खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले ‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा सातबारामध्ये..
पुढील रविवारी
नगर, मावळ
केवळ पवार- प्रभावाची परीक्षा!
जवळपास गेली तीन दशके बारामती मतदारसंघाची खासदारकी पवार घराण्यातच राहिली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या सहापैकी फक्त एका विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार आहे. युती आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. दौंडचे अपक्ष आमदार राष्ट्रवादीसोबत आहेत. अशी राजकीय परिस्थिती असली तरी बारामती लोकसभा मतदारसंघावर पवार यांचाच पगडा राहिला आहे. अगदी विरोधकही बारामतीची जागा निवडून येण्याची शक्यता गृहीत धरत नाहीत. शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतरे हे या वेळी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढण्याच्या तयारीत आहेत. पवारविरोधी वातावरणाचा लाभ उठविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गेली साडेचार वर्षे सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघात चांगला संपर्क ठेवला. आठवडय़ातील तीन दिवस मतदारसंघात दौरा करण्यावर त्यांचा भर असतो. त्यांच्या स्वभावाबद्दल काही जणांच्या तक्रारी असल्या तरी पवार यांची कन्या असल्याने पक्षाची सारी यंत्रणा त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. गेल्या निवडणुकीत सुप्रिया यांना सव्वातीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते. यंदा ते वाढते की घटते यावरच पवार कुटुंबीयांचा बारामतीवर कितपत प्रभाव आहे हे स्पष्ट होईल. यामुळेच मताधिक्य वाढले नाही तरी किमान कायम राहावे हा दादांचा प्रयत्न राहील.
लोकसभा मतदारसंघ : बारामती
विद्यमान खासदार : सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस
मागील निकाल : भाजपच्या कांता नलावडे यांचा पराभव.
जनसंपर्क
मतदारसंघात विविध घटकांशी सातत्याने संपर्क. स्त्री-भ्रूणहत्या विरोधात जनसंपर्क व राज्यभर पदयात्रा. युवतींसाठी मेळावे, बचतगटांना बळ देण्याच्या ‘यशस्विनी अभियाना’द्वारे महिलांशी व्यापक संपर्क.
मतदारसंघातील कामगिरी : ’स्वत:च्या व इतर खासदार निधीतून २० कोटी ७० लाख रुपयांची कामे.
*पुरंदर उपसा योजनेचा तिसरा पंप कार्यान्वित करण्यात यश.
*जलसंधारण : नाला खोलीकरण, सलग समतल चर, विहीर पुनर्भरण, गाळ काढणे आदी कामांमुळे गावागावांत पाणी.
*प्रत्येक तालुक्यात आयटीआय व वसतीगृह.
*अपंग हक्क व विकासासाठी प्रयत्नशील; ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानपूर्वक जीवनासाठी प्रयत्न.
एकूण उपस्थित केलेले प्रश्न ७०४, तारांकित ६६, अतारांकित ६३८, ३९ वेळा चर्चेत सहभाग. एकूण हजेरी-२९२ दिवस (३३५ दिवसांपैकी)
लोकसभेतील कामगिरी
लोकसभेत मांडलेले महत्त्वाचे प्रश्न
*मुलींसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाबाबत विधेयक (२०१०) आणले. स्त्री-पुरुष प्रमाणाचा समतोल राहावा यासाठी स्त्री-भ्रूणहत्येवर बंदी आणणाऱ्या सध्याच्या कायद्यांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी.
*किनारपट्टी सुरक्षाव्यवस्थेसाठी महाराष्ट्र सरकारला अतिरिक्त निधी देण्याची गरज. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी महाराष्ट्र सरकारच्या योजनेला मान्यता देणे.
*गर्भवती महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे तसेच आरोग्यविषयक सुविधांचा हक्क मिळवून महिलांना सकस आहार मिळावा यासाठी पाठपुरावा.
खासदारकीचा अर्थच समजला नाही
सुप्रिया सुळे खासदार म्हणून पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत. दिल्लीत कोणी विचारत नसल्याने त्या स्थानिक पातळीवर फिरताना दिसतात. पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना भेटी देणे हे खासदाराचे काम नाही. त्यांनी दुष्काळनिवारण, केंद्रीय रस्ते निधी, पंतप्रधान ग्राम सडक योजना, एकात्मिक पाणलोट क्षेत्र यांसारख्या धोरणनिर्मितीच्या मुद्दय़ांकडे लक्ष देणे अपेक्षित होते.
विजय शिवतरे, शिवसेना
पुढचे लक्ष्य शिक्षण, आरोग्य
खासदारकीच्या काळात माझी कामगिरी कशी झाली हे स्वत: मी सांगणे योग्य होणार नाही. त्याचे मूल्यमापन मतदारच करतील. ग्रामीण भागात आतापर्यंत पाणी, वीज, रस्ते अशा मागण्या होत होत्या. परंतु, त्या पूर्ण झाल्यावर आता इंजिनीअरिंग-मेडिकल महाविद्यालयांची मागणी होत आहे. या गोष्टींची पूर्तता सर्वाच्या मदतीने करायची आहे. शिक्षण व आरोग्याच्या सुविधांचा दर्जा सुधारणे, लोकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी पुन्हा संधी हवी आहे.
सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस</span>