राज्याच्या अन्य भागांप्रमाणेच कोकणातही शालेय शिक्षणामध्ये वाघिणीच्या दुधाचे वेड वाढायला लागले आहे. कारण मुलांना स्पध्रेत टिकायचं तर इंग्लिशशिवाय पर्याय नाही, असं बहुसंख्य पालकांचं ठाम मत बनत चाललं आहे. त्यातच सर्व प्रमुख व्यवसायाभिमुख परीक्षांच्या प्रवेश परीक्षा इंग्लिश भाषेतून असतात. स्पर्धा परीक्षांसाठी इंग्लिश जास्त सोयीचं मानलं जातं. सीबीएसईशिवाय तर पर्यायच नाही. कोकणासारख्या आर्थिक-सामाजिकदृष्टय़ा मागासलेल्या प्रदेशातही याबाबतची जाणीव मोठय़ा प्रमाणात होऊ लागली आहे. त्यामुळे रत्नागिरीबरोबरच चिपळूण शहर, खेड, दापोली तसंच देवरुखसारख्या अंतर्भागातल्या शहराच्या परिसरातही इंग्लिश माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. शालेय पातळीवर इंग्लिश माध्यमाच्या आकर्षणामुळे मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत असल्याची तक्रार मोठय़ा शहरांमध्ये ऐकू येते. रत्नागिरीत अजून तेवढी गंभीर परिस्थिती नाही. कारण इंग्लिश माध्यमाची शाळा चालवण्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ आणि साधनसामुग्री अजून इथे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. इथल्या खासगी शिक्षणसंस्थांची आर्थिक स्थितीही मोठय़ा शहरांप्रमाणे संपन्न नसते. पण पालकांचा ओढा इंग्लिश माध्यमाकडेच आहे. रत्नागिरीतील ‘न्यू एज्युकेशन सोसायटी’च्या सचिव दाक्षायणी बोपर्डीकर यांच्या मते, इंग्लिश माध्यमाच्या शाळांमधील अध्यापनाच्या दर्जाचा विचार न करता पालक आपल्या मुलांना त्या शाळांमध्ये घालण्यास उत्सुक असतात. त्यासाठी भरमसाट शुल्क देण्याचीही त्यांची तयारी असते. त्या तुलनेत मराठी माध्यमाच्या शाळा जास्त दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात.