बरेचदा अध्यात्माची वाटचाल सुरू होते आणि काही काळानं आपण कोणत्या ध्येयानं ही वाटचाल सुरू केली आहे, याचंच अवधान सुटण्याचा मोठा धोका असतो. श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात की, ‘‘आपल्याला साधायचे काय हे ध्यानात धरले पाहिजे. परमात्मा साधायचा आहे आणि शरीर व प्रपंच ही साधने आहेत, हे पक्के समजावे. आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो, म्हणून आपले चुकते.’’ परमात्मा साधायचा आहे, याचाच अर्थ परमात्म तत्त्वाशी एकरूप असलेला संत जसा निर्भय, नि:शंक, निश्चिंत असतो, सदा आनंदात निमग्न असतो, ती स्थिती साधायची आहे. तेच आपलं ध्येय आणि लक्ष्य आहे. तेव्हा ती स्थिती साध्य आहे आणि ती साधण्यासाठीची जी साधनं आपल्याकडे आहेत ती म्हणजे आपला देह आणि या देहाला धरून असलेला प्रपंच! म्हणजे काय? तर देह हा साधनेसाठी आवश्यक आहे आणि म्हणूनच तो देह सुदृढ राखला पाहिजे. त्या देहाला दोन वेळचं खाणं मिळावं यासाठी उपजीविकेचं काम केलं पाहिजे. त्या देहाला निवारा मिळावा म्हणून घर असलं पाहिजे. त्या देहाला नेसण्यासाठी वस्त्रंप्रावरणं घेतली पाहिजेत. त्या देहाच्या जपणुकीसाठी आणि त्या देहाशी रक्ताच्या नात्यानं जी नाती जोडली गेली आहेत त्यांच्याबाबतच्या कर्तव्यपालनासाठी काही पैसा गाठीला असला पाहिजे. तेव्हा देह आणि देहाचा प्रपंच याबाबत इतपत किमान काळजी घेऊन त्या देहाचा उपयोग परमात्मप्राप्ती अर्थात परमानंद स्थितीच्या प्राप्तीसाठी करायचा आहे. तेव्हा देह आणि देहाचा प्रपंच हे त्या अध्यात्मासाठीचे साधन मात्र आहे. पण होतं असं की कालांतरानं साधन हेच साध्य होतं आणि साध्य हे साधन होतं! म्हणजे काय? तर देह आणि त्याचा प्रपंच हे साधन असताना आणि परमात्मलयता हे साध्य असताना, त्या देहाचा आणि प्रपंचाचा सांभाळ हेच साध्य होऊन बसतं आणि त्यासाठी भक्ती, परमात्मलयता हे साधन होऊन जातं! देवाची भक्ती ही देहासाठी होते. एकप्रकारे देवभक्तीचा पाया देहभक्ती हाच होऊन जातो. श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात की, ‘‘ एका गृहस्थाला मुलाबाळांसह मुंबईला जायचे होते. आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुले गाडीत बसली, पण गृहस्थ मुंबईस जाण्यासाठीच गाडीत बसला. गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले. त्या गृहस्थाला नाही वाटले.’’ म्हणजे प्रवासाचा हेतू मुक्कामाला पोहोचणे, हा होता. त्यात प्रवासातल्या सुख-दु:खाला फारसं महत्त्व नव्हतं. मुक्कामाला पोहोचण्याच्या आनंदापुढे प्रवासातले कष्ट नगण्यच आहेत, हे मुक्कामाचा शुद्ध हेतू ज्याच्या मनात असतो तो जाणून असतो. ज्यांना प्रवासातच आनंद वाटतो त्यांना मुक्कामाचं महत्त्वच पुरेसं जाणवलं नसतं. म्हणून मुक्कामाला पोहोचण्याऐवजी प्रवासातच त्यांना आनंद वाटतो. तेव्हा आपलं ध्येय मुक्काम गाठणं आहे. त्या ध्येयाकडे नेणारी वाट मन:पूर्वक चालायची आहेच, पण चालण्यातच गुंतून पडायचं नाही. प्रपंचात राहूनच परमार्थ साधायचा आहे, पण प्रपंचातच अडकून परमार्थाला प्रपंचसुखाचे साधन होऊ द्यायचे नाही. श्रीमहाराज सांगतात की, ‘‘जमीन सोडून कुणाला राहाता येत नाही, त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही. पण त्यात ‘राम कर्ता’ मानून वागणारा तो पारमार्थिक, ‘मी कर्ता’ असे मानून वागणारा तो प्रापंचिक!’’ आपल्याला खऱ्या अर्थानं पारमार्थिक व्हायचं आहे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा