लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले तडफदार आणि लाडके उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद आजपासून दर रविवारी.. खासदारांचा
सातबारा मध्ये..
मुत्तेमवारांचे प्रगतिपुस्तक कोरेकरकरीत
विलास मुत्तेमवार हे लागोपाठ चार वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. पूर्वी तीन-वेळा चिमूर मतदारसंघातून मिळालेला विजय जमेला धरता त्यांची ही सातवी टर्म आहे. यूपीए-१ मध्ये केंद्रीय राज्यमंत्रिपद तर गेली दोन वर्षे काँग्रेसचे अ. भा. सरचिटणीसपद भूषविले असले, तरी मुत्तेमवार हे स्वत:चा प्रभाव पाडू शकलेले नाहीत. त्यांनी मंत्रिपदाच्या कार्यकाळात नागपूरसाठी काही भरीव काम केले म्हणावे तर तसेही झालेले नाही. ही कामे निवडून येण्यासाठी कामी येत नाहीत हे लक्षात आल्यामुळे त्यांनी निवडून येण्याचे तंत्र तेवढे कुशलतेने आत्मसात केले आहे. नागपूरमधील काँग्रेसच्या साऱ्या मातब्बर नेत्यांशी त्यांचे मतभेद आहेत. गेल्या वेळी तर काँग्रेसचे सारे नेते टपून बसलेले असतानाही मुत्तेमवार विजयी झाले. केंद्रात अपारंपरिक ऊर्जा हे खाते त्यांनी पाच वर्षे भूषविले, पण या खात्याचा एकही मोठा प्रकल्प मतदारसंघात ते उभारू शकले नाहीत. विलास मुत्तेमवार यांच्या दृष्टीने त्यांचे प्रगतीपुस्तक ‘प्रयत्नांनी परिपूर्ण’ असले, तरी मतदारांच्या दृष्टीने ते बहुतांश कोरे आहे. आगामी निवडणुकीत नितीन गडकरी यांच्याशी सामना करायचा असल्याने केंद्रात मंत्रिपद मिळावे ही त्यांची अपेक्षा होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपद तर दूरच राहिले पण काँग्रेस संघटनेतील सरचिटणीसपदही गेले. एका अर्थाने काँग्रेस हायकमांडने मुत्तेमवार यांना सूचक संदेश दिला आहे. आगामी निवडणूक लढण्याची त्यांची तयारी आहे.
लोकसभा मतदारसंघ : नागपूर</strong>
विद्यमान खासदार : विलास मुत्तेमवार, काँग्रेस<br />मागील निकाल : भाजपचे बनवारीलाल पुरोहित यांचा पराभव
जनसंपर्क
यशवंत स्टेडियममधील जनसंपर्क कार्यालयात जनतेला भेटतात. मंत्री असतानाही उपलब्ध होतात. कुणाचाही मोबाइलवरील कॉल स्वीकारतात. अनोळखी क्रमांकाचाही ‘मिस्ड कॉल’ दिसल्यास ते त्यावर नंतर संपर्क साधतात.
मतदारसंघातील कामगिरी :
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अ. भा. आयुर्विज्ञान संस्थेचा दर्जा
*इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (आय.आय.आय.टी.) मंजूर
*नीरीमध्ये ‘इंटरनॅशनल इनोव्हेटिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिटय़ूट’. नागपूरहून हजयात्रेला जाण्यासाठी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा
*रेल्वे स्थानकाला जागतिक दर्जा मिळवून दिला, – ‘टायगर कॅपिटल’
म्हणून नागपूरची ओळख
*मेयो रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठीही प्रयत्न, शहरात २४ रुग्णवाहिका दिल्या
*जेएनयूआरएम, २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना, आणि स्टार बससाठी पैसा आणला. आयआरडीपीमध्ये कोटय़वधी रुपयांचे रस्ते आणले
महत्त्वाचे प्रश्न :
*नागपूरच्या सुविधा विकसित करण्यासाठी विशेष आर्थिक अनुदानाची मागणी
*नागपुरातील यंत्रमाग आणि हातमाग उद्योगांच्या विकासासाठी योग्य उपाययोजनांची मागणी
*महाराष्ट्रातील प्रलंबित सिंचन प्रकल्प, गोसीखुर्द प्रकल्पाचे रखडलेले काम त्वरेने पूर्ण करण्याची मागणी
*नागपूर वैद्यकीय महाविद्यालयासाठी विशेष आर्थिक अनुदानाची मागणी तसेच नागपुरात नवे कर्करोग उपचार इस्पितळ स्थापन करण्याची मागणी
लोकसभेतील कामगिरी
६३१ प्रश्न सभागृहात उपस्थित केलेले
४३ तारांकित
५८८ अतारांकित
* रेल्वे र्थसंकल्पावर एकदा चर्चा. विशेष उल्लेख
एकूण हजेरी : २५८ दिवस (३१४ दिवसांपैकी)
प्रकल्पांचा पाठपुरावा केला
मी एकही मोठा प्रकल्प पूर्ण करू शकलो नसलो, तरी या शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मिहान, मेट्रो रेल्वे इत्यादी प्रकल्पांचा पाठपुरावा करत राहिलो. खासदाराच्या काही मर्यादा आहेत. त्याला अधिकार नाहीत आणि खासदार निधीतील पैशांचीही फक्त शिफारस करता येते. नागपुरातील वाचनालयांना २५ हजार रुपयांची पुस्तके दिली. निधीतून सुमारे १५ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केली.
विलास मुत्तेमवार काय केले
लोकांनाच विचारा!
विलास मुत्तेमवार यांनी नागपुरातून चार वेळा निवडून आल्यानंतरही काय काम केले हे तुम्ही लोकांनाच विचारा. मी त्यांचा राजकीय विरोधक आहे. त्यांच्याबाबत मी निवडणुकीच्या वेळेसच बोलेन.
बनवारीलाल पुरोहित भाजप नेते