दरवर्षी २५ सप्टेंबर हा जागतिक फार्मसिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. आधुनिक तंत्रज्ञान फार्मसी क्षेत्रात शिरले तरी फार्मसिस्ट व ग्राहक/ रुग्ण यांच्यातील नाते घट्ट आहे. आज भारतात ७ लाख केमिस्टची दुकाने व हजारोच्या संख्येत  हॉस्पिटल फार्मसिस्ट आहेत. त्याचा देशाचे आरोग्य सुधारण्यासाठी चांगला उपयोग करून घेता येईल, मात्र त्यासाठी सर्वाचीच मानसिकता बदलणे गरजेचे आहे.

..पांढऱ्या कोटातील फार्मसिस्ट हसतमुखाने रुग्णाचे स्वागत करतो. त्याची विचारपूस करून त्याच्याकडील प्रिस्क्रिप्शन घेतो. ते बघून रुग्णास काही प्रश्न विचारतो व बसण्याची विनंती करतो. प्रिस्क्रिप्शनमधील पाच-सहा औषधांची नावे संगणकात एन्ट्री करतो. एकमेकात आंतरक्रिया (इंटरॅक्शन) होणारी औषधे नाहीत ना, डोस योग्य आहे ना या बाबींची शहानिशा करतो. रुग्णाचा पूर्वेतिहास तपासतो (संगणकीय रेकॉर्डमधून) नंतर सहायकास सर्व औषधे काढण्यास सांगतो व स्वत: प्रत्येक औषधाचे नाव, मात्रा तपासून काही गोळ्यांच्या स्ट्रीपवर रुग्णाला सूचना देणारी, उदा.- ‘रात्री झोपताना एक गोळी’, ‘सकाळ-संध्याकाळ एक’ अशा आशयाची अगदी छोटी लेबल्स चिकटवतो. प्रत्येक औषधासंबंधीची सोप्या भाषेतील माहितीपत्रकाची प्रिंट काढतो. नंतर रुग्णास बोलावून प्रत्येक औषध दाखवून ते रोज किती वेळा, किती दिवस, कसे घ्यायचे व ते नेमके कशासाठी दिले आहे हे थोडक्यात सांगतो. काय खाद्यपदार्थ टाळावेत, काय खावे यासाठी सूचना देतो. रुग्णही त्याच्या सर्व शंकांचे समाधान करून घेतो. फ्लूची (व्हायरल ताप) लस टोचणीही आम्ही करतो, ही नवीन माहिती फार्मसिस्ट देतो. दुकानात मधुमेह, लठ्ठपणा, स्त्रीआरोग्य, व्यसनमुक्ती यासाठी सेवासुविधा उपलब्ध आहेत याकडेही लक्ष वेधतो. रुग्ण फार्मसिस्टला मनापासून धन्यवाद देतो.

.. मोठय़ा हॉस्पिटलमधील अंतर्गत (इन पेशंट्स) फार्मसी. त्यातील काही फार्मसिस्ट कॅन्सर रुग्णांसाठी सलाइनमिश्रित काही मिश्रण र्निजतुक विभागात बनवत असतात. मूत्रपिंडाचे काम खालावलेल्या एका रुग्णासाठी मात्रा ठरवण्याबाबत एका डॉक्टरांकडून विचारणा झालेली असते. त्या कामात एक फार्मसिस्ट गर्क असतो. एक ज्येष्ठ फार्मसिस्ट पेशंट वॉर्डमध्ये राऊंडसाठी जातो. डॉक्टर व तो सोबत राऊंड घेत प्रत्येक रुग्णाची औषध सारणी तपासून, औषध योजनेत काही फेरफार करायचा का यावर एकत्र विचारविनिमय करत असतात.

वरील वर्णन वाचून हे औषध दुकान व हॉस्पिटल भारतातील नसावे असा कयास बऱ्याच जणांनी केला असेल व तो अचूक आहेच. काही थोडे देशवगळता बहुतांशी देशांमध्ये थोडाफार फरकवगळता फार्मसिस्टच्या कामाचे स्वरूप वरीलप्रमाणे दिसते. हे सारे फार्मसीजगत आपल्यासाठी तसे फार अनोळखी, अनोखे आहे. फार्मसिस्टची भूमिका विस्तारत आहे व ती अधिकाधिक रुग्णाभिमुख होत आहे. व्यवसायातील बदलत्या घडामोडींचे, प्रगतीचे, समस्यांचे प्रतिबिंब परिषदांमध्ये नेहमीच बघावयास मिळते. नुकतीच ब्यूनोस आयर्स (अर्जेटिना) येथे जागतिक फार्मसी परिषद पार पडली. विस्मरण, वृद्धत्व, नैसर्गिक आपत्ती, अँटिबायोटिक रेझिस्टन्स, मनोविकार, आरोग्य साक्षरता, गरोदर माता व लहान मुले या व अशा अनेक विषयांवर येथे चर्चा झाल्या. वेगवेगळ्या देशांतील फार्मसिस्ट यासाठी काय काम करत आहेत व अजून फार्मसिस्टची भूमिका कशी समृद्ध होईल व समाजास अधिकाधिक फायदा मिळेल, या अनुषंगाने चर्चा झडल्या. तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्ण समुपदेशन कसे परिणामकारक करता येईल किंवा फार्मसिस्टच्या कामामुळे उच्च रक्तदाब/ मधुमेह/ अस्थमा अशा रुग्णांमध्ये कसे सकारात्मक बदल झाले याविषयीही चर्चा होत्या. अलीकडेच आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशनने ‘लसीकरण व फार्मसिस्टची भूमिका’ असा अहवाल प्रकाशित केला. वरील विषयांची जंत्री देण्याचे कारण फार्मसिस्टची भूमिका किती व्यापक होत आहे, औषध विक्री हा कामाचा गाभा असला तरी अनेक आरोग्यसेवा देणारे ‘हेल्थ आणि वेलनेस’चे केंद्र म्हणून फार्मसीकडे पाहिले जात आहे. फार्मसिस्ट हा रुग्ण व डॉक्टर यातील दुवा आहे. आरोग्यसेवेतील महत्त्वाचा घटक आहे व इतर आरोग्य व्यावसायिकांना फार्मसिस्टच्या ज्ञानाचा आदर व कामाची कदर आहे. या पातळीवर फार्मसी व्यवसाय नेऊन ठेवताना अनेक देशांमध्ये फार्मसिस्टना संघर्षांतूनही जावे लागले, अजूनही जावे लागते. पण एकंदर शिक्षण, कायदे, धोरणे, आर्थिक मोबदला याची अनुकूलता असल्याने फार्मसिस्ट आज एक ‘अत्यंत विश्वसनीय असे व्यावसायिक’ समाजाला वाटतो. इंटरनेट फार्मसी, टेलिमेडिसिन, रोबोटने काम असे आधुनिक तंत्रज्ञान फार्मसी क्षेत्रात शिरले तरी फार्मसिस्ट व ग्राहक/ रुग्ण यांच्यातील नाते घट्ट आहे. खरे तर ते अधिकाधिक समृद्ध होताना दिसत आहे. फार्मसिस्ट-रुग्ण यांच्यातील भावनिक बंधाकडे नेमकेपणाने लक्ष वेधणारे असे.  ‘फार्मसिस्ट : केअरिंग यू’ हे ब्रीदवाक्य या फार्मसिस्ट दिनाचे आहे. केअरिंग वा काळजी घेणे याची व्याख्या तशी कठीण, पण विल्यम केली व एलिएट सोगोल या लेखकद्वयाने लिहिलेल्या ‘द गुड फार्मसिस्ट’ या पुस्तकात ते म्हणतात, ‘दुसऱ्याला वेळ देणे, त्याची समस्या शांतपणे समजून घेणे, समस्येत रस दाखवणे, उपाययोजनेत सहभागी होणे म्हणजे केअरिंग व फार्मसिस्ट जेव्हा रुग्णाची काळजी घेतो तेव्हा रुग्णामध्ये निश्चितच सकारात्मक फरक पडतो.’

या सर्व पाश्र्वभूमीवर जेव्हा आपण भारतातील फार्मसी प्रॅक्टिसकडे नजर टाकतो तेव्हा एकदम हरवल्यासारखी स्थिती होते, प्रचंड पोकळी जाणवते. फार्मसिस्टची भूमिका जशी घडायला हवी तशी ती अजूनही घडलेली नाही. औषध दुकानात ‘विक्रेता’ व रुग्णालयात औषधे देणारा, औषधपुरवठा सांभाळणारा असेच काहीसे फार्मसिस्टच्या कामाचे स्वरूप राहिले. राज्यकर्ते, इतर आरोग्य व्यावसायिक, समाज यांना फार्मसिस्टची नेमकी ओळख नाही. इतके कशाला, स्वत: फार्मसिस्टना त्यांच्या क्षमतांची  किंवा त्यांच्या रुग्णकेंद्री भूमिकेची जाणीव अलीकडेच होऊ लागली आणि या परिस्थितीला जबाबदार सर्व संबंधित घटकच आहेत. शिक्षण, कायदे अंमलबजावणी, धोरणे, दूरदृष्टी, राजकीय इच्छाशक्ती, आरोग्य साक्षरता या व अशा अनेक आघाडय़ांवर आपण कमी पडतो. व्यवसायाचे धंदेवाईक स्वरूप राहिले व रुग्ण केंद्रबिंदू न राहता औषध एक विक्रीयोग्य वस्तू याभोवतीच व्यवसायाची रचना झाली. त्यामुळे औषधांच्या विक्रीखेरीज फार्मसिस्टने अधिक काही करावे, करू शकतो हे विचार अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत पुढेच आले नाहीत. काही राज्यांमध्ये तर अनेक दुकानांमध्ये व काही रुग्णालयांमध्येही फार्मसिस्टच उपस्थित नसतो. अशा ठिकाणी रुग्णाभिमुख सेवा, समुपदेशन फारच दूरची व अशक्यप्राय बाब आहे. महाराष्ट्रात त्या मानाने तुलनेने स्थिती निश्चितच बरी आहे.

अशा सर्व परिस्थितीतही जेव्हा जेव्हा फार्मसिस्टना काही सामाजिक उपक्रमांसाठी आवाहन करण्यात येते तेव्हा लक्षणीय संख्येने फार्मसिस्ट पुढे येतात, ही कौतुकास्पद बाब आहे. क्षयरोगाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होऊन टीबी रुग्णांना ‘डॉट्स’ची मोफत औषधे पुरवणे, रोगनिदान होण्यास मदत करते, जनजागृती अशी कामे दुकानाचा रोजचा व्याप सांभाळत आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न करता सामाजिक बांधिलकीतून हे कार्य फार्मसिस्ट आनंदाने व निष्ठेने करत आहेत. मोफत रक्तदान चाचणी, तंबाखू व्यसनमुक्ती, आरोग्य शिबिरे भरवणे अशीही काही रुग्णोपयोगी सेवा देण्याचा काही फार्मसिस्टचा सातत्याने प्रयत्न असतो. पण अशा ‘परिवर्तित’ फार्मसिस्टची संख्या सध्या तरी खूप कमी आहे व प्रवाहापेक्षा वेगळे काही करताना त्यांची अवस्था अनेकदा ‘त्रिशंकू’सारखी होते. हॉस्पिटलमधील काही फार्मसिस्टही नवे काही शिकण्यासाठी धडपडत असतात, पण त्यासाठी पोषक अशा सुविधा व धोरणे फारशी नाहीत.

‘फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया’ ही संस्था फार्मसी व्यवसाय व शिक्षणावर नियंत्रण ठेवते. कौन्सिलतर्फे जानेवारी २०१५ मध्ये ‘फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशन्स’ देशात प्रथमच जारी केले आहेत. यात कम्युनिटी फार्मसिस्ट (औषध दुकानातील फार्मसिस्ट) व हॉस्पिटल फार्मसिस्टच्या जबाबदाऱ्या व भूमिका याविषयी सविस्तर विवेचन आहे. फार्मसिस्टने करावयाच्या रुग्णाभिमुख भूमिकेला भारतात प्रथमच या नियमनामुळे एक कायदेशीर अधिष्ठान लाभले आहे व रुग्ण हा फार्मसीचा केंद्रबिंदू असावा या जागतिक विचारास भारतातही चालना मिळाली आहे. अर्थात, या विचारास मूर्त स्वरूप येण्यासाठी खूप मोठा पल्ला आपणास गाठावयाचा आहे.

एक जरूर नमूद करावेसे वाटते, केवळ परदेशात फार्मसी व्यवसायाचे स्वरूप वेगळे आहे व म्हणून आपल्याकडेही तसे असावे हा विचार येथे खचितच नाही. परदेशातील फार्मसीचे प्रारूप जसेच्या तसे आपल्या इथे शक्य होणारही नाही. पण आज भारतातील सामाजिक आरोग्याची स्थिती पाहिली तर फार्मसिस्टच्या भूमिकेला प्रचंड वाव आहे, नव्हे ती आता काळाची गरज आहे.

क्षयरोगाचे जगातील २५ टक्के ओझे आपल्या शिरावर आहे. मधुमेहाची आपण राजधानी आहोत. जगातील प्रत्येक सहावा मधुमेही भारतीय आहे. मनोविकार, वेगवेगळे साथीचे आजार, सांधेजन्य विकार सातत्याने वाढत आहेत. वृद्धांची संख्या आज १० कोटींहून अधिक आहे व २०५० साली साधारण २० टक्के भारतीय हे वृद्ध असतील. एकंदर हे सर्व आरोग्यव्यवस्थेचे प्रश्न न राहता ते सामाजिक प्रश्नच आहेत. औषधांचा खप प्रचंड प्रमाणावर वाढत आहे. औषधांचा अतिवापर, कमी वापर वा चुकीचा वापर यामुळे आजारपणातील समस्या अधिकाधिक गुंतागुंतीच्या होत आहेत. रुग्णांना औषधविषयक मार्गदर्शनासाठी फार्मसिस्टची व त्याच्या औषधतज्ज्ञ भूमिकेची नितांत गरज आहे. केवळ औषध साक्षरतेसाठी नव्हे, तर इतरही सर्व आजारांमध्ये समुपदेशन, रोगनिदान, जनजागृती यांसाठी फार्मसिस्टच्या कामाला भलताच मोठा वाव आहे. २०१२ मध्ये जेव्हा फार्मसिस्टना ‘राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात’ सामील करून घेण्याचे ठरवले गेले तेव्हा फार्मसिस्टच्या कामाने प्रभावित झालेल्या केंद्र शासनातील एका उच्च अधिकाऱ्याचे उद्गार बोलके आहेत, ‘आतापर्यंत रिटेल केमिस्टच्या दुकानांकडे आम्ही कधीही सार्वजनिक आरोग्यासाठी ते काही करू शकतील, या दृष्टीने पाहिलेच नाही, पण मुंबईत व महाराष्ट्रातील फार्मसिस्टने गेल्या काही वर्षांत क्षयरोगासाठी केलेल्या कामाने आमचे डोळे उघडले आहेत. आता क्षयरोगच का, मधुमेह, मलेरिया, कुष्ठरोग अशा अनेक राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात फार्मसिस्टना सहयोगी करून घ्यावयास हवे.’ अर्थात, त्यानंतर लगेच अपेक्षित घडते असे नाही. पण संबंधितांचा यासाठी पाठपुरावा मात्र जरूर चालू आहे. जर फार्मसिस्टना अधिक सक्षम व भूमिका सशक्त होण्यास पोषक वातावरण तयार झाले तर ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी फार मोठा फायदा होणार आहे. योग्य धोरणे व कायदे, परिपूर्ण रुग्णाभिमुख शिक्षण, फार्मसिस्टना योग्य आर्थिक मोबदला असे अनेक सकारात्मक बदल घडणे आवश्यक आहे.

आज भारतात ७ लाख केमिस्टची दुकाने व हजारोंनी हॉस्पिटल फार्मसिस्ट आहेत. इतके प्रचंड मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध आहे व त्याचा देशाचे आरोग्य सुधारण्यासाठी निश्चित उपयोग करून घ्यावयास हवा. मात्र त्यासाठी ‘वरपासून खालपर्यंत’ सर्वाचीच मानसिकता, दृष्टिकोन बदलणे व स्थित्यंतर घडवून आणण्यासाठी नेटाने संघटित प्रयत्न आवश्यक आहेत.

रुग्णहित जपणारे फार्मसिस्ट

ग्रामीण भागातील केमिस्टचे दुकान. साधारण पन्नाशीचा एक रुग्ण दुकानात येऊन अशक्तपणा, चक्कर येणे, खाज सुटणे अशा तक्रारी सांगतो व काहीतरी टॉनिक दे व क्रीम दे सांगतो. फार्मसिस्ट त्याला लगेच काही देत नाही. त्याचे वय, कौटुंबीक इतिहास विचारतो. त्याचे वजन तपासतो. कधी रक्तातली साखर तपासली,  या त्याच्या प्रश्नावर रुग्णाचे उत्तर ‘नाही’ असते. फार्मसिस्ट त्याला लगेच साखर तपासून घे असे सांगतो, पण रुग्ण तयार होत नाही. टॉनिक दे, मी जातो असे म्हणत राहतो.

*****

अखेरीस रुग्ण जिल्हा रुग्णालयात जातो व त्याची उपाशीपोटीची व जेवणानंतरची, दोन्ही साखर खूप जास्त असते. मधुमेहाचे निदान होते व उपचार चालू होतात. हे केवळ फार्मासिस्टने नि:स्वार्थीपणे लक्ष घातल्यानेच शक्य झाले.

गजबजलेल्या रुग्णालयातील भरपूर गर्दी असलेली ओपीडी फार्मसी. रुग्णांची भली थोरली रांग. फार्मसिस्टची धावपळ. फिट्सचा (आकडी येणे) एक रुग्ण डॉक्टरांची चिठ्ठी देतो. त्यात त्याच्या गोळ्यांसमोर १-०-० (दिवसाला एकच गोळी) असे लिहिलेले असते. फार्मसिस्टला आश्चर्य वाटते. कारण त्या गोळीचा डोस नेहमी २-०-२ किंवा २-१-२ (दिवस  व ४/५ गोळ्या) असा असतो. रुग्णाला आतापर्यंत पाचच गोळ्या रोज होत्या. त्याचा डोस कमी करायचा असेल तर तो हळूहळू कमी करत जावा लागतो. फार्मसिस्टने रुग्णास डॉक्टरांनी काही सांगितले आहे का गोळ्या कमी करतोय वगैरे असे विचारले. रुग्णाने नकारार्थी उत्तर दिले.

फार्मसिस्ट कामात खूप व्यस्त असतानाही ओपीडीत डॉक्टरांना आपली शंका चिठ्ठी लिहून कळवते. डॉक्टरांचा लगेच फोन येतो व ते २-०-२ (एकच गोळी पूर्वीपेक्षा कमी) असे हवे होते असा खुलासा करतात. रुग्ण परत डॉक्टरांकडे जाऊन चुकीची दुरुस्ती करून येतो व फार्मासिस्ट त्या गोळ्या रुग्णास देतो. अचानक पाचवरून एक गोळी जर रुग्णाने घेतली असती तर त्याला कदाचित परत आकडी येणे व इतर त्रास चालू झाला असता. फार्मसिस्टचे ज्ञान, तत्परता व अत्यंत बिझी असतानाही रुग्णाच्या काळजीने दाखवलेली तत्परता यामुळे पुढील अनर्थ टळला.

 

– प्रा. मंजिरी घरत

symghar@yahoo.com

Story img Loader