१० मार्चच्या ‘लोकसत्ता’मध्ये मधु कांबळे यांनी लिहिलेला ‘आंबेडकर विरुद्ध मूलनिवासी’ या लेखातील मुद्दे मूलगामी व स्युडो आंबेडकरवाद्यांचे पितळ उघडे पाडणारे आहेत. बाबासाहेबांचे नाव घेऊन त्यांच्याच विचारांना फाटा देणारे बुद्धिजीवी, आंबेडकरवादाला कोणत्या दिशेने नेत आहेत, हे अचूकपणे दाखवण्याचे कार्य श्री. मधू कांबळे यांनी या लेखातून केलेले आहेत. हे करत असताना या स्युडो आंबेडकरवाद्यांच्या वर्गीय चरित्राचेही सटीक विश्लेषण कांबळेंनी केलेले आहे.
जातिव्यवस्थेविषयी बाबासाहेबांनी केलेल्या विश्लेषणासंदर्भात कांबळे यांनी ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ आणि ‘अस्पृश्य मूळचे कोण होते?’ या दोन शोधप्रबंधांचे दाखले दिले आहेत. त्याव्यतिरिक्त बाबासाहेबांच्या ज्या दोन शोधप्रबंधांना आंबेडकरवादाचे मूलस्रोत म्हटले जाते, त्या ‘भारतातील जाती’ आणि ‘जाती निर्मूलन’ या शोधप्रबंधांमध्ये बाबासाहेबांनी अत्यंत सखोल, वैज्ञानिक तरीही सर्वसामान्यांना सहज समजेल अशा पद्धतीने जातींची निर्मिती कशी झाली? त्यांचे निर्मूलन करण्याचा मार्ग कोणता? या विषयी मांडणी केलेली आहे. आणि जातींच्या निर्मितीची प्रक्रिया बाबासाहेबांच्या हजारो वर्षे आधीच पूर्ण झाली होती. तेव्हा बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर, काळानुरूप त्यात काही बदल झाला असेही म्हणता येणार नाही. याचाच अर्थ ती मांडणी नाकारून भलतेच काहीतरी मांडणाऱ्यांना एकतर बाबासाहेबांची मांडणी मान्य नाही किंवा ती त्यांना समजली नाही. म्हणूनच त्या मांडणीकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करून ‘मूलनिवासी’ ही संकल्पना निर्माण करणाऱ्या विचारवंतांना स्युडो आंबेडकरवादी म्हणावे लागते.
जातींच्या उत्पत्ती संदर्भात बाबासाहेब लिहितात, ‘‘भारतातील लोकसंख्या आर्य, द्रविड, मंगोलियन आणि शिथिअन या वंशाच्या मिश्रणाने बनलेली आहे. हे लोकसमूह वेगवेगळ्या दिशांनी भिन्न भिन्न संस्कृतींसह शेकडो वर्षांपूर्वी भारतात आले, त्या वेळी त्यांची राहणी भटकी होती. यापकी प्रत्येक टोळी भारतात क्रमश: घुसली आणि तेथील लोकांशी लढाई करून तेथे तिने आपला जम बसविला. त्यानंतर मात्र ते शेजाऱ्याप्रमाणे शांततेने राहू लागले. नित्य संबंध आणि पारस्पारिक व्यवहारामुळे त्यांच्यात एका संस्कृतीचा उदय झाला, आणि तीत त्यांच्या भिन्न संस्कृतीचा लोप झाला. भारतात आलेल्या या विभिन्न वंशातील लोकांचे पूर्णत: एकत्रीकरण झालेले नाही, ही गोष्ट मान्य करावीच लागते. कारण,
भारताच्या सीमांमध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे व दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशाला शरीररचनाच नव्हे, तर लोकांच्या वर्णामध्येसुद्धा लक्षात येण्याजोगा फरक आढळतो. तथापि एखाद्या लोकसमूहाच्या एकत्वासाठी केवळ वेगवेगळ्या वंशाच्या लोकांचे पूर्णत: एकत्रीकरण होणे, हा मुद्दा पुरेसा होऊ शकत नाही. वंशशास्त्रदृष्टय़ा या सर्व लोकसमूहांच्या एकत्वासाठी केवळ सांस्कृतिक ऐक्य हेच त्यांच्या एकत्वाचे गमक असते. हे विधान मान्य झाल्यास मी असे धाडसी विधान करू इच्छितो, की लोकांच्या सांस्कृतिक एकतेच्या बाबतीत दुसरा कोणताही देश भारताची बरोबरी करू शकत नाही. भारत केवळ भौगोलिकदृष्टय़ाच एक आहे, असे नव्हे, तर एकतेच्या इतर कोणत्याही गमकापेक्षा भारतात अधिक मूलभूत असलेली सांस्कृतिक एकता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आढळून येते. परंतु या एकतेमुळेच जातिसमस्येचे स्पष्टीकरण करणे अधिकच बिकट होते. भारतीय समाज हा जर केवळ परस्परापासून भिन्न अशा जातींचा समूह असता, तर हा विषय अतिशय सोपा झाला असता. परंतु आधीच एकसंध असलेल्या समाजाचा जात हा एक तुकडा आहे, म्हणूनच जातींच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण बिकट ठरते. पुढे बाबासाहेब असेही म्हणतात की, ‘वस्तुत: भारतातील जातिव्यवस्था वेगवेगळ्या वंशातील रक्त आणि संस्कृती यांचे मिश्रण झाल्यानंतर अस्तित्वात आली. जातिभेद म्हणजे वंशभेद होय असे समजणे, आणि वेगवेगळ्या जाती म्हणजे वेगवेगळे वंश होय, असे मानणे वस्तुस्थितीचा आडमुठा विपर्यास करणे होय. मद्रासच्या आणि पंजाबच्या ब्राह्मणांमध्ये असे कोणते वांशीय सादृश्य आहे? मद्रासच्या आणि बंगालच्या अस्पृश्यांमध्ये असे कोणते वंशीय सादृश्य आहे? पंजाबचा ब्राह्मण आणि पंजाबच्या चांभारामध्ये असा कोणता वंशीय भेद आहे? मद्रासचा ब्राह्मण आणि मद्रासचा परिया यामध्ये अशी कोणती वंशीय भिन्नता आहे? पंजाबचा ब्राह्मण पंजाबचा चांभार ज्या घराण्यातला आहे, त्याचाच एक वंशज आहे. आणि ज्या घराण्यातील मद्रासचा परिया आहे, त्याच घराण्याचा वंशज मद्रासचा ब्राह्मण आहे. जातिव्यवस्था वंशभेदाची परिसीमा दर्शवीत नाही. जातिभेद हे एकाच वंशाच्या लोकांचे पाडलेले सामाजिक विभाग होत.’
जाती निर्मूलनाच्या मार्गाविषयीही या लोकांच्या मांडणीचा बाबासाहेबांनी अखंड परिश्रमातून शोधून काढलेल्या मार्गाशी सुतराम संबंध नाही. बाबासाहेब आपल्या ‘जाती निर्मूलन’ या ग्रंथात म्हणतात, ‘मला तुमच्या मनावर एक गोष्ट िबबवायची आहे, ती म्हणजे मनूने हा जातीचा कायदा तयार केला नसून, तो तसे करूही शकला नसता. अस्तित्वात असलेले जातीचे नियम संकलित करण्यात व जातिधर्माचा उपदेश करण्यातच त्याचे कार्य संपुष्टात आले. जातीचा प्रसार व वाढ करण्याचे काम इतके अवाढव्य आहे, की ते एखाद्या व्यक्तीच्या किंवा वर्गाच्या सामथ्र्य व धूर्तपणापलीकडचे आहे. ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या, या विचारसरणीतही असाच युक्तिवाद करण्यात येतो. मनूच्या बाबतीत मी जे सांगितले आहे, त्यानंतर वैचारिकदृष्टय़ा ही विचारसरणी चुकीची असून उद्देश्यत: द्वेषमूलक आहे; एवढे सांगितले म्हणजे आणखी काही विशेष सांगण्याची गरज नाही.’’ व्यक्तींचा किंवा समूहाचा द्वेष करून जाती संपणार नाहीत, तर त्यांचा आधार असलेल्या धर्मशास्त्रांचे फोलपण लोकांसमोर उघडे करून ते शक्य होईल. पण आज बहुजन समाज हा ब्राह्मणांच्या विरोधात जरी एकत्र येतो आहे असे भासत असले. तरी तो हिंदू धर्मशास्त्रांकडे अधिकाधिक आकृष्ट होताना दिसतो आहे. नित्यनवीन बाबांच्या मागे तो लागताना दिसतो आहे. म्हणजे ब्राह्मणांना सत्तेपासून दूर करून त्यांच्या जागी कोणताही समूह आला आणि समाजाचा आधार मात्र त्याच धर्मशास्त्रांचा राहिला तर काय फरक पडणार. आणि मधू कांबळे म्हणतात त्याप्रमाणे या स्युडो आंबेडकरवाद्यांना जाती मोडायच्या आहेत? की केवळ जोडायच्या आहेत? यातील फरकाने काय फरक पडू शकतो हे आपण धर्माच्या संदर्भात अनुभवतच आहोत. आमचे संविधान धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना मांडते. पण आम्ही ‘धर्मनिरपेक्षते’ऐवजी ‘सर्वधर्मसमभाव’ अंगीकारला, आणि त्याची फळे गेली साठ वर्षे भोगत आहोत. धर्मनिरपेक्षतेप्रमाणे राज्यव्यवस्था, शिक्षण आणि नीतिमूल्ये या बाबतीत कुठल्याही धर्माची ढवळाढवळ नसावी. पण सर्वधर्मसमभावामुळे या तीनही बाबतींत सर्व धर्माना समान ढवळाढवळ करण्याचा अधिकार मिळतो. पण बहुसंख्येच्या बळावर कुठलाही धर्म आपले वर्चस्व गाजवू शकतो हा जगाचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे जाती केवळ जोडण्याचा प्रयत्न झाला, तर त्याच जन्माधारित अधिकारांच्या शास्त्रांप्रमाणे त्यांच्यात ऐक्य कधीच होऊ शकणार नाही. आणि हेच नेमके आजच्या सत्ताधारी वर्गाना हवे आहे.
आंबेडकरवाद विरुद्ध स्युडो आंबेडकरवाद!
१० मार्चच्या ‘लोकसत्ता’मध्ये मधु कांबळे यांनी लिहिलेला ‘आंबेडकर विरुद्ध मूलनिवासी’ या लेखातील मुद्दे मूलगामी व स्युडो आंबेडकरवाद्यांचे पितळ उघडे पाडणारे आहेत. बाबासाहेबांचे नाव घेऊन त्यांच्याच विचारांना फाटा देणारे बुद्धिजीवी, आंबेडकरवादाला कोणत्या दिशेने नेत आहेत, हे अचूकपणे दाखवण्याचे कार्य श्री. मधू कांबळे यांनी या लेखातून केलेले आहेत.
आणखी वाचा
First published on: 17-03-2013 at 12:08 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambedkar deeply formulate indian caste system and cast extermination