गरिबाघरची गुणवत्ता पैशांअभावी दुर्लक्षित  राहू नये, यासाठी ठाण्यातील समविचारी मित्रांनी ‘विद्यार्थी विकास योजना’ हा उपक्रम सुरू केला. गुणवत्ता हा एकच निकष या योजनेत मदत मिळवून देण्यास पुरेसा ठरतो. गुणवत्तेला आर्थिक सुरक्षाकवच देण्याचा हा प्रयत्न आहे. समाजात कमालीची मतभिन्नता असणाऱ्या सध्याच्या काळात अस्सल गुणवत्तेमागे समाजातील भलेपणाची शक्ती उभी करण्याचे मोठे कार्य या उपक्रमाद्वारे हाती घेण्यात आले आहे.

प्रा माणिकपणे कष्ट करण्याची तयारी आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. ‘सर्व शिक्षा अभियाना’मुळे दहावीपर्यंतच्या शिक्षण प्रवासात पैशांमुळे फारसे काही अडत नाही. उच्च शिक्षणासाठी मात्र पैसा आवश्यक असतो. त्यामुळे दहावीत ९० टक्क्य़ांहून अधिक गुण मिळवूनही अशी मुले पुढे योग्य शिक्षणसंधींपासून वंचित राहतात. समाजातील अशी मुले परिस्थितीपुढे शरण जाऊ नयेत, यासाठी तळागाळातील अशी गुणवत्ता शोधून त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आवश्यक ती सारी मदत मिळवून देण्याचा एक उपक्रम सात वर्षांपूर्वी ठाण्यातील रवींद्र कर्वे, अरुण करमरकर या एकेकाळच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतला. अभिजीत फडणीस, शरद गांगल, महादेव जाधव, राजू हंबर्डे या समविचारी मित्रांची त्यांना साथ लाभली. गरीबाघरची गुणवत्ता केवळ पैशांअभावी दुर्लक्षित राहू नये, हा त्यामागचा मुख्य हेतू. समाजातील एक फार मोठा वर्ग अशा चांगल्या उपक्रमांसाठी यथाशक्ती मदत करण्यास उत्सुक असतो. मात्र, अशी मदत कुणाला आणि कुठे करायची हे त्यांना माहिती नसते. त्यामुळेच रवींद्र कर्वे यांच्या उपक्रमाला सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला. ठाण्यात सुरू झालेली ही चळवळ आता महाराष्ट्रातील २२ जिल्ह्य़ांपर्यंत पोहोचली आहे. त्या त्या ठिकाणचे गुणवंत विद्यार्थी, कार्यकर्ते आणि दात्यांची साखळी तयार झाली आहे. दहावी तसेच बारावीच्या निकालानंतर शहरी आणि ग्रामीण भागांतून अशा गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना हेरून त्यांना त्यांच्या इच्छेनुसार या योजनेद्वारे पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत केली जाते. दहावीत किमान ९० टक्के तसेच बारावीत किमान ८५ टक्के गुण मिळविलेले विद्यार्थी या योजनेत मदत मिळण्यास पात्र ठरतात. गुणवत्ता हा एकच निकष या योजनेत मदत मिळवून देण्यास पुरेसा ठरतो. रवींद्र कर्वे आणि त्यांचे सहकारी स्वत: घरोघरी जाऊन गुणवंत विद्यार्थ्यांची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतात. त्यांची आर्थिक, शैक्षणिक स्थिती पाहून मगच त्यांना मदत दिली जाते. गेल्या वर्षीची शैक्षणिक प्रगती पाहूनच पुढील वर्षी शैक्षणिक मदत दिली जाते. योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांच्या वार्षिक शैक्षणिक खर्चासाठी दाते निवडले जातात. पालक प्रतिनिधींद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर देखरेख ठेवली जाते. वर्षभरातील जमाखर्चाचा ताळेबंद वार्षिक संमेलनात सर्वासमोर जाहीरपणे मांडला जातो. समाजातील गुणवंतांना आपण यथाशक्ती मदत केली पाहिजे, या भावनेने दाते स्वयंस्फूर्तीने वाढत्या संख्येने या विद्यार्थी दत्तक योजनेत सहभागी होत आहेत. दहावी आणि बारावीचे निकाल लागले की प्राध्यापक, शिक्षक आणि परिचितांकडून गुणवंत मुलांचा शोध घेतला जातो. ठाणे आणि मुंबईपाठोपाठ पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, बीड, जळगाव, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अकोला, वर्धा आदी जिल्ह्य़ांमध्ये सध्या ही चळवळ पोहोचली आहे.

Inadequate Public Relations, Misconduct to office bearers , lead to cut the ticket, Mumbai bjp members of parliament, gopal Shetty, Poonam Mahajan, manoj kotak, lok sabha 2024, north Mumbai lok sabha seat, Mumbai north central lok sabha seat, north east Mumbai lok sabha seat, marathi news, bjp Mumbai, Mumbai news,
जनता व कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन मुंबईतील भाजपच्या तिन्ही खासदारांना भोवले
sharad pawar slams amit shah over knowledge about agriculture
‘अमित शहा यांचे शेतीसंबंधीचे ज्ञान मर्यादित’, शरद पवार यांचा टोला
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : शेवटी आर्थिक फटका शेतकऱ्यांनाच!

तरुणपणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत सामाजिक कार्य करणाऱ्या रवींद्र कर्वे यांनी पुढे गृहस्थाश्रम आणि चरितार्थासाठी नोकरी पत्करली. २८ वर्षे त्यांनी तत्कालीन ठाणे जनता आणि आता ‘टीजेएसबी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या बँकेत नोकरी केली. मात्र, नोकरीच्या काळातही त्यांच्या मनात समाजकार्याची ज्योत तेवत होती. काही प्रमाणात त्यांचे कार्य सुरूही होते. याच काळात रायगड जिल्ह्य़ातील माणगावमधील छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण संचालित रातवड, उसर आणि वडघर येथील शाळांसाठी मदत मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले. या शाळांचे निर्माण तसेच सौरऊर्जा, संगणक कक्ष, ई-लर्निग आदी सुविधा रवींद्र कर्वे मित्र परिवाराच्या प्रयत्नाने उपलब्ध करून देण्यात आल्या. सात वर्षांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बँकेतून निवृत्त झाल्यावर पुढील जीवन पूर्णवेळ समाजकार्यासाठी व्यतीत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अरुण करमरकरांसारखे मित्र त्यांच्या मदतीला आले.

सुरुवातीची अनेक वर्षे त्यांच्या या चळवळीला कोणतेही नाव नव्हते. गेल्या वर्षी ‘विद्यार्थी विकास योजना’ असे या उपक्रमाचे नामकरण करण्यात आले. विश्वासार्हता हेच या चळवळीचे मुख्य भांडवल आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी कोणताही नवा ट्रस्ट स्थापन न करता ‘सेवा सहयोग फाउंडेशन’ या आधीच स्थापित असलेल्या स्वयंसेवी संस्थेमार्फत सारे आर्थिक व्यवहार केले जातात. सर्व व्यवहार धनादेशाद्वारे. त्याच्या अतिशय काटेकोर नोंदी. प्रशासकीय खर्च शून्य. कारण किरकोळ खर्च कार्यकर्ते आपल्या खिशातून करतात. वार्षिक संमेलनासाठी लागणारे सभागृह आणि खानपान व्यवस्था रोहीत शहा त्यांच्या ठाण्यातील ‘टिपटॉप’च्या सभागृहात विनामूल्य करतात. जीतूभाई आणि भाविन हे बंधू त्यांच्या ‘आनंद झेरॉक्स’ या दुकानाद्वारे सर्व प्रकारच्या छायांकित प्रती विनामूल्य काढून देतात. त्यामुळे दात्यांकडून आलेला प्रत्येक पैसा हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीच वापरला जातो. गेल्या वर्षीपर्यंत या योजनेत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून ५ कोटी ५ लाख ४८ हजार ७५४ रुपये देण्यात आले आहेत. समाजातील दानशूरांनी गरजू गुणवंतांच्या शिक्षणासाठी दिलेली ही मदत खर्च नसून गुंतवणूक आहे. त्यातून दारिद्रय़ाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या कुटुंबांना आधार मिळेलच, शिवाय जात, पात, पंथ आदी भेदांमुळे दुभंगलेल्या समाजाला सांधण्याचे कार्यही या चळवळीतून घडेल, असा विश्वास रवींद्र कर्वे व्यक्त करतात. सध्या समाजात दिसणारे गढूळ वातावरण वरवरचे आहे. तळातला प्रवाह शुद्ध आहे, असे त्यांचे गेल्या सात वर्षांचे निरीक्षण आहे. सध्या कर्वे आणि त्यांच्या मित्रांपासून प्रेरणा घेऊन राज्यभरात विविध ठिकाणी विद्यार्थी विकास योजनेचे कार्य त्या त्या ठिकाणच्या शिक्षणप्रेमींनी सुरू केले आहे. नाशिकमध्ये प्रकाश भिडे, लातूरमध्ये प्रदीप नणंदकर, सिंधुदुर्गात डॉ. प्रसाद देवधर, विद्यानंद देवधर- कोल्हापूर, श्रीकांत पटवर्धन-सांगली, श्रद्धा फडके-रत्नागिरी, सुनील यादव-पुणे अशा कार्यकर्त्यांची फळी तयार होत आहे.  कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रमाबरोबरच अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी या योजनेतून मदत केली जाते. शिष्यवृत्ती म्हणून केवळ शैक्षणिक शुल्क अथवा साहित्य न देता, वसतिगृह अथवा तत्सम खर्च विचारात घेऊन त्यासाठीही आवश्यक तो निधी दिला जातो. आर्थिक अरिष्टात अडकलेल्या, प्रतिकूल परिस्थितीमुळे योग्य संधीपासून वंचित राहण्याची शक्यता असणाऱ्या ‘नाही रे’ वर्गातील  गुणवंतांना समाजातील ‘आहे रे’ वर्गातील नागरिकांनी मदत करावी, या विचारातून हे कार्य सुरू झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे कर्ज फेडण्याचे बंधन नाही. त्यांनी शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभे रहावे, इतकीच अपेक्षा असते. तरीही लाभार्थी तरुणांनी शिक्षण पूर्ण होऊन नोकरीला लागताच वेतनातील ठरावीक रक्कम विद्यार्थी विकास योजनेला परत देण्याचा समंजसपणा दाखविला आहे.

गुणवत्ता सातासमुद्रापार..

विद्यार्थी विकास योजनेतून आर्थिक सहकार्य मिळालेले शेकडो विद्यार्थी राज्यभरातील विविध महाविद्यालयांमध्ये सध्या कला,वाणिज्य आणि विज्ञान, बी. फार्म, अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट, सी.ए. आदी विषय शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत.  गेल्या वर्षी १७६ विद्यार्थ्यांना १ कोटी १ लाख रुपयांची मदत देण्यात आली. यंदा २०० विद्यार्थ्यांना सुमारे दीड कोटी रुपये मदत दिली जाणार आहे. संस्थेची मदत आणि प्रोत्साहनामुळे तीन विद्यार्थी परदेशात जाऊ शकले. वाडा तालुक्यातील खिनवली येथील रूपेश पाटील सध्या केंब्रिज विद्यापीठात पीएच.डी. करीत आहे. प्रीती पेडणेकर अमेरिकेतील फिलाल्डेफिया येथील युनिव्हर्सिटी ऑफ सायन्सेसमधून तर कृष्णनंद शुक्ला फ्रान्समध्ये नॅनो टेक्नॉलॉजीत पीएच.डी. करीत आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांनी शिष्यवृत्ती दिली आहे हे विशेष.

आरोग्यविषयक उपक्रम 

आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यासाठी रवींद्र कर्वे यांनी मुंबईतील नाना पालकर स्मृती समितीची जबाबदारी स्वीकारली. परळ येथील टाटा रुग्णालयात कर्करोगावर उपचार घेण्यासाठी देशभरातून रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येतात. मुंबईबाहेरून आलेल्या दारिद्रय़ रेषेखालील १७५ ते २०० रुग्णांची किमान एक महिना राहण्याची विनामूल्य सोय समितीने केली आहे. त्यांना पाच रुपयात नाश्ता आणि २०रुपयांमध्ये दोन्ही वेळचे जेवण दिले जाते. दरवर्षी ३५० रुपये या सवलतीच्या दरात दहा हजार डायलिसिस केले जातात.

उद्योजकांचीही साथ 

समाजातील गुणवंतांना मदतीचा हात देणाऱ्या या योजनेला आता सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच कॉर्पोरेट विश्वानेही साथ देण्यास सुरुवात केली आहे. टाटा कॅपिटल, मोतीलाल ओसवाल, आशिदा इलेक्ट्रॉनिक्स, फिनाकस सोल्युशन्स प्रा.लि., सेठीया इरेक्टर्स अ‍ॅण्ड मटेरियल्स हँडलर्स, ग्रोव्हर सिल्क मिल प्रा. लि., पितांबरी समूह, रखमाबाई पांडुरंग केळकर ट्रस्ट आदी संस्थांनी योजनेत योगदान देण्यास सुरुवात केली आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल?

  • सेवा सहयोग फाऊंडेशन, महर्षी दधिचि रुग्णालय, सांताक्रूझ बस आगाराजवळ, सांताक्रूझ (पूर्व). मुंबई- ४०००५५.
  • संपर्क- रवींद्र कर्वे- ९३२३२३४५८५.

 

धनादेश – ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’(SEVA SAHAYOG FOUNDATION) या नावाने काढावेत. धनादेशामागे अथवा सोबत देणगीदाराने त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. त्यावरून संस्थेला पावती पाठविता येईल. संस्थेकडे धनादेश सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.

देणगी ‘८०-जी’ अंतर्गत करसवलतीस पात्र.

यासाठी मदतीची गरज

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उत्तम गुणवत्ता असलेले विद्यार्थी मोठय़ा संख्येने संस्थेच्या संपर्कात येत आहेत. गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत करण्याबरोबरच भविष्यात शाळांच्या सक्षमीकरणासाठी दरवर्षी किमान एक ते दीड कोटींचा निधी संकलित करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.

धनादेश येथे पाठवा.. एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

  • मुंबई कार्यालय : लोकसत्ता, संपादकीय विभाग, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०
  • महापे कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९२५
  • ठाणे कार्यालय : संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३९९६०७
  • पुणे कार्यालय : संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४११२५
  • नाशिक कार्यालय : संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४
  • नागपूर कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, ०७१२ – २७०६९२३
  • औरंगाबाद कार्यालय : संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३
  • नगर कार्यालय : संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७
  • दिल्ली कार्यालय : संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३० उत्तर प्रदेश.   ०११- २०६६५१५००