काळाच्या पुढच्या स्त्रिया
जगावेगळेपण हे व्यक्तीच्या जगण्यावर ठरत नाही, तर तिने केलेल्या कार्यावर, त्याप्रतीच्या तिच्या असीम निष्ठेवर, समर्पणभावानं केलेल्या अथक परिश्रमांवर, त्यातून निष्पन्न झालेल्या समाजोपयोगीतेवर ठरत असते. अमेरिकेत धोबिणीचं काम करणाऱ्या ओसिओला मकार्टी हिने अविश्रांत कष्टत कपडे धुण्याचं काम करून मिळवलेल्या आयुष्यभराच्या पुंजीवर स्वत:च चैन मारत उर्वरित आयुष्य न कंठता त्या रकमेतून गरीब, होतकरू कृष्णवर्णीय मुलांच्या शिक्षणाची सोय केली. तिचं हे आगळंवेगळं कार्य जगाचं लक्ष वेधून न घेतं तरच नवल. अमेरिकेच्या अध्यक्षांसह समस्त अमेरिकेने तिच्या या अनमोल कार्याची यथोचित दखल घेतली..
समाजातील वंचित, पीडित आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या मदतीसाठी विशेष भरीव असे काम करणाऱ्या, इतरांनाही तसेच परोपकारी कार्य करण्याची स्फूर्ती देणाऱ्या निवडक आदर्श अमेरिकन नागरिकांना दरवर्षी राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले जाते. १९९८ साली बिल क्लिंटन यांच्या हस्ते व्हाइट हाऊसमध्ये हे पदक स्वीकारण्यासाठी जमलेल्या सन्माननीय ‘आदर्श नागरिकां’मध्ये ७० वर्षे सातत्याने लोकांचे कपडे धुऊन, इस्त्री करून देण्याचे काम करणारी ओसिओला मकार्टी नावाची ९० वर्षांची एक निग्रो महिला होती.
या धोबिणीने असाधारण समाजसेवेचे काय काम केले होते? कोण होती ही धुणे धुऊन चरितार्थ चालवणारी वृद्ध स्त्री?
१९०८ साली अमेरिकेतील मिसिसिपी प्रांतातील वेन काउंटीमध्ये शेवटच्या घटका मोजत असलेल्या आपल्या नातलगाची शुश्रूषा करून रात्री घरी परतणाऱ्या एका तरुणीवर निर्जन रस्त्यावर बलात्कार झाला. त्यातून जन्माला आलेल्या मुलीला घेऊन ही दुर्दैवी आई तेथून जवळच असलेल्या हॅटिसबर्ग या शहरात तिच्या आई आणि मावशीच्या आश्रयाला जाऊन राहिली. त्या दोघींबरोबर चार घरचे केरवारे, धुणीभांडी करून पोट भरू लागली. मोलकरणीची कामे करून मिळणारा पैसा पुरेसा नसूनही त्या बायकांनी त्यांच्या नातीला शाळेत घातले. तिच्यावर चांगले संस्कार केले. परिस्थितीची जाणीव ठेवून काटकसरीने जगण्याचे आणि बचत करण्याचे धडे दिले. त्यासाठी त्यांनी तिला लहानपणीच एक पोटात पैसे साठवणारी पिगी बँक (चिनी मातीचे एक गोंडस, पोकळ डुक्कर) दिली होती. लहानगी ओसिओला या डुकराचे पोट पै-पैशांच्या नाण्यांनी भरीत असे.
तिघीजणी एकमेकींच्या आधारावर जगत होत्या. ओसिओला सहावीत असताना मावशी गंभीर आजारी पडली. काम करणारे दोन हात कमी होणे त्यांना परवडणारे नव्हते. नाइलाजास्तव ओसिओलाला शाळा सोडावी लागली. तिच्याकडे कपडे धुणे आणि इस्त्री करण्याचे काम सोपविण्यात आले. त्याकाळी कपडे धुण्याची यंत्रे नव्हती. चुलीवर तापवलेल्या पाण्यात कपडे बुडवून ठेवून, हातांनी साबण लावून, घासून घासून ते स्वच्छ धुवावे लागत आणि नंतर घट्ट पिळून, दोऱ्यांवर वाळवून त्यांना इस्त्री करावी लागे. ओसिओलाचे हात त्यानंतर त्याच कामात गुंतून पडले.
ओसिओला तिचे काम चोख तर करीत असेच; पण ती ते अत्यंत आवडीने आणि आनंदानेही करीत असे. तिने धुतलेले कपडे स्वच्छ असतच; त्यांना एक प्रकारचा तजेला चढलेला असे. एक मंदसा सुगंधही येत असे. कपडय़ांची घडी पद्धतशीर आणि इस्त्री अगदी कडक असे. तिच्या कामावर तिची गिऱ्हाइके जाम खूश होती. दुसरीकडे जायला तयार नसत. तीही तिच्या कामाचा अभिमान बाळगून होती. तिच्याकडूनच कपडे धुऊन घेण्याचा आग्रह धरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत ती याच कामांत मग्न असे. ना सुट्टी, ना विरंगुळा. ना मौज, ना चैन. ती मुळातच हाडाची काटकसरी. किराणामालाचे सामान आणायलाही ती पायी मैल- दोन मैल चालतच जात असे. तिच्यापेक्षा कमी काम करणाऱ्यांचा कधी तिने हेवा वा द्वेष केला नाही. स्वत:चे काम अतिशय भक्तिभावाने केले.१९६० साली धुण्याची यंत्रे आली. तिने यंत्र वापरूनही पाहिले. परंतु त्यात धुतलेल्या कपडय़ांची स्वच्छता, तजेला, कडकपणा यांना तिच्या हातांची सर येईना. तिने यंत्र नाकारले. आणि तिच्या सर्व गिऱ्हाइकांनीही तिच्या हातांचा गुणच स्वीकारला.
हा कर्मयज्ञ ७० वर्षे अखंड चालला. लहानपणी बाहुलीच्या पोटात पैसे साठवणाऱ्या ओसिओलाने योग्य वेळी बँकेत खाते उघडले आणि बचत कायम चालूच ठेवली. तिच्या खात्यात फक्त पैसे भरले जात. काढले कधीच जात नसत. अखेर वयाच्या ८६ व्या वर्षी तिचे हात चालेनासे झाले. तिच्या दमलेल्या शरीराने तिला काम बंद करून निवृत्ती स्वीकारण्यास भाग पाडले. नियमित मिळकत बंद झाली तशी ती बँकेत गेली. सातत्याने केवळ नाण्यांच्या स्वरूपात, कपडय़ात बांधलेल्या पुरचुंडय़ांतून फक्त भरणाच होणाऱ्या तिच्या बॅंक खात्यात साठलेली रक्कम अविश्वसनीय.. तब्बल सहा आकडी होती!
एवढय़ा प्रचंड रकमेचे करायचे काय, या विचाराने ती बावचळली नाही. गोंधळली नाही. तिचे डोळेही फिरले नाहीत आणि तिची बुद्धीही! स्वत:साठी कधीच न जगलेल्या ओसिओलाच्या मनाला ती संपत्ती स्वत:साठी खर्च करण्याचा मोहही शिवला नाही. त्या रकमेच्या विनियोगासाठी तिने निवड केली ती गरीब, गरजू, लायक, पण केवळ पैशांच्या कमतरतेमुळे शिक्षणापासून वंचित व्हाव्या लागणाऱ्या कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांची! या केवळ सहावीपर्यंतच शिक्षण घेता आलेल्या कर्मयोगिनीने बँकेच्या व्यवस्थापकांची मदत घेऊन त्यातील दीड लाख डॉलर्स तिच्या घराजवळच्या युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न मिसिसिपीला दिले आणि त्यातून अशा गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची व्यवस्था केली. जराही गवगवा न करता तिने दिलेले हे अलौकिक दान फार काळ गुप्त राहू शकले नाही. त्याला प्रसिद्धी मिळालीच. एका मोलकरणीच्या- धोबिणीच्या या निरलस कृत्याने तमाम मिसिसिपीकरच नव्हेत, तर सर्व देशवासीय अचंबित झाले, थक्क झाले. आपल्या गावाबाहेरील जगही न पाहिलेल्या या विचारी स्त्रीच्या सत्कृत्याने अनेकजणांना जाग आणली. अल्पावधीत पंचक्रोशीतील जवळजवळ ६०० स्त्री-पुरुषांनी तिच्यापासून स्फूर्ती घेऊन त्या रकमेत त्यांच्या कुवतीनुसार आणखीन भर घातली. तिने दिलेल्या मदतीच्या तिप्पट रक्कम विद्यापीठाजवळ जमा झाली.
सीएनएनचे संचालक टेड टर्नर यांनी ‘ही एक कामकरी बाई आयुष्यभराची कमाई अशा रीतीने दान देऊन टाकते, तर मीही थोडेफार तरी देऊ शकतोच..’ असे म्हणून एक बिलियन डॉलर्स सामाजिक कार्यासाठी दान दिले.
प्रसारमाध्यमांनी ओसिओलाच्या या नि:स्वार्थी दानाला अफाट प्रसिद्धी दिली. तिला संपूर्ण जग ओळखू लागले. तिच्या मुलाखती घेतल्या गेल्या. तिला गावोगावी अनेक कार्यक्रमांत भाग घ्यावा लागला. परंतु तिच्या हाडीमासी रुजलेला साधेपणा, कामसूपणा तिला कधीच सोडून गेला नाही. ती पलंगावरील गादी, उशा, पांघरुणे, चादर परत व्यवस्थित घालूनच हॉटेलमधील खोली सोडत असे.
‘ओसिओला मकार्टी शिष्यवृत्ती’प्राप्त पहिल्या विद्यार्थिनीचे नाव आहे- स्टेफनी बुलक. स्टेफनीने आपल्या या उपकारकर्तीला आपल्या छोटय़ाशा कुटुंबात सामावून घेतले. तिला प्रेमादराचे स्थान बहाल केले. या तिच्या लाडक्या ‘मानस- नाती’च्या हाताने ओसिओलाने आयुष्यातील पहिलेवहिले आइस्क्रीम खाल्ले!!
मिसिसिपी विद्यापीठाने ओसिओलाला डॉक्टरेट देऊन कृतज्ञता व्यक्त केलीच; परंतु हार्वर्ड विद्यापीठानेही तिला डॉक्टरेट देऊन शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या तिच्या दातृत्वाचा यथोचित गौरव केला. आणि १९९८ साली राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी तिला राष्ट्रपतीपदक प्रदान करून संपूर्ण देशाच्यावतीने तिच्या या असामान्यतेला मानवंदना दिली.
त्यानंतर एकाच वर्षांने १९९९ साली ओसिओलाचा कॅन्सरने देहान्त झाला.
कपडय़ांचा मळ काढणाऱ्या या स्वच्छ, निर्मळ मनाच्या सामान्य स्त्रीने अनुकरणप्रिय अशा आजच्या पिढीला एक असामान्य असा आदर्श घालून दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jan 2014 रोजी प्रकाशित
ओसिओला मकार्टी ‘आदर्श’ धोबीण
<span style="color: #ff0000;">काळाच्या पुढच्या स्त्रिया</span><br />जगावेगळेपण हे व्यक्तीच्या जगण्यावर ठरत नाही, तर तिने केलेल्या कार्यावर, त्याप्रतीच्या तिच्या असीम निष्ठेवर, समर्पणभावानं केलेल्या अथक परिश्रमांवर, त्यातून निष्पन्न झालेल्या समाजोपयोगीतेवर ठरत असते.

First published on: 17-01-2014 at 02:52 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oseola mccarty