अभिजित बेल्हेकर

पाऊस आल्याची पहिली वर्दी घाटमाथ्यांना मिळते. पश्चिमेकडून पाऊस घेऊन निघालेले ढग या घाटमाथ्यावर विसावतात आणि वैशाख वणव्याने होरपळून निघालेली भूमी असंख्य जलधारांनी न्हाऊन निघते. पाहता पाहता त्या उघडय़ाबोडक्या डोंगरकातळावर हरिततृणांची मखमल चढते आणि त्याला साज चढवत पांढरेशुभ्र धबधबे रानीवनी धावू लागतात, ढगाच्या दुलईने दरीखोरी भरून जातात, जणू साऱ्या घाटातच पाऊस भरून राहतो. वर्षांकाळी सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून धावणाऱ्या प्रत्येकच घाटवाटेवरचे हे दृश्य! पण यातही घनदाट वनसंपदेचे कोंदण मिळालेल्या ताम्हिणी घाटाचे सौंदर्य थोडे जास्त भुरळ पाडणारे!

50 lakh fake notes seized in Mira Road vasai news
मिरा रोड मध्ये ५० लाखांच्या बनावट नोटा जप्त; गुजराथ मधील तरुणाला अटक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
uran karanja road potholes
उरण-करंजा मार्गाची दुरवस्था कायम
Garbage piles up in various places in the city due to the recruitment of election workers Mumbai news
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; निवडणूक कामातील कामगारांच्या नियुक्त्यांमुळे कचरा व्यवस्थापनाची घडी विस्कटली
bjp leader ashish shelar article allegations on shiv sena ubt for plot grab in dharavi
पहिली बाजू : भूखंड खादाडांचा डाव उद्ध्वस्त
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका

पुण्या-मुंबईहून ताम्हिणी घाट साधारण शंभर किलोमीटरवर! या घाटावरच्या ताम्हिणी गावावरून हे नाव पडले. पुण्याहून मुळशीमार्गे तर मुंबई-कोकणातून कोलाड नाहीतर माणगावमार्गे या घाटात येता येते. कुठूनही आलो तरी या घाटवाटेचे सौंदर्य ती येण्यापूर्वीच सुरू होते. पंचवीसएक किलोमीटरची ही घाटवाट आणि तिच्यावरचा हा प्रवास! डोंगरदऱ्यांचा प्रदेश, त्यावरील दाट जंगल, छोटय़ाशा टुमदार वाडय़ावस्त्या आणि मुख्य म्हणजे मुळशी धरणाच्या चमचमत्या पाण्याची सोबत, यामुळे मन गुंतवणारा ठरतो.

हेही वाचा >>> गोविंदा आला रे..

कुणी इथे जंगलात फिरण्यासाठी येतो, कुणी इथे घनगड, तेलबैला, कैलासगडाच्या दुर्गम वाटा चढतो. तर अनेक जण निव्वळ या घाटवाटेवर भटकण्यासाठी म्हणूनही येतात. घनदाट जंगल, डोंगरदऱ्या, जलाशयाची सोबत, यामुळे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अशा तिन्हीही ऋतूत या वाटेचे सौंदर्य हे नवनूतन असते.

उन्हाळय़ात ही वाट भोवतीच्या जंगलाने सुखावते, लागून असलेल्या जलशयामुळे थंडावा देते. हिवाळय़ात ती धुक्यात बुडून जाते. तर पावसाळय़ात ती रानफुलांप्रमाणे चैतन्य घेऊन उमलते. ज्यांना ताम्हिणीचे खरे सौंदर्य पाहायचे असेल त्यांनी वर्षांकाळी इकडे यावे. लय-ताल धरलेल्या पावसात या घाटवाटेच्या भवतालात फिरावे. चिंब भिजलेल्या या वाटेवर तुम्ही कधी हरवून जाल ते कळणारही नाही. पुण्याहून निघालो आणि वाटेवरील मुळशी धरणाची भिंत ओलांडली की ताम्हिणीच्या या पाऊसभरल्या प्रदेशाची जाणीव होते. हिरव्या-पोपटी रंगाची भातखाचरे, त्याच रंगात बुडालेल्या डोंगरदऱ्या, त्यातून धावणारे फेसाळ धबधबे आणि ढगांमध्ये बुडालेला उजव्या हाताचा मुळशी जलाशय! या पहिल्या दृश्याने, पावसापूर्वीच भिजायला होते!

ही ओली वाट पुढे सरकते, तशी पावसाची वेगवेगळी रूपे आपल्यापुढे अवतरतात. निसर्गाच्या या सौंदर्याला मुळशी, पळशी, ताम्हिणी, डोंगरवाडी, आदरवाडी अशा छोटय़ा घरांच्या वाडय़ावस्त्या झालर लावतात.  मुळशी धरणाची साथ जिथे संपते तिथे दोन्ही बाजूला डोंगर सुरू होतात आणि त्याबरोबर हिरवाईची रूपेही गडद होतात. मध्येच काळय़ापांढऱ्या ढगांचे पुंजके या हिरवाईवर नक्षी भरू लागतात. हळूहळू या ढगांची दाटी एवढी होते की डोंगर, दरी, झाडी आणि आपली वाटही त्यात बुडून जाते. ढगांची ही आपल्याभोवतीची मिठी सैल होते तोवर तो पाऊस नगारा वाजवत चहूदिशांनी उधळत येतो. निसर्गाची ही सारी दृश्ये आणि खेळ मनाचा गोंधळ उडवतात.

हेही वाचा >>> कुतूहल: प्रवाळांच्या वाढीसाठी आवश्यक घटक

अशा या चैतन्यभारल्या वाटेवरच्या प्रत्येक वळणावर येणारा खळाळता धबधबा तन-मन भिजवू लागतो. पहिल्यापेक्षा पुढचा निराळा! या धबधब्यांनाही विशिष्ट असा नाद! हा नाद कानी गुंजू लागला, की सगळा घाटच जणू या धबधब्यांनी भरून आणि भारून गेल्यासारखा वाटू लागतो.

ताम्हिणी घाटाच्या अलीकडे वांद्रे गावातून लोणावळय़ाकडे एक वाट निघते. या वाटेलगत सह्याद्रीचे कडे अधिक उंच-खोल होत जातात. त्याच्या त्या उंचीवरून त्या जलधाराही तितक्याच वेगाने खाली कोसळत त्यांचे भय दाखवतात. कोसळणाऱ्या पाण्याला जसे सौंदर्य तसेच त्याच्या रौद्रतेचे भयदेखील!

वांद्रे फाटय़ानंतर डोंगरवाडी आणि कोंडघर गावे येतात. वाट घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरते. पाऊस अधिक तीव्र होतो. बोचू लागतो. तो ओसरला की मध्येच पुन्हा ढग संचारतात. ढगांमध्ये हरवलेल्या या अवस्थेतच एका वळणावर ताम्हिणी घाटाची खिंड येते. दोन कडय़ांमध्ये असलेले हे जणू कोकणाचे द्वार! समोरची सारी दरी ढगांनी भरलेली असते. या ढगांना हटवत पावसाची एक मोठी सर पुन्हा वाजत येते. ती ओसरताच काही क्षणांची लख्ख उघडीप मिळते. त्या अद्भूत अंतराळात अवघे कोकण हिरवाईने नटून लख्ख होत पुढय़ात उभे राहते.

ऐन घाटमाथ्यावर डोंगरदऱ्यांमध्ये अडकलेली ही हिरवाई इथे व्यापक-भव्य रूप घेऊन प्रगटते. दूरदूरवरचे डोंगर, तळातली भातखाचरे, खळाळत निघालेले ओढे-ओहोळ, नद्या-नाले हे सारेच या वर्षांऋतूत रंग भरत पुढय़ात अवतरतात. इकडे ऐन घाटावरच्या त्या कोकणकडय़ावर लहानमोठय़ा धबधब्यांच्या असंख्य माळा सह्याद्रीला जलाभिषेक घालत असतात. ताम्हिणी घाटाच्या सौंदर्याचा हा अत्युच्च क्षण असतो. त्याला किती साठवू आणि किती नाही असे होते. हे सारे पाहत असतानाच डोंगरदऱ्यांच्या त्या खेळावर पुन्हा ढगांचे आच्छादन चढत जाते. पुन्हा सारे धूसर..मग पुन्हा थोडय़ा वेळाने पाऊस! ..ढग-पावसाच्या या खेळात ताम्हिणी घाट चिंब भिजत असतो आणि इकडे आपले मन ओले होत असते !

कसे जाल?

’ पुणे-मुंबईहून ताम्हिणी घाट अंतर १०० किमीवर आहे.  पुण्याहून मुळशीमार्गे तर मुंबई-कोकणातून कोलाड नाहीतर माणगावमार्गे ताम्हिणी घाटात येता येते.  मुंबईकडून येताना मुंबई पुणे महामार्गावर लोणावळा येथे बाहेर पडावे लागते. लोणावळय़ापासून  अ‍ॅम्बी व्हॅली  रस्त्याने ताम्हिणी घाटाकडे जाता येते.

खबरदारी काय घ्याल?

’ ताम्हिणी घाटाच्या भवतालात डोंगर-दऱ्यांमध्ये फिरताना संपूर्ण माहिती किंवा माहीतगार सोबत असावा.

’ पाऊस, ढग, वारा यामध्ये डोंगरझाडीत हरवण्याचा धोका.

’ धबधब्याच्या पाण्याचा वेग आणि निसरडय़ा जागांमुळे अनेकदा अपघात घडतात. abhijit.belhekar@expressindia.com