लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले तडफदार आणि लाडके उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद आजपासून दर रविवारी.. खासदारांचा
सातबारा मध्ये..
मतदारसंघाशी नाळ तुटलेले खासदार
मराठवाडय़ातील परभणी मतदारसंघ हा तसा शिवसेनेचे बालेकिल्ला. १९९८ चा अपवाद वगळता सातत्याने या मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार या मतदारसंघातून निवडून येतो. निवडून येणारे खासदार नंतर शिवसेनेचा त्याग करून काँग्रेसवासी झाल्याची परंपराच पडली. यात अशोक देशमुख, सुरेश जाधव आणि तुकाराम रेंगे-पाटील यांचा समावेश आहे. हात पोळलेल्या शिवसेनेने मग गेल्या वेळी उलटाच प्रयोग केला. काँग्रेसमधून गणेश दुधगावकर यांना गळाला लावण्यात आले आणि शिवसेनेचा भगवा हातात घेतलेले दुधगावकर हे लोकसभेत पोहचले. माजी मंत्री असलेले दुधगावकर शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आले ते ‘शिवसैनिक’ शेवटपर्यंत झालेच नाहीत. जिल्ह्य़ातील जुन्या शिवसैनिकांबरोबर त्यांचा मेळ जमलाच नाही. शिवसेनेचे आमदार जसे सातत्याने मतदारांच्या थेट संपर्कात राहतात, तसे खासदार राहत नाहीत, हे जुने दुखणे आहे. खासदार निष्क्रिय असल्याची चर्चा विरोधकांनी नव्हे तर शिवसेनेतूनच उठविण्यात आली. यातूनच दुधगावकर यांचा पत्ता कापून लोकसभेच्या निवडणुकीत स्वार होण्यासाठी शिवसेनेमध्ये आतापासूनच स्पर्धा सुरू झाली आहे. त्यात पक्षाचे दोन विद्यमान आमदारही आहेत. हे सगळे इच्छुक शिंके कधी तुटते याचीच वाट पाहून आहेत. दुधगावकर आणि शिवसैनिकांमध्ये अंतर निर्माण झाल्याने पक्ष नेतृत्वालाही उमेदवारी देताना विचार करावा लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा