कला व मनोरंजन, उद्याोग, व्यवसाय, समाजसेवा, कायदा व प्रशासन, विज्ञान व संशोधन, क्रीडा या क्षेत्रांमध्ये आपल्या प्रज्ञेने लखलखती कामगिरी करणाऱ्या २० युवा गुणवानांना यंदा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांनी गौरवण्यात आले. भविष्यवेधी दृष्टिकोन आणि चाकोरीबाहेरची दिशा धरणाऱ्या या गुणिजनांच्या कार्याची दखल ‘लोकसत्ता’ने नेहमीच घेतलेली आहे.
जैवतंत्रज्ञानातील विकासवाट
गेल्या काही वर्षांत वैद्याकीय क्षेत्रात, औषधनिर्मिती क्षेत्रात भारत झपाट्याने प्रगती करत आहे. विशेषत: करोना काळात लसनिर्मितीची भारताची ताकद अधोरेखित झाली. मुंबईतील डॉ. सलोनी वाघ व्यवस्थापकीय संचालक असलेली सुप्रिया लाइफसायन्सेस ही कंपनी वेगवेगळ्या आजारांसाठीची विशिष्ट औषधे तयार करते. अँटिहिस्टामाइन्स, दमा यांसारख्या आजारांवर विशिष्ट औषधे, उत्पादने या कंपनीने तयार केली आहेत. औषध निर्मितीसाठीची रसायने आणि सक्रिय औषधी घटकांसाठी कंपनी ओळखली जाते. सलोनी औषधांमध्ये होणारे बदल लक्षात घेऊन त्यासबंधी नवी औषध उत्पादने, क्लिनिकल चाचण्या करते. ही कंपनी जगभरातील ८६ देशांमध्ये सेवा पुरवते. सरकारी पाठिंब्यासह कंपनीने औषधनिर्माण क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. भारतीय औषध उद्याोगाच्या वाढीसाठी ती सतत प्रयत्नशील असते. कंपनी नवीन उत्पादने विकसित करण्यासाठी आणि बायोटेक एपीआयमध्ये विस्तार करण्यासाठी संशोधन आणि विकास या घटकांसाठी आता गुंतवणूक करत आहेत. औषधनिर्मिती क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेऊन डॉ. सलोनी वाघ हिला २०२३ मध्ये फोर्ब्स इंडियाच्या आयकॉनिक महिलांच्या यादीत स्थान देण्यात आले. सुप्रिया लाइफसायन्सेसचे आता लक्ष्य चीन, युरोप, अमेरिकेसारख्या विकसित बाजारपेठांकडे आहे. नवे उत्पादन विकसित करणे, जैवतंत्रज्ञान सक्रिय औषधी घटकांच्या विस्तारासाठी संशोधन आणि विकासावर गुंतवणूक करण्यात येत आहे. देशात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिलांचा सहभाग फार कमी असताना औषधनिर्मितीसारख्या क्षेत्रात डॉ. सलोनीचे काम नक्कीच प्रेरणादायी आहे.
ऑलिम्पिकमध्ये ‘कांस्य’वेध
खा शाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू म्हणजे नेमबाज स्वप्निल कुसाळे. गेल्या वर्षी पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्वप्निलने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. कोल्हापूरमधील राधानगरी तालुक्यातील स्वप्निलला सुरुवातीपासूनच नेमबाजीचे वेड. त्याने २००८ ऑलिम्पिकमधील अभिनव बिंद्राची कामगिरी पाहण्यासाठी बारावीच्या परीक्षेलाही बगल दिली होती. आई कांबळवाडी गावची सरपंच, तर वडील आणि भाऊ दोघेही शिक्षक. मुलाची खेळाकडील ओढ पाहून नववीत शिकत असलेल्या स्वप्निलसमोर आई-वडिलांनी सायकलिंग आणि रायफल यांपैकी एकाची निवड करण्याचा पर्याय ठेवला. स्वप्निलने रायफल उचलली. वडिलांनी २००९ मध्येच स्वप्निलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनीत दाखल केले.
तीन वर्षांत स्वप्निल जर्मनीमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला. मुलासाठी तेव्हा वडिलांनी कर्ज काढून रायफलची खरेदी केली होती. वयाच्या १८ व्या वर्षी २०१५ मध्ये स्वप्निलने पहिले रौप्यपदक जिंकले. प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनी स्वप्निलमधील नेमबाजाला पैलू पाडले. अनेक स्पर्धांमधील पदकांसह आपला प्रवास चालू ठेवणाऱ्या स्वप्निलने २२ ऑक्टोबर २०२२ मध्ये इजिप्त येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला आणि पुरुषांच्या ५० मीटर थ्री-पोझिशन प्रकारात भारताला ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला. पुढे ऑलिम्पिकमध्ये पदककमाई करताना त्याने इतिहास घडवला.
जटिल समीकरणांची उकल
गणित आणि भूमिती हे विषय अनेकांना भीतीदायक वाटतात. १९ व्या शतकात अनेक शोधांनी भूमितीची व्याप्ती वाढविली. अनेक सिद्धांत, प्रमेय यांमुळे भूमिती हा विषय कठीण वाटतो. मात्र गणित व भूमिती सुलभ पद्धतीने सांगण्याचे काम करतोय वेद दातार. प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेला वेद दातार हा भौमितिक विश्लेषण क्षेत्रात कार्यरत आहे. बंगळूरुच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये प्राध्यापक असलेल्या वेदने भूमितीतील काही जटिल समीकरणांची उकल केली आहे. भूमितीची सखोल माहिती मिळविण्यासाठी आंशिक विभेदक समीकरणे वापरतात. उदाहरणार्थ मॅनिफोल्ड्स, आईनस्टाइनची समीकरणे आदी. आईनस्टाईनची मूळ समीकरणे ही नॉन-लिनयर हायपरबोलिक समीकरणे आहेत (नॉन-लिनयर वेव्ह समीकरणांचा एक प्रकार). वेदने त्यांच्या लंबवर्तुळाकार भागांचा अभ्यास केला, ज्यांना काहलर-आईनस्टाईन समीकरणे म्हणतात. काहलर-आईनस्टाईन समीकरणांचा अभ्यास केल्यावर त्याने भूमितीतील ‘फॅनो केस’ शोधण्याचे महत्त्वपूर्ण संशोधन केले. या संशोधनाची काहलर-आईनस्टाईन मॅनिफोल्ड्सची नवीन उदाहरणे तयार करण्यासाठी मदत झाली. त्याचबरोबर वेदने सकारात्मक विभागीय वक्रता यांसह कहलरच्या व्यासाचा अभ्यास, लेज्मी-सेकेलिहिडी अनुमानाच्या प्रोजेक्टिव्ह प्रकरणाचे निराकरणही केले आहे. भौमितिक विश्लेषणसारख्या अतिशय व्यामिश्र विषयात वेदचे संशोधन मोलाचे ठरत आहे.
संशोधनाला नवी दिशा
मानवी शरीर म्हणजे प्रचंड गुंतागुंत… पेशी, हाडे, स्नायू असे बरेच काही असते त्यात… शरीरातल्या लिपिड्स या घटकावरील संशोधनात रमलाय तरुण शास्त्रज्ञ डॉ. सिद्धेश कामत. पुण्यातील आयसर या संस्थेत सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या सिद्धेशने भारतातील सर्वात प्रगत मास-स्पेक्ट्रोमेट्री आणि लिपिडोमिक्स सुविधा विकसित केली आहे. मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेमधून बी. टेक. पूर्ण केल्यानंतर सिद्धेशने अमेरिकेतील टेक्सास येथील ए अँड एम विद्यापीठातून रसायनशास्त्रात पीएच. डी. पूर्ण केली. पेशींचे महत्त्वाचे घटक असलेल्या लिपिड्सचे कार्य समजून घेण्यासाठी अत्याधुनिक पद्धतींचा वापर करून त्याने संशोधन केले. सिद्धेशच्या संशोधनामुळे मानवाच्या विविध पेशींची कार्ये आणि रोगांचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. सिद्धेशच्या संशोधनाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून त्याला स्वर्णजयंती फेलोशिप मिळाली. त्याची एम्बो यंग इन्व्हेस्टिगेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली. इन्साकडून युवा शास्त्रज्ञ पदक त्याला प्राप्त झाले आहे. प्रतिष्ठेचे इन्फोसिस पारितोषिक प्राप्त झाले आहे. तरुण वयात केलेल्या मोलाच्या संशोधनामुळे डॉ. सिद्धेशला हे बहुमान मिळाले. पुण्यातील आयसर संस्थेत राष्ट्रीय जीन कार्यक्षमता सुविधा, आरोग्य व रोग विभागाचे अध्यक्ष म्हणून सध्या डॉ. सिद्धेश कामत कार्यरत आहेत.
आश्वासक अभिनेता
आपण जे काही साकारतो आहोत त्याची उत्तम समज आणि ते सहज अभिनयातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची हातोटी असलेला तरुण फळीतील कलाकार म्हणून सुयश टिळक ओळखला जातो. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधून त्याला लोकप्रियता मिळाली. त्याची ‘का रे दुरावा’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली. त्या दरम्यानच्या काळात त्याने ‘क्लासमेट्स’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘हॅशटॅग प्रेम’, ‘भाखरखाडी ७ किमी’ अशा चित्रपटांमधूनही भूमिका केल्या. मालिका विश्वात तो लोकप्रिय होताच, त्यामुळे त्याने ‘बापमाणूस’, ‘दुर्वा’, ‘पुढचं पाऊल’, ‘आदिशक्ती’, ‘एक घर मंतरलेलं’ अशा मालिकांमधून भूमिका केल्या. मात्र कुठल्याही एकाच एक साच्यात अडकून बसणे त्याला मान्य नसावे… त्यामुळे त्याने पुन्हा रंगभूमीकडे आपला मोर्चा वळवला. त्याने ‘स्ट्रॉबेरी’ हे नाटक केले. त्यानंतर ‘मी स्वरा आणि ते दोघं’ हे नाटक केले. सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ या नाटकासाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. एकीकडे रंगभूमीवर काम सुरू असताना हिंदीतही ‘खालीपिली’ चित्रपटातली खलनायकी भूमिका, ‘बंदिश बँडिट्स’ या गाजलेल्या वेबमालिकेतील महत्त्वाची भूमिका ेकेल्या आहेत. निसर्गप्रेमी असलेला सुयश पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक असलेले माहितीपट, चित्रफिती स्वरूपातील शो याचबरोबर प्रत्यक्ष मुलांना जंगल वाचनाची गोडी लागावी म्हणून घेतलेल्या कार्यशाळा अशा विविध माध्यमांतून कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कुठलेही मानधन न घेता तो आवडीने हे काम करतो आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ‘नेचर स्टोरीटेलर ऑफ द इअर’ हा पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
नवउद्याोगात नवी ‘ऊर्जा’
गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतीमुळे नवनवी इलेक्ट्रॉनिक उत्पादने विकसित होत आहेत. या उत्पादनांच्या अनेक कंपन्या आपल्या देशात निर्माण झाल्या आहेत. मुंबईच्या हृषिकेश जाधवची ‘इंडकल टेक्नॉलॉजी’ ही कंपनी त्यापैकीच एक… चार वर्षांपूर्वी हृषिकेशने या कंपनीची स्थापना केली. भारतीय ग्राहकांना शक्य तितक्या माफक दरात उच्च दर्जाची उत्पादने पोहोचवण्याचे इंडकलचे प्रमुख उद्दिष्ट आहे. इंडकल टेक्नॉलॉजीची उलाढाल १४५० कोटी रुपयांच्या घरात आहे. खासगी समभागातून कोणत्याही बाह्य निधीशिवाय एक हजार कोटी रुपयांचा महसुलाचा टप्पा इंडकलने गाठला आहे. नवउद्यामी जगतातील हे यश दुर्मीळ म्हणता येईल. इंडकल टेक्नॉलॉजी प्रत्यक्षात आणि ऑनलाइन वितरण व्यवस्थेद्वारे संपूर्ण भारतात १६ हजारांहून अधिक शहरांत त्यांची उत्पादने विकत आहे. १२,००० रिटेल आऊटलेटमार्फत विक्री केली जात आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत स्थानिक पातळीवरील घटकांचा वापर केल्यामुळे उत्पादनांची किंमत आणि सेवा देण्याच्या स्पर्धेत टिकून राहणे शक्य झाले. इंडकल टेक्नॉलॉजी ही कंपनी जागतिक परवानाधारक ब्रँड् ते स्वत:च्या ब्रँड नावाखाली उत्पादनांची विक्री करते. भारतीय ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीपासून प्रीमियम सेवा दिली जात आहे. येत्या काळात जलद वितरण आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन, अधिक चांगली सेवा देण्यासाठी यंत्रणा उभी करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. कमी कालावधीत हृषिकेश जाधव या तरुणाने उद्याोग क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे.
महिलांना नवी उमेद
आपल्या देशात आजही ६४ टक्के महिला मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅड वापरत नाहीत, असे एक सर्वेक्षण आहे. मासिक पाळीत योग्य काळजी न घेतल्यामुळे गर्भाशयाला जंतुसंसर्ग होण्यापासून गर्भाशयाच्या कर्करोगापर्यंत अनेक आजार महिलांना होतात. मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृतीचे, महिलांना कापडी सॅनिटरी पॅड शिवायला शिकवण्याचे काम सचिन आशा सुभाष हा त्याच्या ‘समाजबंध’ या संस्थेद्वारे गेली आठ वर्षे करत आहे. पुणे, पेण आणि भामरागडला या संस्थेचे कापडी सॅनिटरी पॅड निर्मिती प्रकल्प आहेत. नऊ हजारांहून अधिक महिलांना प्रशिक्षण देऊन दीड लाखाहून अधिक पॅडचे मोफत वितरण या संस्थेद्वारे केले आहे, तसेच मासिक पाळीसंबंधी जनजागृतीसाठी ६० कार्यकर्ते प्रशिक्षित केले आहेत. सचिनच्या या संस्थेतर्फे ‘प-पाळीचा: जागर स्त्री अस्तित्वाचा’ हा समुपदेशनपर कार्यक्रम केला जातो. मासिक पाळीच्या काळात काय काळजी घ्यावी, काय आहार घ्यावा, व्यायाम कोणता करावा, स्वच्छता कशी राखावी याबाबत माहिती दिली जाते. सचिनचे काम सरकारी अनुदान, सीएसआर मदतीविना चालते. या तरुण सामाजिक कार्यकर्त्याच्या कामामुळे आदिवासी भागांत आता बदल दिसू लागला आहे. कूर्मा प्रथेचे प्रमाण कमी होत असून महिला सॅनिटरी पॅड वापरू लागल्यात, त्यांना सुविधाही मिळू लागल्यात. सॅनिटरी पॅड शिवण्याच्या कामातून महिलांना रोजगार मिळतोय. महिलांच्या स्वातंत्र्य, सन्मानातली अडचण दूर करण्यासाठी धडपडणारा सचिन आशा सुभाषचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.
पॉडकास्टमधील ‘अमुक तमुक’
गे ल्या काही वर्षांत समाजमाध्यमांमध्ये मराठी भाषेचा टक्का वाढण्यात तरुणांचे योगदान नक्कीच महत्त्वाचे आहे. तरुणांकडून वेगवेगळ्या पद्धतीची आशयनिर्मिती आवर्जून मराठीमध्ये केली जातेय. यात महत्त्वाचा ठरतोय पॉडकास्ट हा प्रकार… पुण्याच्या ओंकार जाधव या तरुणाने पॉडकास्ट या प्रकारातल्या संधी ओळखून ‘अमुक तमुक’ची स्थापना केली. या मंचाअंतर्गत नागरिकशास्त्र, खुसफूस असेही मंच निर्माण केले आहेत. या मंचांवर मानसिक आरोग्य, पालकत्व, लैंगिकतेपासून वैविध्यपूर्ण विषयांवर तज्ज्ञ, मान्यवरांशी आशयघन संवाद साधला जातो. त्यातून एक वैचारिक दिशा मिळते. दोन वर्षांतच ‘अमुक तमुक’ने साडेचार लाखांपेक्षा अधिक सदस्यांचा टप्पा गाठला आहे. ओंकारच्या पॉडकास्टचे प्रेक्षक, श्रोते राज्यातील दुर्गम भागापासून जगभरात विखुरलेले आहेत. त्यात ५० टक्के महिला आहेत हे विशेष. ‘अमुक तमुक’ केवळ पॉडकास्ट नेटवर्क न राहता मराठी बोलणाऱ्या समाजातील पिढ्यांसाठी एक सांस्कृतिक पूल बनला आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये, विविध वयोगटांमध्ये वैचारिक संवाद साधला जातो. पॉडकास्टसह ओंकार आशय निर्मिती क्षेत्रात सल्लागार म्हणूनही काम करतो. मराठी डिजिटल कंटेट क्रिएशन क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करत, महत्त्वपूर्ण आणि विचारप्रवर्तक आशयाची निर्मिती ‘अमुक तमुक’च्या माध्यमातून ओंकार जाधव करत आहे़ त्यातील ‘खुसफूस’च्या माध्यमातून विचारप्रवर्तक संवादासाठी मंच तयार करण्यात आला आहे़ तंत्रज्ञानामुळे आता अनेक नवी कवाडे खुली होत असताना डिजिटल माध्यमात मराठी आशय निर्मितीमध्ये ओंकारचे काम लक्षवेधी आहे.
वंचित समाजाची तळमळ
भटकंती करणारा फासेपारधी समाज आजही अंधश्रद्धा, रुढी, परंपरा यात गुरफटलेला असून शिक्षणापासून कोसो दूर आहे. या समाजात मुलींना शिकविण्याबाबत प्रचंड उदासिनता आहे. मुलींना या जोखडातून बाहेर काढत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे याच समाजातील एक तरुणी… पपिता माळवे. शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग आहे हे यवतमाळच्या पपिता माळवेला नेमके समजलेय. फासेपारधी समाजातील पपिताला आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मोलमजुरी करत बारावीपर्यंतच शिकता आले. मात्र, शिक्षणापासून दूर असलेल्या स्वत:च्या समाजातील मुलींनी शिकण्यासाठी पपिता धडपडतेय. पाच वर्षांपूर्वी पपितानं प्रायोगिक तत्त्वावर काही मुलींची स्वत:च्या घरात राहण्याची, शैक्षणिक खर्चाची स्वखर्चाने सोय केली. तिच्या या पुढाकाराला समाजाने विरोध केला, पण तिसरीपर्यंतच शिकलेले तिचे पती ईशू यांनी साथ दिली. या दोघांनी मिळून ‘आम्ही साऱ्या सावित्रीच्या लेकी शैक्षणिक आश्रयालय’ सुरू केले आहे. वाघाडी येथील स्वमालकीच्या जमिनीवर तिने झोपडीवजा शेड बांधून मुलींच्या आश्रयाची सोय केली. पपिताच्या आश्रयालयात राहून आज पहिली ते दहावीच्या ४० मुली शिकत आहेत. पपिता घरोघरी फिरून पालकांचे मतपरिवर्तन करून मुलींना शैक्षणिक आश्रयालयात आणते. मुलींच्या शैक्षणिक प्रगतीवर त्यांचे पालकही खूश आहेत. स्वत:च्या कमाईतून बचत करून, विविध संस्थांच्या मदतीच्या जोरावर पपिताचे काम सुरू आहे. स्वत: अल्पशिक्षित असूनही पारधी समाजातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य पपिता माळवेने केले आहे.
दृश्यकलेच्या माध्यमातून आदिवासींचा आवाज
शहरीकरणाच्या रेट्यात जंगले कमी होत असून त्याचा फटका आदिवासींना, त्यांच्या संस्कृतीला बसतो. अशा वेळी आदिवासी समाज आणि संस्कृती, त्यांच्या समस्या दृश्यकलेतून मांडण्याचे काम करत आहे, डहाणूचा युवा दृश्यकलाकार (व्हिज्युअल आर्टिस्ट) प्रसाद मेस्त्री. चित्रकला, शिल्पकला, प्रतिष्ठापन (इन्स्टॉलेशन आर्ट) अशा वैविध्यपूर्ण कलाकृतींनी प्रसाद आदिवासी समाजाचे वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या कलाकृती निसर्गप्रेरित, आदिवासी पुराणकथा, आदिवासींचे जगणे यांवर आधारित असतात. प्रदर्शन, कलाशिबीर, कार्यशाळा, समाजमाध्यमे आदी विविध व्यासपीठांच्या माध्यमातून आपल्या कलेचे दर्शन प्रसाद कलाप्रेमींना घडवत असतो. त्याच्या कलाकृतींची देशाविदेशात अनेक प्रदर्शने झाली असून विविध पुरस्कारांचाही तो मानकरी झाला आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणांसह राज्याबाहेर दिल्ली, चंडीगड, हैदराबाद, चेन्नई या ठिकाणी आणि देशाबाहेर कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात प्रसादच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले, त्याला कलाप्रेमींनीही मोठ्या प्रमाणावर दाद दिली. गेली सहा वर्षे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील आदिवासींवर प्रसाद संशोधन करत आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या दृश्यकला शिष्यवृत्तीचा तो मानकरी ठरला असून के. के. हेब्बर पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्याचा सन्मान झाला आहे. माझ्या कलेतून आदिवासी समाजाचे स्वरूप व संस्कृती दाखविण्याचा आणि ती अनेकांपर्यंत पोहोचविण्याचा मी प्रयत्न करत आहे, असे प्रसाद सांगतो. दृश्यकलेच्या माध्यमातून प्रसाद आदिवासींचा आवाज बनला आहे.