गेली शंभर अधिक वर्षे आपण वाचनसंस्कृती आकसण्याच्या बिनबुडाच्या वांझोटय़ा चर्चा ऐकून किटलो असू. ‘हल्लीची पिढी वाचत नाही’, ‘टीव्हीने वाचनसंस्कृती धोक्यात आली’, ‘संगणक, इंटरनेट, मोबाइलने वाचक हरविले’ ही सरधोपट, पारंपरिक विधानेही नको इतकी माथी मारली जात आहेत. या ‘चर्चिल’ विधानांवरून असा ग्रह होईल की, अस्तंगत झालेल्या मोहेंजोदडो, हडप्पा संस्कृतींचीच ‘वाचनसंस्कृती’ नामे आवृत्ती आहे की काय? खरी गोष्ट अशी आहे की तंत्रज्ञानाचा विस्तार, माध्यमांचा विकास यांनी कधी नव्हे इतके लोक वाचू लागले आहेत. पूर्वी शाळा, कॉलेज सुटल्यानंतर वाचनाशी काडीमोड घेणारे आता मात्र वाचनाशिवाय जगूच शकत नसल्याचे दिसत आहे. खरे नसेल वाटत, तर या नव्या वाचनप्रवाहाच्या आढाव्याला जाणून घ्या..
वाचन या प्रकाराबाबत आपल्याकडे जितके अपसमज असतील, तितके कुठल्याच गोष्टीबद्दल नसावेत. ‘हल्लीची पिढी वाचत नाही’ हे ठेवणीतले वाक्य म्हणायला गेल्या पिढीतले होण्याचीही गरज लागत नाही, इतके ते वाक्य फॅशनग्रस्त आहे. एकीकडे मुलांना झाडून इंग्रजी शाळेत टाकले, त्या साहित्यधुरिणींना मराठी पुस्तकांचे वाचन कमी होत असल्याच्या चिंतेने ग्रासले आहे. त्यांची मुले इंग्रजी पुस्तकांचा फडशा पाडूनही मग वाचनसंस्कृतीचा भाग होत नाहीत. मराठी पुस्तकांचा ग्रंथव्यवहार शतपटींनी वाढला असला, तरी ‘पुस्तक कोण घेतो?’ अशा वांझोटय़ा गर्जना साहित्य संमेलनांमध्ये निघतात. बरे या साहित्य संमेलनातच पुस्तक खरेदीच्या कोटय़वधी उलाढालींच्या बातम्या वृत्तपत्रवाले छापून साहित्यिकांच्या वेळकाढू चर्चाची बोंब करून टाकतात. म्हणजे मराठीत वाचले, मराठी पुस्तकांची उलाढाल झाली की वाचनसंस्कृती टिकते आणि इंग्रजीत वाचणारे ‘रीडिंग कल्चर’ नामे काही भलतेच करतात की काय, असे वाचन कमी झाल्याचे गळे काढणाऱ्या चिंतातूर चर्चिलांना ऐकून कुणाचाही होऊ शकेल. माध्यम क्रांती आणि तंत्रज्ञान क्रांतीचा घटक झालेल्या प्रत्येकालाच झक्कत वाचक बनावे लागत असल्याच्या चित्राकडे या चर्चिलांची नजरच नाही असे स्पष्ट होते. विद्यार्थी पूर्वी संदर्भ ग्रंथ वाचत, आता त्या जोडीला संदर्भ लिंक्सचा खजिना त्यांच्याकडे उपलब्ध आहे. साहित्यप्रेमींना जगभरातील अभिजात, समांतर साहित्याचे दार तंत्रज्ञानाने इतके उघडे केले आहे की त्यापुढे अलिबाबाच्या गुहेतील काल्पनिक धन थिटे ठरावे. लोक मोबाइलमध्ये, संगणकावर ब्लॉग, मॅसेज, माहिती, फॉरवर्डेड माहिती, बातम्या वाचण्यात गढून गेले आहेत. टीव्हीवरच्या कॅप्शन, गॅझेट्सवरच्या आज्ञावल्या, ई-बुक्स, पीडीएफ- इपब, मोबी आणि कैक माध्यमांतून ग्रंथशरण झाले आहेत. आजची पिढी कालबाह्य़ पुस्तके ५० रुपयांत घेण्यासाठी गर्दी करीत आहे. किलोवर इंग्रजी पुस्तके घेण्यासाठी झुंबड उडत आहे. आणि पुस्तकांची दुकाने सवलतींची बरसात करूनही झोक्यात उभी आहेत. वाचनसंस्कृती आक्रसली असती, तर ती सुरू तरी राहिली असती का, असा प्रश्न पडतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा