खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले ‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा सातबारामध्ये..
पुढील रविवारी – उत्तर मुंबई, ठाणे
मतविभाजनच ठरविणार निकाल
उच्चभ्रू, झोपडपट्टी आणि मध्यमवर्गीय अशी संमिश्र वस्ती असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचे गुरुदास कामत यांना गेल्या वेळी तिरंगी लढतीचा फायदा झाला होता. ईशान्य मुंबई या आपल्या पारंपरिक मतदारसंघात वातावरण तेवढे अनुकूल नसल्यानेच कामत यांनी मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर नव्याने निर्माण झालेल्या उत्तर पश्चिम मतदारसंघाचा आधार घेतला. खासदार म्हणून मतदारसंघात त्यांनी जनसंपर्क चांगला ठेवला आहे. मतदारसंघातील मच्छीमार, आदिवासी, प्रकल्पग्रस्त, प्रवासी, सोसायटय़ांमध्ये राहणारे मध्यमवर्गीय अशा विविध स्तरांतील लोकांचे प्रश्न आणि त्यावरील संभाव्य उपाय यांचा पद्धतशीर पट मांडत कामत यांनी सर्वाना खूश करण्याचे प्रयत्न सुरू केले. यंदा मात्र त्यांना काँग्रेसविरोधातील असलेल्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे. गेल्या वेळी पराभूत झालेले शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांनी तयारी सुरू केली आहे. गेल्या वेळी मनसेच्या उमेदवाराला मिळालेली लाखभर मते ही कामत यांच्या पथ्यावर पडली होती. मतदारसंघात मुस्लीम मतांचे प्रमाण लक्षणीय असून, समाजवादी पार्टीने या मतदारसंघातून लढण्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसच्या लाटेवर कामत स्वार होतात, असा पूर्वानुभव लक्षात घेता यंदा त्यांच्यापुढे आव्हान मोठे आहे. मनसे किंवा समाजवादी पार्टी किती मतांचे विभाजन करते यावर कामत किंवा कीर्तिकर यांचे भवितव्य अवलंबून आहे. मनसेची चलती झाल्यास ते कामतांना फायदेशीर ठरणार आहे. समाजवादी पार्टीने जास्तीत जास्त मुस्लीम मतांवर डल्ला मारावा, असा शिवसेनेचा प्रयत्न राहील. एकूणच या संमिश्र वस्ती असलेल्या मतदारसंघात कोण किती मतांचे विभाजन करते यावर निवडणूक निकाल ठरणार आहे.
लोकसभा मतदारसंघ : उत्तर-पश्चिम मुंबई
विद्यमान खासदार : गुरुदास कामत (काँग्रेस)
मागील निकाल : गजानन कीर्तिकर (शिवसेना पराभूत)
जनसंपर्क
जनसंपर्कासाठी त्रिस्तरीय रचना. दर आठवडय़ाला शनिवारी आणि रविवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी अडीचपर्यंत लोकांना भेटतात. याशिवाय जनसंपर्क मोबाइल व्हॅन.
मतदारसंघातील कामगिरी :
*सरकारी शाळांना संगणक आणि ई-लर्निगची उपकरणे दिली. सीसीटीव्ही यंत्रणेसाठी ५० लाखांचा निधी दिला.
*वसरेव्यात मच्छीमारांसाठी ‘मिनी हार्बर’ प्रकल्प मंजूर
*दिंडोशीतील ११० सोसायटय़ांच्या जमिनीचे ‘टायटल क्लीअर’ करून दिले.
*आदिवासी पाडय़ातील पाणी, शौचालय, बालवाडी, सौरदिव्यांची व्यवस्था केली.
*लहान मुलांच्या खेळण्याची जागा, सुशोभीकरण करून मोकळ्या जागांचे संवर्धन.
लोकसभेतील कामगिरी
एकूण उपस्थिती – १३७ दिवस ३१२ दिवसांपैकी (कामत प्रारंभी मंत्री होते. मंत्री नोंदवहीत स्वाक्षरी करीत नाहीत. त्यामुळे नेमकी उपस्थिती स्पष्ट नाही.) विचारलेले प्रश्न – १, चर्चेत सहभाग १५ वेळा
लोकसभेतील कामगिरी
*चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्ग मंजूर करून घेतला.
*जोगेश्वरी आणि गोरेगावदरम्यान नवीन ओशिवरा रेल्वेस्थानकास मंजुरी मिळाली आहे.
*अंधेरी स्थानकाच्या नूतनीकरणासाठी निधी मिळवला.
*सीआरझेड नियमावलीतील बदलासाठी प्रयत्न.
कामतांचा जनसंपर्कच नाही
गुरुदास कामत यांनी लोकांशी फारसा संपर्क ठेवलेला नाही. खासदार निधीतून त्यांनी केलेली कामे दुय्यम दर्जाची ठरली आहेत. त्यामुळे खासदार निधीचा पैसा वाया गेला. सीआरझेडचा प्रश्न असो की पुरातन गुंफेजवळच्या लोकांना हटवण्याचा, त्यावर उपाययोजना करण्यात कामत अयशस्वी ठरले आहेत.
गजानन कीर्तिकर (शिवसेना)
प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील
मच्छीमार असोत की सोसायटय़ांचे रहिवासी, झोपडपट्टीवासी वा प्रकल्पग्रस्त असोत, सर्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले. लोकसभेत काम करण्यासाठी लोकांचे कोणते प्रश्न दिल्लीतील कोणत्या मंत्रालयात आणि कार्यालयात सोडवतात येतात हे माहिती असावे लागते. गेल्या २५ वर्षांपासून खासदार असल्याच्या अनुभवामुळे मतदारसंघातील कामे करून घेण्यात यश आले.
गुरुदास कामत