‘आंबेडकर विरुद्ध मूलनिवासी’ या लेखावर आक्षेप घेणाऱ्या बऱ्याच तीव्र प्रतिक्रिया आल्या. असभ्य व असंसदीय भाषेचा मुबलक वापर असलेल्या प्रतिक्रियाही त्यात होत्या. विवेक, तर्क आणि बुद्धीच्या दुष्काळात अशा शिवराळ शिवाराला चांगलाच बहर येतो, त्यात नवल वाटावे, असे काही नाही.
मूळ मुद्दा असा होता की, द्वेषावर आधारलेली कोणतीही विचारसरणी निषेधार्ह मानली पाहिजे. फुले-आंबेडकरांची चळवळ त्याविरोधात होती आणि आहे. बाबासाहेबांची चळवळ ही वर्गणीखोरांची चळवळ नव्हती, तर त्यांच्या चळवळीला विचारांचे, सिद्धांताचे अधिष्ठान होते. आर्य भारताच्या बाहेरून आले का, की ते इथलेच होते, अस्पृश्य मूळचे कोण होते, याचा त्यांनी शोध घेताना पारंपरिक सारे सिद्धांत खोडून नवे संशोधन मांडले. मात्र ‘बाबासाहेबांच्या नावाने कुणी तरी बामणी मेंदू असा खोडसाळ प्रचार करीत आहे,’ असा बामसेफ व मूलनिवासी संप्रदायाचा आरोप आहे. बहुजन सारे मूळ भारतातले आणि ब्राह्मण फक्त परके अशी मूलनिवासींची मांडणी आहे. त्यासाठी ते टिळक, नेहरू, सावरकरांच्या लेखनाचा आधार घेतात. ‘ब्राह्मण परकीय आहेत अशी मांडणी टिळक-नेहरू- सावरकर करतात, मग तुम्ही ते भारतीय आहेत, असे का म्हणता,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भारत मुक्ती मोर्चा हा राजकीय पक्ष नाही, तर आंदोलन करणारी संघटना आहे, याची जाणीव करून देऊन माझ्या माहितीच्या अज्ञानावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्नही टीकाकारांनी केला आहे.
भारत मुक्ती मोर्चा हा ‘राजकीय पर्याय देण्याचा प्रयत्न’ आहे, असे मी म्हटले होते, ‘राजकीय पक्ष’ नाही. लोकशाहीत न्याय मिळविण्यासाठी राजकीय सत्तेशी झगडा करावा लागतो, त्यासाठी निवडणुका लढविणारा राजकीय पक्षच हवा, अशी गरज नाही. १९२० ते १९३६ या काळात म्हणजे स्वतंत्र मजूर पक्षाच्या स्थापनेपर्यंत बाबासाहेबांनी परकीयांविरुद्ध व स्वकीयांविरुद्ध जो राजकीय संघर्ष केला, त्या वेळी त्यांचा कोणता राजकीय पक्ष होता? जगप्रसिद्ध राजकीय तत्त्ववेत्ता अॅरिस्टॉटल म्हणतो : मनुष्य हा स्वभावत: राजकीय प्राणी आहे. याचा अर्थ माणूस जन्माला आला की राजकीय पक्षांचे झेंडे घेऊन नाचायला सुरुवात करीत नाही. माहितीचे अज्ञान दूर करता येते, परंतु समजदारीचे दारिद्रय़ कसे दूर करायचे, हा खरा प्रश्न आहे. असो.
ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जोतिबा फुले यांना गुरू मानले, त्या फुल्यांनी आर्य बाहेरून आले असे म्हटले आहे, असा दाखला मूलनिवासीवादी देतात. त्यांना आंबेडकरांचा सिद्धांत खोटा ठरविण्यासाठी फुल्यांचा आधार घ्यावासा वाटतो, असे दिसते. परंतु बाबासाहेबांनी विचाराने स्वीकारलेले आदर्श होते, जातीच्या आधारावर नव्हते. आंबेडकरांनी स्वजातीतील संत चोखामेळ्याला गुरू मानले नाही, तर पूर्वाश्रमीचा क्षत्रिय असलेल्या बुद्धाला, निधर्मी कबिराला आणि बहुजनांतल्या फुल्यांना गुरू मानले. त्यांचा विचार महत्त्वाचा होता, जात महत्त्वाची नव्हती, किंबहुना माणुसकीचा विचार करणाऱ्याला जात असतच नाही. फुल्यांनी चातुर्वण्र्य व्यवस्थेवर कडाडून असूड ओढले. बुद्ध, फुले, कबीर यांनी विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले होते. ते विद्रोही होते, द्वेष्टे नव्हते. विद्रोहात नवनिर्मितीची अपेक्षा असते, द्वेषात नाशाची. म्हणून फुल्यांनी जीर्ण-अमानवी व्यवस्थेला सुरुंग लावताना, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे, अशी शिकवण देणारा सार्वजनिक सत्यधर्म निर्माण केला. काय म्हणतात जोतिबा-
धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वागावे ईशासाठी
ख्रिस्त, महंमद, मांग, ब्राह्मणासी, धरावे पोटाशी बंधुपरी,
निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी?
आणखी असे की,
मानवांचा धर्म सत्य हीच नीती, बाकीची कुनीती, जोती म्हणे.
फुल्यांचा विद्रोह नवसमाजनिर्मितीसाठी होता, विध्वंसासाठी नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. डॉ. आंबेडकरांनी हाच त्यांचा विचार स्वीकारला. मात्र ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ या ग्रंथात डॉ. आंबेडकरांनी आर्य-अनार्य संघर्षांचा- पर्यायाने फुल्यांच्या मांडणीचा कुठे आधार घेतलेला नाही. त्यामुळे मूळचे कोण व उपरे कोण, या संघर्षांत फुले-आंबेडकरांच्या विचारांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न मिथ्या आणि निष्फळ म्हणावा लागेल.
बाबासाहेब आंबेडकर हे समतावादी होते, ते कोणत्या जातीच्या विरोधात असतील का? जातिअंताच्या लढय़ात सुरुवातीला आणि अखेरच्या पर्वातही त्यांचे काही ब्राह्मण सहकारी नव्हते काय? लोकमान्य टिळकांचे पुत्र श्रीधर टिळक हे बाबासाहेबांचे निस्सीम भक्त होते. बाबासाहेबांच्या उपस्थितीतच त्यांनी पुण्याच्या टिळकवाडय़ात समाज समता संघाची स्थापना केली होती. संघटनेचा फलक लावताना त्यांनी चातुर्वण्र्य विध्वंसक समाज समता संघ असे ठळकपणे लिहिले. ‘समाजातील जातिद्वेषाची तीव्रता कमी करून प्रथम पूर्ण सामाजिक समता प्रस्थापित करण्याऐवजी, एकदम स्वराज्य सूर्याला पकडण्यासाठी अंतराळात उड्डाण करू पाहणारे दूरदर्शी पुढारी फजित पावल्याखेरीज राहणार नाहीत,’ हे श्रीधर टिळकांचे विचार प्रसिद्ध झाले आहेत. मग आता श्रीधरपंतांना कोणती जात लावणार?
डॉ. आंबेडकरांनी आर्य परकीय नव्हते, असे म्हटलेच नाही आणि आर्य व शूद्र एकाच वंशाचे होते, असेही म्हटलेले नाही. वंशभेदावर आधारित अस्पृश्यता निर्माण झाली नाही, असे बाबासाहेबांनी म्हटल्याचा काय पुरावा, अशीही विचारणा करण्यात आली.
बाबासाहेबांच्याच शब्दात समजून घेऊया- ‘मी याबाबतीत जो एक सिद्धांत मांडण्याचे धारिष्टय़ करणार आहे, त्या सिद्धांताच्या तीन बाजू खालीलप्रमाणे आहेत.
१) शूद्र पूर्वी आर्य होते.
२) शूद्र क्षत्रिय वर्णाचे होते.
३) शूद्रांचा क्षत्रिय वर्णात प्रबळ समाज होता..’
या तीन मुद्दय़ांच्या आधारावर आर्य बाहेरून आले, त्यांनी मूळच्या लोकांना म्हणजे अनार्याना जिंकून गुलाम केले हे युरोपीयन ग्रंथकारांचे व स्वकीय ग्रंथकारांचे सिद्धांत डॉ. आंबेडकर यांनी सप्रमाण खोडून काढलेले आहेत. परंतु एका वर्गाला परकीय ठरविण्यासाठी बामसेफ किंवा मूलनिवासींना टिळकांचा सिद्धांत प्रमाण वाटतो, त्याबद्दल आंबेडकर काय म्हणतात ते पाहा- ‘टिळकांचा सिद्धांत मौलिक आहे खरा, परंतु त्यात एक न्यून राहिले आहे. घोडा हे वैदिक आर्याचे आवडते जनावर होय. हे जनावर आर्याचे आयुष्य व धर्म यांच्याशी जाम जखडले होते. .. यावरून असे दिसते की, घोडय़ाला वैदिक आर्य धर्मात महत्त्वाचे स्थान होते. आक्र्टिक प्रदेशात वैदिक आर्याचा मूळचा प्रदेश असता तर तेथे घोडे अस्तित्वात असले पाहिजेत, परंतु आक्र्टिक्ट प्रदेशात घोडे होते काय? हा प्रश्न येथे उत्पन्न होतो. या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी मिळाले, तर आर्याचे मूळ स्थान आक्र्टिक्ट प्रदेशात होते, हा टिळकांचा सिद्धांत लंगडा पडतो.’ (शूद्र पूर्वी कोण होते?)
आता त्यावर बामसेफ वा मूलनिवासींचे असे म्हणणे आहे की, बाबासाहेबांचे हे लिखाण १९४८ पूर्वीचे आहे, त्यानंतर बरेच संशोधन झालेले आहे. मात्र बाबासाहेबांचे त्यासंबंधीचे विचार कालबाह्य़ झाल्याचे म्हणण्याचे त्यांचे धाडस होत नाही. परंतु आर्य वा अनार्य या संदर्भातील बाबासाहेबांच्या विचारात कुठेही संदिग्धता नाही. काठमांडू येथे २० नोव्हेंबर १९५६ ला त्यांचे ‘बुद्ध की कार्ल मार्क्स’ हे अखेरचे भाषण झाले. त्यात एका संदर्भात ते म्हणतात : बुद्धपूर्व काळात आर्यामधील वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये संघर्ष होत होता. त्यात जे हरले ते विस्थापित झाले. त्यांना परिव्राजक म्हणत. बुद्धाने त्यांना संघटित करून संघाच्या माध्यमातून धम्माचा प्रचार सुरू केला. याचा अर्थ बाबासाहेबांनी बाहेरून आलेल्या आर्याचा व इथल्या अनार्याचा झगडा होता, असे म्हटले नाही, तर आर्यामधीलच टोळ्यांमध्ये लढाया होत होत्या, असे नमूद केले आहे. (डॉ. आंबेडकर लेखन व भाषणे खंड-१७ वा). तरीही परके व मूळचे या आधारावर अभिजनविरुद्ध बहुजन असा संघर्ष उभा करण्याचा कशासाठी अट्टहास केला जात आहे?
या देशातील मूळचे कोण व परके कोण हा वाद घालून द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना बाबासाहेब त्यांच्या समाजशास्त्रीय संशोधनात काय म्हणतात, एवढाच महत्त्वाचा उद्देश माझ्या मूळ लेखामागे होता. इतर संशोधक काय म्हणतात, हा माझ्या लेखनाचा विषय नव्हता. दुसरे असे की, माझ्या लेखाचे शीर्षक ‘आंबेडकर विरुद्ध मूलनिवासी’ असे आहे, टिळक विरुद्ध मूलनिवासी असे नाही. त्यालाही कुणाचा आक्षेप असेल तर मूलनिवासी संप्रदायाचा विचाराधार कोणता, हे एकदा जाहीर करून टाकावे.
बरे, बाबासाहेबांच्या सिद्धांताबद्दल काही मतभेद असू शकतात, परंतु मूळ मुद्दा आहे तो द्वेषावर आधारलेली चळवळ का करावी, हा.
आंबेडकरी चळवळ ही जातीयवादाच्या विरोधात आहे, कोणा एका समाजाच्या विरोधातील नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली. घटनेच्या प्रस्तावनेत आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असा निर्धार केला आहे. आम्ही भारताचे लोक म्हणजे बहुजन किंवा अभिजन वगळून तिसरे कोणी आहेत का? जन्मावर आधारित उच्च-नीचता मानण्यावर घटनेने बंदी घातली आहे, मग वंशाधारित भेदभाव निर्माण करणे ही बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या घटनेच्या विरोधातील कृती नव्हे काय?