बहुतेक सारे महत्त्वाचे वैज्ञानिक-तंत्रज्ञानीय शोध भारतात प्राचीन काळीच लागले होते, अशी विधाने अलीकडच्या काळात अनेक उच्चपदस्थ व्यक्ती महत्त्वाच्या विचारपीठांवरून सार्वजनिकरीत्या करीत आहेत. इलेक्ट्रॉनिक व सामाजिक माध्यमांतून मोठय़ा प्रमाणावर या युक्तिवादाचा प्रचार व कमी प्रमाणावर त्याचा प्रतिवाद होताना दिसतो. सर्व आधुनिक विद्या पाश्चात्त्यांनी भारतातून पळवल्या आहेत असे भारतातील अभ्यासक्रमातून शिकविले जावे, यासाठी आज सत्तास्थानी असणाऱ्या अनेक व्यक्ती हिरिरीने कामाला लागल्या आहेत व त्याचा विरोध करण्यासाठी ख्यातनाम वैज्ञानिकांसह अनेक जण पुढे सरसावले आहेत. या पाश्र्वभूमीवर ही लेखमाला लिहिली जात आहे. या वादातील दोन्ही बाजूंच्या व्यक्ती व अनेक सामान्य वाचक (ज्यांची कोणतीही भूमिका अद्याप निश्चित झालेली नाही) मला ‘या प्रश्नावर तुम्ही लिहाच’ असे सांगत आहेत. प्राचीन काळात भारतीयांनी कोणकोणते शोध लावले होते याची यादी बरीच मोठी आहे व तिच्यात रोज भरही पडत आहे. त्यातील महत्त्वाचे शोध म्हणजे क्लोनिंग (उदा. शंभर कौरवांचा जन्म), प्लास्टिक सर्जरी (उदा. गणपती – माणसाच्या धडावर हत्तीचे डोके), इंटरनेट (उदा. संजयची दिव्यदृष्टी), प्रक्षेपणास्त्रे इ. याशिवाय भारतीय परंपरेतील अनेक बाबी – आयुर्वेद, आहारविहार आणि ऋतुचर्या-दिनचर्या याविषयीच्या लोकसमजुती, स्थापत्य, धातुविज्ञान (मेटॅलर्जी), पारंपरिक शेतीतील पर्यावरणविषयक विचार – या सर्व बाबी विज्ञानाधारित आहेत की नाही, याविषयी बहुसंख्यांच्या मनात संभ्रम आहे व उत्सुकतादेखील. ही लेखमाला अशा जागरूक, उत्सुक, आपली मते तपासून पाहण्यास व आवश्यक वाटल्यास ती बदलण्यास तयार असणाऱ्या सर्व वाचकांसाठी आहे. या विषयावर ज्यांची मते आधीपासून तयार आहेत, त्यांनीही ती यानिमित्ताने तपासून पाहावी, असे माझे त्यांना नम्र आवाहन आहे. या चच्रेत अनेक वाद-विवादांचे धागे परस्परांत गुंतले आहेत. आपण आधी त्यांची सोडवणूक करून प्रत्येक धाग्याचा थोडक्यात परामर्श घेऊ या.

पुराणातील वांगी पुराणात?

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

कोणताही अभिनिवेश न बाळगता विचार करणारे अनेक जण या संदर्भात असे म्हणतात की, वैज्ञानिक दृष्टी ही लांबची गोष्ट झाली. आपण जर साधा सारासारविचार केला (कॉमन सेन्स वापरला), तरी यातील बऱ्याच दाव्यांचा फोलपणा आपल्याला कळू शकतो. परग्रहांवर विमान पाठवू शकणाऱ्या, इंटरनेट वापरणाऱ्या समाजाला ‘मागासलेल्या’ परकीय आक्रमकांसमोर सातत्याने हार का पत्करावी लागली? आज जिथे वेगाने धावणाऱ्या बलगाडीचे एखादे मॉडेलसुद्धा दाखवता येत नाही, तिथे पूर्वी पुष्पक विमान किंवा अनश्व रथ (मोटर कार) यांचा वापर होत होता, यावर विश्वास कसा ठेवायचा? थोडक्यात सांगायचे तर ‘पुराणातली वांगी पुराणात ठेवा’, असा पवित्रा ही मंडळी घेतात आणि त्यांच्या मते प्रश्न इथेच संपतो. यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे.

पण प्रश्न इथे संपत नाही. परंपरा हा बहुसंख्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. ‘भारतीय विज्ञान खरोखर थोर होते, ते पाश्चात्त्यांनी चोरले व आपल्याला मोठेपणा मिळू नये, यासाठी लावलेल्या शोधांचे श्रेय आपल्याला दिले नाही. आज त्या पाश्चात्त्य प्रभावात वाढलेली माणसे स्वत्व व स्वाभिमान हरवून बसली आहेत, म्हणून ते सतत आपला उज्ज्वल वारसा नाकारत असतात’, हा युक्तिवाद अनेकांना भुरळ घालतो, आपलासा वाटतो. त्यामुळे तुम्ही काहीही युक्तिवाद केला तरी अनेक उच्चविद्याविभूषित व्यक्तीही ‘पण आम्ही अमुक पुस्तकात असे वाचले आहे, तमक्यानी आपल्या भाषणात असे सांगितले, ते खोटे कसे असेल?’ असा युक्तिवाद करतात. मुळात परंपरेकडे पाहण्याचा आपला काय दृष्टिकोन असावा, विज्ञान हे पौर्वात्य आणि पाश्चात्त्य, हिंदू/अन्य धर्मीय असे वेगवेगळे का? त्यातले बावनकशी किंवा कमअस्सल कसे ठरवणार? असे अनेक प्रश्न त्यातून उद्भवतात. म्हणून या प्रश्नांना आपण भिडलेच पाहिजे. त्यांच्या उत्तरांबद्दल आपली एकवाक्यता झाली नाही, तरी घडणाऱ्या विचारविमर्शामुळे आपण सारे नक्कीच समृद्ध होऊ. या संदर्भात माझी भूमिका थोडक्यात अशी आहे –

१) वर नमूद केलेले किंवा त्यांच्यापकी काही शोध जर भारतीयांनी लावले असतील, तर मला त्याचा सार्थ अभिमान वाटेल.

२) या संदर्भातले दावे खरे आहेत की खोटे हे सिद्ध करण्यासाठी आपण आतापर्यंत जी वैज्ञानिक पद्धती शिकलो, तिच्या किंवा तितक्याच तार्किक अन्य कसोटय़ांचा वापर केला जाणे आवश्यक आहे.

३) एखादी गोष्ट परंपरेत बसते की नाही; तिचा संदर्भ रामायण, महाभारत, वेद किंवा अन्य धार्मिक ग्रंथांत दिलेला आहे की नाही; त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीने (वैमानिक, शल्यचिकित्सक, वैज्ञानिक) तसा दावा केला आहे की नाही या बाबी विज्ञानाच्या दृष्टीने गरलागू ठरतात.

४) कोणत्याही क्षेत्रातील एक, अनेक किंवा बहुसंख्य तज्ज्ञ व्यक्तींनी ‘दावा’ केला, तरी विज्ञानाच्या दृष्टीने त्याचे मोल शून्य असते. त्याच्या समर्थनासाठी पुरेसा प्रभावी वैज्ञानिक ‘पुरावा’ उपलब्ध आहे की नाही, हाच एकमेव निकष विज्ञान वापरते.

५) उपलब्ध पुरावा पुरेसा आहे किंवा नाही, याबद्दल वैज्ञानिकांमध्ये वाद असू शकतात किंवा एखाद्या प्रमेयाच्या सिद्धतेसाठी आवश्यक पुरावा त्या काळात उपलब्ध असणाऱ्या साधनांतून उभा करणे शक्य नसते. अशा वेळी एखादे प्रमेय हे अवैज्ञानिक आहे असा निर्णायक पवित्रा न घेता, ‘हे तर्कदृष्टय़ा वैज्ञानिक वाटते, पण त्यासाठी पुरेसा पुरावा आज उपलब्ध नाही’ असे म्हणणेही अवैज्ञानिक ठरत नाही.

६) एखाद्या परंपरेतील एखादी गोष्ट वैज्ञानिकदृष्टय़ा बरोबर किंवा चूक आहे, यावरून त्या परंपरेतील साऱ्याच बाबी तशा आहेत, असे विधान करणेही अवैज्ञानिक ठरेल. त्यामुळे, प्रत्येक बाबीचा स्वतंत्रपणे वैज्ञानिक निकषांनुसार विचार करावा लागेल.

प्रश्न विचारायला हवेत

अर्थातच, कोणत्याही प्रश्नावर आपले मत ठरविताना कोणत्याही युक्तिवादाला बळी न पडता, आपल्यासमोर मांडलेल्या पुराव्याची छाननी करायला आपण शिकणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. माझ्या मागच्या लेखानंतर मला आलेल्या पत्रांतून असे सांगितले गेले की, विमानाच्या तळाशी असलेल्या पात्रात ठेवलेल्या शेकडो शेर पाऱ्याची सूर्यकिरणांच्या साह्य़ाने वाफ होते व त्या ऊर्जेच्या मदतीने विमान उडते. तेव्हा माझ्या मनात पुढील प्रश्न निर्माण झाले –

पाऱ्याचा उत्कलनिबदू ३५६.७ अंश सेल्सियस आहे. १०० अंश सेल्सियस उत्कलनिबदू असणारे पाणी नुसत्या उन्हात ठेवले, तर त्याची वाफ व्हायला किती वेळ लागतो, याचा विचार केल्यास उन्हाच्या धगीने पारा उकळू शकेल का? शेकडो किंवा हजारो शेर पाऱ्याची किंमत काय असेल? एक ग्रॅमचा एक लक्षांश भाग पारा जर शरीरात गेला तर आपला मेंदू निकामी होऊ शकतो. मग ‘हजारो शेर पाऱ्या’ची वाफ केल्यास काय होईल?

मोहेंजोदारो-हराप्पा किंवा मायन संस्कृती काय होत्या, त्या काळात त्यांनी कितपत भौतिक प्रगती केली होती, यांचे पुरावे तेथील उत्खननातून मिळतात. भारतीय संदर्भात प्लास्टिक सर्जरी झालेल्या व्यक्तींचे सांगाडे, विमाने, प्रक्षेपणास्त्र किंवा इंटरनेट यांचे अवशेष किंवा तत्सम पुरावे जोवर मिळत नाहीत किंवा जुन्या ग्रंथांच्या साह्य़ाने जोवर कोणी क्लोनिंग करून दाखवत नाही, उडणारे विमान किंवा धावणारी मोटार बनवत नाही, तोवर त्यांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणे मला तरी शक्य नाही.

अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक कथा माझ्या खूप आवडीच्या आहेत; पण म्हणून ‘उडता गालीचा अस्तित्वात होता’ असे मी तरी म्हणणार नाही. अर्थात, एवढय़ामुळे आपल्या परंपरेतील वैज्ञानिक आधारावर फुली मारायलाही मी तयार नाही. त्याबद्दल सविस्तर पुढच्या लेखात.

– रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ 

ravindrarp@gmail.com

Story img Loader