भारतीय लष्कर जम्मू- काश्मीरमध्ये स्थानिकांशी मैत्रीचे बंध दृढ करण्यासाठी दीड दशकांपासून  सद्भावना कार्यक्रम राबवीत आहे. दुसरीकडे दहशतवादी कारवाया हाणून पाडण्याचे काम उत्तम प्रकारे सुरू असतानाही तेथील काही भागांत वातावरण मात्र कमालीचे बदलत आहे. दहशतवादी शोध मोहिमेवेळी स्थानिक तरुणांकडून थेट जवानांवर दगडफेक करण्यात येते. सुरक्षा यंत्रणांची वाहने रोखण्याचा प्रयत्न होतो. लष्करी मोहिमेत अडथळे आणून दहशतवाद्यांना पळून जाण्यास मार्ग मिळावा, असा प्रयत्न असतो. हा प्रकार तेथील जवानांबरोबरच  देशाची चिंता वाढवणारा आहे..

जम्मू-काश्मीरमध्ये काही महिन्यांत लष्कराने अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांच्या सहकार्याने या मोहिमा यशस्वी झाल्या. भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस या तिन्ही यंत्रणांचा कधी नव्हे, इतका चांगला समन्वय प्रस्थापित झाल्याचे लक्षात येते. दहशतवादी कारवाया हाणून पाडण्याचे काम उत्तम प्रकारे सुरू असतानाही जम्मू- काश्मीरच्या काही भागात वातावरण मात्र कमालीचे बदलत आहे. दहशतवादी शोधमोहिमेवेळी काही स्थानिक तरुणांकडून थेट जवानांवर दगडफेक करण्यात येते. सुरक्षा यंत्रणांची वाहने रोखण्याचा प्रयत्न होतो. त्यामागे लष्करी मोहिमेत अडथळे आणून दहशतवाद्यांना पळून जाण्यास मार्ग मिळावा, असा प्रयत्न असतो. अलीकडच्या काळात उदयास आलेला हा प्रकार सुरक्षा यंत्रणांबरोबर भारताची चिंता वाढविणारा आहे.

Eknath shinde, shiv sena role, Airoli, belapur assembly election
ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
seven people dismissed from Shiv Sena Shinde party
शिवसेना (शिंदे) पक्षातील सात जणांची हकालपट्टी
terrorist 44 killed during the year in jammu region
जम्मू विभागात दहशतवादी कारवायांत वाढ; वर्षभरात ४४ ठार
Manipur Violence :
Manipur Violence : मणिपूरमध्ये सीआरपीएफ जवानांची मोठी कारवाई; ११ दहशतवादी ठार, दोन जवान गंभीर जखमी
Jammu And Kashmir
Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील सैन्याच्या गोळीबारात ट्रेकर्स सापडले; गोळीबार थांबवत सैनिकांनी केली सुटका
jammu Kashmir Kishtwar district encounter
Jammu-Kashmir Encounter: दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद, तर तीन जवान जखमी
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला

काश्मीर खोऱ्यांत बर्फ वितळण्यास सुरुवात झाली की, घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ होते. कोणतेही वर्ष त्यास अपवाद नाही. त्यामुळे घुसखोरी रोखण्यासाठी डोळ्यात तेल घालून जवानांना कार्यरत राहावे लागते. कारगिलचा अनुभव गाठीशी असल्याने सूक्ष्म त्रुटीही राहणार नाही, याची खबरदारी घेणे क्रमप्राप्त ठरते. पाकिस्तान लष्कराकडून होणारी आगळीक, घुसखोरी रोखणे यासाठी सीमेवर खिंड लढविताना भारतीय लष्करासमोर अंतर्गत भागात दहशतवाद्यांचा बीमोड करण्याचे अव्याहत आव्हान असते. यावेळी विशिष्ट काही भागात स्थानिकांची दहशतवाद्यांप्रति सहानुभूती वाढत असल्याचे ठळकपणे अधोरेखित होत आहे. केवळ सहानुभूतीच नाही तर, दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ लढण्यास ही मंडळी पुढे सरसावत असून हा बदल सद्भावना प्रकल्पांतर्गत लष्कराने आजवर केलेल्या प्रयत्नांनाही धक्का देत आहे.

निसर्गसौंदर्याने नटलेला आणि हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे झाकोळल्या जाणाऱ्या काश्मीर खोऱ्यात कधी, कोणत्या कारणाने तणाव निर्माण होईल हे सांगणे अवघड. किरकोळ कारण वातावरण तापविण्यास पुरेसे ठरते. समाज माध्यमांवरून विखारी प्रचार व अस्वस्थतेला खतपाणी घातले जाते. त्यामुळे तोंडाला कपडा बांधून रस्त्यावरून दगडफेक करणारे तरुणांचे जथ्थे दूरचित्रवाणीवर नेहमीच झळकत असतात. परंतु, एखाद्या मुद्दय़ावरून निर्माण झालेल्या रोषातून सार्वजनिक ठिकाणी घातला जाणारा धुडगूस आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना जवानांवर होणारी दगडफेक या दोन्हीकडे एकाच दृष्टिकोनातून पाहता येणार नाही. दहशतवाद्यांच्या सहानुभूतीदारांची वाढलेली हिंमत त्यातून समोर येते.

काही दिवसांपूर्वी अनंतनाग जिल्ह्यातील अश्मुगाम गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त कारवाई सुरू केली. त्यावेळी गावातील जमावाने कारवाई क्षेत्रात येऊन जवानांवर दगडफेक सुरू केली. पोलिसांनी घरात थांबण्याचे आवाहन करूनही कोणी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. दगडफेकीत जवान जखमी झाल्यामुळे सुरक्षा दलांना हवेत गोळीबार करावा लागला. ९ मार्च २०१६ रोजी पुलवामा जिल्ह्यत यापेक्षा वेगळे काही घडले नव्हते. दहशतवादी व जवान यांच्यात तुफान गोळीबार झाला. अखेरीस दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. क्षणार्धात सुरक्षा यंत्रणांच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन सुरू झाले. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या. याच जिल्ह्यतील काकापोरा भागात एका दहशतवाद्याचा खात्मा केल्यानंतर सुरक्षा दलाविरोधात स्थानिक रस्त्यावर उतरले. त्यावेळी झालेल्या गोळीबारात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी आणि महिलेचा मृत्यू झाला. मागील तीन ते चार महिन्यांपासून सातत्याने प्रत्यक्ष मोहिमे वेळी जवानांवर दगड-विटांचा मारा करण्याचे प्रकार घडत आहेत. दहशतवाद्यांच्या बाजूने उघडपणे समोर येणाऱ्या काही स्थानिक तरुणांमुळे या लढाईत अवरोध येत आहे. एका आघाडीवर बंदुकीने लढण्याचे तर दुसऱ्या आघाडीवर संयतपणे स्थिती हाताळण्याचे आव्हान सुरक्षा दलांसमोर आहे.

दहशतवादी संघटनांनी छुप्या लढाईत सुरक्षा दलांविरोधात स्थानिकांना उतरविण्याची नवीन रणनीती आखली आहे. त्याचा अंदाज सुरक्षा दलांनाही आहे. मागील दोन वर्षांत दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यात मोठा हल्ला करता आलेला नाही. सुरक्षा यंत्रणांच्या मते सद्य स्थितीत काश्मीर खोऱ्यात सुमारे दीडशे दहशतवादी लपलेले आहेत. ते हिजबुल मुजाहिद्दीन अथवा लष्कर ए तैयब्बाशी संबंधित आहेत. त्यांची नावे व ओळखही पटलेली आहे. त्यातील निम्म्यापेक्षा अधिक तरुण स्थानिक असून बहुतांशी दक्षिण काश्मीरमधील आहेत. त्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर मोठी सहानुभूती मिळत असल्याचे अधिकारी सांगतात. वास्तविक, अशा मोहिमांमध्ये कमीतकमी नुकसान होईल या दृष्टीने नियोजन करत जवान दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्याचा प्रयत्न करतात. संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यावर काश्मीर खोऱ्यातील कोणत्याही भागात तात्कालिक युद्धप्रवण क्षेत्र तयार होते. मोहिमेदरम्यान या क्षेत्रात वावरणे कोणाच्याही जिवावर बेतणारे ठरू शकते. या स्थितीत स्थानिक मंडळी जवान व लष्करी वाहनांना अडथळे आणत दहशतवाद्यांना पळून जाण्यास मदत करताना दिसतात. हे अतिशय धोकादायक आहे.

वारंवार हे प्रकार घडू लागल्याने जम्मू-काश्मीर पोलिसांनी खास सूचना प्रसिद्ध करत कायद्याचा बडगा उगारण्याचा इशारा दिला. अशा क्षेत्रात दोन किलोमीटरच्या परिघातील नागरिकांनी आपल्या घरातच थांबावे. पालकांनी आपली मुले घराबाहेर पडणार नाहीत याची दक्षता घेण्याचे सूचित केले. ज्यांची मुले अशी मोहीम सुरू होण्याआधी बाहेर असतील, त्यांना तात्काळ घरी बोलविण्यात यावे. या काळात खिडक्याही उघडू नयेत. बंदुकीतून सुटलेली गोळी एखाद्याचा प्राणही घेऊ शकते. तसे घडू नये ही सुरक्षा दलाची इच्छा असल्याची जाणीव स्थानिकांना करून दिली जात आहे. फुटीरतावादी संघटना सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी प्रचाराद्वारे खतपाणी घालतात. अडथळे आणण्यासाठी दहशतवादी गटांकडून स्थानिकांना पैसेही दिले जात असल्याचा संशय आहे. या स्थितीत जम्मू-काश्मीर पोलिसांची सूचना काम करेल, अशी सुरक्षा दलांची अपेक्षा आहे.

अशा प्रत्येक मोहिमेत लष्कराला सीआरपीएफ व जम्मू काश्मीर पोलिसांना कायम सोबत ठेवावे लागते. दहशतवाद्यांशी लढण्याची जबाबदारी लष्करावर आहे तर अंतर्गत कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी अन्य दोन यंत्रणांवर.

लष्करी जवान दहशतवाद्यांशी दोन हात करतो, तेव्हा अन्य दलांना स्थानिकांना नियंत्रणात ठेवण्याचे काम करावे लागते. लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार काश्मीर खोऱ्यातील शहरी भागात मोहीम राबविताना या आव्हानाचा प्रकर्षांने सामना करावा लागतो. परंतु, जंगल प्रदेश अथवा विरळ लोकवस्तीच्या भागात या मोहिमा राबविताना अडचणी उद्भवत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

स्थानिकांशी मैत्रीचे बंध दृढ करण्यासाठी दीड दशकांपासून भारतीय लष्कर जम्मू-काश्मीरमध्ये सद्भावना कार्यक्रम राबवीत आहे. त्या अंतर्गत लष्कराने जम्मू-काश्मीरमधील १,७०० शाळांचे नूतनीकरण केले. ज्या दुर्गम गावात एकही शाळा नाही, तिथे ६० हून अधिक नव्या शाळांची उभारणी केली आहे. राजौरी व पेहलगाम येथे निवासी स्कूलही सुरू करण्यात आले. या शाळांना आवश्यक त्या शैक्षणिक साहित्याची उपलब्धता, आर्थिक स्थिती बिकट असणाऱ्यांना मोफत शिक्षण आणि राष्ट्रीय भावना वाढीस लागण्यासाठी ‘देशाची सफर’ या माध्यमातून वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न होत आहे. लष्करी अधिकारी आणि स्थानिक युवक यांच्यात क्रिकेट सामने, सांस्कृतिक कार्यक्रम याद्वारे स्थानिकांशी नाते बळकट केले जाते. अविरत चाललेल्या या प्रयत्नांवर दक्षिण काश्मीरमध्ये घडणाऱ्या घटना छेद देत असल्याची सध्याची चिंताजनक स्थिती आहे.

 

– अनिकेत साठे
aniket.sathe@expressindia.com