मोदींचा करिष्मा कायम

दिल्ली किंवा बिहारच्या पराभवानंतर मोदी लाट ओसरली, असा अर्थ काढला जात होता. पण उत्तर प्रदेशात मिळालेल्या यशानंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या राज्यात अद्यापही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा कायम असल्याचे बघायला मिळाले. भाजपचा चढता आलेख आणि ढेपाळलेले विरोधक लक्षात घेता २०१९ची लोकसभा निवडणूक भाजपसाठी सोपी जाईल, अशीच एकूण चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांमधील यशाने भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला होता. उत्तर प्रदेशात ७३ जागा (दोन मित्र पक्ष) जिंकून भाजपने एकहाती यश मिळविले होते. हा कल कायम राहण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. नोटाबंदी आणि अन्य मुद्दय़ांमुळे भाजपच्या विरोधात वातावरण तयार होईल, अशी अटकळ व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात लोकसभेचाच कल विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात कायम असल्याचे बघायला मिळाले. मोदी यांची लाट किंवा करिष्मा अजूनही तसाच असल्याचे चित्र समोर आले.

उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकण्याकरिता भाजपने गेले दीड वर्ष बरीच मेहनत घेतली. बिहारच्या पराभवानंतर भाजपने उत्तर प्रदेशातील बूथ पातळीवर लक्ष घातले. उत्तर प्रदेशात ३०० पेक्षा जास्त जागाजिंकणाऱ्या भाजपला दलित तसेच मुस्लीम मतदारांचाही पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले. जनधन योजना, विविध अनुदाने किंवा सरकारी योजना यांचे लाभ तळागाळात पोहचतील याची खबरदारी घेण्यात आली. विकास योजना किंवा विकास कामांचा लाभही जातीच्या आधारवर देण्याची उत्तर प्रदेशात परंपरा होती. भाजपने हे सारे बदलले. समाजातील सर्व वर्गाना सरकारी योजनांचा लाभ दिला. याचा फायदा भाजपला मिळाला आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत मुस्लीम आणि दलित मतदार भाजपला दूर ठेवत असत. पण यंदा या दोन्ही समाजांनी भाजपला साथ दिली. सरकारी योजनांच्या माध्यमातून भाजप समाजातील सर्व वर्गापर्यंत पोहचल्याचे सांगण्यात येते.

सत्तेत आल्यापासून मोदी यांनी ‘सब का साथ, सब का विकास’ यावर भर दिला होता. पावणे तीन वर्षांत त्यांनी कधी जातीय किंवा धार्मिक आधारावर मतप्रदर्शन करण्याचे टाळले होते. फक्त प्रचारात रमझान आणि दिवाळी तसेच कब्रस्तान आणि स्मशान यांची केलेली तुलना वगळता स्वत:ची प्रतिमा जपली होती.

फक्त उत्तर प्रदेशच का?

मोदी यांचा करिष्मा फक्त उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बघायला मिळाला. पंजाब, गोवा किंवा मणिपूरमध्ये मोदी नाणे चालले नाही. भाजपच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षाने सारी ताकद ही उत्तर प्रदेशात लावली होती. गोव्याची सारी जबाबदारी ही मनोहर पर्रिकर यांच्याकडे सोपविली होती. भाजप किंवा मोदी यांच्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान ही हिंदी पट्टय़ातील राज्ये महत्त्वाची आहेत. त्यातूनच मोदी यांनी सारे लक्ष हे उत्तर प्रदेशवर केंद्रित केले होते. उत्तर प्रदेश जिंकल्याशिवाय लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार नाही हे लक्षात घेऊनच पावले टाकण्यात आली होती. उत्तर प्रदेशच्या विजयाने भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गुजरात आणि त्यापाठोपाठ कर्नाटक जिंकून लोकसभेच्या दृष्टीने रणनीती आखली जाईल. उत्तर प्रदेशच्या विजयाने २०१९च्या दृष्टीने भाजपला वातावरण पोषक झाल्याचे मानले जाते.