लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले तडफदार आणि लाडके उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद आजपासून दर रविवारी.. खासदारांचा
सातबारा मध्ये..
मतदारसंघाशी नाळ तुटलेले खासदार
मराठवाडय़ातील परभणी मतदारसंघ हा तसा शिवसेनेचे बालेकिल्ला. १९९८ चा अपवाद वगळता सातत्याने या मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार या मतदारसंघातून निवडून येतो. निवडून येणारे खासदार नंतर शिवसेनेचा त्याग करून काँग्रेसवासी झाल्याची परंपराच पडली. यात अशोक देशमुख, सुरेश जाधव आणि तुकाराम रेंगे-पाटील यांचा समावेश आहे. हात पोळलेल्या शिवसेनेने मग गेल्या वेळी उलटाच प्रयोग केला. काँग्रेसमधून गणेश दुधगावकर यांना गळाला लावण्यात आले आणि शिवसेनेचा भगवा हातात घेतलेले दुधगावकर हे लोकसभेत पोहचले. माजी मंत्री असलेले दुधगावकर शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आले ते ‘शिवसैनिक’ शेवटपर्यंत झालेच नाहीत. जिल्ह्य़ातील जुन्या शिवसैनिकांबरोबर त्यांचा मेळ जमलाच नाही. शिवसेनेचे आमदार जसे सातत्याने मतदारांच्या थेट संपर्कात राहतात, तसे खासदार राहत नाहीत, हे जुने दुखणे आहे. खासदार निष्क्रिय असल्याची चर्चा विरोधकांनी नव्हे तर शिवसेनेतूनच उठविण्यात आली. यातूनच दुधगावकर यांचा पत्ता कापून लोकसभेच्या निवडणुकीत स्वार होण्यासाठी शिवसेनेमध्ये आतापासूनच स्पर्धा सुरू झाली आहे. त्यात पक्षाचे दोन विद्यमान आमदारही आहेत. हे सगळे इच्छुक शिंके कधी तुटते याचीच वाट पाहून आहेत. दुधगावकर आणि शिवसैनिकांमध्ये अंतर निर्माण झाल्याने पक्ष नेतृत्वालाही उमेदवारी देताना विचार करावा लागणार आहे.
लोकसभा मतदारसंघ :
परभणी
विद्यमान खासदार :
अॅड. गणेश दुधगावकर (शिवसेना)
मागील निकाल :
राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश वरपूडकर यांचा पराभव.
जनसंपर्क
परभणीत संपर्क कार्यालय आहे. खासदारांशी संपर्क होत नाही, अशी तक्रार शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीच संपर्कप्रमुखांसमोर
केली होती.
मतदारसंघातील कामगिरी :
*परभणी, पूर्णा या दोन्ही रेल्वेस्थानकांचा ‘आदर्श रेल्वेस्थानक’ यादीत समावेश करण्याबाबत पाठपुरावा; सेलू, मानवत रस्ता, परतूर, पोखर्णी व गंगाखेड रेल्वेस्थानकांचा मॉडर्न रेल्वेस्थानकांच्या यादीत समावेश.
*२२२ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गासाठी ३५ कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता.
*परभणी-मुदखेड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचा पाठपुरावा; परभणी-मनमाड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणास मान्यता.
*माजलगाव उजवा कालव्याच्या १६ वर्षांपासून रखडलेल्या कामाला चालना, त्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध.
*लोअर दुधना प्रकल्पासाठी ‘एआयबीपी’ या योजनेंतर्गत ४५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त.
*परभणी व जालना या दोन्ही जिल्ह्य़ांच्या ठिकाणी केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याचे काम मार्गी.
महत्त्वाचे प्रश्न :
*राज्यातील तीव्र दुष्काळाचा प्रश्न सोडविण्यासाठी निधीची मागणी. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याची मागणी
*परभणी मतदारसंघातून जाणारा
राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ तसेच नांदेड-औरंगाबाद महामार्ग चौपदरी
करण्याची मागणी
*अवकाळी पावसामुळे शेतमालाची हानी झालेल्या मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी
लोकसभेतील कामगिरी
ळ६७ प्रश्न सभागृहात उपस्थित केलेले
४० तारांकित
३२७ अतारांकित
* ५ वेळा लोकसभेतील चर्चेत सहभाग.
एकूण हजेरी : २८९ दिवस (३१४ दिवसांपैकी)
विकासाच्या मुद्दय़ांवर भर
मराठवाडा विकास आंदोलनात विकासाचे जे मुद्दे ऐरणीवर होते, तेच मुद्दे प्राधान्याने जोर देऊन सोडविण्याचा आपला प्रयत्न आहे. सिंचन, औद्योगिक विकास या क्षेत्रातील कामासाठी कृषी प्रक्रिया उद्योग हेच उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवले आहे. राष्ट्रीय महामार्गासह वाटूरफाटा ते जिंतूर रस्त्याचे चौपदरीकरण आणि रेल्वेस्थानकाचे अद्ययावतीकरणाचे काम यामुळे दळणवळणाच्या मोठय़ा संधी उपलब्ध झाल्या आहेत.
अॅड. गणेश दुधगावकर
सर्वाधिक निष्क्रिय खासदार
‘निष्क्रिय खासदार’ अशीच या खासदारांची ओळख आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेत रस्त्याची जी कामे चालली आहेत, ती सर्व जुनी आहेत. रेल्वे अर्थसंकल्पात किंवा इतर तरतुदींमधून जे पदरात पडले, त्यासाठी कोणताही पाठपुरावा त्यांनी केला नाही. अशा कामांचे श्रेय त्यांनी घेऊ नये.
विजय भांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>