शैलेश बलकवडे यांनी ऑगस्ट २०१८ ला गडचिरोली पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. नक्षलवादी प्रभावाचा भाग म्हणून जिथे येण्यासाठी अनेक सरकारी अधिकारी तयार नसतात, अशा ठिकाणी शैलेश बलकवडे यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत उत्तम काम करून दाखवले आहे. त्यांच्या नेमणुकीनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का तर वाढलाच, पण कोणत्याही हिंसक घटनेविना ही प्रक्रिया पार पाडण्यामध्ये शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलिसांनी १३ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले, शिवाय ४४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, २८ जहाल माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. यात माओवादी विभागीय समितीची जहाल नक्षलवादी नर्मदा अक्का हिची अटक महत्त्वपूर्ण आहे. बलकवडे यांच्या कार्यकाळात चातगांव दलम कमांडरसह सर्व सदस्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याने हे दलमच संपुष्टात आले. हा गडचिरोलीतील माओवादी चळवळीला मोठा धक्का होता. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये चार विभागीय समितीचे सदस्य असून, २००५ पासूनची ही सर्वात मोठी कामगिरी मानली जाते. पण केवळ नक्षलवाद्यांना अटक आणि त्यांच्या कारवायांना चाप लावणे एवढेच शैलेश बलकवडे यांचे उद्दिष्ट नाही. या कारवायांना आळा घालतानाच या परिसरातील नागरी जीवनाची गाडी रुळावर यावी, येथील तरुणांनी नक्षलवादी चळवळीत भरती होऊ नये, चांगले शिक्षण घेऊन योग्य मार्गाला लागावे यासाठीही ते प्रयत्नशील असतात. विद्याथ्र्यांचे अभ्यासगट करून त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांना रोजगार मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, आदिवासींना वनहक्क व इतर शासकीय योजना मिळवण्यासाठी लागणारी जात व इतर प्रमाणपत्रे पोलिसांच्या छावण्यांतून उपलब्ध करून देण्याची सुविधा देणे अशा अनेक लोकोपयोगी योजनांतून शैलेश बलकवडे यांची कर्तव्यदक्षता दिसून येते. गणवेशाचा धाक समाजकंटकांसाठी; सामान्य माणसांच्या मदतीसाठी मात्र शैलेश बलकवडे यांच्या गणवेशातील ‘माणूस’ सदैव ‘दक्ष’ असतो.
भक्ती कुलकर्णी (क्रीडा) : बुद्धिबळाची राणी
फुटबॉलप्रेमी गोव्याला बुद्धिबळाच्या खेळाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणारी महिला ग्रँडमास्टर आहे- भक्ती कुलकर्णी. गोव्यात वाढताना इतर खेळांसह भक्तीला खुणावत होता बुद्धिबळाचा पट. लहान वयातच तिने गोव्यातील राज्य बुद्धिबळ स्पर्धेत सलग तीन विजेतेपदे पटकाविली. भक्ती म्हणते, गोवा तसा फुटबॉलप्रेमी; पण माझ्या आंतरराष्ट्रीय पदकांमुळे बुद्धिबळाकडेही गोवेकरांनी लक्ष दिले. ‘डेम्पो’ या फुटबॉल क्लबनेही आपणहून मला प्रायोजकत्व दिले. या प्रोत्साहनामुळे मी जिद्दीने आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकत गेले.
२८ वर्षांच्या भक्तीने आजवर आशियाई महिला बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक (उझबेकिस्तान), राष्ट्रकुल बुद्धिबळ महिला स्पर्धेत सुवर्णपदक (स्कॉटलंड), जागतिक शालेय बुद्धिबळ स्पर्धा (सिंगापूर) या स्पर्धांसह देशातील अनेक बुद्धिबळ स्पर्धांची विजेतेपदे मिळवली आहेत. महिला राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील ती गतविजेती आहे. २०१२ मध्ये ‘महिला ग्रँडमास्टर’ मान मिळवणाऱ्या भक्तीच्या खात्यावर आंतरराष्ट्रीय मास्टरचा बहुमानही आहे. २०२० मधील चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत संयुक्त विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघात तिचा समावेश होता. त्याचप्रमाणे गतवर्षी आशियाई महिला अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघातही तिचे महत्त्वाचे योगदान होते. गोवेकरांमधून उत्तम बुद्धिबळ खेळाडू तयार व्हावेत याकडे ती आवर्जून लक्ष देते आहे.
प्राजक्त देशमुख (कला) : लेखणीचा जादूगार
सांस्कृतिक तसेच कलेची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील प्राजक्त देशमुख आज मराठी रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाव आहे. रंगभूमीवरील त्याचा प्रवेश तसा अपघातानेच झाला. पण गेल्या १५ वर्षांत त्याने अभिनय, लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य यासह अन्य तांत्रिक बाबींवर आपली हुकूमत निर्माण करून स्वतंत्र ठसा उमटवला आहे. नेमके शब्द, उत्तम विषय- निवड आणि काही सेकंदांतच प्रेक्षकांना काबीज करणारे शब्दगारूड उभे करण्यात प्राजक्त तरबेज आहे. भद्रकाली प्रॉडक्शनच्या वतीने सादर झालेले त्याचे पहिले व्यावसायिक नाटक ‘संगीत देवबाभळी’ समीक्षक आणि रसिक दोहोंच्याही पसंतीस उतरले आहे. ते सर्वदूर गाजत आहे. राज्य नाट्य स्पर्धा, आंतर महाविद्यालयीन स्पर्धा, अखिल भारतीय नाट्य परिषद, वसंत करंडक, पुरुषोत्तम करंडक यांसह राज्यात ठिकठिकाणी होणाऱ्या नाट्यस्पर्धांतून प्राजक्तच्या एकांकिका वर्चस्व राखून असतात. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत त्याची ‘बुद्रुुकवाडीचा मारुती बाटला’ एकांकिका महाविजेती ठरली. याशिवाय एकादशवतार, हमिनस्तु, १२ कि. मी., दो बजेनिया, मून विदाऊट स्काय या एकांकिका त्याने लिहिल्या आहेत. मुक्त विद्यापीठाच्या नाट्य विभागाच्या अभ्यासक्रम निर्मितीतही प्राजक्तचा महत्त्वाचा सहभाग आहे. ‘संगीत देवबाभळी’साठी अखिल भारतीय नाट्य परिषद, महाराष्ट्र शासनाचा राम गणेश गडकरी, जी. बी. देवल, आचार्य अत्रे आदी पुरस्कार प्राजक्तने पटकावले आहेत. याशिवाय राज्य शासनाच्या वतीने विजय तेंडुलकर यांच्या नावे देण्यात येणाऱ्या पुरस्काराचाही तो मानकरी आहे.
समीर धामणगावकर (मनोरंजन) : ऐकवू आनंदे
मराठी ऑडिओ बुक्सच्या विश्वातील एक आघाडीचे नाव म्हणजे स्नॉवेल. त्याची जबाबदारी सांभाळत आहे- समीर धामणगावकर हा तरुण. ऑडिओ बुक म्हणजे एखाद्या पुस्तकाचे सलग वाचन, तर पॉडकास्ट म्हणजे विविध विषयांवरील ‘ऑन डिमांड ऑडिओ’ कथा, कादंबऱ्या, कविता यांपासून अगदी वृत्तपत्रांमधील विशेष पुरवण्यांमधील मजकूर श्राव्य स्वरूपात मागणीनुसार उपलब्ध करणे. सध्या पाश्चिमात्य देशांतील ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. २०११ मध्ये समीरने आवड म्हणून स्नॉवेलची सुरुवात केली. जवळपास सात ते आठ वर्षं प्रयोग म्हणून काम करत समीर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रभाकर पेंढारकरांची ‘रारंगढांग’, डॉ. जयंत नारळीकर लिखित ‘प्रेषित’, जयवंत दळवी लिखित ‘सारे प्रवासी घडीचे’ ही पुस्तके, प्रकाश नारायण संत यांचे ‘वनवास’, जिम कार्बेट यांच्या ‘कुमाउचे नरभक्षक’ या शिकारी कथा आदी साहित्य ऑडिओ बुक स्वरूपात सादर केले आहे. २०१९ मध्ये स्नॉवेल अधिकृतरीत्या कंपनी म्हणून स्थापन झाली. त्यापूर्वी सात-आठ वर्षे संशोधन, अभ्यास आणि प्रयोग म्हणून ऑडिओ बुक्स तयार केली. अलीकडेच स्नॉवेलने संकेतस्थळ, मोबाइल अॅपवर सबस्क्रिप्शनचीही सुरुवात केली. मराठी पुस्तकांपासून सुरुवात केल्यावर आता वेगवेगळ्या भाषांमध्येही काम करण्याची स्नॉवेल तयारी करत आहे. २०११ मध्ये स्नॉवेल आवड म्हणून सुरू करताना समीर नोकरी करत होता. मात्र, जागतिक स्तरावर ऑडिओ बुक्सच्या क्षेत्रात होणाऱ्या घडामोडी, त्यातल्या शक्यतांचा अदमास घेऊन समीरनं नोकरी सोडून पूर्णवेळ या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक म्हणून या क्षेत्रात मोठा पल्ला गाठण्याचे समीरचे उद्दिष्ट आहे.
नीरज बोराटे (उद्योग) : एक धागा उद्योगाचा
घोंगडी विणणे आणि गोधडी शिवणे या हळूहळू लुप्त होत चाललेल्या अस्सल भारतीय कला. त्या जगभरात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे- नीरज बोराटे यांचे मदर क्विल्ट आणि घोंगडी डॉट कॉम. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीत मन रमले नाही म्हणून काही वेगळे करण्याचे नीरज यांनी ठरवले आणि त्यातूनच या उद्योगाची सुरुवात झाली. गोधडी, घोंगडीसारख्या वस्त्रप्रकारांचे महत्त्व लक्षात घेता त्यांचे संवर्धन, जतन करण्याचे महत्त्व ओळखून नीरज यांनी त्यातील कारागिरांशी संपर्क साधला आणि या कलाप्रकारांच्या दस्तावेजीकरणाबरोबरच त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमांच्या नव्या तंत्राचा वापर केला. घोंगडी, गोधडीचे अस्सल भारतीयत्व, त्यांचे आध्यात्मिक, पारंपरिक आणि आरोग्यपूर्ण महत्त्व जगासमोर आणण्याचा प्रयत्न सुरू केला. देश-परदेशातून त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यांनी तयार केलेल्या योगा मॅट्स, गोधडीच्या पर्स, लॅपटॉप बॅग, गालिचे अशा अनेक कल्पक गोष्टी ग्राहकांच्या पसंतीस उतरू लागल्या. उत्तम मोबदला मिळू लागल्याने कारागिरही पुन्हा या कलेमध्ये रस घेऊ लागले. त्यामुळे हे कलाप्रकार नव्याने विकसित होण्यास सुरुवात झाली. नीरज म्हणतात, ‘महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, प. बंगाल आणि दक्षिणेतील राज्यांत विविध पद्धतींनी घोंगड्या, गोधड्या तयार होतात. तिथे जाऊन, कारागिरांना भेटून, बोलून, लिखित आणि दृश्य स्वरूपात या कलांचे दस्तावेजीकरण केले तर नव्या पिढीला त्याचा उपयोग होऊ शकेल, नवे कारागीर घडतील, आणि हे करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.’
प्रा. डॉ. तुषार जावरे (विज्ञान) : संशोधनमात्रे…
कुपोषण ही आपल्या देशापुढील एक मोठी समस्या. त्यावर मात करण्याचे प्रयत्न अनेक संस्था, व्यक्तींकडून केले जातात. कुपोषणामुळे अकाली प्रसूती आणि त्यातून जन्मलेल्या अर्भकाच्या तसेच नवजात शिशुच्या मेंदूची वाढ परिपूर्ण झालेली आहे किंवा नाही, हे एमआरआय प्रतिमांचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करून ठरवता येते. त्यासाठी योग्य उपचार पद्धती ठरवता यावी म्हणून तांत्रिक प्रणाली तयार करण्याच्या विषयात प्रा. डॉ. तुषार ऋषिकेश जावरे यांनी संशोधन केले आहे. या कार्याबद्दल त्यांना कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाने सर्वोत्कृष्ट संशोधक म्हणून गौरविले आहे. दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णाच्या संदर्भातील पूर्ण माहिती आणि त्याचा आरोग्य इतिहास याबद्दल इत्थंभूत माहिती उपलब्ध करून देणारे तंत्रज्ञान ‘हॉस्पिटल अॅन्ड पेशंट केअर मॅनेजमेंट सिस्टीम’ या नावाने विकसित करून त्याची पेटंट नोंदणीसुद्धा जावरे यांनी केली आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी हे तंत्रज्ञान फार महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या जावरे हे शिरपूर येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठात प्रा. डॉ. जावरे हे पीएच. डी.चे मार्गदर्शक म्हणून नामनिर्देशित आहेत. अभियांत्रिकीतील विविध विषयांवरील त्यांची सात पुस्तके आंतरराष्ट्रीय प्रकाशनांनी प्रकाशित केली आहेत. तसेच अभियांत्रिकी विषयातील तीन आंतरराष्ट्रीय पेटंट्सही त्यांनी मिळवली आहेत. विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त पत्रिकांमध्ये त्यांचे पन्नासहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. या कामगिरीबद्दल अनेक संस्थांकडून त्यांना गौरविण्यात आले आहे.
सौरभ (नक्षत्र) बागवे (समाजकारण) : भारतातला पहिला ‘गे’ ब्रँड अम्बॅसिडर
विरारमधल्या सामान्य घरात वाढलेला सौरभ बागवे. आपली समलैंगिकता न लपवता ती ताठ मानेने मिरवणारा, समलैंगिकांनाही मनमुक्त, सर्वसामान्य जगण्याचा अधिकार आहे, हे ठामपणे सांगणारा एक अभिनेता, उद्योजक आहे. सौरभ भारतातला पहिला गे ब्रँड अम्बॅसिडरसुद्धा आहे. समलैंगिक व्यक्तींनाही प्रवासाचा मनमुराद आनंद लुटता यावा यासाठी त्याची ‘द बॅकपॅक ट्रॅव्हल्स’ ही कंपनी विशेष प्रयत्न करते. सौरभ ऊर्फ नक्षत्र हा एलजीबीटीक्यूंच्या हक्कांसाठी लढा देणारा सामाजिक कार्यकर्ताही आहे.
एका सामान्य कुटुंबातील मुलाने आपले वेगळेपण ओळखून ते मान्य करण्याचा सौरभचा प्रवास कधीच सोपा नव्हता. पण आपल्यासारखेच वेगळेपण असलेल्या इतरांसाठी हा प्रवास सोपा व्हावा यासाठी सौरभ नक्कीच प्रयत्न करतो. विविध कार्यक्रम आणि चर्चासत्रांद्वारे एलजीबीटीक्यू समूहाचा संघर्ष, व्यथा आणि त्यांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. त्यांनाही समाजात आनंदाने जगता यावे यासाठी उपक्रम राबवतो. देशातल्या विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन याविषयी प्रबोधन करतो. सौरभ म्हणतो, ‘‘एलजीबीटीक्यू समूहाला हक्काचा, मानाचा, सुरक्षित आणि आमच्या अस्तित्वाची जाणीव असलेला समाज हवाय.’’
आपले बहुतांश काम सौरभ समाजमाध्यमांद्वारे करतो. तो विविध लघुचित्रपट, ब्लॉग इत्यादी माध्यमांतून एलजीबीटीक्यू समूहाच्या समस्या मांडत असतो. २०१९ मध्ये त्याने २५ ब्रँडसोबत इन्फ्ल्यूएन्सर अम्बॅसिडर म्हणून करार केला, तर ब्रँड अम्बॅसिडर म्हणून तीन आंतरराष्ट्रीय, तर एका राष्ट्रीय ब्रँडसोबत करार केला आहे.
पराग पाटील (उद्योग) : उद्योगऊर्मी
मोठ्या उद्योगांना वीजनिर्मिती आणि इतर वापरासाठी लागणाऱ्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पांची यंत्रसामुग्री तयार करते- शालीन कंपोझिट इंडिया प्रा. लिमिटेड ही स्वदेशी कंपनी. तिचे संस्थापक, सर्वेसर्वा आहेत पराग पाटील हे विरारमधील तरुण उद्योजक. पराग पाटील यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईच्या मध्यमवर्गीय घरात गेले. वडील एका कंपनीत लेथ कामगार होते. त्यानंतर त्यांनी डीएम इंजिनीअरिंग नावाचा छोटा कारखाना सुरू केला. विद्युत अभियांत्रिकीच्या पदवीनंतर परागनीही वडिलांना कारखान्यात मदत करायला सुरुवात केली आणि पाच ते सहा वर्षांत कंपनीची आर्थिक स्थिती सुधारली. परागना लक्षात आले की, कंपन्यांना वीजनिर्मिती आणि इतर वापरासाठी पाणी शुद्धीकरण प्रकल्पांत लागणारे फिल्टर व्हेसल परदेशातून आयात करावे लागतात, कारण भारतात ते बनत नाहीत. मग याच व्यवसायात उतरण्याचा निर्धार पराग यांनी केला. अविरत अभ्यास, ध्यास आणि कष्ट यांचा परिपाक म्हणून यथावकाश शालीन कंपोझिट इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीची स्थापना झाली. कंपनीच्या मालकीच्या जागेत पालघरमध्ये कारखाना उभा राहिला आणि आता तेथे एफआरडी बास्केट स्टेनर, एफआरपी फायबर रेनफोस्र्ट पॉलिमर, एफआरपी कार्टेज (फायबर रेनफोस्र्ट पॉलिमर) फिल्टर हाऊसिंग, एफआरपी मिक्सर, एफआरपी प्रेशर वेसल, ब्लोअर्स, डिगॅसिफाइंग टॉवर, केमिकल स्टोरेज टॅँक्स अशी निरनिराळी उपकरणे बनवली जातात. आज कंपनीची उलाढाल पाच कोटीच्या घरात गेली आहे. पाणी शुद्धीकरण प्रकल्पात भारतात ज्या चार-पाच कंपन्या आहेत, त्यामध्ये पराग पाटील यांच्या शालीन कंपोझिट इंडिया प्रा. लिमिटेडचे नाव आघाडीवर आहे.
मीनाक्षी वाळके (उद्योग) : कलेने दिले जगण्याचे बळ
वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबात जन्म झालेल्या मीनाक्षी वाळके यांना खरे तर स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे होते. बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यावर गुणवत्ता असूनही केवळ परिस्थितीअभावी ते शिक्षण पूर्ण करता आले नाही. पुढे लग्न झाले आणि त्यानंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी म्हणून त्यांनी पूजेच्या कलात्मक थाळ्या, करंडे, शोभेच्या वस्तू करायचे ठरवले. या वस्तूंना बऱ्यापैकी मागणीही होती. दरम्यान त्यांच्या दुसऱ्या प्रसूतीदरम्यान मुलीचा मृत्यू झाला. या दु:खातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कलेचा आधार घेतला. बांबूपासून वस्तू बनवण्याच्या कलेत त्या मनापासून रमल्या. या बांबूने त्यांचे जीवनच जणू बदलून टाकले. बांबूपासून सुंदर वस्तू बनवण्याची कला त्यांना चांगलीच साधली होती. बांबूपासून अनेक शोभेच्या वस्तू, पर्यावरणपूरक राख्या त्यांनी तयार केल्या. त्यांच्या उत्पादनाला केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातूनही मागणी येऊ लागली. अमेरिकेने प्रायोजित केलेल्या मिस क्लायमेट-२०१९ चे मुकूटही त्यांनी बनवून दिले. या पंचतारांकित स्पर्धेमध्ये त्यांचा सत्कार झाला. वंचित, गरजू महिलांसाठी त्यांनी ‘अभिसार इनोव्हेटिव्ह ’
हा नवउद्योग सुरूकेला. नवी दिल्ली येथील शक्ती वूमन फाऊंडेशनने या नवउद्यमाला भारतातील पहिल्या २० नवउद्योगांमध्ये स्थान दिले. मीनाक्षी यांना राष्ट्रीय नारी शक्ती सन्मान मिळाला. इस्रायलच्या जेरुसलेम येथील एका कला महाविद्यालयात शिकवण्याचे निमंत्रण मिळाले. टाळेबंदीच्या काळातही मीनाक्षी स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी आपल्याला आणि सहकारी महिलांना काही ना काही कामांत गुंतवून घेतले. टाळेबंदीच्या काळात त्यांनी राख्या तयार केल्या आणि रोजगारही मिळवला. स्वत: वंचित समाजगटातील असूनही आज आपल्यासारख्याच अनेकींसाठी रोजगार उपलब्ध करत मीनाक्षी वाळके यांनी एक नवा आदर्श ठेवला आहे.
क्षितिज पटवर्धन (कला) : सर्जक कथनशैली
पत्रकारिता, जाहिरात क्षेत्र, नाट्यलेखन आणि चित्रपटलेखन असा विस्तृत पट आहे क्षितिज पटवर्धन या लेखकाचा. पुण्यातल्या रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारिता आणि जनसंज्ञापनाची पदवी प्राप्त केल्यानंतर क्षितिज यांनी वृत्तपत्रांतून पत्रकारिता केली, जाहिरात संस्थेत कॉपी रायटिंग केले, विविध जाहिरातींसाठी लेखन केले. आणि हे करताना आपल्या प्रतिभेला सामाजिक जाणिवेची जोडही दिली. म्हणूनच त्यांच्या कलाकृतींमधली माणसं खोटी वाटत नाहीत, तर अगदी आपल्या आसपासचीच वाटतात.
क्लासमेट, टाइम प्लीज, डबल सीट, वायझेड, फास्टर फेणे, धुरळा अशा अनेक सिनेमांच्या कथा क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतून साकारल्या आहेत. त्यात राजकारणापासून ते प्रेमापर्यंत अनेक विषय त्यांनी हाताळले आहेत. चित्रपटासाठी लेखन करताना त्यांनी ‘जागर’ आणि ‘समन्वय’ या संस्थांच्या माध्यमातून मराठी रंगभूमीशी असलेली नाळही कायम राखली आहे. सामाजिक विषय-आशय असलेल्या कथा, नाटके त्यांच्या लेखणीतून उतरली आहेत.
नव्या काळातील बदलते नातेसंबंध मांडणाऱ्या ‘नवा गडी, नवे राज्य’ या त्यांच्या नाटकाने व्यावसायिक यश मिळवले. सुमारे ४७५ प्रयोग करत नवीन इतिहास रचला. या नाटकाला २५ पुरस्कार मिळाले असून, ते पाच भाषांत अनुवादित झाले आहे. क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘दोन स्पेशल’ या नाटकाचेही अडीचशेपेक्षा जास्त प्रयोग झाले. ‘मोहिनी’, ‘धागा धागा’, ‘बघतोस काय, मुजरा कर’, ‘मन शेवंताचे फू ल’, ‘तुला जपणार आहे रे’ आदी गाणीही त्यांच्या लेखणीतून उतरली आहेत. किशोरवयीन मुलांसाठी त्यांनी ‘दर्या’ ही चित्रमय कादंबरी प्रकाशित केली आहे. नाटक, सिनेमा, गीतलेखन, किशोर साहित्य अशा निरनिराळ्या कलाप्रकारांत अनेक प्रयोग करत स्वत:ला नव्या काळाशी, नव्या जाणिवांशी जोडू पाहणारे क्षितिज पटवर्धन म्हणूनच आजच्या काळातील एक गुणी कलावंत ठरतात.
मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)
सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बॅँक लि., वल्र्ड वेब सोल्युशन्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सिडको
पॉवर्ड बाय : एम. के. घारे ज्वेलर्स
नॉलेज पार्टनर : प्राईसवॉटरहाऊसकुपर्स
टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा