एकाचवेळी २० हजार कंटेनर वाहून नेणारे ४०० मीटर लांबीचे एव्हरग्रीन या तैवानी कंपनीचे महाकाय मालवाहू जहाज इजिप्तमधील सुएझ कालव्यात रुतले आणि त्याच्यापाठची २०० जहाजेही खोळंबली. पश्चिम आशिया आणि युरोप यांच्या दरम्यानची मालवाहतूक, तेलवाहतूक ठप्प झाली. अत्यावश्यक साहित्यपुरवठा खंडित झाला. हा एक जागतिक पेचप्रसंगच, तोही नजीकच्या भूतकाळात कधी न घडलेला. जगभरच्या माध्यमांनी वेगवेगळ्या कोनांतून त्याचे चित्र टिपले… 

‘एव्हरग्रीन’ जहाज का अडकून पडले असावे, याबद्दल अंदाज-आडाखे बांधणारी मतमतांतरेही काही माध्यमांनी प्रसिद्ध केली. वेगवान वाऱ्यामुळे हे जहाज एका बाजूला वाहत जाऊन अडकले, असे अधिकृत कारण सांगण्यात येत असले तरी

‘द गार्डियन’मधील लेखात पत्रकार आणि जलव्यापाराविषयी पुस्तके लिहिलेल्या लेखिका रोझ जॉर्ज यांनी या कारणाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. ‘‘सागरी मार्गांवरील बहुतेक अपघात मानवी चुकांमुळे होतात. अशा अपघातांमुळे अन्य जहाजांवरील खलाशी अडचणीत सापडतात. गेल्या काही वर्षांत जहाजांचा आकार वाढत गेला आहे. त्यामुळे ९० टक्के जागतिक व्यापारासाठी हे लाभदायक असले, तरी त्याची आपल्याला किंमत चुकती करावी लागते,’’ असे कारण जॉर्ज यांनी मांडले आहे.

फ्रान्सच्या ‘लेस एकोज’ या उद्योग वृत्तपत्राने, ‘‘मालवाहू जहाजाची दुर्दशा ही करोनाच्या महासाथीनंतरची दुसरी अशी घटना आहे, जिच्या जोखमीबद्दल आपण अधिक जागरूक असण्याची गरज आहे,’’ अशी टिप्पणी केली आहे. ‘‘‘काहीही दिले जात नाही’ या गृहीतकावर कंपन्यांना काम करण्यासाठी आणखी एक कारण मिळाले आहे. घटनांचा सर्वांत अतक्र्य क्रम समजणे सर्वांत अशक्यप्राय असते, असे मानण्याची आवश्यकता नाही. चपळता, लवचीकता आणि सर्जनशीलतेचा प्रश्न येतो तेव्हा अद्याप बरेच काही शिकणे बाकी असल्याचे लक्षात येते,’’ असे सूचक भाष्यही या वर्तमानपत्राच्या संपादकीय लेखात केले आहे.

जहाज अडकल्याचा सर्वाधिक फटका युरोपला बसत असल्याचे निरीक्षण ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’मधील लेखात फिलीप वेन, जिंग यांग आणि स्टेला यिफान क्षी यांनी नोंदवले आहे. या अपघातामुळे उत्पादन पुरवठ्यावर परिणामाचा इशारा देतानाच उत्पादनांची वाहतूक आता महागड्या हवाईमार्गे करावी लागेल किंवा आफ्रिकेच्या टोकाला वळसा घालून मंदगती मार्ग अवलंबावा लागेल. यात ग्राहकोपयोगी वस्तू आणि औद्योगिक वस्तूंच्या पुरवठ्यास विलंब होईल, असा इशारा लेखात देण्यात आला आहे.

‘सीएनएन’, ‘सीएनबीसी’ आणि ‘सीनेट’ या वृत्तवाहिन्यांच्या संकेतस्थळांवरील लेखांमध्येही या जलवाहतूक कोंडीच्या परिणामांची चर्चा करण्यात आली आहे. सुएझ कालव्यातील वाहतूक कोंडीने जगातील एका मोठ्या व्यापार मार्गात निर्माण केलेला अवरोध ‘गळ्यातील रक्तवाहिन्यां’सारखा असल्याचे  ‘सीएनएन’मधील लेखात म्हटले आहे. सुट्या भागांची वाहतूक थांबल्याने कारखाने कदाचित बंद पडतील, अत्यावश्यक वस्तू आणि करोना प्रतिबंधात्मक उत्पादनांचा तुटवडा निर्माण होईल आणि युरोपातील आधीच चढे असलेले इंधनदर आणखी वाढतील, अशी भीती अमेरिकी जलव्यापार अकादमीतील प्राध्यापक साल्वातोर मर्कोग्लियानो यांनी या लेखाद्वारे व्यक्त केली आहे.

‘सीएनबीसी’ वाहिनीच्या संकेतस्थळावरील लेखात लोरी अ‍ॅन लारोक्को यांनी या कोंडीमुळे प्रति तास ४०० मिलियन डॉलर्सचे नुकसान होत असून पुरवठा साखळीच खंडित झाल्याचे म्हटले आहे, तर आधीच अडचणीत असलेल्या शिपिंग कंपन्यांना आता आणखी एका पेचाला तोंड द्यावे लागत आहे. शिवाय, पुरवठ्यातील विलंबामुळे टंचाई उद्भवण्याचा इशारा ‘सीनेट’ संकेतस्थळावर डॅनियल व्हॅन बूम यांच्या लेखात आहे.

‘द न्यू यॉर्क टाइम्स’मधील लेखात पीटर गुडमन यांनी सुएझ-कोंडीच्या परिणामांची चर्चा करण्याबरोबरच एका वेगळ्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. तो आहे अति जागतिकीकरणाचा. सुएझ कालव्यात जहाज अडकण्याची घटना हा अति-जागतिकीकरणाचा इशाराच आहे, असे विश्लेषण गुडमन यांनी केले आहे. एका जहाजातून किती कंटेनर वाहून नेले जावेत यावर काहीही नियंत्रण राहिलेले नाही. जास्तीत जास्त कंटेनर वाहून नेणारी जहाजे बांधण्यात आली. जहाजांच्या कंटेनर वाहून नेण्याच्या क्षमतेमध्ये गेल्या अर्ध्या शतकात सुमारे दीड हजार टक्क्यांनी वाढ झाली. या क्षमतावाढीमुळे जग आणखी संकुचित केले गेले. शिपिंग कंटेनर व्यवसायाने जागतिक व्यापारात क्रांती घडवली. वाहनांच्या मालवहन क्षमतेत वाढ झाल्याने त्यासाठी लागणारा वेळ घटला. कंपन्यांनी खर्चावर मर्यादा ठेवण्यासाठी, नफा वाढवण्यासाठी तथाकथित ‘इन टाइम मॅन्युफॅक्र्चंरग’चा अवलंब केला. त्यासाठी त्यांना गोदामांमध्ये अतिरिक्त वस्तूंचा, सुट्या भागांचा अतिरिक्त साठा करून ठेवावा लागतो. त्यांच्या या साठवणूक हव्यासातूनच जहाजांनी वहनक्षमता वाढवली. त्या अर्थाने, अति जागतिकीकरणावर याचा दोष जातो, असे विश्लेषण गुडमन यांनी केले आहे.

(संकलन : सिद्धार्थ ताराबाई)