जो ‘जाणता राजा’ असतो त्याला सर्वच जाणता आले पाहिजे. मग ते रण युद्धाचे असो वा राजकारणाचे, राजाला जाण नसेल तर किल्ले धारातिर्थी पडतात. महाराष्ट्रात पाच दशकांचे राजकारण पाहणाऱ्या शरद पवारांना हातचे किल्ले कसे वाचवायचे आणि हातून गेलेले किल्ले परत कसे मिळवायचे याचा प्रदीर्घ अनुभव आहे. चातुर्य हे तर पवारांचेच पर्यायी नाव वाटावे इतके ते त्यांच्याशी एकरूप झाले आहे. निवडणुकीच्या मैदानातील पवारांचे हे चातुर्य दरवेळी महाराष्ट्र अनुभवतच असतो. पण, राजकीय मैदानाबाहेरही पवारांचे हे चातुर्य प्रयोग सुरूच असतात. चातुर्याचा हा नवीन अध्याय घडला तो दिल्लीच्या साहित्य संमेलनात.
पवार हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष. अनेकांनी विनवण्या करूनही सहा दशकांच्या राजकीय कारकिर्दीत पवारांनी मात्र कधीही स्वागताध्यक्षाची जबाबदारी स्वीकारली नाही. संमेलन दिल्लीत होतेय म्हटल्यावर मात्र पवारांचे हे अघोषित प्रण मागे पडले. आता पवार स्वागताध्यक्ष असतील आणि संमेलन ऐतिहासिक होणार नसेल तर संमेलनाला पवारांशी जोडून अर्थ काय? म्हणून पवारांनी हा प्रश्नच उपस्थित होऊ दिला नाही. २०१४च्या नवीन स्वातंत्र्यानंतर देशात काहीही ऐतिहासिक करायचे असेल तर त्याचे नाव पंतप्रधानांशी जोडा.पुढे वेगळे काही करायची गरजच नाही. अशी ऐतिहासिक दूष्टी तर पवारांच्या अंगभूत गुणांपैकी एक. अंगभूत गुणाचा कौशल्यपूर्ण वापर करून त्यांनी मोदींना थेट संमेलनाच्या उदघाटनाला आणले आणि नेहरूंच्या ७० वर्षांच्या ऐतिहासिक विक्रमाच्या समकक्ष उभे केले. मोदी संमेलनाला आले याचे निर्विवाद श्रेय पवारांचे. त्यामुळे मोदी हे पवारांचे पाहुणे आणि पाहुण्यांना वाईट बोलता येत नाही. पण, एरवी कुठल्याही सापडयातून तेल लावलेल्या पैलवानासारखे निसटणारे पवार संमेलनाच्या मंचावर मात्र आपल्याच सापळयात अडकले. स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी जे छापील भाषण तयार केले त्याच्या शेवटच्या पानावर एक ओळ होती…‘‘भोवताली वणवा पेटला असताना आत्ममग्न राहणाऱ्यांना काळ माफ करणार नाही’’. पवार हेच भाषण वाचत होते. त्या ओळीपर्यंतही ते आले. परंतु. मध्येच त्यांचे डोळे चमकले. ही ओळ वाचली तर माध्यमांचे मथळे काय असतील, हे राजकीय मैदानातील पारंगत पवारांनी बरोबर ओळखले आणि ती ओळ तशीच सोडून त्यांनी पूर्ण भाषण वाचले. हा भाषणाचा खर्डा पवारांच्या डोळयापुढून गेला नसेल, असे होऊच शकत नाही. पण, मग ही ओळ भाषणात आली कशी? पवारांनीच ती टाकली का? आणि टाकलीच असेल तर ऐनवेळी गाळली का? याचे उत्तर पवारच देऊ शकतील. पण…
पवार ते देणार नाहीत. कारण, वर म्हटल्याप्रमाणे ‘जाणता राजा’ सगळेच जाणत असतो. राजाला जाण नसेल तर किल्ले धारातिर्थी पडतात. उरलेले किल्ले धारातिर्थी पडणे पवारांना परवडणारे नाहीच.