संपदा सोवनी
औषधांचा शरीरातील चयापचय यंत्रणेवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करणाऱ्या डॉ. सुनीती धारवाडकर. ‘पोस्ट डॉक्टरल’ अभ्यासासाठी फ्रान्स सरकार आणि अमेरिकेतील विद्यापीठाकडून फेलोशिप मिळाल्यावर त्यांनी कर्करोगजन्य प्रदूषक आणि त्यांच्याशी निगडित शरीरात होणाऱ्या बदलांच्या जैविक परिणामांवर संशोधन केले. त्या काळात मराठवाडय़ातील स्त्रीने फेलोशिप मिळवून परदेशी जाणे हा एक विक्रमच होता. जीवरसायनशास्त्रात अध्यापन, संशोधन व विज्ञान प्रसार या तिन्ही क्षेत्रात कार्य करणाऱ्या, संशोधनाचा उपयोग समाजाला होण्याच्या या दृष्टीने प्रयोग करत राहाणाऱ्या डॉ. सुनीती धारवाडकर आहेत, यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा’.
विज्ञान संशोधन करताना ते पुढे विविध प्रकारे समाजाला प्रत्यक्ष कसे उपयोगी पडू शकेल, हा विचार करणे फार आवश्यक असते. ही सामाजिक बांधिलकी डोक्यात ठेवतानाच एकंदरीतच विज्ञानाची आवड आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवण्यासाठी आपल्या परीने योगदान देणे हे प्रेरणादायी आहे. हे प्रयत्न आहेत डॉ. सुनीती धारवाडकर यांचे.
डॉ. सुनीती धारवाडकर यांचा जन्म सोलापूरचा, परंतु त्यांचे शिक्षण औरंगाबादला झाले. घरात शिक्षणाचे वातावरण होते, तरी प्रत्यक्ष विज्ञान संशोधनात कुणी काम करत नव्हते. सुनीती लहानपणापासूनच हुशार विद्याíथनी. अगदी त्यांचे मॅट्रिकदेखील वयाची १५ वष्रे पूर्ण होण्याआधीच पूर्ण झाले होते. वैद्यकीय क्षेत्र की मूलभूत विज्ञान, यात त्यांनी मूलभूत विज्ञानाची निवड केली आणि विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. त्यांनी रसायनशास्त्र या विषयात प्रथम क्रमांकाने पदवी मिळवली आणि त्या वेळी नवीन असलेला जीवरसायनशास्त्र हा विषय पदव्युत्तर शिक्षणासाठी निवडला. यातही त्यांना ‘डीएनए’, मेटॅबॉलिझम’- अर्थात चयापचय यंत्रणा आणि उत्क्रांती या विषयांत खास रस होता. त्यामुळे त्यांनी १९७७ मध्ये ‘पीएच.डी.’साठी ‘ड्रग मेटॅबोलायिझग सिस्टीम’ म्हणजे औषधांची चयापचय यंत्रणा अभ्यासणारा विषय घेतला. औषधे विकसित करताना औषधांच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी अशी संशोधने उपयुक्त ठरतात. त्यांच्या या संशोधनात असाही निष्कर्ष निघाला, की आहारातील प्रथिने आणि ‘ए’, ‘सी’ आणि ‘ई’ जीवनसत्त्वे यांचा औषधे आणि कर्करोगास कारणीभूत ठरू शकतील अशा परकीय पदार्थाच्या चयापचय यंत्रणेवर सकारात्मक परिणाम दिसून येतो. हे संशोधन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाले.
आपल्या देशात सर्वच ठिकाणी अद्ययावत वैज्ञानिक उपकरणे शास्त्रज्ञांना मिळतीलच असे नाही. यावरही औरंगाबादमध्ये काम करणाऱ्या डॉ. सुनीती आणि त्यांच्या चमूने उपाय शोधला. त्यांच्या संशोधनात लागणारे ‘अल्ट्रासेंट्रिफ्यूज’ हे आधुनिक उपकरण उपलब्ध नसताना त्यांनी त्याला पर्यायी अशी पद्धत विकसित केली आणि संशोधन सुरू ठेवले.
याबरोबरच डॉ. सुनीती यांनी अध्यापन क्षेत्राची निवड करून त्या औरंगाबादमधील ‘स. भु. विज्ञान महाविद्यालया’त ‘जीवरसायनशास्त्र’ शाखेच्या विभागप्रमुख म्हणून काम करू लागल्या. पुढे त्यांनी संशोधन मार्गदर्शक म्हणूनही काम केले. त्या सामान्य नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवू पाहाणाऱ्या ‘लोकविज्ञान’ संघटनेमध्येही काम करू लागल्या आणि अध्यापन, संशोधन व विज्ञान प्रसार या तिन्ही क्षेत्रात कार्य करू लागल्या. प्रयोगशाळेबाहेर आणि सामान्य जीवनाशी निगडित संशोधन फार महत्त्वाचे आहे, हा विचार त्यांनी वारंवार मांडला. विज्ञानविषयक जाणीव जागृतीसाठी निरनिराळे उपक्रम आयोजित करण्यात त्या पुढाकार घेऊ लागल्या.
त्यांना ‘पोस्ट डॉक्टरल’ अभ्यासासाठी फ्रान्स सरकार आणि त्यानंतर अमेरिकेतील विद्यापीठाकडून फेलोशिप मिळाली. त्या काळात मराठवाड्यातील स्त्रीने या प्रकारच्या फेलोशिप मिळवून परदेशी जाणे हा एक विक्रमच होता, कारण मुळातच त्या काळी स्त्रियांचा संशोधनात असलेला सहभाग आताच्यापेक्षा खूप कमी होता. परदेशात डॉ. सुनीती यांनी कर्करोगजन्य प्रदूषक आणि त्यांच्याशी निगडित शरीरात होणाऱ्या बदलांचे जैविक परिणाम याविषयी संशोधन केले. कर्करोगाची जैविक प्रक्रिया काय असते याचा शोध घेण्यासाठी आणि रासायनिक पदार्थाची जैविक विल्हेवाट कशी होते हे जाणून घेण्यासाठी या संशोधनाचे मोल आहे.
त्यानंतरही डॉ. सुनीती संशोधन आणि मार्गदर्शनात सक्रिय राहिल्या. त्याबरोबर प्रयोगशाळेबाहेरील संशोधनातही त्या कार्यरत राहिल्या. मूत्रिपडाच्या आजारात ‘ग्लायकेटेड हिमोग्लोबिन’चे (अर्थात ऌुअ1ू) प्रमाण आपल्याला त्या रोगाची स्थिती समजण्यासाठी उपयोगी पडते, शिवाय एकंदर आरोग्यासाठी आणि हृदयरोगाच्या प्रतिबंधासाठी ‘ए’, ‘ई’ आणि ‘सी’ जीवनसत्त्वे महत्त्वाची ठरतात, हे त्यांच्या संशोधनातून दिसून आले. उच्च रक्तदाबासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक औषधांचा आणि ‘एसीई रिसेप्टर’ या विकराचा तुलनात्मक अभ्यास हाही त्यांच्या संशोधनाचा एक घटक होता. कारले, दुधी भोपळा, आले, काकडी, भेंडी, टोमॅटो अशा भाज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात ‘प्रतिऑक्सिडंट’ गुणधर्म असतात आणि कर्करोग व मधुमेहासारख्या आजारांमध्ये त्यांचा कसा उपयोग होतो, हे त्यांनी अभ्यासले. औरंगाबाद शहरातील औद्योगिक परिसरातील पाण्याचे प्रदूषण, दुग्ध उद्योगांमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे प्रदूषण, थर्मल पॉवर स्टेशनचे राखयुक्त प्रदूषण, अशा प्रदूषणाच्या जैवरासायनिक परिणामांचा अभ्यास करत या सगळ्याचे आरोग्यावर होत असलेले दुष्परिणाम त्यांनी अभ्यासले. आपण करतो त्या संशोधनात सामाजिक स्वास्थ्याचा विचार असावा, याचे भान त्यांनी कायम राखले.
सामाजिक-पर्यावरणीय अभ्यासामध्ये त्यांनी वाहतूक पोलिसांचे वाहन-वायू प्रदूषणाविषयीचे आकलन समजून घेण्यासाठी त्यांना प्रश्नावली दिल्या. त्यांच्या विश्लेषणाचा अभ्यास करून वाहतुक पोलिसांच्या आरोग्यावर होणारे प्रदूषणाचे दुष्परिणाम, त्यावरच्या उपाययोजना यांची माहिती देणारी एक पुस्तिका डॉ. सुनीती यांनी लिहिली. ती पोलीस आयुक्त कार्यालयाने प्रकाशितही केली.
त्यांना जीवरसायनशास्त्र विषयातील कार्यासाठी विविध सन्मान मिळाले आहेत. १०६ प्रकाशित संशोधन साहित्य- म्हणजे शोधनिबंध, लेख इत्यादी. यांसह त्यांनी १३० हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांची विज्ञानविषयक ११ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वृत्तपत्रे, आकाशवाणी, मासिके या माध्यमांतूनही विज्ञान प्रसारासाठी त्या लेखन व कार्यक्रम करत असतात.
‘संयम बाळगा आणि स्वतवर विश्वास ठेवा. आपली ऊर्जा योग्य दिशेने वापरली आणि वैज्ञानिक अनुभवांना सामोरे जायची तयारी आणि उत्साह कायम ठेवला, तर आपले ध्येय नक्की साध्य करता येईल,’ अशी प्रेरणा त्या संशोधनात नव्याने येऊ पाहाणाऱ्या मुलींना देतात. विज्ञानप्रवासात कुटुंबाची आणि जीवनसाथीची भरभक्कम साथ मिळणे फार गरजेचे असते, हे मोठ्या प्रमाणावर होऊ लागले तर स्त्रिया आणखी मोठ्या संख्येने संशोधनात येतील, असा त्यांचा आशावाद आहे. आपल्या संशोधनात समाजाचा विचार करण्याबरोबरच विज्ञान प्रसारासाठी मोठे कार्य करणाऱ्या डॉ. सुनीती धारवाडकर यांना पुढील प्रवासासाठी ‘लोकसत्ता’तर्फे शुभेच्छा!
संपर्क: डॉ. सुनीती धारवाडकर sunitidharwadkar@gmail.com
sampada.sovani@expressindia.com
मुख्य प्रायोजक : ग्रॅव्हिटस फाऊंडेशन
सहप्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सिडको, व्ही. पी. बेडेकर अॅँड सन्स प्रा. लि. तन्वी हर्बल्स , टीजेएसबी सहकारी बॅँक लि.
पॉवर्ड बाय : व्ही. एम. मुसळूणकर ज्वेलर्स , दि न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड जमीन प्रा. लि.
टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा