजना व वस्ती विकास योजनांचा ताळमेळ घातल्यास स्थानिक रोजगारनिर्मिती होऊ शकेल.
इतक्या भयानक आपत्तीतून योगायोगाने जीवदान मिळालेल्या, नशीबवान माणसांना त्यांच्या या पुनर्जन्माचे चीज करण्याचे स्वप्न दाखवून आणि जबाबदारीचे भान जागवून, जगण्याची नवी उमेद देण्याचे काम मानसोपचारतज्ज्ञ, इतर गावकरी, आप्तेष्ट आणि हितचिंतकांनी स्नेहभेटींमधून जाणीवपूर्वक करावे. माणसाला माणसाचाच आधार असतो. गावातील एकोपा आणि संघटनाच गावक ऱ्यांना या धक्क्यातून सावरू शकतील. स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, समाजभान असणारे संवेदनशील नागरिक आपल्या नैमित्तिक प्रत्यक्ष वा पत्रभेटींमधूनही जगण्यावरचा विश्वास आणि आनंद माळीणकरांना परत मिळवून देऊ शकतात.
लातूरच्या भूकंपानंतर असेही आढळले की, दु:ख, घटनेचा धक्का, आपद्ग्रस्तांना, मृतांच्या वारसांना भरपूर मदतीमुळे हाती आलेले पैसे यामुळे गावकरी व्यसनाधीनतेकडे जाऊ शकतात. अशा प्रसंगात गावे व्यसनाधीनतेकडे न जाण्यासाठी, त्यांची मन:शांती टिकून राहण्यासाठी, रामकृष्ण मठासारख्या धार्मिक-आध्यात्मिक-सेवेकरी संस्थांचा विविध माध्यमांतून पुनर्वसनात सहभाग हा नक्कीच लाभदायक ठरतो.
राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे महाविद्यालयीन युवकांना पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी करून घेतल्यास, वास्तुकला महाविद्यालयामध्ये ग्रामनियोजनासाठी व घरांच्या रचना निश्चित करण्यासाठी स्पर्धा आयोजित करून, अध्यापक व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेतल्यास तरुणांमध्ये सामाजिक जाणीवजागृती निर्माण होईल. जाणिवांची लांबी-रुंदी-खोली वाढेल. अनेकांना जीवनाचे उद्दिष्ट समजेल..
माळीण गावाचे संपूर्ण पुनर्वसन लोकांच्या कलाने, त्यांच्या पद्धतीने, सर्वसंमतीने, कोणावरही कोणतीही बळजबरी/ अन्याय न करता लोकशाही पद्धतीने, ग्रामसभेत सारे निर्णय घेऊन व्हावेत. अशा लोकसहभागाच्या प्रक्रियेला भरपूर वेळ द्यावा लागेल. पण तेवढा धीर धरलाच पाहिजे. तरच पुनर्वसन कार्यक्रम गावक ऱ्यांचा होईल; अन्यथा शासन/ सेवाभावी संस्था यांचीच ती जबाबदारी होऊन बसेल.
‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ असे म्हणणाऱ्या, विदर्भातील लेखा मेंढा गावाप्रमाणे. ग्रामस्थांच्या सर्व शंका फिटेपर्यंत ग्रामसभेत चर्चा होऊन, नंतर एकमुखाने व एकोप्याने समग्रपणे निर्णय घेतले गेले, तरच परिणामकारक कार्यवाहीची आशा बाळगता येईल.
शासकीय यंत्रणा, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि व्यक्तिगत त्यागातून उभा राहिलेला निधी काटकसरीने व पारदर्शक पद्धतीने, गरजेनुसार नियोजनपूर्वक खर्च करावा.
पुनर्वसनाच्या निमित्ताने..
३० जुलै २०१४ रोजी भीमाशंकरच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या माळीण गावावर मुसळधार पावसात प्रचंड मोठी दरड कोसळली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.
आणखी वाचा
First published on: 10-08-2014 at 02:33 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malin landslide and rehabilitation of villagers